चिं. मो. पंडितांच्या लेखाच्या निमित्ताने

(१)संगणक माझ्या मेंदूसारखा, बुद्धीसारखा आहे का?
काही बाबतीत तरी असावा. त्याला काही प्रकारची स्मरणशक्ती असते. ज्या गोष्टी तो ‘लक्षात ठेवतो त्यांना काही क्रमाने मांडणेही संगणकाला जमते. अशा क्रमांचे ढोबळ अर्थही तो लावू शकतो. उदाहरणार्थ, जर संगणकात वेगवेगळ्या माणसांची वये आणि वजने नोंदली, तर तोवयानुसार नोंदी करून प्रत्येक वयाच्या माणसांची सरासरी वजने काढू शकतो, ती क्रमाने मांडू शकतो, आणि वयानुसार (सरासरीने) वजन कसे बदलत जाते याचे गणिती समीकरणही शोधू शकतो – हे सारे मीही करू शकतो. मात्र –
मला वय हे मूळ’ व वजन हे त्यावर अवलंबून’ हे सुचते. संगणकाला ते सुचेलच याची खात्री नाही. पण मी गणिती ‘प्रतिकृती’, तार्किक प्रतिकृती या कल्पनांशी परिचित आहे. असा परिचय नसलेलीही खूप माणसे असतात, आणि त्यांनाही दोन घटकांपैकी मूळ काय, अवलंबित काय हे सुचेलच असे नाही. म्हणजे संगणक आणि माणसांची बुद्धी यांच्यात काही बाबर्तीत तरी साम्ये आहेत.
(२)या साम्यांमध्ये ‘भाषा’ येते का? मी शब्द किंवा कागदावरील चिन्हे वापरून माझे मत दुसन्यापर्यंत पोचवतो, पण संगणक म्हणे विद्युतस्पंदनांनी काय ते करतात. म्हणजे त्यांची भाषा माझ्या भाषेपेक्षा वेगळी आहे, नाही का?
माझे तमिळ मित्र एकमेकांशी तमिळ बोलतात तेव्हा मला फक्त ध्वनिलहरी ऐकू येतात. त्यांची पत्रे मी पाहतो तेव्हा मला फक्त कागदांवरील चिन्हे दिसतात. त्यांचेही मराठी संभाषणे ऐकताना व पत्रव्यवहार ‘पाहताना’ असेच होते. दुसरे म्हणजे माझे वैद्य मित्र सांगतात की माणसांच्या मेंदूमध्येही संगणकांसारखी विद्युतस्पंदनेच इकडेतिकडे जातात, आणि त्यातूनच ‘विचार’ होतो! बरे, संगणकांच्या आत काय व्हायचे असेल ते असो, पण बाहेर मात्र व्हिडिओ पडद्यावरील चिन्हे म्हणजे अक्षरेच दिसतात. माझ्या मेंदूतही काय व्हायचे ते होवो, मला कागदावर चिन्हेच काढावी लागतात. म्हणजे आपली ‘नेहमीची’ भाषा जशी दुसर्यााला ‘यावी लागते नाहीतर दुभाष्या लागतो – तशीच संगणकाची भाषा आपल्याला व आपली भाषा त्याला यावी लागते. पण ध्वनी व चिन्हांनी ‘म्हणणे’ दुसन्याला कळवणे व दुसन्याच्या ध्वनि-चिन्हांचा अर्थ लावणे माणसेही करतात, संगणकही करतात.
(३)संगणकांना म्हणे ज्याला काही तर्कशुद्ध रचनाक्रम आहे, जे निर्णयप्रक्रियांमध्ये (algorithms मध्ये) मांडता येते, तेवढेच कळते. आपले मात्र वेगळे आहे, कारण आपण ऐकतो त्यातले निवडून, त्यावर काय प्रक्रिया करायची ते ठरवून मगच विचार करतो. यात काटेकोर अॅलगॉरिदम नसले तरी चालतात. हा तर फरक आहेच ना, संगणक आणि माणसांमध्ये?पंडितांनी एक उदाहरण दिले आहे टेलिफोन-डिरेक्टरीचे. यात नावे-अकारविल्हे नोंदली की त्यांची माहिती होते. पण नावे, अकारविल्हे का नोंदायची नावे, भौगोलिक विभाग का नाही पाडायचे?भौगोलिक विभाग पाडायचेच आणि एका विभागात (शहरात) नोंदी अकारविल्हे नोंदायच्या! ही एक निर्णयप्रक्रियाच आहे, अॅलगॉरिदमच आहे! आपणही अशी सूत्रेच वापरतो.
तुम्ही म्हणाल, हे टेलिफोन-डिरेक्टरीचे ठीक आहे, पण देशभक्तीचे काय? प्रेमाचे काय? माणसांच्या आध्यात्मिक ऊर्मीचे काय?याला एक उत्तर आहे की या बाबी निर्णयप्रक्रियांमधून घडत नाहीत. या बाबी उद्भवायला ‘आत्मा’ लागतो.
पण दुसरेही एक उत्तर आहे – या बाबींमागेही काही निर्णयप्रक्रिया आहेत, पण त्या आपल्या आपणच ओळखू शकलेलो नाही. जरा उडी मारू
(४) पंडित रॉजर पेनरोजने केलेली मानवी आणि संगणकीय निर्णयांची एक तुलना देतात. हा जो कोण पेनरोज आहे, (गणितज्ञ, त्याचप्रमाणे भौतिकीतली आणि तत्त्वज्ञानातली एक अधिकारी व्यक्ती), तो नक्कीच माझ्यासारखा भारतात ‘ठेकेदारी करणारा नव्हता. ‘तो’ अनुभव जर त्याच्या गाठीशी असता, तर त्याने खालील विधाने केली नसती –
(क) माणसे योग्यायोग्यतेचा व्यावहारिक विचार करतात!
(ख) माणसे सत्यासत्य, न्यायान्याय जाणून नैतिक मूल्ये जोपासतात!
(ग) माणसे समजून-उमजून काम करतात!
(घ) माणसे बटबटीत, दुष्टहेतुपूर्वक, हेंगाड़ी कामे करत नाहीत!! कोणत्या जगात राहतो हा पेनरोज?एक मात्र खरे की मानवी निर्णयांमध्ये ‘अहंकार’ लागतो. खरे तर इथे अहंकारापेक्षा जास्त योग्य शब्द आहे ‘आत्मभान’. माणसांनी नोंदीची माहिती करताना, माहितीचे ज्ञान करताना ‘मला’ काय हवे/’मला’ काय नको हे ठरवायच्या काही खास निर्णयप्रक्रिया वापरलेल्या असतात. म्हणजे निर्णय घेणान्याचा निर्णयावर परिणाम होत असतो. या निर्णय घेणार्या्ला इतिहास असतो, अनुभव आलेले असतात, मुळात काही क्षमता असतात, आणि या सा-यांतून ‘मी’ची जाणीव झालेली असते. ‘स्व’ आला, ‘मी’ आला, की स्वार्थ, अहंकार सारेच आले.
संगणकांना आज तरी हे सारे नाही. माणूस एका चारेक अब्ज वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून घडला आहे. संगणकांचा इतिहास पन्नासेक वर्षांचा आहे. माणूस निसर्गाच्या पार्श्वभूमीवर घडला आहे, तर संगणक प्रयोगशाळा-कार्यशाळा अशा नियंत्रित वातावरणात. माणूस ‘टिकायला’, ‘तगायला’ घडला, आणि यासाठी स्वार्थ, अहंकार, आत्मभान, मूल्यविचार वगैरे लागते. संगणकाला घडवले गेले आहे, आणि संरक्षण देऊन टिकवायची पद्धत आहे.
– जरा वेगळ्या दिशेने पाहू
(५)मेंदूचा शरीरशास्त्रीय अभ्यास खूप तपशिलात झाला आहे. मृत माणसांचे मेंदू तर ‘सोलले गेले आहेतच, पण जिवंत माणसांच्या मेंदूचाही ‘स्वस्थ’ आणि ‘इजा झालेल्या स्थितीत बराच अभ्यास झाला आहे. मेंदूत अशी एकही रचना सापडलेली नाही, की जिचे कार्य संगणकांकरवी करून घेता येत नाही.
एक मात्र खरे, की मेंदूची क्लिष्टता आजच्या अति-महा-बहुशक्तिमान (!) संगणकांच्यापेक्षा लक्षावधी पटींनी जास्त आहे.
(६) आता देशभक्ती, प्रेम, आध्यात्मिक ऊर्मीबद्दलचे दुसरे उत्तर देऊ- अत्यंत क्लिष्ट, बहुआयामी, बदलत्या परिस्थितीशी अनुरूप घडलेल्या मेंदूत फक्त संगणकांमधल्यासारख्या रचना अपार क्लिष्ट रूपांत साठवलेल्या आहेत. आणि या जातीच्या क्लिष्टतेमध्ये अनपेक्षित वाटणाच्या गुणधर्माचा उद्भव होऊ शकतो, असे विज्ञानात वारंवार आढळले आहे. (Complexity has repeatedly given rise to unexpected emergent characteristics in scientific studies.) त्यामुळे संगणकीय रचनांपेक्षा वेगळे काही सापडत नाही तोपर्यंत (तरी) ‘आत्मा’ न मानता आत्मभानालाही, जाणिवेलाही, ‘बुद्धी’लाही एक रंगरूपासारखा पण जास्त क्लिष्ट गुणधर्म मानावे!
‘आत्मा’ या नामकरणाने ज्या गुणधर्माला आपण ‘गौरवतो, त्या नामकरणाने काहीही नवे ज्ञान मिळत नाही, किंवा नवे ज्ञान कमावणे सोपे होत नाही. अशा संकल्पनेला नाव देण्याने (reification) काही साधत नाही, तर नाव ठेवा कशाला?त्याऐवजी येवढेच म्हणावे की मेंदूसुद्धा संगणकासारखा आहे, पण तो खूपच क्लिष्ट, खूपच विविधआयामी परिस्थितीसाठी घडला आहे. म्हणून त्याच्या निर्णयप्रक्रिया आपल्याला समजत नाहीत व आपल्याला वाटते की संगणक तर्कशुद्ध, तर मेंदू ‘ठोकून देतो ऐसाजे’ असा काही फरक आहे.
मेंदूही तर्ककठोर, तर्ककर्कशच. पण मेंदूमेंदूमध्ये फरक खूप. अनुभवांमध्ये फरक खूप. त्यातून घडलेल्या तर्कशृंखला वेगवेगळ्या, आणि अपार क्लिष्ट. म्हणून भावना (देशभक्ती इ.इ.) तर्कबाह्य ‘वाटतात’. पण ही आपली मर्यादा आहे. मेंदूचा हा विशेष गुण मानण्याजोगे काहीसापडलेले नाही.
(७) आणि संगणक तर आज अगदी प्राथमिक अवस्थेत आहेत. बुद्धिबळासारख्या नियमबद्ध, तर्कबद्ध व्यवहारातही संगणकांना चकवता येते, हे गॅरी कॅस्पारॉव्हने दाखवून दिले आहे – यावर मागेआजच्या सुधारकात लेखही आला आहे. कविता, कादंबर्याे याबाबतीत संगणक आत्मभान असलेल्या निर्मितिक्षमतेच्या जवळही नाही –व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्दसंच, यमके वगैरे संगणक जुळवू शकतात – पण ते काव्य नव्हे. मोठमोठे, अनुभवी, विद्वान भाषातज्ज्ञही काव्य करू शकतातच असे नाही, तिथे संगणकाची काय कथा?काव्यरचना आणि काव्यसेवन’ यांच्या अॅलगॉरिदम्ज अजून कुणाला स्पष्टपणे नोंदता आलेल्या नाहीत. अशा अॅलगॉरिदम्ज असतील, पण त्यांच्यात स्थलकाल, सामाजिक घटक वगैरेंचे इतके प्रभुत्व असेल की त्यांची स्पष्ट नोंद माणसांना करता येणे अशक्यच दिसते. खरे तर अगदी गणिती मांडणी शक्य असलेल्या क्षेत्राच्या गाभ्याजवळसुद्धा संगणक आज जाऊ शकत नाहीत. अगदी वरवरची क्षेत्रेच संगणकांच्या क्षमतेत बसतात.
(८)अर्थातच या क्षमता वाढवायला संगणकशास्त्री झटतातच. जसे, नेमकेपणाऐवजी संभाव्यतेचा (probabilities) विचार संगणकांमार्फत करू शकणारे ‘धूसर तर्कशास्त्र’ (fuzzy logic) घडवता आले आहे. कधी जर वेगवेगळ्या तर्कमालिका वापरून उत्तरे काढणे शक्य असेल,
तर ‘समांतर प्रक्रिया’ (parallel processes) करता येतात.
पंडितांच्या लेखात यासाच्याकडे पाहण्याचा सूर निराशावादी आहे. संगणकांना ‘व्यक्तिरूप देऊन, आक्रमक मानून जणू काही ती यंत्रे माणसांना ‘हरवायला निघाली आहेत असा सूर आहे. ही संगणकप्रेमींच्या अत्युत्साही दाव्यांना प्रतिक्रिया आहे – पण ही तटस्थ वृत्ती नाही.
संगणकांच्या क्षमता माणसेच वाढवताहेत. या नव्या यंत्राने मानवी विचाराबद्दलचे, निर्णयप्रक्रियांबद्दलचे अनेक प्रश्न पुढे आणले आहेत. पण हे प्रश्न माणसांपुढेच आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे सोपे नाही. ते प्रश्न संगणकांच्या ‘टप्प्यात नाहीत. आणि या प्रश्नांनी फार वेळा माणसांचा अहंकार दुखावला जातो की “वेड्या, तुला स्वतःबद्दलच इतकी कमी माहिती कशी?”
–पण याकरता त्या यंत्रावर रागावणे गैर आहे.
हे सारे ‘तात्त्विक पातळीवरचे झाले. पंडितांच्या लेखाचा उत्तरार्ध मात्र संगणकांच्या वापराबद्दल, स्पष्टपणे व्यवहारी भागाबद्दलचा आहे. तिथेसुद्धा पंडितांचे प्रश्न, शंका, भये, ही सारी खरी असली तरी जराजरासे ‘नेम चुकलेले आहे. संगणकांच्या क्षमतांच्या अंदाजांमध्ये ‘अतिशयोक्ती’ माणसांनीच आणली आहे, त्या यंत्रांनी नव्हे. ‘शिक्षण’ या कल्पनेत विकृती आणली आहे ती संगणक विक्रेत्यांनी,त्या यंत्रांनी नव्हे. ‘संगणक साक्षरता’ ही कल्पना संगणक घडवणान्यांनी हेतुपुरस्सर धूसर ठेवली असणे शक्यच नव्हे, संभाव्यही आहे. संगणकांच्या वापराने व्यवस्थांचे जास्त केंद्रीकरण होणे हाही धोका खराच आहे. नोंदीच्या, आकडेवारीच्या हव्यासापोटी राज्यकर्ते संगणकांना वापरीत माणसांच्या खाजगी आयुष्यांवर अतिक्रमणे करणार, हेही अटळ दिसते आहे. माणसांच्या संख्येच्या रेट्याला घाबरून राज्यकर्ते ‘नको ते’ निर्णय संगणकीय तर्कावर ढकलतील, हीही भीती आहे.
पण या सान्याच त्या यंत्रांचा, त्या तंत्रांचा दोष नाही. पेनरोज वाटेल ते म्हणो, माणसे योग्यायोग्यता, सत्यासत्यता, सुंदर-असुंदर यांचा वापर करून विचार करतात हे खोटे आहे. माणसे क्रिया करताना मूल्यविचारांना केंद्रस्थानी मानत नाहीत. ही कुरूपता, हे अशिव कुठून येते?
पाचरीचे ‘यांत्रिक तत्त्व वापरून हत्यारांना धार लावायला माणूस शिकला-त्याची कोणी तरवार केली, कोणी गिलोटीन केले, कोणी कात्री केली. विद्युच्चुंबकीय क्षेत्रांचेगुणधर्म वापरून यंत्रांना ऊर्जा देता येऊ लागली—कुणी यावर दिवे पेटवले, कुणी इलेक्ट्रिक चेअर घडवली. नोंदींचे व्यवहार संगणक वेगाने आणि बिनचूकपणे करू लागले – कुणी यातून गणितातले ‘फोर कलर थिअरम’ सारखे कूटप्रश्न सोडवले, कुणी सारा भर निरर्थक ‘व्हिडिओ-गेम्ज’वर रोखला.
नाही. जबाबदारी माणसांचीच आहे. यंत्रतंत्रांची नाही. यंत्र-तंत्रे समजून घेणे गरजेचे आहे, ते त्यांचा वापर नियंत्रित ठेवायला. त्याऐवजी नव्याजुन्या यंत्र-तंत्राकडे पाठ फिरवणे हा पूर्वी निरर्थक ‘लडाइटिझम’ (Ludditism) नावाचा यंत्रद्वेष होता त्याची ताजी आवृत्ती ठरेल!
* * * * * * *
आता पंडितांच्या लेखातील ‘आवर्तनांच्या आलेखाबद्दल’. एकतर मला हा आलेखच समजला नाही. मला निर्णयप्रक्रियांमधल्या आवर्तनांचे वर्गीकरण कोणत्या निकषांवर केले, ते समजले नाही. जसे –
‘मेंदूचे प्रश्न’, ज्यांच्या सोडवणुकीतली आवर्तने पुढे जाऊन ज्ञानकक्षा कुंठित करतात – ‘मनांचे प्रश्न’ ज्यांच्यासाठी वापरली जाणारी आवर्तने ज्ञानाच्या कक्षा वाढवत नेतात आणि (बहुधा) आध्यात्मिक प्रश्न जे स्फुरण, इच्छाशक्ती वगैरे देतात. पंडितांना या तीन पातळ्या वेगळ्या आहेत असे कोणत्या कारणाने मानावेसे वाटते?समजायला सोप्या निर्णयप्रक्रिया, समजायला अवघड निर्णयप्रक्रिया, ठार न समजणाच्या निर्णयप्रक्रिया, असा फरक तर नाही?मग त्या सीमारेषा ठरवताना बुद्धिप्रामाण्य, विवेक आणि प्रज्ञा हे शब्द कुठूनआणले?
नव्या संज्ञा घडवण्याने, वापरण्याने, आकलन वाढले का?मला तरी तसे दिसत नाही. मग आपल्याच विचारांमधली अस्पष्टता, काही बाबतीतले अज्ञान, या सा-यांवर विचारयंत्रे रोखून आकलन वाढवायचा प्रयत्न करावा. नाहीतर उगीच त्या संज्ञा अविचारी लोक बळकावतील, आणिम्हणतील की अध्यात्मवाद (म्हणजे काय?) बुद्धिप्रामाण्यवादापेक्षा (म्हणजे कशापेक्षा?) ‘उच्च’ आहे, असे पंडित-पेनरोज म्हणतात! दुःख म्हातारी मेल्याचे नाही, अविवेक सोकावण्याचे आहे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.