मुलींबाबत पालकनीती

जग आता एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. या जगातील मानवी समाजाचे दोन वर्ग पुरुष आणि स्त्री. या दोन्ही वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजात त्यांचे स्थान, प्रतिष्ठा, त्यांना मिळणाच्या संधी यात समानता असावी, हे तत्त्व मान्य होत आहे. या दृष्टीनेच आतापर्यंत जो वर्ग कनिष्ठ, हीन म्हणून शोषित, मागासलेला राहिला त्या स्त्रीवर्गाला, मुलींना योग्य दर्जा मिळावा, माणुसकीची वागणूक मिळावी आणि कुटुंब, समाज, राष्ट्र उभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग असावा या दृष्टीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कक्षावर बरीच जागृती करण्याचे प्रयत्न होत आहेत. १९७५ ते १९८५ हे महिला दशक साजरे झाले. स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना चालना देण्यासाठी व शिक्षण, आरोग्यसेवा, मालमत्तेचा हक्क, नोकर्या मिळणे इ. विविध क्षेत्रांत त्यांच्या बाबतीत होणार्या पक्षपाताची चर्चा घडवून आणण्यासाठी नैरोबी, बीजिंग अशा आंतरराष्ट्रीय परिषदा पणआयोजण्यात आल्या. मुलींना मुलांच्या बरोबर समान कक्षावर कसे आणावे, त्यांना सक्षम, सबल कसे बनवावे याबाबत जगातील सरकारे व समाज यांनी या परिषदांतून बरीच चर्चा केली. तरीसुद्धा याबाबत निश्चित धोरण व उपाययोजना ते करू शकले नाहीत.
लिंगसमानतेबद्दल एक चुकीची कल्पना गृहीत धरून उपाययोजना केल्या जातात.प्रौढ स्त्रियांना जे हक्क व अधिकार मिळतात त्यांवरून त्यांचा सामाजिक दर्जा ठरतो. हेच हक्क व अधिकारआपोआप तरुण मुलींच्या कक्षेपर्यंत झिरपत पोचतात. तेव्हा त्यांच्याविरुद्ध होणार्याआ अन्यायाची पक्षपाताची स्वतंत्र विचार करून धोरणे आखण्याची जरूरी नाही असे गृहीत धरले जाते. आर्थिक विकासवरच्याथरावर होत राहिला की तोतळागाळाच्या सर्व क्षेत्रांत झिरपतो हे गृहीत जसे खोटे ठरले तसेच प्रौढ महिला विकासाबरोबर बाल व तरुण मुलींचा विकास आपोआपघडत राहातो असे मानणे चूक ठरते. मुलींच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी योग्य दृष्टी ठेवून तसे प्रयत्न बालवयापासून सातत्याने झाले पाहिजेत. त्यांची सुरुवात कुटुंबापासूनच झाली पाहिजे. पण पुरुषवर्चस्वप्रधान अशा आपल्या समाजात पालकच मुलींबाबत संकुचित धोरण ठेवून मुलींना दुजाभावानेवागवितात. बालपणापासूनच कुटुंबात मुलांचेप्राबल्य, वर्चस्व आणि मुलींचे दुय्यम स्थानरुळले जाते. मुलामुलींना मिळणारे कपडे, खेळणी, खाद्यपदार्थ, पादत्राणे, औषधांच्या सोयी, शिक्षणाबाबत संधी, इ. सर्व बाबतींत मुलांच्या गरजा अधिक चांगल्या रीतीने भागविल्या जाव्यात अशी आईवडिलांची सतत धडपड असते. मुलींनीही दुय्यम प्रतीची वागणूक सहन करीत राहिले पाहिजे असेचवळण त्यांना लावतात. मुलींनी हळू बोलावे, मोठ्याने हसू नये असे त्यांना शिकविले जाते. मुली १३/१४ वर्षांच्या झाल्या की त्या लहान स्त्रिया समजल्या जातात व त्यांना पुढे सासरी दुसर्या.कडे जावयाचे आहे, मातृत्वाची जबाबदारी स्वीकारावयाची आहे अशा दृष्टीने त्यांना शिकवण दिली जाते. त्यांची बाल्यावस्था लौकरच संपते. मुलगे मात्र बाल्यावस्थेतअधिक काळराहतात व पितृत्वाचे ट्रेनिंग त्यांना दिलेच पाहिजे असे मानले जात नाही. घरातील कामाचा बोजा पण मुलीवर अधिक टाकला जातो. घरकाम करण्यासाठी ठेवलेले नोकर आले नाहीत तर कचरा काढणे, कपडे धुणे, भांडी घासणे इ. कामे मुलींना करावी लागतात. लहान भावंडांना स्नान घालणे, कपडे करणे, आजार्याुची शुश्रूषा करणे हे थोरल्या बहिणीने करावयाचे. वडील भावाने ते केलेच पाहिजे असे नाही. पालकांची अशी वृत्ती राहते व बाहेरही त्याचे तसेच पडसाद उमटतात.
दरिद्री कुटुंबांत मुलींबाबत जो अन्याय घडून येतो त्यामुळे त्यांचे कुपोषण होते. बर्या च मुली बालवयातच मरण पावतात. त्यामुळे भारतीय लोकसंख्येत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत घसरत आहे अशी प्रवृत्ती लोकसंख्येच्या काही पाहण्यांवरून दिसून येत आहे. भारताच्या एक चतुर्थांश लोकसंख्येचा भाग हा १०/२० वर्षांपर्यंतच्या मुलींचा येतो. सुमारे १ कोटी ३० लक्ष मुलींचा दरवर्षी जन्म होतो. यातील २५ टक्के मुली त्यांच्या १५ व्या वर्षापर्यंत जगत नाहीत. १/३ मृत्यू त्यांच्या जीवनाच्या पहिल्या वर्षात म्हणजे मुली तान्ह्या असतानाच होतो. आपल्या देशात ओरिसा, बिहार, राजस्थान, तामिळनाडू इ. भागात तान्हेपणात मुलींच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. गर्भजलपरीक्षेमुळे मुलींचे गर्भच नष्ट केले जातात. मग त्यांच्या जन्माचा प्रश्नच येत नाही. तसेच काही भागांत । मुलीसाठी तिच्या लग्नाच्या वेळी हुंडा देण्याचा प्रश्न येऊ नये म्हणून दवाखान्यातील दाईमार्फत तिचा खून केला जातो. मृत्यू घडवून आणण्यासाठी दाईला २० रु. मोबदला दिला जातो. या नवजात मुलींची प्रेते नदीत किंवा जंगलात फेकली जातात. बाळ मुलगी आहे म्हणून मारणे हे केवढे क्रौर्य! ही किती भयानक सामाजिक विकृती अस्तित्वात आली आहे! काही खासदारांच्या कुटुंबांत २५/ ३० वर्षांत मुलींचा जन्मच झाला नाही असे ऐकिवात आहे. मुलीबाबत नावड व मुलगा वंशाला दिवा पाहिजे असा हव्यास धरणे अशी विचारसरणी अनेक देशांतील संस्कृतीत आढळते. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीत बाल मातांना त्यांच्या कन्या त्यांनी उघड्या ठेवाव्या असा उपदेश केला जात असे म्हणजे त्या मृत्यू पावल्या तरी चालेल. कडू बात सौम्य शब्दांत सांगण्याची ही पद्धत. चीनमध्ये मुली म्हणजे तांदुळातील आळ्या अशी म्हण, तर डच लोकांत मुलींनी भरलेले घर म्हणजे आंबट दारूने भरलेले तळघर, माझ्या एका नातेवाईक बाईला ओळीने पहिल्यांदा चार मुलीच झाल्या. त्या बाई त्या मुलींच्या देखत ‘‘कन्या ही रास संकटांची, छाया ही पूर्वपातकांची’ असे वारंवार म्हणत असत. लहान वयात मुलींना यातले काही कळत नसे. पण आपण या आईच्या पोटी। जन्माला आलो हा आपण मोठा अपराध केला अशी त्यांच्या मनाची कोंडी झाली. आयुष्यभर त्या माहेरी मोकळेपणाने वागूच शकल्या नाहीत. पुढे पाचवे भावंड म्हणजे त्यांना भाऊ झाला. तोहीनवससायासाने झालेला. तेव्हा त्याचे स्वागत किती उस्फूर्तपणे, प्रेमाने झाले याची प्रचीती त्या मुलींना आली. ज्या कुटुंबात अपत्यसंभव झालेला नाही किंवा होण्याची शक्यता नाही असे वाटले ती जोडपी दत्तक घेण्याचा विचार करून एखाद्या मुलालाच दत्तक घेतात. मुलगा म्हणजे म्हातारपणाचा आधार, म्हातारपणाची काठी असे समजले जाते. प्रत्यक्ष अनुभव निराळाच येतो. मुलगी म्हणजे बोजा अशी धारणा रुळलेली आहे. त्यामुळे तिचे बरेच वेळा मानसिक खच्चीकरण होते. मानसिक व शारीरिक विकास खंटला जातो. या व अशा आनुषंगिक कारणामुळे मुलींची संख्या आपल्या देशात घटत आहे व समाजातील स्त्री-पुरुष प्रमाणातील संतुलन पण बिघडत आहे.
अमेरिकेसारख्या विकसित देशात सुद्धा एकच मूल असावे व तो मुलगा असावा अशी प्रवृत्ती २३६ जोडप्यांची पाहणी करण्यात आली त्यात दिसून आली. मुलगा होण्याची शक्यता वाढविण्यासाठी शक्य होईल ते डॉक्टरांचे सल्ले घेतले जातात.
मुलींच्या मुळेच मानवाचे सातत्य टिकून आहे पण त्यांच्या या जननक्षमतेमुळे त्यांचा दर्जा कुटुंबात किंवा समाजात उच्च गणला जात नाही. आपल्या संस्कृतीत स्त्रीला गौरवशाली स्थान दिल्याचे काही सुभाषितांवरून व प्राचीन ग्रंथांवरून वाटते. पण वास्तवात स्त्रीला दुय्यम कनिष्ठ स्थानच दिले जाते. मुलींच्यावर निरनिराळी दडपणे-बंधने लादली जातात. गर्भजलपरीक्षेची सोय झाल्यामुळे त्यांना या जगात येण्यास मज्जाव केला जातो. अलिकडे लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी हा उपाय वापरणे प्रचलित होऊ लागले आहे, असे वाटते. काही ठिकाणी त्यांचे पाय बांधून ठेवणे, पडदा पद्धती सक्तीची करणे हे चालू असते. काही ठिकाणी इंद्रिय विच्छेदन (genital mutilation) करण्याची प्रथा पण आहे. त्यांच्या हालचालींवर व लैंगिकतेवर बंधने लादणे हा मुख्य हेतू त्यात असतो. आणखी एका मोठ्या धोक्यास पौगंडावस्थेतील मुली बळी पडतात. दुर्दैवाने हा धोका काही ठिकाणी कुटुंबातूनच पोचतो. या वयातील मुलींना त्यांच्यात होणार्या. शारीरिक व मानसिक बदलाचे नीट शास्त्रीय ज्ञान असत नाही. घरातील जवळचे नातेवाईक ज्यांच्यावर त्या मुलींचा व इतर नातेवाईकांचा विश्वास असतो अशापैकी कोणाच्या तरी अत्याचाराला त्या बळी पडतात. काका, चुलतभाऊ, मामा किंवा प्रत्यक्ष त्या मुलीचा जन्मदाता बाप सर्व विवेक सोडून हे अघोरी कृत्य करतो. अशा स्थितीत मुलीची फारच गळचेपी होते. बाहेर बोलणे कठीण, कारण बापाला किंवा भावाला तुरुंगवास होण्याची भीती असते. मुलीच्या आईचीसुद्धा सहानुभूती मिळणे कठीण जाते. घरातले लोकच तिला टोमणे देऊन मारहाण करतात. काहीवेळा जीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे ती आत्महत्येचा प्रयत्न करते किंवा तिला वेड लागते. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे अशी बरीच उदाहरणे आढळतात. पालकांकडूनच मुलीला धोका असेल तर तिने कोठे जावे?या वयात होणार्यां बदलांची योग्य कल्पना आईने मुलीला दिली पाहिजे. तसेच योग्य पुस्तके निवडून स्वतः वाचून मग मुलींना व मुलांना वाचण्यास देणे जरूर वाटते.
शिक्षण, आरोग्यसेवा या व्यक्तित्वविकासाच्या महत्त्वाच्या बाबी आहेत. मुलांना चांगल्या शैक्षणिक संस्थेत पाठविणे किंवा परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविणे याबाबत आईवडील बरीच तत्परता दाखवितात. त्यामुळे मुलांना चांगल्या संधी, चांगल्या नोकर्यार, चांगले व्यवसाय, चांगले अनुभव प्राप्त होतात. मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनतेचे धोरण असते. मागासलेल्या राज्यांतमुलींना प्राथमिक शिक्षण मिळण्याचीसुद्धा सोय नसते. काही ठिकाणी सरकारी शाळा असल्या तरी त्यातून मुलींची वाढीव गळतीच चालू असते. घरकाम, शेतकाम अशासाठी ग्रामीण भागात मुलींना घरी ठेवून घेण्यावरच भर दिला जातो. मुलींची लग्नपण त्यांच्या भवितव्याचा विचार न करिता अत्यंत बालवयात केली जातात. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मुलींना मोफत व सार्वत्रिक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही उपाययोजना व कार्यक्रम आखले आहेत. त्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यावर त्यांचे यश अवलंबून आहे.
मुलींच्या बाबत दुजाभाव राखून जो पक्षपात होतो त्याचा परिणाम आजच्या मुलींवर होतोच पण उद्याच्या महिला आणि उद्याच्या मातांवर पण होतो. लिंगपक्षपात हा केवळप्रौढ स्त्रीपुरुषांचा प्रश्न मानणे योग्य आहे काय याचा विचार झाला पाहिजे. लिंगभेदाचे पृथक्करण वयानुसार झाले पाहिजे. त्यासाठी जुन्या काळातील पुरुषवर्चस्वप्रधान पद्धतीचा त्याग केला पाहिजे. हे होण्यासाठी मुलींच्या बाबत रूढी-परंपरेने प्रस्थापित झालेला संकुचित दृष्टिकोण बदलून उदार विचारसरणीचा अवलंब केला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या विकासासाठी योग्य संधी व वातावरण निर्माण होईल अशी दक्षता पालकांनीच बाळगली पाहिजे. अलिकडे सर्वसाधारणपणे स्त्रियांचा प्रत्येक क्षेत्रात प्रवेश झालेला आहे व होत आहे. व प्रत्येक ठिकाणी योग्य कामगिरी करून त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. ही कर्तबगारी अधिक प्रभावी होण्यासाठी पालकांनी बालपणापासून मुलींनान्याय्य वर्तणूक देणे जरूर आहे. मुलामुलींच्या मानवी हक्कास १९८९ मध्येच संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली आहे. पण पक्षपाताचे धोरण बदलण्यासाठी केवळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयस्तरावर चर्चा घडवून आणून किंवा परिषदा घेऊन हे काम होणार नाही. त्याची खरी सुरवात कुटुंबातूनच पालकाकडून झाली पाहिजे. मुलींची शारीरिक, भावनिक, सामाजिक व आर्थिक स्वतंत्रता कुटुंबात जपली जाणे अतिशय महत्त्वाचे आहे. असे झाले तरच मुली सबल होणार, म्हणून कुटुंब सबल होणार व समाज पण सबल होणार.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.