लोकेश शेवडे यांच्या पत्राला उत्तर

आजच्या सुधारकातील हुसेन साहेबांच्या चित्राविषयीच्या लेखासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करणारे लोकेश शेवडे यांचे पत्र एप्रिल १९९७ च्या अंकात प्रसिद्ध झालेले आहे. पत्रातील आमच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे लेखनशैली. स्वभावाने आम्ही उद्दाम किंवा बेरड नसून खिलाडी वृत्तीने टीकाकाराचेही महत्त्व मान्य करण्याची आमची वृत्ती आहे. प्रा. के. रा. जोशी यांनीआमच्या विचारांसंबंधी वेळोवेळी उपहास केला आहे. त्यांचा तो अधिकारही मान्य आहे. आमची मते अंतिम सत्य आहेत असा आमचा आग्रह नाही. के. रा. जोशी म्हणतात त्याप्रमाणे भड़क भाषाशैली, बेदरकार विवेचन यासाठी वापरले जाते की परंपरावादी थोडे हलतील. लेखनाची दखल घेतील. उत्तरपक्ष करतील आणि हा आमचा हेतू साध्य होत आहे. आमच्या लेखनशैलीमुळेच लोकेश शेवडे लिहिते झाले. आमचा हेतू कमालीचा यशस्वी झाला असे आम्ही समजतो. अन्यथा अनुल्लेखाने एखादा विचार दाबून टाकण्याची आपली परंपरा आहे.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास हुसेनसाहेबांच्या रेघोट्या चित्रे नसतात. त्यात काही सौंदर्यशास्त्रातील ठराविक विशेषणे तोल, कंटूर्स, वगैरे आम्ही दिलेली आहेत. तेदेखील सौंदर्यशास्त्रावरील काही ग्रंथ वाचून जेवढे समजले तेवढे दर्शविण्यासाठीच. आमच्या मते सौंदर्याचे शास्त्र होऊ शकत नाही. तो एक पोकळ शब्दांचा, मानसशास्त्रीय विवेचनाचा आधार घेऊन तर्कशुद्ध अशा अर्थशून्य वाक्यांचा पुंज असतो. सौंदर्याची आस्वाद्यता ही माणसाची मनोभूमिका, वातावरण, सहवास, जाहिरात, प्रभाव, यापैकी एक वा अनेक घटकांवर अवलंबून असते. राजा रविवर्मा, दलाल, एस्.एम्. पंडित, द. ग. गोडसे या चित्रकारांची चित्रे आम्हाला भावतात. हुसेनसाहेबांनी हत्ती रंगविताना वापरलेला ब्रश मी पाहिला आहे. तो जसा होता तसे त्याचे वर्णन केले आहे. घराला सफेदी देण्यासाठी कारागीर असेच तागाचे फड्यासारखे ब्रश विदर्भात वापरतात. हुसेनची चित्रे लोकेश शेवडेंना आवडत असतील आणि सौंदर्यपूर्ण वाटत असतील तरी आमचा आक्षेप नाही. कारण सौंदर्याचे शास्त्र नसल्यामुळे शेवटी आवडनिवडही वैयक्तिक असते. आणि व्यक्तिस्वातंत्र्य आम्हाला मान्य आहे.
हुसेनला आम्ही ‘मदनशरविद्ध’ म्हणालो. कारण विश्वामित्र आणि मेनकेच्या रेखाटनात मेनकेच्या हातातील बालकाचे रेखाचित्र, विश्वामित्रापासूनच प्रसूत झाले असते. मेनकेचे रेखाचित्र कोणाचेही असू शकते. हुसेनसाहेब या मेनकेला माधुरी म्हणतात आणि स्वतःला विश्वामित्र समजतात. Mcbull या चित्रातील बुल विषयी म्हणतात, “आय अॅम बुल, आय अॅम विश्वामित्र’ आणि मग प्रश्न विचारला आहे इज ही इन् लव्ह?प्लेटॉनिक देन?’ स्वतः हुसेनसाहेब माधुरीच्या संदर्भात म्हणतात, “यह कौन सा मोड है उमर का’?(इंडिया टुडेनोव्हें. १९९६ पान १६२) आताही अवस्था मदनशरविद्धतेची नाही तर काय मदनदहन झाल्याची समजायची?आमच्या इकडे म्हातारपणी नुसती प्रेमाची भावगीते आणि गझला म्हटल्या तर म्हातारचळ लागला असे म्हणतात. हुसेन साहेब चित्रांतून तेच करीत आहेत. नुकतेच त्यांनी रेखाटलेले मदर टेरेसाचे रेखाटन, जगदंबा, द्रौपदी, नरसिंह, कोणाचेही असू शकते.
आता ही मदनशरविद्धता, खाजगी राहिलेली नाही. भीमण्णाची ‘मल्लखांबी तोडी’, हुसेनचे रंग आणि भीमण्णाचे सूर यांच्या रंगसूरसंगमाच्या घटनेशी संबंधित आहे. पण भीमसेनच्या तोडीतला कोमल गांधार डोळ्याच्या कडा ओला करण्यासही समर्थ असतो. एका विशेषणाने भीमण्णांचे गाणे निकालात निघत नाही. जसे रविवर्याच्या अनेक प्रमाणबद्ध आकर्षक चित्रकृतीत दमयंती तेवढी लठ्ठ आणि थोराड दिसते. त्यामुळे रविवर्मा यांचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. तोडी (त्रुटिका) हा आलापीप्रधान राग आहे. त्यांत ललका-यांना विशेष अतिरिक्त स्थान मिळाले की ती मल्लखांबीच होत असते. उदाहरणादाखल बोलायचे झाल्यास दरबारी हा जर जोरकस गायला तर त्याचा क्षणात अडाणा होतो. अप्रचलित राग गाऊन त्यात निरनिराळे प्रयोग करणे भीमण्णाच्या मनःस्थितीत नसते. ठराविक रागांवर त्यांची अनेक वर्षांची कसरत प्रत्येक राग पहिलवान झाल्यासारखा वाटतो. ठुमरी आणि गझल, भावगीत, लालित्यपूर्ण भजने गाता न येणे ही भीमण्णाच्या गायकीला पडलेली लक्ष्मणरेखा आहे. तरीपण भीमण्णा ग्रेट गायक आहेत याविषयी आमचे दुमत नाहीत. तसे हुसेनसाहेबांच्या बाबतीत ते चित्रकार नाहीत हे मत कायम आहे. कित्येकदा रविशंकरचे सतारवादन टिंगल करण्यासारखे असते.
शेवडे म्हणतात अशा टिंगलखोर स्वभावामुळे तानसेन ते जॅक्सन यांच्यापैकी कोणाचीही टिंगल केली जाऊ शकते. आमचे उत्तर असे की टिंगल होतेच. सैगलच्या ‘बाबुल मोरा’ या भैरवीची। आजची जवान पोरे टिंगलच करतात. कै. बडे गुलाम अली खान यांच्या ठुमरी बाजाला, भडभुंज्याचे गाणे म्हणून म्हटले जाते. भातखंडे तानांनी प्रचुर गायकीला ‘गलेबाजी’ म्हणतात. विनायकबुवा पटवर्धन आणि व्यास यांच्या मालगुंजी रागातील ‘गौवे बनमें चरावे’ या जुगलबंदीत गाइलेल्या चीजेला ऐकून हे दोघे गव्हाच्या शेतात बैलाप्रमाणे घुसलेत’ अशी टिंगल होतेच. बेगम अख्तर, मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंह यांचे गझलगायन रेहकणे असते. (रेहकणे हे क्रियापद रेख्ता म्हणजे गझल या अर्थानि तयार झाले आहे.) टिंगल होत कुणाची नाही?शास्त्रीय संगीताची जाण नसलेला गायक सुंदर गातो त्यावेळी तानसेनच्या काळापासून तो संगीतात धाड भरतो अशी टिंगल होत असते. या धाड भरणा-यांचे धारी नावाचे स्वतंत्र घराणे तानसेन काळातच निर्माण झालेआहे. (आमचा संगीताचा अभ्यास सखोल आहे हे नम्रपणे सांगावेसे वाटते. दोन घराण्यांचे गायक परस्परांची टिंगलच करीत असतात.
शेवडे यांनी सौंदर्यशास्त्राचा मुद्दा उपस्थित केला आहे. सौंदर्यशास्त्रावर आमचा शास्त्र म्हणून विश्वास नसतो. तो एक गणिती पोरखेळ असतो. ज्या अनुभूतीचा संबंध प्रतिक्षिप्त स्वरूपाचा हृदयाशी असतो. तिथे बौद्धिक स्तरावर विश्लेषण करण्याची संधीच नसते. तारषड्ज किंवा निळ्या आकाशातील जांभळ्या छटेनेधूसर रंगविलेली पवर्तराजी यांचा संबंध फक्त कानाशी आणिडोळ्याशी असतो. त्यात बुद्धी मिसळली की मग विचार येतो. हा षड्ज २४० कंपनांचाच आहे काय?पर्वतअसे जांभळे दिसतात काय?शास्त्र कशाचे मांडता?ब्रिटिश अधिका-यांना आसामातील खाशी जमातीच्या स्त्रिया अतिशय आवडत (संदर्भ नीरज चौधरी), तिथे सौंदर्याचे शास्त्र कशाचे निर्माण करता? सौंदर्याचे शास्त्र होऊ शकत नाही. ज्याला करायचे असेल त्याने शब्दच्छल करून धन्य समजून घ्यावे. सौंदर्यशास्त्रावरील साहित्य हा उधईचा उत्तम नास्ता होऊ शकतो. ज्याला आकर्षक आणि लालित्यपूर्ण गाता येत नाही तोच संगीताचे सौंदर्यशास्त्र सांगून आपली तसल्ली करून घेत असतो. तेच चित्रकलेचे आहे. चविष्ठस्वयंपाक करणारा आचारी हा गृहअर्थशास्त्र विषयाचा पदवीधर नसतो. शेवडे जसे हुसेनवरील लेख वाचून उद्विग्न झाले तसेच प्रो. के.रा. जोशी अनेक लेखांसंबंधी होतात. आलोचना करण्याचा त्यांचा हक्क मान्य आहेच. पण प्रत्येकाने आपले गाणे प्राध्यापकांच्याच ठेक्यावर गावे हा आग्रह का?नेहमीच गुळमुळीत, गुळगुळीत ‘आनंदाचे डोहीं आनंद तरंग’ उठविण्यासाठीच लेखन करायचे?प्रा. जोशींचे म्हणणे असे की आमचे निष्कर्ष बेछूट असतात. आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले हे लोकमान्यांचे विधान असेच बेछूट होते. आर्य हा वंश आणि भाषा यांचा संकर आहे हे मॅक्समूलरचे विधान बेछूटच होते. माणूस स्वार्थाशिवाय आपले बोट हालविणार नाही हे बेन्थामचे विधान बेछूट आहे. पातिव्रत्यधर्म हा दुबळ्यांनी आपल्या भार्येवर लादला हे चार्वाकाचे विधान बेछूट आहे. ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ हे विधान बेछूट आहे. पृथ्वी गोल आहे हे कोपर्निकसचे विधान युरोपातील धर्म मार्तंडाना बेछूट वाटले. आमच्या बेछूट विधानात इतिहासात पुरावे असतात. आम्ही गृहीत धरले असते की विद्वानांना हा इतिहास ज्ञात असतो. स्वतः आस्तिक, धर्माभिमानी, परंपरावादी असूनही आपली अस्मिता न सोडता, विरोधी विचार मान्य करण्याची, त्याचा आदर करण्याची सहिष्णुता का नसावी?हाच खरा चिंतनाचा विषय आहे. विचारांचा परामर्श कठोरपणे अवश्य घ्यावा. पण असे लेखन होऊच नये, हा जो उपनेणिवेत कर्मठपणा असतो त्याचे उन्नयन केव्हा तरी होणे आवश्यक असते. ज्यावेळी हा कर्मठ विचार ‘जो जे वांछिल तो तें लाहो’ अशा भूमिकेवर येईल किंवा ‘मार्तंड ज्यावेळी तापहीन होतील त्यावेळी टागोर म्हणतात त्याप्रमाणे हा देश नंदनवनातच निद्रामुक्त होईल. शेवडेंच्या संदर्भात आम्ही हा वाद आमच्यातर्फे थांबविला आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.