मी आस्तिक का आहे?

मी आस्तिक आहे का नास्तिक आहे, याबद्दल निश्चितपणे काही सांगायला मी कचरतो. माझी हिंमत होत नाही. तरीपण, पुढील कारणांस्तव मी मला स्वतःला ‘आस्तिक’ म्हणणेच योग्य ठरेल.
‘मी आहे’ म्हणजे, माझा देह आहे व ह्या देहात ‘देह नसलेली’ एक शक्ती आहे, म्हणजेच देहात आत्मा आहे.
देह ही जड वस्तू आहे. आत्म्याशिवाय देह ही जड वस्तू नाश पावते. Matter is indestructible हा नियम मान्य करूनच ‘नाश’ हा शब्द मी वापरला आहे.
आत्मा ही चेतक शक्ती आहे. पण ती शक्ती स्वतंत्रपणे दिसत नाही. भासत नाही. पंचेंद्रियांना ती कळत नाही.
मात्र, देह आणि आत्मा यांचा योग म्हणजेच देहात्मयोग आहे, हेच ‘मी आहे’ चे स्पष्टीकरण होऊ शकेल.
देहातील आत्म्याचे वर्णन ‘आत्मबुद्ध्या त्वदंशकः’ असे केलेले आहे. त्वदंशक म्हणजे ‘परमेश्वराचा अंश.’ हा परमेश्वर, देहाप्रमाणे जड आहे असे म्हणता येईल काय? माझे उत्तर ‘नाही’असे आहे.
परमेश्वर आहे; तो सगुण की निर्गुण, साकार की निराकार, कर्ता की अकर्ता, असत्य की सत्य, ह्या प्रश्नांची उत्तरे देताना मी म्हणतो –
परमेश्वर निर्गुण आहे, निराकार आहे, अकर्ता आहे व सत्य आहे.
मनुष्याचे जीवन व त्याचा मृत्यू ह्या गोष्टी परमेश्वराधीन नाहीत. पाप वा पुण्य देणाराही परमेश्वर नाही. नवस वा प्रार्थना यांना पावणारा तर तो नाहीच नाही. याला आधार ‘अनुभवाचा.’
वदतो व्याघात होईल, पण तो पत्करून संतांचा माझ्यावरील प्रभाव लक्षात घेऊन मी आस्तिक आहे’ असे मी म्हणतो.
आणि तरल पण महत्त्वाचे आणखीही एक कारण माझ्या आस्तिकतेच्या पाठीशी आहे, ते म्हणजे, ‘आस्तिकता आहे म्हणून जीवनात काव्य आहे; ते काव्य गमवायला मी तयार नाही.
तर, असा मी ‘आस्तिक’ आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.