मी नास्तिक का आहे

या प्रश्नाचे उत्तर ‘मी आस्तिक नाही म्हणून’ या चार शब्दांत देणे शक्य आहे हा विचार बाजूला सारला तरी मी जन्मतःच नास्तिक नव्हतो. कोणतीही व्यक्ती तिला थोडेफार कळायला लागल्यावर तिच्या अवतीभवतीच्या वातावरणानुसार, उदा. घरातील संस्कार, शाळेतील शिक्षण, ती व्यक्ती वावरत असलेल्या समाजाचा सर्वसाधारण विचार, इत्यादि कारणांमुळे आस्तिक किंवा नास्तिक बनत असते. संपादकांनी सुचविलेला विषय फक्त ईश्वराचे अस्तित्व किंवा नास्तित्व या संबंधात आहे असे मी समजतो. लहानपणी घरी दारी देव, देव. शाळेतील पाठ्यपुस्तकातही देव,देव.
(१) पाहूं जातां एक देव, तेणें निर्मीयले सर्व
पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारे, सर्व त्याचींच लेकुरें।
अन्नपाणी तोचि देतो, प्रेमें सर्वा सांभाळीतो
चित्तीं धरी जो हे बोल, त्याचे कल्याण होईल।।
(२) कारे नाठवीसी कृपाळू देवासी
पोषितो जगासी एकलाची
(३) देवाजीने करुणा केली. भातें पिकुनी पिवळी झालीं ।
देवाजीच्या नांवा घेतां बरकत येते बहुतचि भाता ।।
(४) देवाच्या इच्छेशिवाय झाडाचे पानहि हालत नाही अशा प्रकारच्या संस्कारामुळे देव हा कृपाळूव सर्वशक्तिमान आहे व प्रत्येक बरीवाईट गोष्ट देवाच्या इच्छेमुळे घडत असते असा आस्तिक समज बालवयात दृढमूल झाला. त्यामुळे वैयक्तिक बाबतीत कोणतीही चांगली गोष्ट घडली की मनातल्या मनात देवाचे आभार मानी व वाईट गोष्ट घडली की, उदा. साधी ठेच लागली तरी, त्यासाठी देवाला जबाबदार धरून ‘भो xxxx xxxx xxx xxx’ अशी त्याला मनातल्या मनात आईवरून इरसाल शिवीपण देत असे.
इंग्रजी पहिलीत होतो (१९२३-२४). शाळेतून घरी परतताना फारशी वस्ती नसलेल्या भागात वाटेवर एक दक्षिणमुखी मारुतीचे देऊळ लागायचे. आम्ही समवयस्क तीन चार विद्यार्थी, भाविकांनी मारुतीपुढे ठेवलेला प्रसाद, जसे पेढे, बत्तासे, केळी, साखरफुटाणे, पेरू इत्यादी फस्त, करीत असू. मारुतीपुढे ठेवलेले पैसे मात्र उचलीत नव्हतो. प्रसादावर सुद्धा वास्तविक पुजारी गुरवाचा हक्क! योगायोगाने नेमक्या हनुमानजयंतीच्या पहाटे ३ – ४ वाजता माझे पोट भयंकर दुखायला लागले. पोटात असह्य कळा येत असल्याने अक्षरशः ओक्साबोक्षी रडत होतो. आई, आजोबा, आजी यांनी हिंगतूप यांसारखी वेगवेगळी घरगुती औषधे दिली. तरी कळा थांबेनात. मनातल्या मनात मारुतीची करुणा भाकीत होतो की गुरवाच्या हक्काचा, भाविकांनी तुझ्यापुढेठेवलेला प्रसाद पुन्हा कधीही खाणार नाही. सूर्योदयानंतर पोट दुखायचे थांबले. अशा रीतीनेआस्तिकपणाचा खुटा हालवून बळकट होत गेला.
नंतर, नास्तिक शिक्षक, अनुभव, वाचन, मनन, चिंतन यामुळे नास्तिकपणाकडे हळूहळू प्रवास सुरू झाला. इंग्रजी चौथीला आम्हाला गुर्जर नावाचे नास्तिक सायन्स टीचर होते. ते संदर्भासंदभनि ‘पुनर्जन्म न विद्यते’, ‘देवो न विद्यते’ अशी विधाने शिकविताना करायचे. त्यांचाही नकळत परिणाम व्हावयाचा.
महसूल खात्यात मामलेदार या गॅझेटेड पोस्टवर बढती मिळाल्यावर कुलदैवत असलेल्या अष्टविनायकाचे दर्शन घेऊन कामावर रुजू होण्यास जात असता खिशातील पैशाचे पाकीट मुंबईच्या लोकलमध्ये गायब! आस्तिकपणाला हा पहिला मोठा हादरा! कुलदैवतावरील श्रद्धेचा अजून पूर्णपणे लोप झाला नव्हता. कुलदैवताला कसलातरी नवस केला. दैवत नवसाला पावले. नवसफेड म्हणून देवळात बसून स्वतः अथर्वशीर्षाची सहस्रावतने केली. नंतर त्या घटनेचा विपरीत अनुभव येऊ लागल्यावर कुलदैवत नवसाला पावले नसते तर बरे झाले असते असे वाटायला लागले. त्यानंतरही काही नवस केले. परंतु फलप्रद झाले नाहीत. त्यामुळे नको त्या नवसाला पावणारे कुलदैवत अशी कुलदैवताबद्दल नास्तिकपणात जमा होणारी भावना झाली.
एका इंग्रजी नियतकालिकात ईश्वराच्या अस्तित्वासंबंधात पोरकट युक्तिवाद वाचण्यात आला की ‘आता हे घड्याळ आहे. याचा कोणीतरी कर्ता आहेच. त्याप्रमाणेच भौतिक विश्वाचा कोणी creator असणारच.’ त्याचवेळी अंधुकसा विचार चाटून गेला की या creator चा creator कोण?व हे मारुतीचे शेपूट न संपणारे आहे. परंतु नंतर “uncreatedness and indestructibility of matter’ चा वैज्ञानिक सिद्धान्त वाचण्यात आला व भौतिक विश्व हे अनिर्मित व अविनाशी म्हणजेच अनादि व अविनाशी म्हणजेच शाश्वत आहे हे समजले. सतत बदल हा निसर्गनियम असल्याने भौतिक विश्व हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भूतकाळात सदासर्वदा होते, आज आहे या स्वरूपात आहे व भविष्यकाळातही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात राहणार आहे, व त्यासाठी ईश्वर या व्यक्तीची किंवा शक्तीची आवश्यकता नाही हा विचार पटला व त्यानुसारआता पूर्णपणे नास्तिक आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.