श्री रिसबूड यांना उत्तर

याच अंकात पत्रव्यवहार या सदरात श्री माधव रिसबूड यांचे मला आलेले पत्र छापले आहे. या पत्राचा सूर उघड उघड अनादराचा, अधिक्षेपाचाही आहे. माझी विचारसरणी साचेबंद आहे असा त्यांचा आरोप आहे. ते मला हटवादीही म्हणतात. त्यांच्या सप्टेंबर ९३ च्या पत्राला दिलेल्या उत्तरात मी जाणीव कल्पनेची थट्टा केली आहे, समर्पक उत्तर दिले नाही अशी त्यांची तक्रार आहे. असे जर आहे तर त्यांनी त्याच विषयावरील विचार पुन्हा माझ्यापुढे का मांडावेत? माझ्या साचेबंद हटवादी भूमिकेतून त्यांना हवे ते उत्तर मिळाल्याची आशा नसल्यामुळे या पत्राचे प्रयोजन काय असा प्रश्न मला पडला आहे. त्यांना माझे उत्तर समर्पक वाटले नाही याचे कारण कदाचित त्यांना ते समजले नसेल हे असू शकेल ही कल्पना त्यांना शिवली नाही. सप्टेंबर २३च्या आजचा सुधारकात त्यांना दिलेले उत्तर मी पुन्हा वाचले, पण मला त्यात कोठे थट्टा दिसली नाही. त्याहून वेगळे उत्तर माझ्याजवळ आजही नाही. म्हणून त्याची पुनरावृत्ती करण्याची माझी इच्छा नाही.
पण त्यांच्या या नव्या पत्रात काही नवीन मुद्देही आहेत, आणि त्यांना उत्तरे देणे मी अवश्य समजतो.
श्री रिसबूड म्हणतात की ‘ईश्वर आणि जाणीव हे शब्द समानार्थकच आहेत. आता याला काय म्हणावे?इतका खोल आणि भव्य विचार करण्याची ताकद माझ्यात नसल्यामुळे मी एवढेच म्हणतो की रिसबुडांना ‘ईश्वर’ आणि ‘जाणीव’ या शब्दांचे अर्थ माहीत नसावेत. याहून वेगळा निष्कर्ष कोणता निघू शकेल?
‘ईश्वर’हा शब्द अनेक अर्थांनी आपण वापरतो. म्हणून ईश्वराविषयी चर्चा करताना आपण तो शब्द कोणत्या अर्थाने वापरीत आहोत हे आधी सांगणे अवश्य असते. उदा. ईश्वर स्वरूपाची एक सामान्य कल्पना तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, आणि सर्वथासाधु आहे अशी आहे. पण ह्या वर्णनाचा ईश्वर असू शकत नाही असे मी म्हणतो, कारण त्यातील गुणांचे अस्तित्व आणि जगातील प्रचंड दुःख यांत विरोध आहे, आणि दु:ख वास्तव असल्यामुळे त्याशी विसंगत असणारा ईश्वर अशक्य असला पाहिजे.
यावर रिसबुडांचे म्हणणे असे आहे की ईश्वर साधु आहे असे मी मानीत नाही. माझा ईश्वर फक्त सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे, पण तो साधूही नाही आणि असाधुही नाही. पण असा ईश्वर त्यांच्या खेरीज आणखी कोणाला मान्य आहे याचा त्यांनी तपास करावा. त्यांच्या लक्षात येईल की मानवांना हवा असणारा ईश्वर हा दयाधन, करुणानिधि, भक्तांचा सखा, प्रार्थनांना पावणारा असाच असावा लागतो. ईश्वराची करुणा वजा केली तर त्याला कोणी भीक घालणार नाही. आपल्यामंदिरांतून आणि अन्यत्र जे नामस्मरण अखंड चालू असते, त्यात जे नवस बोलले जातात, ते काय दर्शवितात?
परंतु रिसबूड म्हणतील की मी म्हणतो तशी ईश्वराची एक कल्पना असू शकेले की नाही?आता त्या कल्पनेत व्याघात नसल्याने त्याअर्थी ईश्वर असू शकेल असे म्हणता येईल. परंतु असा ईश्वर असू शकेल असे म्हटल्यावर तो आहे काय हा प्रश्न शिल्लकच राहतो. ज्याच्याजवळ अमर्याद शक्ती आणि ज्ञान आहे असा पदार्थ आहे असे मानायला पुरावा काय आहे?हे जग ईश्वराने निर्माण केले असे मानले तर त्याला प्रचंड शक्ती आणि ज्ञान लागेल हे खरे आहे. पण अमर्याद?आणि त्याने हे जग निर्माण केले, किंवा तो हे चालवितो हे तरी कशावरून?या प्रश्नांना उत्तरे नाहीत. हे जग अनादि आहे असे मानण्यात काही अडचण दिसत नाही.
रिसबूड म्हणतात, ‘ईश्वराचा निर्माता कोण हे सांगा, आणि नसेल सांगता येत तर ईश्वराचे अस्तित्व तुम्ही मानू शकत नाही हा आपला नेहमीचा युक्तिवाद आहे. मला तो हटवाद वाटतो.’
वरील युक्तिवाद माझा नेहमीचा युक्तिवाद असेल. पण तो प्रश्न महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे, तो युक्तिवाद बरोबर आहे की नाही हा. या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय तो हटवाद आहेअसे म्हणणे गैर आहे.
रिसबूड विचारतातः साधुत्वाचा अर्थ माणसाच्या दृष्टिकोणातूनच ठरविला पाहिजे असे तरी कोणी ठरविले?मी रिसबुडांना विचारतो की ‘साधु’ या शब्दाला स्वयंभू अर्थ आहे काय?कोणत्याही शब्दाला अर्थ मनुष्याने दिलेला असतो. तो शब्द वापरणाच्या लोकांच्या अभावी ‘साधु हा एक निरर्थक आवाज आहे. तो शब्द जे वापरतात ते त्याचा एका विशिष्ट अर्थाने उपयोग करतात. तोच त्याचा अर्थ, त्याला दुसरा अर्थ नाही. म्हणून ईश्वराला साधु म्हणायचे असेल किंवा नसेल, तर ते त्या शब्दाच्या संकेतितार्थीच म्हणावे लागेल. नाहीतर ईश्वर साधु आहे किंवा नाही असे म्हणताना बोलणान्याला काय अभिप्रेत आहे हे कसे समजायचे?सारांश, ईश्वर साधु असेल तर तो मराठी भाषा बोलणार्याे लोकांना अभिप्रेत अर्थानच असला पाहिजे.
आता हेही हटवादी आणि साचेबंद आहे काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.