परंपरा, आधुनिकता व राष्ट्रवाद (पूर्वार्ध)

आधुनिकतेचा विचार राष्ट्रवादाच्या संदर्भात केला नाही तर तो अपुरा आणि अधांतरी राहतो असे मला वाटते. म्हणून त्या दोहोंचा संबंध तपासण्याचा हेतू मनात धरून हा लेख लिहीत आहे.
मानवतेवर आधारलेला नीतिविचार आणि बुद्धिवाद ही दोन ‘‘आधुनिक’ म्हटली जाणारी मूल्य आहेत. प्र. ब. कुळकर्णीच्या शब्दांत (आ. सु. मार्च १९९७) “विवेकनिष्ठ मानवता हेआधुनिकतेचे बीज आहे.” “मानवता”म्हटले की राष्ट्रवाद बाद होतो. राष्ट्रवाद बाद होणे मला रुचणारे नाही. तेव्हा प्रथम राष्ट्रवादाची गरज मला का वाटते आणि त्याचे स्वरूप काय हे अत्यंत सक्षेपाने सांगून नंतर राष्ट्रवादाचा नीतिविचाराशी व बुद्धिवादाशी कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो याचा शोध मी घेणार आहे.
(१) राष्ट्रवादाची गरज व त्याचे स्वरूप
राष्ट्रवादाचे मूळ गृहीतक असे की जगस्पर्धाशील आहे. टोळ्या म्हणून, जमाती म्हणून, वंश म्हणून किंवा वेगवेगळे धार्मिक समूह म्हणून मानवजात गटागटांत विभागली गेली आहे, आणि हे गट कधी या रूपाने तर कधी त्या रूपाने एकमेकांशी स्पर्धा करीत आलेले आहेत. गेली काही शतके ‘राष्ट्र’ हा मानवगट या स्पर्धेतला एक महत्त्वाचा एकक (यूनिट) झालेला आहे. या स्पर्धेचा इतिहास एकमेकांवर कुरघोडी, आक्रमण, अत्याचार, हिंसा, शोषण यांचा आहे. आजही या परिस्थितीत मूलतः बदल झालेला नाही अशी राष्ट्रवादी विचाराची धारणा आहे. गटांची अंतर्गत घडण (काँपोझिशन) आणि साधने बदलली असली तरी गटस्वार्थाच्या प्रेरणा आणि त्यांतून निर्माण होणार्याग कृती बढुंशी कायम आहेत असे राष्ट्रवाद मानतो.
अर्थात राष्ट्रा-राष्ट्रांत सहकार्यही असतेच, किंबहुना तेही वाढल्याचे लक्षात येते. टपालाची जागतिक यंत्रणा, इंटरपोल, एक (क्षीण) आंतरराष्ट्रीय कायदा व काही संकेत, पहिल्या आणि दुसर्यार महायुद्धानंतर स्थापन झालेल्या जागतिक स्तरावर काम करणार्याक अनेक संस्था – ही या सहकार्याची उदाहरणे होत. आता तर शस्त्रास्त्रनिर्मूलनतासाठी वाटाघाटी होत आहेत. दुष्काळ, भूकंप, पूर अशा संकटांच्या प्रसंगी देश एकमेकांना मदत करतात असेही दृश्य दिसते.
मात्र सगळेच सहकार्य भूतदयेच्या किंवा मानवतेच्या प्रेरणेतून आकाराला येते असे समजणे चूक ठरेल. किंबहुना बवंश सहकार्य स्वार्थप्रेरित असते असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. सहकारी चळवळीतला “सहकार” तपासून पाहिला तर असे लक्षात येईल की बहुतेक उदाहरणांत स्वार्थ हेच सहकारी समूहाच्या सदस्यांचे ध्येय असते, एकत्र येऊन प्रत्येकाचा स्वार्थ अधिक चांगल्या रीतीने साधण्याची शक्यता असेल अशाच वेळी व्यक्ती स्वेच्छेने सहकार्य करतात आणि असाच सहकार यशस्वी होतो. एवढेच नाही तर व्यक्तींनी समूहाच्या उपक्रमात जी निविष्टी (इनपुट) घातलेली असते – धन किंवा श्रम या स्वरूपात – तिच्या प्रमाणात तिला फायदा होत असेल तरच सहकार स्थिर पायावर उभा राहतो. (सहकार म्हणजे निःस्वार्थीपणा, परोपकार असे अम्र त्याच्याभोवती उभे करण्यात आल्यामुळे भारतात अशी स्थिती झालेली आहे की त्याचे खरे स्वरूपलोकांना कळत नाही, वर्तनात दंभ शिरतो आणि सहकाराचे उपक्रम अशास्त्रीय पायावर उभेराहतात.) सहकार्य म्हणजे “शाहणा स्वार्थ’ हे अर्थातच खरे आहे, पण तरी अखेरीस तो स्वार्थच असतो. म्हणजे सहकार्य करणार्याम समूहाच्या प्रत्येक सदस्यांचा स्वार्थ असतो हे विसरून चालणार नाही. राष्ट्राराष्ट्रांच्या सहकार्याबाबतही हे खरे आहे. विशुद्ध भूतदया किंवा मानवी अनुकंपा यांचा अंश आंतरराष्ट्रीय सहकार्यात असेलच तर तो फार थोडा असतो.
“प्रत्येकाविरुद्ध बाकीचे सर्व” (ईच अगेन्स्ट ऑल) अशा या परिस्थितीत कुठल्याही समूहाला टिकून राहण्यासाठी आपली शक्ती वाढवणे अवश्य ठरते. येथेच राष्ट्रवादाची गरज निर्माणहोते.
भारत आज अशाच जागतिक परिस्थितीत आहे. त्यामुळे त्याला एक अखंड, सुदृढ आणि समृद्ध समूह म्हणून जगायचे तर राष्ट्रवादाची आस धरली पाहिजे.
मुळात राष्ट्रवादाच्या पुरस्कारालाही एक नैतिक अर्थ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक विचाराप्रमाणे मानवी जीवन ‘‘पवित्र’ आहे (“ह्यूमन लाइफ इज सेक्रेड’; अमेरिकेच्या राज्यघटनेतराइट टु लाइफ, लिबर्टी अँड हॅपिनेस’ असे शब्द आहेत.) म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा हक्क आहे. आता ही व्यक्ती समूह केल्याशिवाय जगूशकत नाही; स्पर्धायुक्त जगात तिला ‘‘आपलासमूह ठरवून त्यावर निष्ठा केंद्रित कराव्या लागतात. म्हणून समूहाला किंवा गटालाही जगण्याचा हक्क प्राप्त होतो. या अथनि गट म्हणून जगण्यात एका नीतितत्त्वाचाच आदर केला जातो. मात्र असे जगण्याचा प्रयत्न करीत असताना इतर गटांशी अनीतीने वागणे अपरिहार्य होते. तरीही असे म्हणता येईल. की “आततायितनमायान्तं हन्याद् एवाविचारयन्’ या वचनात आदेशिलेलास्वसंरक्षणार्थ हत्ये’ चा नियम हा एक नीतिनियमच आहे.
(२) राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय नीतिमत्ता
राष्ट्रवादाची पहिली अट म्हणजे “आपले कोण आणि “परके’ कोण हे ठरवणे.“आपपरभाव’” हा अशा रीतीने राष्ट्रवादाचा पाया असतो. इथेच मानवतेला छेद जातो.
स्पर्धा जितकी उग्र तितकी मानवतेवर आधारलेल्या न्याय, नीती इत्यादि मूल्यांची अवहेलना अधिक. आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे नजर टाकली तर असे सहज लक्षात येते की परक्याच्या हेतूबद्दल प्रत्येक राष्ट्र साशंक असते. मैत्री तह-शांतताकरार राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून केवळ सोयीसाठी केले जातात (आणि सोयीनुसार मोडले जातात); दिलेला शब्द पाळला जातोच असे नाही; कधीकधी इतरांचा बळी देऊन किंवा त्यांना नुकसान पोचवून राष्ट्रहित साधले जाते; तुम्ही शेजारचा देश गिळलानाही तर त्याच्या पलीकडे असलेला शत्रुदेशच त्याला गिळून तुमच्या दारावर धडका मारू लागेल या भीतीने शेजारच्या देशाचाच स्वाहाकार केला जातो, इत्यादि.
मुख्य मुद्दा असा की अशी वर्तणूक अनेकदा अपरिहार्य असते. एक मानवसमूह म्हणून वागू पाहण्याचा हा स्वाभाविक परिणाम असतो. जगद्राज्य स्थापन होईपर्यंत या स्थितीला पर्याय दिसत नाही. ते तर अजून दृष्टिपथातही नाही.
उच्च नीतितत्त्वांशी तडजोड न करता जगावे, त्या प्रयत्नात सर्वस्वत्याग किंवा आत्मत्याग करण्याचा प्रसंग आला तरी तो करावा ही भूमिका एखाद्या गटाने तीही सहमतीने (कुणी लादल्यामुळे नव्हे) घेतली तर ती कृती कदाचित गौरवास्पद समजली जाईल. पण तिचे नैतिक मूल्य काय हा प्रश्न उरतोच. कारण सामूहिक आत्मनाश, वैयक्तिक आत्मनाशाप्रमाणेच, जीवनाच्या पवित्र्याच्याविरोधी आहे. दुसरे असे की एखाद्या गटाने आक्रमकांपुढे असा अंतिम त्याग केला किंवा करण्याची तयारी दर्शविली तरी आक्रमकांच्या वृत्तीत फरक पडेल अशी शक्यता फारच कमी आहे.
तेव्हा मानवता हा नैतिकतेचा स्थळकाळनिरपेक्ष आधार होऊ शकत नाही.
मात्स्य न्याय किंवा जंगलचा कायदा जारी असलेल्या जगात उच्च नीतिमूल्यांचा पाठपुरावा शंभर टक्के करता येत नाही याचा अर्थ त्या मार्गाने प्रवासच करू नये असा नाही. पण असा प्रवास करण्याची व जगावर प्रभाव पाडण्याची क्षमता राष्ट्रपुरेसे सुदृढ व समर्थ झाल्यावरच यईल. कदाचित् काही हिंदुत्ववादी म्हणतात त्याप्रमाणे हिंदू समर्थ झाले तर ते विश्वशांतीचा व न्यायप्रस्थापनेचाच प्रयत्न करतील, कारण तसा त्यांचा सास्कृतिक वारसाच आहे. पण ते खरे असो वा नसो, प्राप्त जागतिक परिस्थितीत टिकून राहायचे तर त्यासाठी कधीकधी “सूक्ता”प्रमाणे ‘‘असूक्त’ मार्गाचाही अवलंब करावा लागतो हे म्हणणे शिल्लक उरतेच. (३) राष्ट्रवाद आणि अंतर्गत नीतिमत्ता
मात्र राष्ट्रवादाचीच गरज म्हणूनही अंतर्गत नीतिमत्तेचे निकष मानवतेवर आधारलेले असावे लागतात. अर्थात ही “मानवता’ म्हणजे देशाच्या सीमेत संकुचित केलेली मानवता.
राष्ट्रवादाला एक बाहेरची बाजू असते आणि तिचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय व्यवहारात येतो. तिची दखल आपण घेतली. आतली बाजू सांभाळताना अंतर्गत ऐक्य किंवा संघटन साधावे लागते. तरच सुदृढ होणे शक्य आहे. या ऐक्याला बंधुभाव अवश्य असतो. तसा तो निर्माण होण्यासाठी किमान सामाजिकन्यायाची प्रस्थापना करावी लागते. राष्ट्रवादाच्या विकासाच्या प्रारंभिकइतिहासात हे झालेच नव्हते आणि तरीही प्रखर राष्ट्रवाद प्रत्ययाला येत होता हे खरे आहे. मात्र लोकशाही स्वरूपाची जागृती जगभर होत असताना, आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्कांची जाणीव वाढत्या प्रमाणावर होत असताना, येथून पुढच्या काळात राष्ट्र-उभारणी करू इच्छिणाच्या नेत्यांना आपल्या राष्ट्रवादी विचारांत सामाजिक न्यायाचा आशय प्रविष्ट करून देण्याशिवाय गत्यंतर नाही.
शिवाय एकूणच अंतर्गत वातावरण बंधुभावाचे असणे याचा अर्थ परस्परविश्वास, दिलेला शब्द खरा करण्याची तयारी, अहिंसा, वाद सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब या व अशा गोष्टींना मूल्ये म्हणून मान्यता देणे असा आहे.
(४) नैतिक द्वैत
वरच्या विवेचनाचा अर्थ असा की राष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वात एक नैतिक द्वैत येते, “डबल स्टैंडईसा प्रवेश होतो. यातून राष्ट्रजीवनाविषयीचाही एक प्रश्न उभा राहतो.
राष्ट्रनेते आंतरराष्ट्रीय व्यवहारात “आंतरराष्ट्रीय नीती’ (म्हणजेच अनीती) प्रमाण मानू लागले तर अंतर्गत नीतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता दुर्लक्षिता येणार नाही. ही अनीती खोल गेलेली असण्याची शक्यता असते, कारण तिचे व्यावसायिक शिक्षण दिले जाते. शाकुंतल नाटकात शकुंतलेने दुष्यंतावर प्रहार करताना राजनीतिविशारदांचे वर्ण असे केले आहे … जेशास्त्र म्हणून लबाडीचा अभ्यास करतात…’ (परातिसन्धानम् अधीयते यैः विद्या इति), परराष्ट्र खात्यात, हेरगिरीत, युद्धशास्त्रात असा अभ्यास करावा लागतो. या वागणुकीचा परिणाम अंतर्गत व्यवहारावर होणे अशक्य नाही.
मात्र राष्ट्रनेत्यांच्या आणि एकूणच जनतेच्या मनात राष्ट्राविषयीच्या प्रेमाची व निष्ठेची भावना प्रखर असेल तर हे दुभंगलेपण त्रासदायक ठरणार नाही. इंग्लंडसारख्या राष्ट्रांनी ही किमया साध्य करून घेतली आहे असे वाटते. त्यांच्या अनेक नेत्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवहारात, आपद्धर्म म्हणून न्यायनीतीची तत्त्व धुडकावून लावलेली असली तरी अंतर्गत व्यवहारात विशुद्ध चारित्र्य जपलेले आहे. जेफर्सन, लिंकन, थिओडर रूझवेल्ट, फ्रैंकलिन रूझवेल्ट हे अमेरिकेचे अध्यक्षआंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या राष्ट्राचे हित जपत नव्हते असा आरोप त्यांच्यावर कुणी करणार नाही; तरीही अंतर्गत व्यवहारात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे त्यांनी प्रयत्न केले याला इतिहासाची साक्ष आहे.
प्रस्तुत संदर्भात अभद्र वाटेल असे उदाहरण द्यायचे तर चोरांच्या टोळीचे देता येईल. सहकारी चोर “आपले’ आणि बाकीचा समाज “परका” अशी विभागणी एकदा झाली म्हणजे अंतर्गत नीतीचे नियम कटकपणाने पाकळे जातात हे सर्वश्रुतच आहे.
(५) राष्ट्रवाद आणि जगाचा नैतिक स्तर
राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय नैतिक अराजकाची एक काळी बाजू असली तरी राष्ट्रवादाच्या विकासाचा जगावरचा एकूण नैतिक परिणाम विधायक स्वरूपाचा झाला असण्याची शक्यता आहे. येथे “राष्ट्र’ म्हणताना धर्म, वंश, भाषा इत्यादींवरच्या निष्ठा ओलांडून पुढेगेलेल्या व व्यापक आणि अधिक विवेकी (नॅशनल) निष्ठांचा अवलंब केलेली आधुनिक पाश्चात्त्य राष्ट्रे माझ्या डोळ्यासमोर आहेत. या देशांमध्ये नागरिकांच्या निष्ठा भौगोलिक दृष्ट्या अधिक विस्तृत प्रदेशावर व अधिकाधिक मोठ्या लोकसंख्येवर केंद्रित होत गेल्या. स्थानिक संकुचित निष्ठांचा लोप झाला. हा एक प्रकारचा नैतिक विकासच होय. कारण या प्रक्रियेतून बंधुभावाची व्याप्ती वाढली.
भारतात आपण आज हेच करू पाहात आहोत आणि या प्रयत्नांना थोडेफार यश आल्याचेही जाणवत आहे. गाव, जात, भाषिक गट यांच्या भिंती ओलांडून आपल्या निष्ठा अखिल भारतीय होत आहेत.
आंतरराष्ट्रीय संघर्ष चालूच आहेत. युद्धे होतच आहेत. त्यांची संहारकता वाढलेली आहे. हे सर्व खरे आहे. पण त्याचबरोबर जगातल्या फार मोठ्या भूखंडावर अंतर्गत शांतता व सामरस्य यांचा अंमल चालू आहे. आधुनिक राष्ट्रवादाचा उदय होण्यापूर्वीच्या मध्ययुगातली स्थिती आणि आजची स्थिती यांची तुलना करता राष्ट्रवादाच्या विकासामुळे जगाचा एकूण नैतिक स्तर उंचावला आहे असे मान्य करावे लागते. कार्ल पॉपर यांनी ‘‘ए हिस्टरी ऑफ अवर टाइम्स’ या लेखात म्हटल्याप्रमाणे पाश्चात्त्य समाजाची एकूण नैतिक पातळी उंचावलेली आहे ती या अर्थाने की माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हे तत्त्व पश्चिमी देशांच्या लोकमानसात खोलरुजलेले आहे. या प्रक्रियेत लोकशाही विचारांचा वाटा आहे यात शंका नाही. पण राष्ट्रवादी विचारही तिला पोषक ठरलेला आहे.
(६) राष्ट्रवाद, परंपरा आणि विवेकवाद
‘आपला’ कोण आणि ‘परका’ कोण हे कोणत्याही देशातील राष्ट्रवादाला ठरवावे लागते, हे वर सांगितले. त्याचाच अर्थ असा की ‘‘अस्मिता’ (आयडेंटिटी) ठरवावी लागते. अस्मितेच्या प्रस्थापनेसाठी परंपरेकडे वेळावे लागते. कारण अस्मिता, म्हणजेच एखाद्या जनसमूहाचे वैशिष्ट्य, कालक्रमातून भूतकाळातून घडलेले असते. व्यक्तीची ओळख करून देताना तिचा चरित्रपाठ (बायोडेटा) सांगवा लागतो तसेच हे आहे.
परंपरेत धर्म, भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, नीतिमूल्ये, विज्ञान, तंत्रज्ञान, ललित कला इत्यादि सर्व मानवी कृतींचा समावेश होतो. या सगळ्याला मिळून ‘‘संस्कृती’ हे पर्यायी नाव द्यायला हरकत नाही. या सागळ्यामुळे मानवगटाच्या मनाची घडण होते आणि त्याची वैशिष्ट्ये साकार होतात. म्हणून राष्ट्रवाद आणि संस्कृती यांचे नाते दृढ असते. राष्ट्रवाद हा या अर्थाने बहुधा सांस्कृतिक राष्ट्रवादच असतो. (हिंदुत्ववादी जेव्हा आपल्या राष्ट्रवादाला ‘‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ म्हणतात तेव्हा ती खरे म्हणजे द्विरुक्ती होते. पण आपला राष्ट्रवाद ‘‘धार्मिक” किंवा “केवळ धार्मिक’ नाही असे सुचवण्यासाठी असा शब्दप्रयोग केला जातो. प्रत्यक्षात तसे आचरण होते की नाही हा प्रश्न अलाहिदा.)
भविष्यकाळाविषयीच्या समान आकांक्षा, समान आर्थिक हितसंबंध, समान शत्रूचे अस्तित्व इत्यादि घटकही राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी पुरेसे असतात असे म्हटले जाते. पण हे बंध परंपरेशी तुलना करता क्षीण दिसतात. शिवाय ते जेव्हा कार्यशाली होतात तेव्हा परंपरेपासून पूर्णपणे तुटलेले असतात असे नाही. आणखी असे की ज्या गटांना फार मोठा इतिहास नाही आणि ज्यांच्यामध्ये दृढ परंपरा प्रस्थापित झालेल्या नाहीत असे गट सोडले तर जे पुरातन गट आहेत त्यांना आपला इतिहास सहजासहजी विसरता येत नाही. म्हणून त्या संचिताकडे स्वाभाविकपणेच त्यांची नजर वळते. पण परंपरेकडे वळणे म्हणजे काय?
परंपरा टिकवणे आणि तिचा अभिमान वाहणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची प्ररंभीच दखल घेतलेली बरी. सगळीच परंपरा टिकवण्यासारखी नसते. मात्र परंपरेचे काही घटक टिकवण्यासारखे, पुनरुज्जीवित करण्यासारखे असतात. ज्यांच्या जोपासनेनेच आपले राष्ट्र बनेल अशा आपल्या परंपरा आहेत, पण प्रायः त्या त्याज्य ठरलेल्या आहेत,” असे जेव्हा प्र. ब. कुळकर्णी (आ.सु. एप्रिल १९९७) म्हणतात तेव्हा ते परंपरेच्या सर्व घटकांचा विचार करीत नाहीत. त्यांनी या संदर्भात दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येते की त्यांचा सर्व भर सामाजिक संस्था व समाजरचनेची तत्त्वे यावर आहे. (उदा. “जन्मजात विषमतेवर आधारलेले चातुर्वर्य, स्त्रीजातीची दुय्यमता, व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी”इ.) पण परंपरेचा हा महत्त्वाचा असला तरी एक भाग झाला. विविध ललितकलांचा अविष्कार हाही भारतीय परंपरेचा मोठा भाग आहे. माझे तरी मतअसे आहे की भारतीय संगीत, त्याचे अनेक प्रकार, नृत्यांच्या वेगवेगळ्या शैली, वास्तुकलेचे नमुने–अशा गोष्टी नुसत्याच अभिमानास्पद आहेत असे नसून त्या टिकवून ठेवण्यासारख्याही आहेत. हे माझे वैयक्तिक मत असले तरी अनेकांना पटेल असे मला वाटते. “ललितकला म्हणताना माझ्या मनात केवळ अभिजात (क्लासिकल) कला नाहीत; भांगडा, महाराष्ट्रातील धनगरांचे नृत्य, कुमार गंधर्वांनी पुनरुज्जीवित केलेल्या लोकधुना – म्हणजे लोककलांचे अनेक प्रकारही माझ्या मनात आहेत.
उत्सव, जत्रा हाही सामाजिक संस्कृतीचा भाग असतो. यातला अनुपयुक्त किंवा हानिकारक भाग काढून त्यांना नवे स्वरूप देणे, आधुनिक गरजांशी, अभिरुचीशी त्यांना सुसंगत करून त्या टिकवणे यांतही संस्कृतीची जपणूक होते.
भारतात भाषेचा प्रश्न जटिल आहे. तरीसुद्धा एका राष्ट्रीय भाषेच्या दिशेने प्रवास करणे उपयुक्त होईल यात शंका नाही. सुदैवाने आपल्या संचितात असा प्रवास सुकर होण्याला अनुकूल असे काही घटक आहेत. पण प्रस्तुत संदर्भात भारतात कोणत्या परंपरा टिकविण्यात याव्यात यापेक्षा राष्ट्राच्या उभारणीत सर्वसामान्यपणे ज्या परंपरा टिकविण्यासारख्या असतात, उदा. पोषख, भोजनाच्या पद्धती, अभिवादनाच्या पद्धती इत्यादी अनेक गोष्टींचा या संदर्भात उल्लेख करता येईल त्यांचा उल्लेख मी करीत आहे.
थोडक्यात परंपरा अशा असतात की ज्यांचे संरक्षण, संवर्धन पुनरुज्जीवन विवेकनिष्ठ समाजाच्या विरोधी नसते.
पण जुने काही टिकवणे हा राष्ट्रवादाचा व्यावहारिक भाग झाला. दुसरा भाग मानसिक स्तरावर कार्यरत होतो, तो म्हणजे परंपरेतली अभिमानाची व स्फूर्तीची केंद्रे उज्जीवित करणे. जी संस्कृती आजपर्यंत घडत आली तिच्यामागे काही कर्तृत्वशाली व्यक्तींचे योगदान होते. त्यांच्या ज्या कृती आजही टिकवण्यासारख्या आहेत त्या कृतींविषयी अर्थातच अभिमान बाळगता येतो. शिवाय ज्यांनी त्या कृती प्रचलित केल्या त्या व्यक्तीही अभिमानास्पद ठरतात. मात्र व्यक्तींकडे वळले म्हणजे असे लक्षात येते की ज्या व्यक्तींच्या कृती आज टिकवण्यासारख्या नाहीत, किंवा घातकही ठरतील, त्यांपैकी काही व्यक्तीही आपल्या विशेष गुणांमुळे अभिमानास्पद ठरू शकतात. उदाहरणांनी याचा पुढीलप्रमाणे खुलासा करता येईल. आयुर्वेदातले आजही काही टिकवण्यासारखे असेल तर आयुर्वेद हा अभिमानाचा आणि स्फूर्तीचा विषय होतो. त्याचप्रमाणे त्याचे उद्गाते चरक, सुश्रुत हेही अभिमानविषय होतात. रामायण आणि महाभारत हेही अभिमानविषय आणि वाल्मीकी व व्यास हेही. पण शंकराचार्यांचा मायावाद आज मान्य नसला आणि त्याचे पुनरुज्जीवन घातक वाटत असले तरी आचार्यांची बौद्धिक कर्तबगारी त्यांच्या प्रतिपादनात दिसून येत असेल तर त्या त्यांच्या गुणांपुरते ते अभिमानविषय ठरू शकतात. शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचा व युद्धपद्धतीचा आज काही उपयोग नसला तरी त्यांच्या अनेक गुणांमुळे ते अभिमानविषय व म्हणून स्फूर्तिदाते ठरू शकतात.. शकतात.
पण अभिमान जागृत करणे या क्रियेत विवेकनिष्ठा कितपत राखता येते हा माझ्यापुढे प्रश्न आहे. राष्ट्रनेत्यांचा उद्देश जनतेला क्रियाप्रवण करणे असा असतो. ही जनता म्हणजे कमी-अधिक प्रमाणात ‘‘सामान्य जनता” (मासेस) असते. तिला भावनिक आवाहन करावे लागते; तिच्यापुढेस्फूर्तिदायक” इतिहास – व्यक्तींचा आणि त्यांच्या क्रियांचाही – सांगावा लागतो. पण इतिहास मिश्र असतो; त्याच्यात चांगल्या घटनांबरोबर वाईट घटनाही असतात. पण इतिहासाचे समग्ररूपसांगणे हे भावनिक आवाहनाच्या दृष्टीने फारसे उपयुक्त नसते. थंड, तर्कशुद्ध विश्लेषणातून तप्त भावनिक स्थितीचा परिणाम साधता येत नाही. म्हणून जनतेपुढे पराक्रमपूर्ण, कर्तृत्वशाली इतिहासाचे चित्र रंगविले जाते. इथे विवेकनिष्ठेला ढळ पोचतो.
याहीपुढे जाऊन कधीकधी “नवा इतिहास लिहिला जातो. मिथके तयार केली जातात. ज्या गटांना फार कर्तृत्वशाली इतिहासच नाही अशा गटांच्या बाबतीत असे घडण्याची शक्यता जास्त असते. मिथके तयार करणे हे ऐतिहासिक सत्याशी फारकत घेणेच होय.
लक्षात घ्यायची ती गोष्ट ही की आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि नैतिक अराजक यांच्या वातावरणात जगण्याचा आणि टिकण्याचा प्रयत्न करताना विवेकनिष्ठेला काही प्रमाणात तिलांजली द्यावी लागते. द्यावी लागते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.