वैज्ञानिक रीत

डॉ. हेमंत आडारकर यांच्या पत्राच्या (आ. सु., ८:२, ५९-६१) संदर्भात थोडे विवेचन.
आपल्या पत्रातील पहिल्याच परिच्छेदात डॉ. आडारकरांनी आम्ही आमच्या लेखात (आ. सु., ८:१, २४-२५) वर्णन केलेल्या भस्मधारी तथाकथित वैज्ञानकांच्या वर्णनाची पुष्टीच केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.

विज्ञान हे गृहीतकांपासूनच सुरू होते हे खरेच. सर्वप्रथम कोणा एका वैज्ञानिकाच्या (अथवा सामान्यजनांच्याही!) तल्लख डोक्यात एखाद्या भन्नाट कल्पनेचा (idea) उगम होतो. त्यानंतर, ती व्यक्ती वैज्ञानिक असली तर, अशी कल्पना उपलब्ध ज्ञानावर तपासली जाते व ती अगदीच निराधार (म्हणजे पाण्यापासून पेट्रोल सारखी) नसेल तर ती कल्पना तपासून पाहण्यासाठी (test करण्यासाठी) प्रयोगांची आणखी केली जाते व त्यानुसार प्रयोग वारंवार (हे महत्त्वाचे) केले जातात. मूळ कल्पना जर अशा प्रयोगांद्वारे थोडीफार सिद्ध झाली तर त्याविषयी माहिती अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात अथवा मान्यवर वैज्ञानिक स्वतंत्रपणे पुनरावृत्ती (repeat experiments) करून ती कल्पना ग्राह्य आहे अथवा नाही याचा निर्वाळा जाहीरपणे देतात. या रीतीनेच वैज्ञानिक ज्ञानाची इमारत एक एक वीट रचली जाऊन तयार झालेली आहे. हल्ली अशा कल्पनांना (गृहीतांना) विज्ञानात कमालीचे महत्त्व आहे. ज्यांच्या डोक्यात नवनव्या कल्पना असतात अशा वैज्ञानिकांना त्यांच्या वजनाच्या भारंभार द्रव्य देऊन आपल्याकडे काम करण्यासाठी ओढण्याची पाश्चात्त्य देशात स्पर्धा असते. परंतु ज्यांचे डोके केवळ पूर्वसंचित ज्ञानावरच चालते अशा अनुभवी वैज्ञानिकांना दुय्यम दर्जाचे रटाळ वैज्ञानिक काम करीत (पाट्या टाकीत) आयुष्य काढावे लागते!

या सर्व वैज्ञानिक रीतींमध्ये कोणाही जगन्नियंत्याचे अथवा दैवी सूत्रधाराचे मुळीच स्थान नाही. डॉ. आडारकरांना आपल्या संशोधनात, विश्वाच्या उत्पत्तीत अथवा संरचनेत कोणा सूत्रधाराचा हात आहे असे वाटले याचे कारण त्यांच्या संशोधन विषयात आज अपुरे असलेले ज्ञान हेच आहे. कारण अज्ञानातूनच अज्ञात शक्तींबद्दलचे आकर्षण उत्पन्न होते व वाढते हे तर स्वयंसिद्धचआहे.

विश्वाच्या आरंभाबद्दल व धारणेबद्दल अंतिम ज्ञान विज्ञानाने अजून तरी प्राप्त केलेले नाही. पण त्या दिशेने झपाट्याने प्रगती होत आहे हे सुद्धा लक्षात घ्यावयास हवे. विश्वाचा कोणी निर्माता, होता व तोच सतत विश्वाचे संचालन करतो ही केवळ अज्ञानमूलक भाबडी भावना आहे. एक सामान्यजन म्हणून आमच्या अल्पमतीप्रमाणे आमची अशी धारणा आहे की हे अमर्याद विश्व (अथवा पोकळी) नेहमीच होती व या पोकळीत प्रचंड ऊर्जा सतत होती व आहे. या ऊर्जेपासून भौतिक नियमांनुसार पदार्थ (mass) उत्पन्न होतात व पुन्हा नष्ट होऊन ऊर्जेत रूपांतरित होतात. ही प्रक्रिया विश्वात सातत्याने घडत राहते. हा विश्वाचा मूलभूत भौतिक गुणधर्म आहे. काळ, अंतरे, वेग ही परिमाणे तर माणसाच्या बुद्धीने उत्पन्न केलेली आहेत. ती विश्वाला लागू नाहीतच आणि ही परिमाणे वापरून विश्वाचे आकलन करण्याचे मानवी प्रयत्न आजतरी व्यर्थ आहेत. जोपर्यंत वैज्ञानिक रीतीमध्ये पुरेशी प्रगती होत नाही तोपर्यंत विश्वाचे ठाम आकलन होणार नाही, व या अज्ञानातूनच मानवाला ईश्वराचा, विश्वनियंत्याचा मृगजळासारखा भास होत राहणारच! आणि पर्यायाने आस्तिकता/नास्तिकता हा वाद चालूच राहणार,

आपल्या पत्रात शेवटी डॉ. अडारकरांनी “मी कोण आहे?” “माझा पिता कोण?” हे प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे उत्तर म्हणजे “मी आणि माझा पिता हे दोन्ही या विश्वातील पदार्थाचे व ऊर्जेचे अत्यल्प कण (bodies of mass, whiffs of energy) असून आमचे नियंत्रण मूलभूत भौतिक नियमांनुसार होत असते, असेच द्यावे लागते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.