मी नास्तिक का आहे?

एखादी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, हा ज्ञानक्षेत्राशी निगडित प्रश्न आहे. आणि त्यासाठी प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान हे ज्ञानसाधन आहे. ईश्वराविषयी जेव्हा पुरावा मागितला जातो तेव्हा हा श्रद्धेचा प्रश्न आहे, असे आस्तिक म्हणतात. श्रद्धा ही ज्ञानसाधन होऊ शकते काय?ज्याचा पुरावा देता येत नाही त्यावर विश्वास म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा ज्ञानसाधन कशी काय होऊ शकते?
ज्याप्रमाणे आस्तिक ईश्वर हे अंतिम तत्त्व मानतात त्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानात पुरुष आणि प्रकृती ही अंतिम तत्त्वे मानली जातात. तर अनेकेश्वरवादात अनेक ईश्वर मानले जातात. श्रद्धा हे ज्ञानसाधन असेल तर या विश्वाच्या, सृष्टीच्या मागचे अंतिम तत्त्व काय, या प्रश्नाचे उत्तर सारखे असले पाहिजे, हे उघड आहे. ज्याअर्थी सांख्य, एकेश्वरवाद, अनेकेश्वरवाद या तिन्ही तत्त्वज्ञानांत विश्वाच्या, सृष्टीच्या अंतिम तत्त्वाविषयी, श्रद्धा परस्परांपासून भिन्न उत्तरे देते, त्याअर्थी श्रद्धा हे ज्ञानसाधन आहे, हे मानता येत नाही.
आपण आस्तिक आहोत कारण बुद्धीला मर्यादा आहेत आणि ज्या ठिकाणी बुद्धीचे क्षेत्र संपते त्या ठिकाणी श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते अशी मांडणी आणि प्रतिपादन आस्तिक करीत असतात.
बुद्धीला मर्यादा आहेत, श्रद्धेला मर्यादा नाहीत म्हणजे श्रद्धा ही एक विलक्षण वस्तू असली पाहिजे. बुद्धीपेक्षा सामर्थ्यशाली. बुद्धीला सुद्धा पोटात सामावून घेणारी. असे जर असेल तर आतापर्यंत विज्ञानाचा चमत्कार वाटावा असा जो विकास झाला, तो श्रद्धेच्या बळावर आणि आधारावर व्हावयास हवा होता. उलट विज्ञानविकासाचा इतिहास असे सांगतो की श्रद्धेशी भांडतच, विरोध करीतच विज्ञानाला विकसित व्हावे लागले. कोपर्निकस, ब्रूनो, गॅलिलिओ यांना प्रचंड छळ सहन करावा लागला.
बुद्धीला मर्यादा आहेत म्हणून श्रद्धेचा आधार घ्यावा लागतो व म्हणून ईश्वरास्तित्व मान्य करावे लागते, ही मांडणी सदोष असली तरी तार्किक मांडणी आहे. आणि तर्क हा बुद्धीचा घटक आहे. म्हणजे श्रद्धेचं समर्थन करतानासुद्धा श्रद्धावंतांना बुद्धीचा आधार घ्यावा लागतो. अशा रीतीने आस्तिकांच्या विचारप्रक्रियेतच अंगभूत व्याघात असतो.
सूर्यास्त व सूर्योदय कसा होतो?समुद्राला भरती-ओहोटी कशी लागते?अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे ज्या काळात उपलब्ध नव्हती त्या काळात बुद्धीच्या मर्यादा जाणवल्या असणार. पण या प्रश्नांची उत्तरे बुद्धीच्या आधारावर उपलब्ध झाली, श्रद्धेच्या नव्हे, म्हणून अजूनही कित्येक प्रश्न अनुत्तरित असले तरी या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध व्हायची तर ती बुद्धीच्या आधारेच उपलब्ध होतील, असे निश्चितपणे म्हणता येते.
ईश्वराने सृष्टी कशी निर्माण केली?ती भावातून निर्माण केली की अभावातून निर्माण केली? ती अभावातून निर्माण होऊ शकत नसल्यामुळे ईश्वराच्याही अगोदर जे अस्तित्वात होते याचे स्वरूप काय?ईश्वराच्याही अगोदर काही अस्तित्वात असेल तर ईश्वर हे आदिकारण कसे ठरते? या प्रश्नांची उत्तरे श्रद्धा देऊ शकत नाही.
ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जे नानाविध युक्तिवाद केले जातात ते मला मुळीच स्वीकारार्ह वाटत नाहीत. त्यांच्यापैकी आपण एक उदाहरणादाखल घेऊ. आस्तिक म्हणतात प्रत्येक निर्मितीचा एक कर्ता असतो. जसे अपत्याचा पिता, लाकडी वस्तूंचा सुतार, मातीच्या वस्तूंचा कुंभार, तसा या विश्वाचा, या सृष्टीचा कर्ता ईश्वर. ही सोयीची आणि परवडेल तितकीची तर्कनिष्ठा आहे असे मला वाटते. कारण अपत्याचा कर्ता पिता, लाकडी वस्तूंचा कर्ता सुतार आणि मातीच्या भांड्यांचा कर्ता कुंभार ह्या सर्व व्यक्ती मरणशील आहेत. म्हणून या विश्वाचा, या सृष्टीचा कर्ताही मरणशील असला पाहिजे आणि मरणशील ईश्वर ही व्याघातमय कल्पना आहे. त्यामुळे ईश्वरास्तित्व मानता येत नाही.
सृष्टीचा एक निर्माता आहे, हे मला अशक्य वाटते. ईश्वराला सृष्टी निर्माण करावयाची तर त्याला तशी इच्छा व्हावी लागेल. Brain tissues असल्याशिवाय त्याला तशी इच्छा होणार नाही. त्याला Brain tissues आहेत याचा अर्थ त्याला रुधिराभिसरण संस्था असली पाहिजे. म्हणून पचनसंस्था असली पाहिजे. तो मलमूत्र विसर्जन करीत असला पाहिजे. पण हे तर मरणशील सजीवाचं वर्णन आहे.
ईश्वराला कर्तुमकर्तुम् शक्ती मानली जाते. मानवी जीवनात जे काही बरे वाईट घडते ते या ईश्वरामुळेच. एखाद्या व्यक्तीने खून केला तर मग त्या व्यक्तीला गुन्हेगार मानता येत नाही. कारण ती व्यक्ती मग ईश्वरेच्छेचे साधनमात्र ठरते. आणि म्हणून स्वायत्त आणि स्वतंत्र नीती आणि मूल्यव्यवस्था प्रस्थापित करण्यास ईश्वर ही कल्पना अडथळा आहे असे मला वाटते.
तात्पर्य, विश्वाचा हा पसारा अनादि आणि स्वयंभू आहे, त्याला आदिकारण नाही. जे जे इंद्रियगोचर आणि आपल्या जाणिवेच्या कक्षेत येणार आहे, त्याचेच अस्तित्व आहे ही भूमिका हीचतर्कशुद्ध आणि वैज्ञानिक भूमिका आहे.
मी नास्तिक आहे तो या कारणांसाठी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.