श्री माधव रिसबूड यांस आणखी एक उत्तर

आ. सु. (जुलै ९७) ला लिहिलेल्या पत्रात श्री. माधव रिसबूड लिहितात – ‘फलित बीजांडापासून आरंभ करून संपूर्ण देह तयार होईपर्यंत ज्या क्रिया घडतात त्यात जोडीजोडीचे अवयव ज्या पेशींपासून बनतात त्या पेशींची दोन अधुके एकमेकांपासून वेगळी होऊन दूर होण्याची क्रिया असते. ही दोन अधुक एका काल्पनिक मध्यरेषेच्या दोन्ही बाजूस ठराविक अंतरावर जाऊन थांबतात, त्यांना डावे-उजवेपणाचे भान असते व त्यानुसार त्यांची पुढली जडणघडण होते, आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना सिमेट्रीचे भान असते. या तीन गोष्टी निश्चितपणे हे दर्शवितात की कसलीतरी जाणीव इथे कार्यरत आहे.”
एक असे मत हे की वैज्ञानिक तत्त्वे ही वस्तुस्थितीचे वर्णन करण्यासाठी योजलेली व्यापक रूपके आहेत. तर वर वर्णिलेली क्रिया वाचताना तिच्याशी जुळत्या कोणत्या क्रिया सुचतात, ते तपासून पाहिले, म्हणजे अशा सर्व घटनांसाठी रूपक शोधता येईल. अशा अनेकानेक समांतर क्रिया सुचल्या. जसे – दोन सारख्या वजनांच्या मुली फुगडी खेळत होत्या. आजूबाजूच्या प्रोत्साहनाने वेग वाढला, हातांना घाम आला, हात ‘सुटले आणि मुली एका काल्पनिक मध्यरेषेपासून दोन विरुद्ध बाजूंना जाऊन पडल्या. वजने सारखी असल्याने त्या सारख्याच दूर फेकल्या गेल्या. ज्याने सममिती साधली गेली. हा काल्पनिक प्रयोग पेशीविभाजनासमरूप ठरला.
असेच खरबरीत जमिनीवर समांतर ठेवलेल्या दोन लोहचुंबकांचेही झाले. जेव्हा जमिनीवर तेल टाकून घर्षण कमी केले गेले. असेच सारख्या वजनाच्या दोन चमूमधल्या रस्सीखेचीतही झाले. असेच कमकुवत ‘झिप्’ तुटल्यावर सदन्याच्या दोन कडांचेही
झाले. …
पण यात (मला तरी) कोठेही भान आणि जाणीव दिसली नाही. उलट भान ‘सुटून’ तोल जाण्याची ही सर्व उदाहरणे वाटली! दोन समान वस्तूंना जोडणारे एक बल होते, आणि दूर फेकणारे एक बल होते. जोडणार्यार बलाहून ‘तोडणारे’ बल जास्त झाले, आणि दोन वस्तू तंतोतंत समरूपतेने ‘हलक्या’ झाल्या. अखेर ‘सममिती’, ‘सिमेट्री’ ही रचनांकडे बाहेरून पाहणा-यांना जाणवणारी बाब आहे, रचनेच्या घटकांना ती ‘जाणवते’ कशी हे कळत नाही.
बले, त्यांचे समतोल, असे समतोल टळणे, या सार्याा बाबी भौतिकीच्या दाट परिचयाच्या आहेत. त्या सजीव रचनांमध्ये सापडल्या की त्यात जाणीव आलीच असे मानणे योग्य दिसत नाही.
पेशीविभाजन आणि त्यातून क्लिष्ट, सुघड, अवयवांमध्ये विभागता येईलशी रचना घडणे, या सार्याणचा खूपसा भाग समजलेला नाही. पण काल्पनिक मध्यरेषेच्या दूर सममिती साधत जाणे, हा भाग बलांच्या विचारातून समजतो. इतर काही भागांमध्ये जाणीव, भान, वगैरेंसारखे गुण आज आढळतात. जास्त अभ्यासातून यापैकी काही भाग भौतिक-वैज्ञानिक आकलनाच्या टप्प्यात येऊ शकतील, हे अगदी सहज शक्य आहे.
या प्रतिपादनात ‘जाणीव’ या कल्पनेची थट्टा नाहीच, उलट फार सहजपणे ‘जाणिवेसारख्या संकल्पना का वापरू नयेत याचे स्पष्टीकरण आहे. आता जाणिवेपासून ईश्वराच्या संकल्पनेपर्यंतचा युक्तिवाद दिलेला नाही, त्यामुळे पुढे जाणे अवघड आहे.
क्लिष्ट रचनांमध्ये असे गुणधर्म असतात, की जे नीट न समजल्यामुळे जाणिवेसारख्या अस्पष्ट कल्पना वापरायचा मोह होतो. पण यातले कांही कांही गुणधर्म प्रयोगसिद्ध, अनुमानाने समजू शकणारे ठरतात, ह्याची जाणीव ठेवायलाच हवी!
(अत्यंत किचकट वाटणाच्या गोष्टींची ‘सोपी’ स्पष्टीकरणे कशी सापडतात यावर ब्रायन गुडविनचे “हाऊ द लेपर्ड चेंज्ड इट्स स्पॉट्स’, हे पुस्तक मजेदार माहिती देते. या बाबतीत जास्त रस असणान्यांनी ते जरूर वाचावे!)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.