सामाजिक सुधारणा आणि आजचा सुधारक

विवेकवादाला (rationalism) ला वाहिलेले “आजचा सुधारक’ हे जगातील प्रमुख मराठी मासिक आहे. या मासिकाचे लक्ष्य मराठी भाषिक, विशेषत: महाराष्ट्रातील जनता हेच आहे हे सुद्धा उघड आहे. ही जनता म्हणजे सामान्य जनता नसून, समाजातील विचार करण्याची आवड व कुवत असलेली मंडळी एवढीच “आ.सु.” ची वाचक आहेत. परंतु ही मोजकी मंडळीच नवे तर्कशुद्ध विचारही प्रसवू शकतात.
“आजचा सुधारक’ च्या पहिल्या संपादकीयामध्ये (आ.सु., १-१ : ३-५) यामासिकाची काही उद्दिष्टे विशद केलेली आहेत. त्यात अंधश्रद्धेचे व बुवाबाजीचे निर्मूलन, सामाजिक जीवनातील धर्माचा ‘धुडगूस’, व्रतेवैकल्ये, यज्ञ, कुंभमेळे यांवर आवर घालणे; दलित, स्त्रिया यांचे शोषण थांबविणे; अनाथ, अनौरस मुलांना आधार देण्याचे महत्व पटवून देणे. याचसोबत तत्त्वज्ञानाचे विशेषतः विवेकवादाचे प्रकट चिंतन, वैज्ञानिक मनोवृत्तीस प्रोत्साहन देणे इत्यादि विषयांची चर्चा करण्यासाठी एक जबाबदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे असा स्थूल उद्देश नवा सुधारक (म्हणजेज आजचा सुधारक) चे प्रकाशन सुरू करण्यामागचा होता.
परंतु ज्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यात आला होता त्या गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेली व १०० वर्षांपूर्वी त्यांच्या मृत्यूनंतर विस्कळीत झालेली सामाजिक सुधारणा या उद्दिष्टांमुळे साध्य होण्याचा संभव कमीच आहे याची जाणीवही आजचा सुधारककर्त्यांना होती हेही स्पष्ट आहे. विशेषत: आगरकरानंतर गेल्या शंभर वर्षात भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्रीय समाजात आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे. जन्या समस्यापैकी अनेकांचे निराकरण झालेले आहे, परंतु त्याचबरोबर नवी जीवनपद्धती, नव्या रूढी, नवनवीन सामाजिक मान्यता व संकेत तसेच जागतिकीकरणाच्या हव्यासामुळे नवी सामाजिक वर्तणूक अस्तित्वात आलेली असून आगरकरांच्या वेळी समाजात जेवढे वाईट व टाकाऊ होते त्याहून कितीतरी पटीने अधिक वाईट आणि त्याज्य असे आचार समाजात पसरले आहेत. त्यामुळे “आजचा सुधारक’ सारख्या सामाजिक सुधारणेचे कंकण बांधलेल्या प्रकाशनाने आपल्या उद्दिष्टांची व्याप्ती वाढविणे निकडीचे झाले आहे. त्या दृष्टीने चर्चा व्हावी व वाचकवर्गातील साक्षेपी व विचारी मंडळींना आपले विचार मांडण्यास उद्युक्त करावे म्हणून या लेखाचा प्रपंच केला आहे.
आ. सु.” ने निश्चित स्वरूपाच्या सामाजिक सुधारणा सुचविणे व या सुधारणा प्रत्यक्षात सामान्य नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात कशा अंमलात आणाव्यात याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन करणे हा “आ.सु.” चा प्रमुख प्रयत्न असावयास पाहिजे. या सुधारणा कोणत्या याविषयी सुबुद्ध वाचकांना विचार करावयास लावणे आवश्यक आहे. केवळ हिंदुत्व, कुटुंबपद्धती, समान नागरी कायदा, स्त्रीमुक्ती यांसारख्या प्रमुख विषयांवर चर्चा घडवून आणणे एवढेच आमचे मर्यादित कार्य आहे असा या मासिकाच्या संचालकांचा दावा असू शकतो. परंतु अगदी साध्यासाध्या वैयक्तिक वर्तनातही आवश्यक अशा सुधारणा (grassroot reforms) घडविण्यासही मार्गदर्शन आवश्यक आहे. अनेक सुधारणा, चर्चा वाचून वाचकांना पटल्या तरी त्या प्रत्यक्षात कशा उतरावयाच्या, कोणी व कशी सुरवात करावयाची याविषयी वाचकांना व सामान्यांना नेहमीच संभ्रम पडतो. उदाहरणार्थ अलीकडील एका अंकात (आ.सु. ७:१२, ३७९-३८०) एका वाचकांनी पत्र लिहून मौंजीबंधन संस्काराविषयी एक व्यावहारिक प्रश्न संपादकांना विचारला होता. त्याचे उत्तर त्यांना आजवर मिळालेले नाही. जनतेला अशा प्रकारचे व्यावहारिक, परंतु सुधारणांसंबंधी मार्गदर्शन करणे “आ.सु.” ला अभिप्रेत नाही काय?
तात्त्विक चर्चा वाचणे व त्यावर विचार करणे सोपे असते; पण मी आज नेमके काय करावे हे उमजण्यास ‘‘आ.सु.” चा उपयोग न झाला तर या मासिकाचे कार्य हे केवळ बुद्धिरंजनच ठरण्याची शक्यता आहे. केवळ वैचारिक खाद्य पुरविण्यापलीकडे वाचकांना जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत विवेकावर आधारित सुधारित आचार करण्याचा प्रात्यक्षिक मार्ग दाखविला पाहिजे असे आम्हास वाटते. असे झाले तरच या मासिकाने काही भरीव कार्य केले असे म्हणता येईल.
यासाठी सर्वप्रथम ज्या विषयासंबंधी समाजसुधारणा होणे आवश्यक आहेत असे आजचा सुधारककर्त्यांना वाटते त्या विषयांची स्पष्ट सूची तयार झाली पाहिजे. ही सूची सतत प्रासंगिक ठेवण्यासाठी वाचकांनी त्यात भर टाकली पाहिजे. तसेच जे विषय अयोग्य वाटतील त्याबद्दल मतप्रदर्शन केले पाहिजे. अशी सूची तयार करण्यासाठी काही लहानमोठे विषय आम्हाला सुचवावेसे वाटतात. आम्ही खाली दिलेल्या सूचीतील विषय अग्रक्रमाने आलेले आहेतच असे नाही. परंतु वाचकांसमोर काहीतरी निश्चित सादर करण्यासाठी खालील विषय सुचविले आहेत. सामाजिक जीवनातून व वैयक्तिक आचरणातून पुढील गोष्टींचे निर्मूलन व्हावे.
१. सार्वजनिक स्वरूपात धार्मिक उत्सवांचे आयोजन.
२. अध्यात्माचे स्तोम. उदा. गुरुमहाराजांच्या नावे साप्ताहिक उपासना, सत्संग, प्रार्थना, प्रवचन, जपजाप्य.
३. शुभाशुभाच्या निराधार समजुती; तिथी, दिवस, वार, मुहूर्त, त्यानुसार वर्त्य, अवज्यचि आचारनियम,
४. सामाजिक, आर्थिक, मानसिक पातळीवर स्त्रियांना दिला जाणारा दुय्यम दर्जा.
५. बालकांचे शोषण : बालमजुरी, निरक्षरता, अस्वास्थ्य इ. प्रकारे.
६. बालिकांचे कुपोषण, निरक्षरता, बालविवाह.
७. चंगळवाद, चैन, व्यसने यांचा पगडा.
८. पालकांच्या अविचाराने मुलांना नाकारले जाणारे क्रीडास्वातंत्र्य, क्रीडांगणावरील अतिक्रमणे.
९. पोषक आहाराबद्दल अज्ञान,
१०. शिक्षणाचा खालावलेला दर्जा, शाळेतील शिक्षकांचे औदासीन्य.
११. बोर्डात व विद्यापीठ परीक्षांत होणारे संघटित गैरप्रकार.
१२. खाजगी शिकवणीवर्गाचा बाजार व अपायकारक स्पर्धा.
१३. नामांकित शाळांमधून प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या देणग्या.
१४. बौद्धिकदृष्ट्या अक्षम विद्याथ्यांचा उच्चशिक्षणक्षेत्रात संचार.
१५. व्यावसायिक शिक्षणाची नावड व त्याबद्दल प्रतिष्ठेचा अभाव.
१६. भ्रष्ट मार्गांनी संपत्ती, सत्ता संपादन करणा-यांनाही समाजात मिळणारा मान.
१७. राजकारणातील घराणेशाही.
१८. दूरदर्शनचे वाढते व्यसन, बालमनावरील दुष्परिणाम.
१९. दिवाळी, नाताळ, नववर्षाचे आगमन, वराती इ. प्रसंगी कोट्यवधी रुपयांची होणारी राख.
२०. धुळवड, रंगपंचमी इ. प्रसंगी बीभत्स वर्तन व घाणेरड्या भाषेचा वापर.
ही आधुनिक सामाजिक जीवनातील अवांच्छनीय वर्तणूक असून तीत सुधारणा होणे आवश्यक आहे. वाचकांनी या यादीत भर घालावी.
या सुधारणांसंबंधी “आजचा सुधारक’ सारख्या व्यासपीठावर चर्चा होणे अगत्याचे आहे व समाजातील विचारी मंडळींनी याविषयी सामान्य जनतेला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
हे विषय सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने गौण आहेत असेही मत अनेक वाचकांचे असू शकते. काही वाचक असे म्हणतील की “आ.सु.” चा वाचकवर्ग इतका सुबुद्ध व उच्चभ्रू आहे की त्यास अशा “पोरकट” विषयांवर उहापोह करण्याची आवश्यकता नाहीच मुळी. असे जर असेल, तर हा सुबुद्ध वाचकवर्ग विवेकवाद, कुटुंबांची पुर्नरचना, समान नागरी कायदा, स्त्रीमुक्ती, हिंदुत्व, मनुस्मृती यासारख्या वजनदार विषयांवरील तात्त्विक चर्चा वाचून आपल्या उच्चभ्रूपणाला सुखावीत आहे, आणि “सुधारक’ हे या विशिष्ट वाचकवर्गाच्या केवळ मनोरंजनाचेच साधन मानावे लागेल. याउलट समाजातील लहानसहान अंधश्रद्धा, अपप्रवृत्ती, त्याज्य रीतीरिवाज यांची स्पष्ट व्याख्या करून अशा अनिष्ट गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी “आ.सु.” मार्गदर्शन करणार असेल तरच या मासिकाचे नाव सार्थ होणार आहे. म्हणूनच उपर्युक्त सूचीतील विषयांवर लेख, पत्रे, स्फुटे प्रसिद्ध करण्याचे “सुधारक’ ने ठरविले पाहिजे व त्यासाठी “सुधारकाच्या सुमारे १००० नियमित वाचकांना चर्चेसाठी आवाहन केले पाहिजे. तरच संभ्रमात पडलेल्या लोकांनी नेमके काय करावे याचे योग्य मार्गदर्शन आजचा सुधारक’ कडून होऊ शकेल. अशी अपेक्षा करणे अनाठायी आहे काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.