सुधारणा, लैंगिकता व क्लोनिंग

हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याचा पसारा, त्याचे वस्तुमान, त्याचे तेज, त्याची शक्ती, त्याचे वेग, या सर्वच गोष्टी मानवी कल्पनेबाहेरच्या आहेत. गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण त्या समजू शकत नाही. या उलट अणु-रचनेचे, अणु-परमाणूंचे आकार, वेग, भ्रमणकक्षा, वस्तुमान वगैरेंची कल्पना, गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. पण ही विश्वाची अवाढव्य यंत्रणा काय किंवा अणूची सूक्ष्मतम यंत्रणा काय, त्या एखाद्या घड्याळाप्रमाणे नियमबद्ध आहेत. त्यामधील घटकांना स्वयंप्रज्ञाही नाही व आत्मभानही नाही. त्यांना संवेदनाही नाही व बुद्धिमत्ताही नाही. स्मृतीही नाही, व प्रगतीही नाही. विस्मयपूर्ण आदर करावा, कौतुक करावे असे त्यामधे कांही नाही. सर्व काही ‘जड’ आहे, त्यामध्ये जडत्व आहे (inertia). चैतन्य नाही!

मग खरोखरी विस्मय करण्याजोगे या विश्वात काय आहे? तर माझ्या मते पहिली विस्मययुक्त आदर बाळगण्यासारखी गोष्ट म्हणजे जीव. पृथ्वीवर अथवा विश्वात कोठेही, पहिला सजीव पदार्थ कसा निर्माण झाला असेल, हे पदार्थ-विज्ञान शास्त्राच्या किंवा रसायनशास्त्राच्या नियमांनी उलगडून दाखवणे कधी शक्य होईल की नाही, याबद्दल माझ्या मनांत शंका आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सजीवाला निर्णयस्वातंत्र्य आहे. प्राप्त परिस्थितीत डावीकडे वळावे की उजवीकडे, हल्ला करावा की पळून जावे, प्रकाशाच्या दिशेने जावे की प्रकाशापासून दूर, असे निर्णय सजीव घेऊ शकतात. सजीवांनी पृथ्वीवरील पर्यावरण बदलले. वनस्पतींनी वातावरणातील कार्बन डायॉक्साइड वापरून ऑक्सिजन तयार केला. नंतर ऑक्सिजन वापरून कार्बन डायॉक्साइड तयार करणारे प्राणी निर्माण झाले. जीवसृष्टीची उत्क्रांति होत होत अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती वगैरे तयार झाले.

यानंतरची विस्मयजनक गोष्ट होती लैंगिक पुनरुत्पादन. त्यापूर्वीच्या शाकीय (vegetative) पुनरुत्पादनात पुनरुत्पादित जीव हा त्यापूर्वीच्या जीवाची हुबेहूब नक्कल असे. त्यात फरक झाला तर अपघातानेच. त्यामुळे उत्क्रांतीची गती फार कमी होती. पण लैंगिक पुनरुत्पादनामध्ये दोन वेगवेगळे गुणधर्म असलेले जीव एकत्र येऊन गुणधर्माचे वेगळेच एकत्रीकरण असलेल्या जीवाला जन्म देऊ लागले. त्यामुळे अपघाताने निर्माण झालेल्यागुणधर्मातील फरकांचा परिणाम अनेक पटींनी गुणित झाला व भराभर उत्क्रांति होउन सजीवांच्या अनेक जाती-प्रजाती-उपजाती निर्माण झाल्या. जीवनाच्या संघर्षामध्ये त्यांतील काही टिकल्या, काही नष्ट झाल्या. ज्या टिकल्या त्या पर्यावरणातील अनुकूल प्रतिकूल बदलांचा फायदा उचलत किंवा त्यांना तोंड देत वाढल्या, पसरल्या व अधिक उत्क्रांत झाल्या. यानंतरची विस्मयजनक गोष्ट होती संस्कार, संस्काराचा उगम माणसापासूनच झाला. मानव सोडून इतर सर्व जीवांमध्ये एका पिढीच्या अनुभवाचा वारसा पुढील पिढीला मिळू शकत नाही. मागील पिढ्यांचा वारसा पुढील पिढ्यांना फक्त आनुवंशिक गुणांच्या आधारेच – म्हणजे जनुक-रंगसूत्रे यांच्या माध्यमातूनच मिळायचा. नाही म्हणायला अधिक उत्क्रांत सस्तन प्राणी आपल्या पिलांना भक्ष्य मिळवणे, संरक्षण करणे, शिकार करणे, दडून बसणे, वगैरेचे थोडेफार शिक्षण देतात, पण मानवाच्या तुलनेत ते दुर्लक्षणीय शिक्षण होय. संस्कारांच्या मुळे मानवाने आनुवंशिकतेच्या मर्यादा ओलांडल्या व आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा, शहाणपणाचा फायदा तो आपल्या मुलांना व इतर मानवांना सरळसरळ (directly) देऊ लागला. त्यामुळे मानवाची प्रगति इतर जीवांच्या तुलनेने फारच जलद झाली. भाषा, लेखन, छपाई, पुस्तके, कॉम्प्युटर्स, रेडिओ, टेलिव्हिजन वगैरे साधनांमुळे अनुभवांचे संकलन व संक्रमण यांची व्याप्ती फारच वाढली, व लैंगिकतेवर संस्कारांनी मात केली. म्हणजे मुलाला जैविकरीत्या, अनुवंशाने, आई-बापांकडून मिळणाच्या गुणधमपिक्षा, शिक्षणाने गुरूकडून मिळणाच्या शिक्षणाचे महत्त्व वाढू लागले आहे.. अर्थात् आई-बापच गुरूचेही काम करतात – पण तो संस्काराचा (शिक्षणाचा) एक भाग होय.
या संस्काराच्या फायद्याबरोबरच दोन तोटेही मानवाला स्वीकारावे लागले आहेत. एक म्हणजे मानवाची जैविक उत्क्रांति थांबली आहे. जैविक उत्क्रांतीसाठी आवश्यक गोष्ट म्हणजे अधिक चांगले गुणधर्म असलेल्या नराला वा मादीला अधिक मुले होणे, ती मुले जीवनसंघर्षात अधिक यशस्वी होऊन त्यांनी पुन्हा अधिक पुनरुत्पादन करणे व त्यामानाने कमी चांगले गुणधर्म असलेल्या व्यक्तींना पुनरुत्पादनाची संधी कमी मिळणे, व त्यांची प्रजा जीवनसंघर्षात अयशस्वी होऊन हळूहळू नष्ट होणे. अशा रीतीने चांगले गुणधर्म हळू हळू सर्व प्रजातीमध्ये पसरतात व तेवढी उत्क्रांति होते.
पण मानवाने आपल्या बुद्धीने पर्यावरण बदलून व समाजव्यवस्था निर्माण करून जीवनसंघर्षच संपवला आहे.

अधिक प्रगत मानवांची जननक्षमता कमी झालेली दिसते इच्छापूर्वक संततिनियमनामुळे म्हणा किंवा इतर भौतिक सामाजिक प्रगतीचा एक अपरिहार्य परिणाम म्हणून म्हणा. औषधे, रोगप्रतिकारक लसी, यांच्यामुळे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीलाही फारसे महत्त्व उरले नाही. यंत्रामुळे शारीरिक शक्तीला महत्त्व उरले नाही. चष्म्यामुळे नैसर्गिक दृष्टिक्षमतेला महत्त्व उरले नाही. काळजीवाहू सरकारमुळे व कुटुंब व्यवस्थेमुळे दुर्बळ व्यक्तीही विवाह करून अपत्यनिर्मितीकरू शकतात. अशीही यादी खूप वाढवता येईल! या सर्वांचा परिणाम म्हणून माणसांचीआनुवंशिक उत्क्रांति थांबली आहे, व अधोगतीच सुरू असण्याची शक्यता बरीच आहे.

दुसरा तोटा म्हणजे संस्काराने होणारे अनुभवांचे, शहाणपणाचे संक्रमण आपोआप होत नाही. आनुवंशिकतेने होणारे संक्रमण आपोआप होत असते. पण संस्कार प्रत्येक व्यक्तीवर नव्याने करावे लागतात. प्रत्येक व्यक्ती रानटी माणसाचेच आनुवंशिक गुणधर्म घेऊन जन्माला येते. कारण माणसाची बरीचशी प्रगती ही गेल्या काही हजार वर्षातलीच आहे व त्या प्रगतीचे आनुवंशिकतेत परिणाम दिसण्याच्या दृष्टीने हा कालावधी फार कमी आहे. शिवाय वर पाहिल्याप्रमाणे, माणसाची आनुवंशिक दृष्ट्या उत्क्रांति थांबलीच आहे. एका प्रगत समाजव्यवस्थेमध्ये नांदण्यासाठी जे गुणधर्म माणसाला आवश्यक आहेत, त्याच्याशी विसंगत असे गुणधर्म बन्याच वेळा माणसाला आनुवंशिकतेने मिळतात व त्यांत फरक होण्याची शक्यता नाही. म्हणून या विसंगत गुणधर्मावर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीवर संस्कार करण्याची, त्याला शिक्षण देण्याची जरूरी असते. असे नाही की एका जोडप्यावर चांगले संस्कार केले, की त्या जोडप्याच्या मुलांना ते संस्कार आपोआप, जन्मत: प्राप्त होतील. त्यामुळे संस्कार करण्याची ही क्रिया कधीच न संपणारी आहे. शिवाय संस्कार करणारी माणसे स्वत: सुसंस्कृत असावी लागतात. संस्कार करण्याची बरीच मोठी जबाबदारी पालकांची असते व त्यातील बराच भाग अनौपचारिक असतो. मुद्दाम शिकवण्याचा भाग त्यात कमी असतो. मुले पाहून, ऐकून, उदाहरणाने शिकत असतात. जन्मलेल्या प्रत्येक मुलावर सुसंस्कार करण्यासाठी मुळात सुसंस्कृत पालक व शिक्षक वर्ग आवश्यक आहे. तो कोठून आणणार? इतके करूनही सुसंस्कृत माणसांतील मुळातील स्वार्थी-रानटी प्रवृत्ती कधी बंड करून उठतील व सर्व संस्कारांवर मात करतील हेसांगता येत नाही.

समाजातील अन्याय, शोषण, विषमता दूर करण्यासाठी झटणारे कार्यकर्ते बर्यावच वेळा अशा निर्णयाला येतात की मुळात माणूसच बदलायला हवा. विशेषत: समाजवादी कार्यकर्ते असे वारंवार म्हणतात की आम्हाला माणूसच बदलायचा आहे, किंवा आम्ही माणूसच नवीन घडवणार आहो. माणूस बदलण्याची प्रक्रिया किती अवघड, कशी कधीच न संपणारी व कशी जवळजवळ अशक्य आहे हे सर्वांनीच ध्यानात घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ सुसंस्कार करण्याचा प्रयत्नच सोडावा असे नाही. पण माणूस हा त्याच्या चांगल्या वाईट प्रवृत्ति-गुणांसह, जसा सध्या आहे, तसाच यापुढेही हजारो वर्षे राहणार आहे, हे वास्तव स्वीकारून मग त्यावरच आपली कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्था बेतली पाहिजे. माणसामध्ये स्वार्थ, लोभ, मत्सर, क्रोध, काम, आळशीपणा, प्रसिद्धीची व स्तुतीची हाव, भीति, हे सर्व गुण कमी-अधिक प्रमाणात असणारच. हे लक्षात घेउन, एकाच वेळी या प्रवृत्तींचा समाज-धारणेसाठी उपयोग करून घेणे व त्याच वेळी या प्रवृत्तींना योग्य बंधनात ठेवून त्यांना समाजविघातक स्वरूप धारण करता येणारनाही अशी डोळ्यात तेल घालून काळजी घेणे, यात जी व्यवस्था यशस्वी होईल तीच चिरस्थायी होऊ शकेल.

त्याच वेळी समाजातील जास्तीत जास्त मुलांवर त्यांच्या घरी, शाळेत व एकंदर समाजात चांगले संस्कार होतील याचा सतत प्रयत्न करत रहावे लागेल. हे न संपणारे काम असेल व त्याच्यावर जास्तीत जास्त वेळ, पैसा व श्रम समाजाने खर्च केला पाहिजे. सुसंस्कृत समाजचअधिक सुखी, अधिक बंधनमुक्त व नवीन – नवीन आव्हाने स्वीकारणारा असू शकतो.

या सुसंस्कारांचा एक महत्त्वाचा भाग असा असावा. प्रत्येक व्यक्तीचे आपल्या मुलानातवंडांवर प्रेम असते. ती मूल-प्रवृत्ती असते. माणसाच्या धडपडीचा एक महत्त्वाचा हेतू आपल्या मुलानातवंडांची योग्य तरतूद करणे हा असतो. याच प्रवृत्तीचा विकास करून, तिला योग्य वळण लावून, आपल्या सध्याच्या जीवनपद्धतीने, राहणीमानाने, आपण आपल्या मुला-नातवंडांचे म्हणजेच पुढील पिढ्यांचे जीवन अशक्य किंवा रोगट करत नाही ना याबद्दलची जागरूकता निर्माण करणे हा सुसंस्कारांचा महत्वाचा भाग राहावा. या जागरूकतेतूनच प्रदूषण न करणे, पृथ्वीवरील साधन-संपत्तीची उधळपट्टी न करणे व सर्वच पर्यावरणाची काळजी घेणे ही महत्त्वाची नीति बनेल.

क्लोनिंगचा हेतू लैंगिक पुनरुत्पादनाने संततीत निर्माण होणार्यान आनुवंशिक गुणधर्मामध्ये, जी विविधता व अनिश्चितता असते, तिच्यावर मात करणे हा आहे. हापूसच्या आंब्याच्या कोयीपासून आपण नवीन झाड लावत नाही, तर त्याचे कलम करतो, त्यातलाच हा प्रकार आहे. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत कदाचित क्लोनिंग उपयोगी ठरेल व समाजमान्य होऊ शकेल. पण माणसाच्या बाबतीत मात्र ते अवघड असेल, त्यापासून फायदाही काही असणार नाही व ते कधीही समाजमान्य होईल असे वाटत नाही. पण एखादे इंद्रिय बनवण्याइतका जर त्याचा उपयोग करता आला तर ते वैद्यकीयदृष्ट्या उपयोगी ठरण्याची व समाजमान्य होण्याची शक्यता आहे.

सारांश, माणसाच्या बाबतीत दोन दुर्दैवी गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. एक, त्याचा नैसर्गिक विकास किंवा जैविक उत्क्रांति थांबली आहे. दोन, त्याच्यावरील सुसंस्कारांचे संक्रमण आपोआप त्याच्या संततीमध्ये होत नाही. क्लोनिंगने एका माणसापासून नवीन माणूस बनवला, तरी मूळ माणसाच्या संस्कारांचा – अनुभवांचा नवीन क्लोन-संभव माणसाला कांही फायदा मिळणार नाही. क्लोनिंगमध्ये फक्त आनुवंशिक गुणच संक्रमित होतील. संस्कार पुनश्च करावेलागतीलच.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.