आस्तिकता आणि विज्ञान : दि. य. देशपांडे ह्यांच्या लेखाला उत्तर

मे १९९७ च्या ‘आजचा सुधारक’च्या कव्हरवर बर्ट्रॅंड रसेल यांचा ‘इतरांच्या मताबद्दल आदर’ हा उतारा, तर पहिल्या पानावर दि. य. देशपांडे यांच्या लेखात माझ्या नावाच्या आसपास असलेले उद्गारवाचक चिन्ह हा विरोधाभास गंमतीशीर वाटला.

वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे हे देशपांडे यांचे मत. ‘देश म्हणजे देशातील माणसे’हे माझे त्याला उत्तर.

दि. य. देशपांडे ह्यांना कोणता ईश्वर अभिप्रेत आहे? आइन्स्टाइन-बोर-एकल्स ह्यांच्या परमेश्वराच्या संकल्पना कोणत्या? ईश्वराची व्याख्या कोणती? दि. य. देशपांडे ह्यांना अभिप्रेत असलेला ईश्वर हा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वसाधु आहे. ह्या काटेकोर चौकटीत मी नास्तिक आहे. कारण देशपांडे यांचा ईश्वर हा देवळाच्या गाभार्याआत, चर्चमध्ये किंवा देवघरात सापडतो.

देशपांड्यांचा लेख हा एक monologue आहे कारण परमेश्वराची त्यांची व्याख्या मला अभिप्रेत नाही. व्याख्याच जर वादग्रस्त असेल पुढील वादाला अर्थ राहात नाही.

…. अजापुत्रं बलिं दद्यात् । देवो दुर्बलघातकः।।

ही परमेश्वराची दुसरी संकल्पना. ईश्वर जर evil असेल तर देशपांड्यांना आस्तिक व्हायला
आवडेल का?

मी agnostic आहे कारण माझे संशोधनातले अनुभव असे मी लिहिले आहे. Nuclear physics व Astrophysics मधील ते अनुभव सांगण्यासाठी गणिताची मदत घ्यावी लागेल. तेव्हा एक प्रश्न ‘आजचा सुधारक’च्या वाचकांसमोर ठेवतो.What is the link between molecules and life? दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर मी तुम्हाला इलेक्ट्रॉन प्रोटॉन सारखे building blocks देतो. तुम्ही माणूस सोडा मला एक अमीबा तयार करून द्याल?

दुसरा प्रश्न : genes पुढील पिढ्यांत जावे यासाठी जी धडपड अगदी कीटकांसारख्या प्राण्यांत दिसते, त्याचे स्पष्टीकरण सांगा.

Is there a general scheme of things? Or is the whole universe based on chance? या दोन प्रश्नांची मला कोणीही उत्तरे द्यावीत.

माझ्यामते वरील दोनही गुणधर्म मला माझ्या संशोधनात आढळले. म्हणूनच मी agnostic आहे.
देशपांडे यांनी माझ्या मतांचे lumpenisation केले आहे.

परत त्यांच्या लेखाकडे वळू या. देशपांडे म्हणतात की गेल्या तीन हजार वर्षात ‘ईश्वराचा शोध लागला नाही. विज्ञान भविष्यवाणी उच्चारत नाही. तेव्हा भविष्यात ‘ईश्वराचा शोध लागणार नाही असे नाही. वैज्ञानिकरीत्या आपण एवढेच म्हणू शकतो की ‘ईश्वराच्या शोधासाठी ३००० हून अधिक वर्षे लागतात.

वैज्ञानिक रीतीवर देशपांड्यांचे प्रतिपादन हे pedagogic स्वरूपाचे आहे. विज्ञान म्हणजे काय? Science is international असे म्हणणारे विद्वान आढळतात. पण वस्तुस्थिती तशी आहे का? आज विज्ञान ही एक Euro-centric intellectual activity आहे. जरा Discovery हे टीव्हीवरील चॅनल बघा.

देशपांडे, शास्त्रीय शोधनिबंध मान्य करताना शास्त्रज्ञ काळा आहे का गोरा आहे हे तपासले जाते हे तुम्हाला ठाऊक आहे का?

तुम्ही म्हणाल की डॉ. आडारकर peripheral गोष्टींना महत्त्व देत आहेत. विज्ञानाचा गाभा तसा नाही. मला एवढंच म्हणायचे आहे की Science is a human activity.

देशपांडे आणि इतर नास्तिक विवेकवादी, हे ‘ईश्वर’ मानत नाहीत, पण विज्ञान आणि वैज्ञानिकांना मात्र देव्हार्‍यात बसवू इच्छितात.

‘वैज्ञानिक हा एक मानव आहे’ हे जर मान्य झाले तर बरेचसे प्रश्न सुटतात. एखादा डॉक्टर, पोलीस अधिकारी, कवी, वकील हे आस्तिक/नास्तिक असणे आणि शास्त्रज्ञआस्तिक/नास्तिक असणे यांत फरक नाही.

देशपांडे यांनी केलेले विधान “धर्म ईश्वरावाचून शक्य नाही’ हे बरोबर नाही, कारण इस्लाममधील इस्माइली पंथ, बौद्ध आणि जैन धर्म यांच्यात ‘ईश्वर’ ही संकल्पना नाही.

‘ईश्वर’ आणि ‘विज्ञान’ या दोन्ही संकल्पना सर्वमान्य नसल्यामुळे असे monologues सुरूच राहाणार. We are all punching in air.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.