आडारकरांच्या उत्तराविषयी

डॉ. हेमंत आडारकरांच्या लेखाला मी मे ९७ च्या अंकात दिलेल्या उत्तराला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते याच अंकात छापले आहे. त्याविषयी दोन शब्द लिहिणे अवश्य वाटते.
वैज्ञानिक म्हणजे विज्ञान नव्हे या माझ्या विधानावर ते म्हणतात की देश म्हणजे देशातील माणसे.
त्यासंबंधी एवढेच म्हणणे पुरे की विज्ञान म्हणजे प्रमाणित ज्ञानाचा संचय, तर वैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक उद्योग करणारी माणसे. माणसे असल्यामुळे माणसांचे दोष त्यांच्याठिकाणी असू शकतात. (उदा. आपल्या शोधाविषयी खात्री करणे किंवा प्रीति असणे.) परंतु विज्ञान कोणत्याही काळी सिद्ध झालेले आणि सर्वमान्य झालेले ज्ञान. त्यात चूक असू शकेल, पण ती अजून सापडलेली नाही. ही दोन म्हणजे विज्ञान आणि वैज्ञानिक – एक कसे असू शकतील हे सांगणे कठीण आहे.
परंतु आडारकरांच्या उत्तरातून एक गोष्ट स्पष्टपणे व्यक्त झाली हे चांगले झाले. ती म्हणजे ईश्वराच्या अनेक संकल्पना आहेत, आणि ईश्वर आहे की नाही हा प्रश्न विचारण्यापूर्वी कोणत्या ईश्वराची चर्चा चालली आहे हे स्पष्ट करणे अवश्य आहे. ईश्वराच्या अनेक कल्पनांपैकी एखाद्या कल्पनेचा ईश्वर नसला तरी एखाद्या अन्य कल्पनेचा ईश्वर असू शकेल. ईश्वराची सामान्यपणे गृहीत कल्पना म्हणजे सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु असलेल्या आणि मनुष्यांच्या प्रार्थनांना नवसांना पावणार्याश पदार्थाची. असा ईश्वर असू शकत नाही असे मी आपल्या लेखात म्हटले होते. डॉ. आडारकर आता म्हणताहेत की ‘या काटेकोर चौकटीत मी नास्तिक आहे.’ हे उत्तर मला इष्ट आहे, कारण ह्याच वर्णनाच्या ईश्वराविरुद्ध माझी मुख्यतः तक्रार आहे.आस्तिकांचा ईश्वर तो हाच, आणि त्याला अस्तित्व नाही असे माझे मत.
पण आडारकर असेही म्हणतात की आपण ईश्वराविषयी अज्ञेयवादी आहोत. परंतु तो कोणता ईश्वर ते ते सांगत नाहीत. ते फक्त आजचा सुधारकाच्या वाचकांसमोर दोन प्रश्न ठेवतात, ते म्हणतात “मी तुम्हाला electrons, protons सारखे building blocks देतो. त्यांतून तुम्ही मनुष्य सोडा, अमीबा तयार करून दाखवा.’
समजा या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आले तर त्यावरून ते करू शकणारा ईश्वर आहे असे सिद्ध होईल?मनुष्य आज पुष्कळ गोष्टी करू शकत नाही. पण भविष्यात तो त्या करू शकणार नाही असे सिद्ध होत नाही. मनुष्याचे सामर्थ्य रोज वाढते आहे. कोणी सांगावे आडारकरांचेआव्हानही त्याला स्वीकारता येईल.
दुसरा प्रश्न. कीटकांसारख्या प्राण्यांतही genes पुढील पिढ्यांत जातील अशी धडपड दिसते. तिचे स्पष्टीकरण काय आहे?
एक छोटीशी दुरुस्ती. संबंध प्राणिसृष्टीत नर आणि मादी यांच्या संयोगाची धडपड दिसते हे खरे आहे, आणि संयोग झाला की त्यांतून genes चे संक्रमण होते हेही खरे. पण म्हणून genes चे संक्रमण व्हावे या हेतूने नरमादीचा संयोग होतो हे खरे नाही. आपल्या कृतीमुळे genes चे संक्रमण होते याच्याविषयी ते पूर्ण अज्ञ असतात.
पण समजा, हेही स्पष्टीकरण आपल्याला देता न आले तर त्याने त्याच्यामागे ईश्वराचे कर्तृत्व आहे हे सिद्ध होईल?खरे म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर ‘मला माहीत नाही’ असे साधे द्यायला हवे.
त्याऐवजी आडारकर म्हणतात की मी अज्ञेयवादी आहे.
‘अज्ञेयवाद’ हा शब्द आपण सहज, विचार न करता वापरतो. अज्ञेयवादाची अनेक व्यंजिते ‘अज्ञेयवाद-एक पळवाट’ या लेखात (नोव्हेंबर ९६) स्पष्ट केली आहेत. तो एकदा डोळ्यांखालून घालावा असे मी आडारकरांना सुचवितो.
आपण अज्ञेयवादी आहोत असे म्हणतांना आपल्याला उत्तर माहीत नाही, ते आपल्याला अज्ञात आहे, एवढेच आडारकरांना अभिप्रेत असावे असा माझा तर्क आहे. तसे असले तर ती भूमिका सहज मान्य होऊ शकेल.
आडारकर म्हणतात की विज्ञान हा आंतरराष्ट्रीय उद्योग आहे असे काही विद्वान म्हणतात. पण हा त्यांचा भ्रम आहे. वस्तुतः तो एक Euro-centric उद्योग आहे. या म्हणण्यात थोडा तथ्यांश असेल; पण ते बवंशी असत्य आहे. रामन्, चंद्रशेखर, रामानुजन्, खुराना इत्यादि भारतीय वैज्ञानिकांना जी सार्वत्रिक मान्यता मिळाली ती त्यांच्या वर्णनिरपेक्ष. खरे म्हणजे जर कोणता उद्योग आंतरराष्ट्रीय असेल, तर तो विज्ञान हा आहे. वैज्ञानिकांमध्ये काही लोक वर्णभेद मानणारे असतील. पण ते फार कमी, अपवादात्मक. सर्व मनुष्य समान आहेत ही कल्पना नवीन आहे. पण ती हळूहळू प्रस्थापित होते आहे. पण अजून काही वैज्ञानिक संकुचित मनोवृत्तीचे आहेत, म्हणून विज्ञान हा Euro-centric उद्योग आहे असे म्हणणे अतिरेकी आहे.
आडारकरांनी आणखी दोन प्रश्न विचारले आहेत आणि त्यांची उत्तरे कोणीतरी द्यावीत असे त्यांचे आवाहन आहे. ते प्रश्न असे आहेत : (१) विश्वात काही व्यवस्था आहे की नाही?की (२) विश्व केवळ योगायोगाने चालते?
या प्रश्नाविषयी आमचे मित्र नंदा खरे म्हणतात त्याप्रमाणे हे दोन प्रश्न अन्योन्यव्यावर्तक आहेत असे मानायचे कारण नाही. कदाचित् विश्वात दोन्ही असतील, एक सामान्य व्यवस्था असेल, आणि तिच्यात योगायोगाला बराच वाव असेल.
आणि दुसरे म्हणजे त्यात व्यवस्था आहे असे म्हटल्याबरोबर ती कोणीतरी निर्माण केली असली पाहिजे, आणि म्हणून त्यांचे अस्तित्व सिद्ध होते असे नाही. प्रामाणिकपणाचा मार्ग म्हणजे ते अज्ञेय आहे असे न म्हणता, ते आज अज्ञात आहे, आणि कदाचित ते सर्वदा अज्ञातच राहील; पण म्हणून आपला शोध चालू न ठेवणे हा त्यावर उपाय नाही. कदाचित त्या प्रश्नांची उत्तरे पुढेमागे सापडतील.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.