विश्वातील सर्वव्यापी मूलतत्त्व

डॉ. हेमंत आडारकरांनी माझ्या पत्राची (आ.सु. ८:४, १११-११२) दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. विश्वाच्या उत्पत्तीत व संरचनेमध्ये कोणा सूत्रधाराचा हात आहे असे डॉ. आडारकरांना जाणवते (आ.सु. ८:२, ५९-६१) या त्यांच्या जाहीर विधानावर आमचा तीव्र आक्षेप आहे. एखादा डॉक्टर, पोलीस अधिकारी, कवी, वकील यांच्यासारखाच शास्त्रज्ञ आस्तिक/नास्तिक असू शकतो ( आ.सु. ८.५, १५२-१५३) हे आडारकरांचे म्हणणे ही शोचनीय गोष्ट आहे. भारतातील एका नामवंत विज्ञानसंस्थेशी संबंध असलेल्या डॉक्टरआडारकरांसारख्या वैज्ञानिकाने अशी अवैज्ञानिक विधाने सार्वजनिकपणे करावीत हे भारतीय विज्ञानाच्या प्रगतीसाठी अयोग्य आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. रामन नावाच्या लुच्च्या माणसाच्या पाण्यापासून पेट्रोल’ या फसवाफसवीला प्रारंभी समर्थन देणार्याप भारतशासनाच्या विज्ञानविभागातील काही उच्चपदस्थ मंडळींनी दाखविल्यासारखाच हा अविवेक होय. या विश्वात घडणारी प्रत्येक घटना, मग ती खगोलविश्वातील असो वा पृथ्वीवरील (असल्यास इतर ग्रहांवरीलही) जीवसृष्टीशी संबंधित असो, निश्चित भौतिक नियमांच्या पलीकडे जाऊन कोणत्याही अज्ञात शक्तीच्या प्रभावामुळे घडत नाही, याविषयी कोणत्याही सच्च्या वैज्ञानिकाच्या मनात तरी संभ्रम असू नये.

डॉ. आडारकरांनी आपल्या “आस्तिकता आणि विज्ञान’ या (आ.सु., ८:५, १५२१५३) लेखात एक प्रश्न(?) वाचकांसमोर ठेवला आहे. तो म्हणजे ‘‘What is the link between molecules and life?” हे वाचून तर करमणूकच होते. डॉ. आडारकरांच्या संशोधन/अभ्यास विषयातील, अर्थात् Nuclear Physics व Astrophysics मधील, त्यांच्या अधिकाराचा मान राखून त्यांना नम्रपणे सुचवावेसे वाटते की त्यांनी कृपया Molecular Biology या विषयावर अलीकडे प्रसिद्ध झालेले उत्तम ग्रंथ अथवा या विषयावरील शोधनिबंध प्रकाशित करणारी २-४ प्रमुख नियतकालिके अवश्य चाळावीत; म्हणजे त्यांना वरील प्रश्न वाचकांसमोर ठेवण्याचे धाडस होणार नाही! अमीबा तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन/प्रोटॉन एवढे मोघम building blocks पुरेसे ठरावेत ही त्यांची समजूतही modem biology च्या थोड्या अभ्यासानंतर त्यांना सुधारावी लागेल यात शंका नाही.
विश्व हे अचल (static) आहे असे विधान आम्ही केलेले नाही. उलट विश्वातील पदार्थ (matter) व ऊर्जा (energy) यांचे सातत्याने परस्पर परिवर्तन होत असते, म्हणजेच विश्व अखंडपणे dynamic अवस्थेत असते, असेच आम्ही म्हटले होते. अतिदूरवरील आकाशगंगांमधील (galaxies) ऊर्जेच्या प्रचंड ढगांपासून पदार्थाचे नवे पिंड तयार होत असल्याची, हबल अंतरिक्ष दुर्बिणीने घेतलेली प्रकाशचित्रेपाहून विश्व static आहे असे कोण म्हणेल?

काळ, वेग व अंतरे ही माणसाने आपल्या सोईसाठी निश्चित केलेली परिमाणे असून ती विश्वाला लागू नाहीत या आमच्या विधानाचा अर्थ, विश्वाचा पसारा कोणासही कधीही अंतराच्या परिमाणात मोजता येणार नाही, विश्वातील पदार्थाच्या हालचालींचा व ऊर्जाप्रसारणाचा वेग कळणार नाही, तसेच विश्वाच्या अस्तित्वाची कालगणना करणे अशक्य आहे, असा आहे.

विश्वामध्ये सर्वत्र व सार्वत्रिक असे जे मूलभूत भौतिक नियम आहेत ते अगदी आकाशगंगांच्या व्यवहारांपासून, प्राण्यांच्या मेंदूत व मज्जातंतूंमध्ये होणार्याग व्यवहारांपर्यंत एकसारखेच आहेत. गुरुत्वाकर्षण अथवा ऊर्जा व पदार्थ यांचे परस्पररूपांतर यांसारख्या सर्वच भौतिक नियमांच्या मुळाशी एकच शाश्वत मूलभूत भौतिक मूलतत्त्व आहे. ते म्हणजे, “पदार्थाचे पिंड कोणत्याही आकाराचे असोत व त्यांच्यामध्ये अंतर कितीही असो, अशा पिंडांमध्ये कमी अधिक प्रमाणात उत्पन्न होणारे आकर्षण’. हेच मूलतत्त्व ग्रहतान्यांपासून रासायनिक अणुरेणूंच्या परस्पर संबंधांपर्यंत, तसेच जीवांच्या पेशीतील असंख्य रेणूंच्या (molecules) संरचनेच्या व कार्यप्रणालीच्या मुळाशी आहे. ग्रहांमधील गुरुत्वाकर्षणापासून, पदार्थातील व जीवरसायनामधील hydrogen bonds, covalent bonds, disulfide bonds, van der woals bonds यासारखे विविध अनुबंध हे याच भौतिक मूलतत्त्वाचा परिपाक आहेत. त्यामुळे या विश्वातील सर्वच घटनांचा आधार विविध आकारांच्या (with different physical weight to molecular weight) पिंडांमधील (bodies of matter) आकर्षण व अनुबंध करण्याची ऊर्मी हाच असून या मूलतत्त्वाला वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या संज्ञा मिळालेल्या आहेत: परंतु मूलतत्त्व एकच आहे.

ज्या मंडळींना (वैज्ञानिक अथवा सामान्यजन) ईश्वराचे, विश्वनियंत्याचे अस्तित्व मानल्याखेरीज समाधान होत नाही, चैन पडत नाही, त्यांनी या भौतिक मूलतत्त्वालाच ईश्वर का मानू नये? असे झाले तर ईश्वर ही कोणी बाहेरून विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती नसून, तो या विश्वातील सर्व चराचरांमधील अणुरेणूत वास करतो ही अध्यात्मातील एक मान्यता तरी खरी आहे असे म्हणता येईल! व या मूलतत्त्वावर श्रद्धा ठेवून स्वत:ला कौतुकाने आस्तिक म्हणवून घेता येईल!

विश्वातील प्रत्येक जीव, मी अथवा माझा पिता, हा विश्वातील पदार्थातील मूलद्रव्ये व विश्वातील ऊर्जेपासून मिळविलेल्या कॅलरीजपासूनच उत्पन्न झालेला आहे. पित्यापासून माझी उत्पत्ती व माझ्यापासून माझ्या प्रजेची उत्पत्ती ही पदार्थ व ऊर्जा यांच्या वैश्विक स्रोतापासूनच होते व या प्रत्येक जीवाचे अंतत: वेगळ्या पदार्थात आणि मुक्त ऊर्जेतच रूपांतर होते. यासगळ्या व्यवहारात आध्यात्मिक, पारलौकिक अथवा अगम्य असे काय आहे?

ता. क.
डॉ. हेमंत आडारकर आपल्या पत्रात (आ. सु. ८-६, १९१-१९२) लिहितात की ‘‘विश्वाची उत्पत्ती ही एका प्रचंड स्फोटामुळे झाली असे शास्त्रज्ञ मानतात. त्यानंतर विश्व हळूहळू थंड होत गेले व त्याचे आजचे तपमान उणे २७० (-270°C) अंश सेल्सियस आहे.”

डॉ. आडारकर विश्व या संज्ञेमध्ये कशाचा अंतर्भाव करतात हे स्पष्ट नाही. ज्या! स्फोटामुळे विश्व निर्माण झाले तो स्फोट कशाचा होता?ज्या गोष्टीचा (पदार्थ/ऊर्जा) स्फोट झाला त्याचे स्वरूप काय होते?जे होते (अर्थात् पदार्थ अथवा ऊर्जा) ते विश्वाचाच भाग नव्हते काय? हा प्रारंभीचा (?) स्फोट झाल्यानंतर पुन्हा असे स्फोट झाले नाहीत काय? होत नाहीत काय? या अमर्याद पोकळीत (ज्यास विश्व म्हणावे असे आम्हास वाटते) ऊर्जा व पदार्थ यांमध्ये सातत्याने परिवर्तन होत नाही काय?आजही कृष्ण विवरात गडप होणारे तारे (किंबहुना संपूर्ण आकाशगंगा) आणि सातत्याने ऊर्जेच्या स्फोटातून जन्मणारे नवजात तारे (Stars are bom!) हे जर सत्य असेल तर मग एक स्फोट (Big Bang) होऊन विश्व निर्माण झाले असे ते म्हणतात, ते कोणते विश्व होय?विश्व तर एकच आहे व त्याला आदि अंत नाही, त्याचा व्याप मोजणे असंभव आहे अशी आमची समजूत आहे, ती खोटी आहे काय?

विश्वाचे तपमान आता उणे २७० अंश सेल्सियस आहे असे ते म्हणतात ते कोणत्या ठिकाणी?विश्वातील रिकाम्या जागी अथवा सर्वत्र?जेथे ऊर्जेचे निस्सारण होते अथवा तारे आकुंचन पावून अतिघन होतात तेथेही एवढेच तपमान असते काय?प्रखर तान्यांच्या मंडळातही असेच अतिशीत तपमान असते काय?सूर्यमंडळातील शनी आदि ग्रहच काय, पण पृथ्वीवरील सहारामधील तपमान हेही विश्वाच्या एका घटकाचे तपमान नाही काय?

डॉ. आडारकरांनी त्यांची स्वतःची व ते ज्या शास्त्रज्ञांचा हवाला देतात त्यांची विश्वाच्या व्याप्ती व स्वरूपाबद्दलची संकल्पना पुनश्च स्पष्टपणे व थोड्या विस्ताराने मांडावी अशी त्यांना विनंती आहे. तसेच भौतिकीचे एक नामवंत अभ्यासक (physicist) या नात्यानेत्यांनी विश्वाविषयी वर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अद्ययावत ज्ञानाच्या आधारे देऊन सामान्य वाचकांचे उद्बोधन करावे असेही आवाहन त्यांना करावेसे वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.