आस्तिक्य आणि विवेकवाद

विवेकवाद म्हणजे अनुभव आणि तर्क यांच्याशी सुसंगत असेल तेवढेच स्वीकारणे आणि यांच्याशी विसंगत असणारे काहीही न स्वीकारणे.
ईश्वरविरोधी, विवेकवादी नास्तिकांची भूमिका अमान्य करता आली तर आपोआपच आस्तिकवादाची तर्कसुसंगतता सिद्ध होईल. आपण विवेकवादी नास्तिकांचा ईश्वरविरोधात युक्तिवाद पाहू. हा युक्तिवाद त्यांना बिनतोड वाटतो.
विवेकवादी नास्तिकांचा ईश्वरविरोधातील युक्तिवाद
नास्तिकांचा युक्तिवाद मुख्यतः आस्तिकांच्या भूमिकेतील विसंगतीवर बोट ठेवणारा आहे. त्यांचे म्हणणे असे की आस्तिकांची ईश्वरविषयक कल्पना ही मुख्यतः दुःखहर्या ईश्वराची आहे. जगातील विविध प्रकारचे आणि अपार असे दुःख पाहिले तर त्यापासून मुक्तता द्यायला समर्थ असा फक्त ईश्वरच असू शकतो अशी आस्तिकांची समजूत आढळते. नास्तिकांचे म्हणणे असे की दुःखहरण करू शकण्यासाठी ईश्वर हा प्रथम सर्वज्ञ असावा लागेल; त्याशिवाय दुःख कुठकुठेआहे आणि कसकसे आहे हे त्याला कळूच शकणार नाही, आणि कळलेच नाही तर दुःखहरणाचाप्रश्नच निर्माण होणार नाही. पण ईश्वर केवळ सर्वज्ञ असून भागणार नाही. तो सर्वथा साधु म्हणजे सदैव शुभाची आकांक्षा करण्याची वृत्ती असणारा आणि अशुभाचे हरण करण्याची आकांक्षा करणारा हवा. कारण त्याखेरीज त्याला कुठे अशिव/अशुभ (evil) आहे हे समजले तरी साधुत्वाअभावी अशिवहरणाला प्रवृत्तच होणार नाही असे घडणे शक्य आहे; आणि शेवटी, सर्वज्ञतेच्या आणि सर्वथासाधुतेच्या जोडीने ईश्वर हा सर्वशक्तिमानसुद्धा असायला हवा. कारण त्याला शक्ती नसलीच किंवा ती सीमित असली तर अशिवाचे ज्ञान होऊन, त्याचा नाश करायला प्रवृत्त होऊनही प्रत्यक्षात तो अशिव दूर करू शकणार नाही. तेव्हा दुःख हरणासाठी ईश्वर असायचा तर, तो सर्वज्ञ, सर्वथा साधु आणि सर्वशक्तिमान असायलाच हवा. या तीन गुणांपैकी कशाही बाबत ईश्वरात न्यून असून चालणार नाही.
आस्तिकांच्या दुःखहर्ता ईश्वर या संकल्पनेची व्यंजिते (इम्प्लिकेशन्स) स्पष्ट केल्यावर विवेकवादी नास्तिकांचे पुढे म्हणणे असे की, समजा असा ईश्वर असला तर जगात दुःख असायला काही कारणच न उरल्याने जगात दुःख असायला नको; आणि जर जगात दुःख असेल तर मात्र त्याचा अर्थ ईश्वर नाही किंवा निदान दुःख हरण्यास समर्थ असा तरी ईश्वर नाहीच नाही, त्यात काही तरी न्यून आहे, असा होईल. जगात दुःख आहे हे तर उघडच आहे, ते नाकारण्याचा प्रश्नच नाही. म्हणून दुःख असताना त्याच्याशी व्याघाती असा ईश्वरही आहे हे म्हणणे तर्कविसंगत ठरते. दुःख आणि दुःखहर्ता ईश्वर या दोहोंपैकी फक्त एक आणि एकच गोष्ट असू शकते. दुःख हे निर्विवादपणे आहे. सबल ईश्वराचे नसणे हेही निर्विवाद आहे. हेही आपोआपच सिद्ध होते.
तथाकथित बिनतोड युक्तिवादावरील तोड
दुःखाचे असणे आणि सर्वज्ञ, सर्वथासाधु व सर्वशक्तिमान अशा ईश्वराचे असणे यात विवेकवादी नास्तिकांना वाटतो तसा व्याघात संबंध नाही असे मला वाटते. याचे पहिले कारण असे की, अशिव आणि दुःख यात फरक आहे, त्यांत तादात्म्य नाही. दुःख हे शिवकार म्हणजेच शिवाचे साधन असू शकते. उदा. स्वदेशाच्या स्वातंत्र्य-रक्षणार्थ केलेले बलिदान, दुःख हा कशाचा तरी परिणाम असतो. (१) मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध काही घडले की दुःख होते. उदा. पहिला क्रमांक मिळावा असे वाटत असताना आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न केले असताना तो मिळाला नाही की दुःख होते. एखादे गोड स्वप्न पाहात असताना झोपमोड झाली की दुःख होते. परिचिताच्या अकाली मृत्यूमुळे दुःख होते. (२) शरीराची स्वाभाविक स्थिती बिघडली. जसे, पाय मुरगळला, बोट कापून रक्त आले. डोळ्यात कचरा जाऊन निघाला नाही की दुःख होते. (३) शरीराच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती झाली नाही की दुःख होते. उदा. भूक लागूनही खायला मिळाले नाही किंवा शरीर थकले असताना विश्रांती मिळाली नाही. पण शरीर आणि मन या दोहोंचाही जिथे संबंध असतो तिथे चित्र वेगळे दिसते. त्यात सामान्यपणे मनाचावरचष्मा असतो. उपास करायचा ठरवले की भूक लागूनही समोर असलेले अन्न जेव्हा आपण खात नाही तेव्हा मानसिक समाधानापोटी सहन केलेले शारीरिक दुःख आपण अशिव समजत नाही. उलट बहुतेकदा ते धार्मिक असते. त्याला आपण संयम असे नाव देतो आणि अशाच काहीशा संयमाची अपेक्षा असताना क्वचित कोणाला तो राखता आला नाही तर त्याकडे, शारीरिक गरजेची तीव्रता लक्षात घेऊन, कानाडोळा करतो. उदा. घरात प्रेत असताना भूक अनावर होऊन एखाद्याने जेवणे. वयाच्या किंवा अन्य कोणत्याही अधिकाराने मोठा असणार्या. कोणीही, त्याच्याकडून लहानाबाबत झालेल्या चुकीची कबुली दिली किंवा प्रसंगी त्यासाठी माफी मागितली तर याला प्रांजळपणा असे सद्गुणवाचक नाव देऊन यात आपण वयाच्या मोठेपणाला बाध येण्याचे दुःख किंवा आपण बिनचूक असू शकत नाही याची खंत सहन करण्याला प्रोत्साहित करत असतो. मृत्यू अकाली असला तर अशिव असतो पण कृतकृत्य झाल्यावर आलेला किंवा प्रायोपवेशनाने निमंत्रित केलेला मृत्यूदेखील शिवच असतो. म्हणूनच दु:खाची सरसकट उपस्थिती ईश्वरविरोधी मानण्याचे कारण नाही. पण तरीही, विवेकवादी नास्तिक म्हणतील की काही दुःख असे उरतेच की नाही की ज्याने आस्तिक्य असिद्ध व्हावे?तेव्हा जोपर्यंत कोणतेही दुःख अशिव किंवा अशिवकारक नाही हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ईश्वराचे अस्तित्व शक्य होणार नाही. या आमच्या भूमिकेला कुठेही तडा जात नाही.
दुःखाच्या वरील प्रकाराखेरीज नैसर्गिक कारणांनी निर्माण होणारे दुःखही जगात असते. उदा. सर्पदंशाने विषबाधा होणे, वाघाचे भक्ष्य ठरणे, रोग होणे, भूकंपग्रस्त होणे इ. पण या प्रकारच्या दुःखावर मात करणे शक्य आहे. अर्थात आपण निष्काळजी राहिलो नाही आणि अज्ञान हा बचावाचा मुद्दा होऊ शकत नाही असे लक्षात ठेवून प्रयत्नशील राहिलो तर, सारांश, दुःखाची उपस्थिती ही ईश्वरविरोधी ठरण्याचे कारण नाही.
जगात दु:ख आहे, ते विविध प्रकारचे आणि पुष्कळ आहे हे अमान्य न करता फक्त ते अशिव नाही असे आपण म्हणतो तेव्हा आपणही अनुभवाकडे डोळेझाक न करता, नास्तिकांप्रमाणे, त्याचा अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य तेवढेच घेतो आहोत हे कोणीही विसरता कामा नये. त्यामुळे आपल्या युक्तिवादातील चूक दाखवून जगात काही दु:ख अशिव असेच आहेआणि ते अपरिहार्य आहे असे कोणी दाखवेपर्यंत नास्तिकांची ईश्वरविरोधी भूमिका असिद्धच म्हणायला हवी.
पण आपलाही हा युक्तिवाद निषेधकच आहे. त्यामुळे नास्तिकांची भूमिका सिद्ध व्हायला विरोध झाला तरी त्याने आस्तिकांची भूमिका सिद्ध होते असे नाही. आस्तिकांची भूमिका निर्विवाद सिद्ध करायची किंवा निदान ती संभाव्य आहे असे दाखवायचे तर जगात अशिव असले तरी ते ईश्वरविरोधी नसणे कसे शक्य आहे हे दाखवायला हवे. आपण तसे करू.
अशिव
तेव्हा अशिव असले तरी ते ईश्वराच्या स्वभावाच्या विरोधी नसण्याचा संभाव्य मार्ग .. कोणता ते आता सांगायला हवे. हा मार्ग आहे सेंद्रिय पूर्णाच्या सिद्धान्ताचा.
सेंद्रिय पूर्णाचा सिद्धान्त
या सिद्धान्ताचा उल्लेख विश्लेषक तत्त्वज्ञानाच्या पंथाच्या, नास्तिक असलेल्या, सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ जी.ई. मूर यांच्या, ‘प्रिन्सिपिआ एथिका’ या ग्रंथात आहे. नीतिशास्त्रासाठी मूलभूत असणार्याम ‘शुभ’ (गुड) या संकल्पनेचे स्वरूप नि:संदिग्ध आणि स्पष्ट करताना हो उल्लेख आला आहे. या सिद्धान्तानुसार पूर्णाचे स्वतोमूल्य हे केवळ त्या पूर्णाच्या घटकांनीच ठरत असले तरी ते मूल्य म्हणजे घटकांच्या मूल्यांची केवळ बेरीज नव्हे. पूर्णाचे मूल्य घटकांच्या मूल्यांच्या बेरजेपेक्षा भिन्नही असू शकते.
म्हणजे या सिद्धान्तानुसार असे शक्य आहे की, एक सेंद्रिय पूर्ण असे असेल की ज्याचे मूल्य, अशिव त्या सेंद्रिय पूर्णाचा घटक नसताना जेवढे असते त्यापेक्षा अशिव त्या सेंद्रिय पूर्णाचा घटक असताना, जास्त असेल. याचा अर्थ असा की अशिव हे साधन म्हणून नव्हे तर घटक म्हणून असेल तरी जगाचे शिवतेच्या बाबतीतले स्वतोमूल्य, जगात अशिव मुळीच नसताना जगाचे स्वतोमूल्य जेवढे राहिले असते त्यापेक्षा जास्त असू शकते आणि असे होणे याचा अर्थ ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वथा साधु आणि सर्वशक्तिमानच नाही तर ईश्वर हा कल्पकआणि चतुर योजकही ठरेल.
सिद्धान्ततः शक्य असणार्याह या गोष्टीची म्हणजे ईश्वराच्या योजकतेची संभाव्यता वाटण्याचे कारण म्हणजे पुढील प्रकारचा अनुभव.
अनर्हित म्हणावे असे दु:ख ज्यांच्या वाट्याला आले आहे त्यापैकी कर्तृत्ववानांनी (उदा. हेलन केलर) त्या स्वत:च्या दु:खावर मात केली आहे. काहींनी असे दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रयत्न केले आहेत. ज्यांना स्वत:च्या अनर्हित दु:खावर स्वकर्तृत्वाने मात करता आलेली नाही त्यांच्या दु:खाने इतरांतील सत्प्रवृत्तीला आवाहन केले. प्रेरणा दिली आणि सबलांच्या मदतीने दुबळ्यांचे दु:ख सह्य झाले. उदा. कुष्ठरोग्यांची सेवा करणारे किंवा मदर टेरेसासारख्या व्यक्ती, हिरोशिमावरील बॉम्बने अनेकांना दु:खाच्या खाईत लोटले असले तरी हिरोशिमाची पुनरावृत्ती टाळण्याची शिकवण मिळून भावी काळातील त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरील आपत्ती टळलेली आहे असे कोणी का समजू नये?जगाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे हेच यातून दिसते. शहाणपण स्वस्त आणि सोपे नाही पण तसेच ते अशक्यही नाही हे लक्षात घेता जगात अशिव असले तरी ते ईश्वराचे अस्तित्व असिद्ध करण्यापेक्षा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारेच वाटते. तेव्हा विवेकवादी नास्तिकांनी ईश्वराचे अस्तित्व असिद्ध करणाच्या नव्या बिनतोड युक्तिवादाच्या शोधाला पुन्हा लागायला हवे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.