श्री. गोखल्यांचे ईश्वरास्तित्वाचे समर्थन

प्रा. विवेक गोखले आपल्या ‘आस्तिक्य आणि विवेकवाद’ (आ.सु. ८.७, पृ. २१२) या लेखात म्हणतात की नास्तिकांचा एक युक्तिवाद बिनतोड समजला जातो. पण तसा तो नाही. आणि त्यानुसार त्यांनी त्या युक्तिवादाचे एक खंडन सादर केले आहे.
नास्तिकांचा युक्तिवाद असा आहे : ईश्वरवाद्यांच्या ईश्वरस्वरूपाविषयी अनेक कल्पना आहेत. त्यापैकी ईश्वर सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु आहे ही एक आहे. पण असा ईश्वर असू शकत नाही, कारण जगात निर्विवादपणे अस्तित्वात असलेले प्रचंड दुःख आणि वरील वर्णनाचा ईश्वर यांत विरोध आहे. ईश्वर जर ईश्वरवादी म्हणतात तसा असता, तर जगात दुःख असू शकले नसते, कारण ते त्याच्या साधुत्वाला बाधक झाले असते. जगात दु:ख प्रचंड प्रमाणात आहे हे निःसंशय. म्हणून ईश्वर अशक्य आहे.
गोखले म्हणतात की जगात दुःख आहे हे खरे; पण ते ईश्वरास्तित्वाला बाधक होत नाही. कारण दुःख नेहमी वाईटच असते असे नव्हे. त्यामुळे जगात दुःख असल्यामुळे, ते नसते तर जग असते, त्यापेक्षा अधिक चांगले झाले आहे असे म्हणता येते.
गोखल्यांचा सबंध लेख जी.इ. मूर या ब्रिटिश तत्त्वज्ञाच्या Principig Ethica या ग्रंथावर आधारलेला आहे. त्यामुळे मूरच्या महत्त्वाच्या कल्पनांचे स्वरूप लक्षात घेणे जरूर आहे.
मूरच्या मतानुसार नीतिशास्त्राची प्रमुख संकल्पना good, चांगलेपणा किंवा शिवत्व ही आहे. तिलाच मूल्य (value) असेही नाव आहे. Good चे तो प्रथम दोन प्रकार करतो, good in itself
आणि good as a means. यांनाच value च्या परिभाषेत intrinsic value (स्वतोमूल्य), आणि value as means (साधनमूल्य) म्हणतात. Good या विरुद्ध evil (वाईट, अशिव). काही वस्तू स्वयमेव चांगल्या असतात. त्यांचे मूल्य धनमूल्य (positive value) असते. काही वस्तू स्वयमेव वाईट असतात. त्यांचे मूल्य ऋणमूल्य (negative value). काही वस्तू स्वरूपतः चांगल्याही नसतात आणि वाईटही नसतात. त्यांचे स्वतोमूल्य शून्य असते. त्या उदासीन किंवा तटस्थ असतात.
हे झाले स्वतोमूल्याविषयी. साधनमूल्य मात्र कोणत्याही वस्तूला (उदासीन वस्तूलाही) असू शकते.
यापैकी प्रधान कल्पना स्वतोमूल्याची. कारण जर काही वस्तु स्वतोमूल्यवान नसतील तर कशालाही साधनमूल्य असू शकणार नाही. साधनमूल्य म्हणजे स्वतोमूल्याचे साधन असल्यामुळे प्राप्त झालेले मूल्य.
आणखी एक कल्पना आहे, organic wholes ची, जैव संघातांची. या नावाने ओळखली जाणारी कल्पना अनेक क्षेत्रांत वापरली जाते, परंतु मूरने ती केवळ नीतिशास्त्रीय मानली असून तिचेरूप स्पष्ट केले आहे. निसर्गात वस्तू सुट्या सुट्या असत नाहीत, त्या वेगवेगळ्या समूहांत असतात, किंवा त्यांचे वेगवेगळे संघात असतात. उदा. सुखानुभव हा एक संघात आहे. त्याचे घटक एक संवेदना किंवा ज्ञान, एक विषय, आणि तिचे अनुकूल वेद्यनीयत्व हे आहेत; किंवा कलास्वाद या गोष्टीत एक ज्ञान आहे, त्याचा विषय आहे, त्याचे रोचकत्व आहे, आणि विषयाचे वाटणारे कौतुकही आहे. शुद्ध एकाकी वस्तूला फार थोडे मूल्य असते, जवळपास नसतेच. (त्याला एक अपवाद आहे. दुःख हे मोठे ऋणमूल्य आहे.) परंतु असे जवळजवळ मूल्यहीन घटक एकत्र येऊन होणार्या, संघाताला बरेच किंवा खूप धनमूल्य किंवा ऋणमूल्य असू शकते. उदा. कलावस्तू स्वतः निर्जीव, मूल्यहीन असते. तसेच एखादी संवेदनाही स्वतः मूल्यहीन असते. पण त्या दोहोंचा होणारा संघात खूप मूल्यवान असतो. हा जैव संघाताचा गुण. मूर त्याचे वर्णन असे करतो : संघाताचे मूल्य त्याच्या घटकांच्या मूल्यांच्या बेरजेपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.
एवढ्या तयारीनंतर आपण आता गोखल्यांच्या युक्तिवादाकडे वळू शकतो.
लेखाच्या आरंभीच गोखले एक चमत्कारिक विधान करतात. ते म्हणतात : ‘विवेकवादी नास्तिकांची ईश्वरविरोधी भूमिका आपण अमान्य करू शकलो तर आस्तिकवादाची तर्कसुसंगतताआपोआपच सिद्ध होईल.’
‘विवेकवादी नास्तिकवादी भूमिका आपण अमान्य करू शकलो’ याचा अर्थ ती आपण खंडित करू शकलो, असा मी घेतो. आणि ‘आस्तिकवादाची तर्कसुसंगतता’ म्हणजे त्याची सत्यता असे धरून चालतो. एका अर्थान नास्तिकवादी भूमिका अमान्य करता आली तर आस्तिकवाद आपोआपच सिद्ध होतो हे म्हणणे खरे आहे; कारण नास्तिकवादाचे खंडन केल्यास आस्तिकवाद हा एकमेव पर्याय शक्य असल्यामुळे तो आपोआप सिद्ध होईल. पण नास्तिकवादी मताच्या एखाद्या युक्तिवादाचे खंडन केल्याने तेवढ्याने आस्तिकवाद सिद्ध होत नाही. एखादे विधान आणि त्याचा साधक युक्तिवाद यांत भेद आहे. त्याचे साधक युक्तिवाद सर्व तर्कदुष्ट आहेत असे दाखविले तरी त्यामुळे ते विधान खंडित होत नाही; ते तरीही सत्य असू शकेल. म्हणजे नास्तिकवाद असिद्ध आहे एवढेच सिद्ध होईल. त्याचे खंडन होणार नाही. तो सत्य असू शकेल आणि कदाचित् त्याचे अन्य निर्णायक साधक युक्तिवादही असू शकतील.
गोखल्यांनी नास्तिकवाद्यांचा एक युक्तिवाद निर्णायक नाही एवढेच दाखविले आहे. ते खरे असेल तर नास्तिकवादाचा एक साधक युक्तिवाद खंडित झाला एवढेच सिद्ध होईल. नास्तिकवाद तरीही खरा असू शकेल.
आता आपण गोखल्यांच्या युक्तिवादाकडे वळू.
ते म्हणतात की ईश्वराचे अस्तित्व आणि जगातील दुःख यांत विरोध नाही. कारण दुःख अशिव असतेच असे नाही, आणि या मताच्या पुष्ट्यर्थ ते अनेक उदाहरणे देतात. त्या सर्व उदाहरणांत दुःख सुखाचे साधन असते, पण त्यामुळे दु:ख वाईट नाही असे सिद्ध होत नाही. वाईटातून चांगलेही निघू शकते एवढेच म्हणता येते.
आता संघाताच्या मूल्यांचा विशेष असा आहे की त्याचे मूल्य त्याच्या घटकांच्या मूल्यांच्या बेरजेपेक्षा अधिक किंवा कमी असू शकते. आपल्याला सद्दर्शनी असे वाटते की घटकांच्या मूल्यांचीबेरीज (किंवा धनमूल्यातून ऋणमूल्याची बजाबाकी) म्हणजे संघाताचे मूल्य. पण असे घडत नाही. काही,संघात असे असतात की त्यांच्या घटकांना अगदी कमी (जवळपास नाहीच) धनमूल्य असते, पण त्या संघातांचे मूल्य खूप जास्त असते. उदा. कलास्वाद. उलट काही संघात असे असतात की त्यांच्या घटकांचे ऋणमूल्य बरेच असूनही संघाताचे मूल्य धनमूल्य असते. उदा. शोकनाट्याचा आस्वाद. आणि काही संघात असे असतात की त्यांच्यातील ऋणमूल्यवान घटक जर प्रत्यक्षअस्तित्वात असेल, तर त्यात आणखी ऋणमूल्याची भर घातल्याने होणार्याा संघाताचे ऋणमूल्यत्याच्या मूळ वाईट घटकापेक्षा कमी होते. उदा. समजा कोणी एखादे दुष्कर्म केले आहे. त्याला त्याबद्दल शिक्षा करणे म्हणजे त्याला दु:ख देणे. येथे दोन वाईट गोष्टी एकत्र आल्या आहेत, आणि मूळच्या ऋणमूल्यात भर पडून संघात अधिक वाईट होईल अशी आपली अपेक्षा असणार. पण तसे होत नाही. अपराध्याला दंड दिल्याने निर्माण होणारी परिस्थिती अदंडित अपराधापेक्षा कमी वाईट असते असे आपण समजतो.
या शेवटच्या प्रकारचे उदाहरण गोखल्यांच्या नजरेसमोर असावे असे वाटते. कारण ते म्हणतात : ‘असे शक्य आहे की एक सेंद्रिय पूर्ण असे असेल की ज्याचे मूल्य त्याचा घटक अशिव नसताना जेवढे असते त्यापेक्षा अशिव त्याचा घटक असताना जास्त असेल.’ याचा अर्थ असा की जगात जर अशिव असेल तर जगातील मूल्य (धनमूल्य) त्यात अशिव नसताना जेवढे असले असते त्याहून अधिक असू शकते. पण असे घडत नाही असे मूर स्वतःच सांगतो. तो म्हणतो की ज्या संघातात प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले अशिव असते, (म्हणजे ज्यातील अशिव नाटकातील अशिवाप्रमाणे काल्पनिक नसते), त्याचे अशिव त्यात उचित अशिवाची भर घातल्याने जरी थोडे कमी झाले, तरी संघाताचे मूल्य कधी धनमूल्य होते असे मला वाटत नाही. शोकनाट्याच्या आस्वादात खूपच धनमूल्य असते, पण त्यातील evil, वाईटपणा खरा नसतो, काल्पनिक असतो. पण वास्तवात एखादा खल असेल, तर त्या संघाताचा वाईटपणा! काही केले तरी नाहीसा होऊन त्याला धनमूल्य प्राप्त होईल असे मला वाटत नाही असे मूर म्हणतो. त्याचे प्रत्यक्ष शब्द असे आहेतः “But there seems no reason to doubt that where evil is real, the amount of this real evil is always sufficient to reduce the total sum of value to a negative quantity. Accordingly we have no reason to maintain the paradox that an ideal world would be one in which vice and suffering must exist in order that it may contain the goods consisting in the appropriate emotions towards them. It is not a positive good that suffering should exist in order that we may compassionate it. … It follows that we cannot admit the actual validity of any of the arguments commonly used in Theodicies; no such argument succeeds in justifying the fact that there does exist even the smallest of the many evils which this world contains”, (Principia Ethica, p. 220).
(परंतु जिथे अशिव वास्तविक असते तिथे त्या अशिवाची मात्रा पूर्ण संघाताचे मूल्य ऋणमूल्य करण्यास पुरे असते…. म्हणून आदर्श जगात दुर्गुण आणि दुःख असली पाहिजेत, कारण त्याशिवाय त्यांच्याविषयी उचित भावना बाळगल्यामुळे निर्माण होणारे शिव अस्तित्वात येणार नाही असे मानणारे विपरीत मत मान्य करण्याचे कोणतेही कारण नाही. आपल्याला त्यांचीकरुणा वाटावी एवढ्याकरिता जगात क्लेश असले पाहिजेत हे कदापि धनमूल्य असू शक़त नाही. …म्हणून असे निष्पन्न होते की ईश्वरी न्यायाच्या समर्थनाच्या प्रयत्नात वापरले जाणारे युक्तिवाद निर्दोष असतील असे आपण मान्य करू शकत नाही. जगातील थोड्याही अशिवाचे समर्थन करणारा कोणताही युक्तिवाद निर्णायक होत नाही.)
या सबंध उपपत्तीचा प्रणेताच हे म्हणत आहे, आणि गोखले त्याच्या अधिकारावर पूर्ण विसंबून आहेत. त्यामुळे नास्तिकवादी मताचा पुरस्कार करणारा युक्तिवाद त्यांनी खंडित केला नाही असा निष्कर्ष काढणे भाग आहे.
गोखले म्हणतात की ईश्वर केवळसर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथा साधु आहे एवढेच नव्हे तर तो कल्पक व चतुर योजकही आहे, आणि त्याच्या पुष्ट्यर्थ ते पुढील काही गोष्टी सांगतात. ते म्हणतात की अनर्हित दुःख ज्यांच्या वाट्याला आले आहे त्यांच्यापैकी कर्तृत्ववानांनी त्यांच्यावर मात केली आहे, उदा. हेलेन केलर. पण तिच्या कर्तृत्वापेक्षा तिला अंधारातून बाहेर काढणाच्या तिच्या नर्स आणि डॉक्टर यांचेच कर्तृत्व मोठे आहे. ज्यांना आपल्या अनर्हित दुःखावर मात करता आली नाही त्यांचेही दुःख वाया गेलेले नाही असे गोखले म्हणतात; कारण त्याच्यामुळे अन्य लोकांना त्यांना मदत करण्याची संधी मिळते. पण त्यामुळे त्यांना प्रचंड अनर्हित दुःख भोगावे लागते ही वस्तुस्थिती नाहीशी होत नाही. गोखल्यांनी दिलेले हिरोशिमाचे उदाहरण तर फारच आश्चर्यकारक आहे. तिथे लक्षावधि निरपराध माणसे क्षणार्धात नाहीशी झाली याचे समर्थन काय, तर त्यांच्या संहारामुळे भविष्यकाळातील आणखी भयानक दुःखे टळली आहेत. या भयानक अग्निप्रलयातही गोखल्यांना ईश्वराचे साधुत्व आणि चतुर योजकत्व दिसते ही गोष्ट मती गुंग करणारी आहे. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वथासाधु ईश्वरालाही हे अशिव टाळता आले नाही, याहून तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वथासाधु नाही याची आणखी कोणती सिद्धी असू शकेल?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.