मुक्यांचा आक्रोश

शिक्षणाचे लोण पसरत आहे. त्याबद्दल विस्तार झाला, पण उथळपणा आला अशी तक्रारही आहे. तिच्यात तथ्यांश असेल, पण विस्ताराचे अनेक फायदेही आहे. उदा. दलित साहित्य, ते नसते तर समाजाचे केवढाले गट केवढी मोठी दु:खे मुक्याने गिळीत होते हे कळलेच नसते. मूकनायक निघायला शतकानुशतके लोटावी लागली.
भीमराव गस्ती यांचे बेरड हे आत्मकथन १९८७ साली प्रकाशित झाले तेव्हा दलित आत्मकथांची पहिली लाट ओसरत चालली होती; म्हणून आपल्या कहाणीकडे लोकांचे लक्ष जाईल की नाही याची शंका लेखकाला होती. पण वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
‘सुखाची जात सर्वत्र एकच पण दुःखाच्या जाती अनंत हेच खरे’!
गस्तींनी ‘बेरड-रामोशी’ या आपल्या जातिबांधवांमध्ये १९७४ च्या सुमाराला आपले काम सुरू केले. बेरड मध्ये १९८२ सालापर्यंतच्या कामाचा अहवाल दिला आहे. आक्रोश ९१ पर्यंत केलेल्या चळवळींचे वर्तमान आहे.
दया पवारांचे बलुतं (१९७८), लक्ष्मण माने यांचे उपरा (१९८०), शंकरराव खरातांचे तराळ- अंतराळ (१९८१), रुस्तुम अचलखांब यांचे गायकी (१९८३), शरणकुमार लिंबाळे यांचे अक्करमाशी (१९८४), लक्ष्मण गायकवाडांचे उचल्या (१९८७) ही काही गाजलेली, गौरवलेली आत्मवृत्ते. या सगळ्याहून गस्तींच्या आत्मवृत्ताचा वेगळेपणा जाणवतो तो असा की त्यांचे आत्मवृत्त प्रायः त्यांनी केलेल्या चळवळींचे वृत्त आहे. आत्मचरित्र त्यात नाही असे नाही; पण जेवढ्यास तेवढे.
‘आक्रोश’ हे एक सामूहिक आक्रंदन आहे. गुरासारखे जिणे वाट्याला आलेल्या बेरडरामोश्यांचे विव्हळणे त्यात आहे. आंधळ्या रूढीखाली भरडून जिवाला मुकलेल्या मायाक्काचे हुंदके त्यात आहेत. त्यात रूढीच्या जोडीला संशयपिशाच्चाने घास घेतलेल्या सत्यव्वाचे चीत्कार आहेत.‘खलनिग्रहणाय’ आणि ‘सद्रक्षणाय’ हे पोलीस खात्याचे ब्रीद! बेरडांच्या मुखात ‘खल’च्या जागी ‘सत्’ आणि ‘सत्’ च्या जागी ‘खल’ असा बदल पोलिसांनी केल्यामुळे कल्लापा आणि काशी यांच्या तोंडून निघालेल्या करुण किंकाळ्या आहेत. एकट्याचा आवाज क्षीण पडतो म्हणून गस्तींनी त्यांना एकी करायला शिकविले. गस्तींच्या ग्रंथातला आक्रोश असा एकीकृत आहे. देवदासी बेरडांतच नाहीत तर महार, मांग, धनगर अशा सर्वच दलित जातींत आढळतात. त्यांची आर्त हाकही या आक्रोशात समाविष्ट आहे. एकूणच आवाज हरवून बसलेल्या मोठ्या समाजगटाला याआक्रोशात कंठ फुटला आहे.
हे भीमराव गस्ती कोण?त्यांनी कोणते काम केले?त्यात त्यांना किती यशापयश आले? यशाचे वाटेकरी कोण? त्यांच्या कामाची प्रेरणा आणि पद्धती काय?असे अनेक प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.
*(बेरड आणि आक्रोश या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक – राजहंस प्रकाशन, पुणे)
गस्ती बेळगाव नजीकच्या यमनापूरचे. बेळगाव, हुकेरी आणि गोकाक हे तालुके आणि आसमंतातील प्रदेश हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र. ते स्वतः जातीने बेरड, लहानपणापासून मनात वागविलेला एक सल आणि एक निमित्तकारण यामुळे ते सामाजिक कामात पडले. चोराचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या ‘चलनट्टी’ येथे एक बेरड त्यांना आमच्या गावी पुन्हा कशाला आलास म्हणून धमकावतो. हा प्रसंग बनगरवाडीतील दादु बालट्याची आठवण करून देतो. गस्ती त्याला म्हणतात, ‘बंबरग्या, मी हळयूर कालेरी शिवाप्पाचा पणतू आणि यमनापूर घाणगी सिद्धाप्पाचा नातू आहे हे विसरू नकोस’ (८०).’ हे शब्द कानी येताच त्याच्या हातातली फरशी गळून पडली. तो जागीच गपकन् थांबला. त्याचा चेहरा एकदम उतरला आणि सिद्धाप्पाचे आपल्यावरती उपकार मानून तो गस्तींचा मित्र बनला. बंबरग्या म्हणजे रामा नाईक ७० वर्षांचा निधड्या छातीचा पटाईत दरोडेखोर. उभी हयात चोर्या. करण्यात गेली. दहा-बारा खून पचंवलेला मुळात बेळगाव तालुक्यातल्या ‘बंबरगे’ गावचा म्हणून लोक त्याला ‘बंबरग्या’ म्हणत. गस्तींचे वडील बंशाणी (बसवाणी) हे जवळच्याच तुरूकमट्टी माळाचे सरकारी राखणदार आणि गावचे एक पंच होते. बेळगावहून इंटर सायन्स झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते आंध्रात गेले. B.Sc., M.Sc. आणि रसायनशास्त्र या विषयात त्यांनी पीएच.डी. मिळविली. तिथल्याच सरकारी प्रयोगशाळेत त्यांना १९७४ पासून नोकरी मिळायची होती. कामावर जायला थोडा अवधी होता तोपर्यंत गावक-यांच्या अडचणीत लक्ष घाल असे वडील म्हणाले. तेव्हापासून गस्ती समाजकार्यात पडले ते कायमचेच.
बेळगावजवळ १९६५ च्या सुमारास इंडालअॅल्युमिनियम कारखाना उभाराहिला. त्यासाठी आजूबाजूच्या खेड्यांतील लोकांच्या जमिनी स्वस्तात हडप केल्या गेल्या. कारखाना सरकारी आहे असा लोकांचा समज करून देऊन एरवी एकरी बारा ते पंधरा हजार रुपये दर असताना लोकांना पाचशे ते अडीच हजार असा सरकारी भाव दिला गेला. सरकारी अधिका-यांनी कारखान्याच्या चालकांशी संगनमत करून आपले उखळ चांगलेच पांढरे केले. मुलांना नोकर्याी, बायकांना काम, मोफत शिक्षण, औषधपाणी फुकट अशी आश्वासने प्रत्यक्षात आलीच नाहीत. गस्ती हैद्राबादला असतानाच्या चार-पाच वर्षांत कारखाना खूप वाढला होता. बाहेरच्या राज्यातील कामगारांनी येथे येऊन घरदार केले आणि मूळ वस्तीतील माणसे घरदार सोडून कामासाठी बाहेर जाऊ लागली.
एक गोष्ट मात्र जशीच्या तशीच होती. ते म्हणजे पोलिसी अत्याचार. गस्तींच्या लहानपणी त्यांचा चुलत भाऊ ‘लगमाण्णा’ पोलिसांच्या मारठोकीने मरण पावला होता. त्याप्रसंगी बालक भीमरावने मनोमन निश्चय केला होता, ‘मी मोठा होइन तेव्हा गप्प बसणार नाही….लगमाण्णा, तुझी आठवण सतत हृदयाशी बाळगीन’ (बेरड ६३).
गस्तींच्या समोर कामाचे स्वरूप स्पष्ट झाले ते असे. (१) बेरड-रामोश्यांना पोटापाण्यासाठी रोजगार, (२) पोलिसी अत्याचारापासून सुटका, (३) बेरड-रामोश्यांची अनुसूचित जातींत गणना, (४) मुलांसाठी आश्रमशाळा. (बेरड १७८)
**१ कंसातील यापुढील आकडे ‘बेरड’ असा निर्देश नसेल तेथे ‘आक्रोश’ मधील पानांचे समजावेत.
बेरडांचा पोटापाण्याचा प्रश्न गस्तींनी मोठ्या प्रमाणात मार्गी लावला. कारखान्यात ज्यांच्याजमिनी गेल्या त्यांच्या मुलांना खूपच धरसोड झाली होती. पटवारी दप्तरातील गडबडी, दलाल लोकांच्या मतलबी कारवाया. सरकारी अधिका-यांची बेपर्वाई याशिवाय आणखी एक गमतीदार कारण या अराजकाच्या मागे होते. बेरडांमध्ये व्यक्तीचे नाव, बापाचे नाव आणि कुलनाम सारखे असण्याची अनेक उदाहरणे होती. एखाद्या खेड्यातील देवस्थानाचे, किंवा उपजातीतील विशेष पराक्रमी पुरुषाचे नाव घरोघरी दिले जाई. त्यामुळे एका व्यंकटाप्पाचे पत्र पोस्टमनने दुसर्याा व्यंकटाप्पाला दिले आणि त्याची जमीन कारखान्याकडे गेलेली नसूनही तो नोकरीत रूजू झाला असे प्रकार झाले होते. गस्तींनी अशी सगळी माहिती गोळा करून कारखान्याच्या चालकांकडे दाद मागितली. नेहमीचा कामचुकारपणा, दफ्तर दिरंगाई, बेजवाबदारी आणि खाबूपणाच्या अनुभवांनी विटून ते राजकीय नेत्यांची मदत मागतात. तिथेही हा कोण नवा प्रतिस्पर्धी म्हणून प्रस्थापित पुढारी ताकास तूर लागू देत नाही. मंत्र्यापर्यंत दाद फिर्याद जाऊनही न्याय मिळत नाही तेव्हा गस्ती लोकशक्ती उभी करतात. बेरडांच्या वस्त्यांत जाऊन त्यांच्या सभा घेऊन त्यांना संघटित करतात. आपल्या हक्कांबद्दल त्यांच्यात जागृती उत्पन्न करतात. अशाच एका प्रसंगी त्यांची बंबरग्याशी गाठ पडली होती. त्या प्रसंगानंतर बंबरग्या त्यांचा एकनिष्ठ अनुयायी झाला होता. चंदगड, गडहिंग्लज अशा तालुक्यांच्या ठिकाणी मोर्चे, पदयात्रा, सभा, शिबिरे घेऊन अधिका-यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर करणे ही पहिली पायरी. इथपासून प्रत्यक्षात गार्हा ण्यांची तड लागेपर्यंत त्यांना जे अनेक लढे द्यावे लागले, अपमान सहन करावे लागले, उदंड शारीरिक कष्ट करावे लागले, आर्थिक झळ सोसावी लागली, स्वकीयांचे शत्रुत्व ओढवून घ्यावे लागले. इतकेच नाही तर प्रसंगी आपली पत्नी आणि आईवडील यांच्या तीव्र रोषाचे धनी व्हावे लागले, हे सर्व मुळातूनच वाचले पाहिजे. गस्तींनी या हकीगती कादंबरीत रोचक शैलीत सांगितल्या आहेत. कारखान्याकडून न्याय मिळविण्यात त्यांना जसे यश लाभले तसेच डोंगरातील जमिनी पन्नास-पन्नास वर्षे वाहणार्यान कुळांना मिळवून देण्यात असेच मोठे यश लाभले. खाजगी मालकीच्या डोंगरातील पडीत जमिनी बेरडरामोश्यांनी लागवडीस आणल्या. उत्पन्नाचा ठरलेला भाग इमाने इतबारे दरवर्षी जमीनदाराला पोचवला. पुढे जमिनीच्या किंमती वाढल्या म्हणून मालकांनी जमिनी परस्पर विकल्या. नवीन मालक जुन्या कुळांना हुसकावू लागले. पटवारी दप्तरात दरवर्षी शेतसारा भरणाच्या बेरड कुळांची नावे सात बाराला नसायची अशी कागदोपत्री कच्ची बाजू असलेल्या बेरड कुळवाड्यांची कड घेऊन गस्तींनी जमीनदारांशी फार मोठी लढाई दिली आणि सरकारशी झगडून डोंगरावरील सुमारे चौदाशे एकर जमिनी आजूबाजूच्या बेरडवाड्यातील दोनशे कुटुंबांच्या मालकीच्या करून दिल्या. या प्रदीर्घ लढ्यात विजय हाताशी आला असताना सरकारी अधिकारी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियांचे टार्गेट पूर्ण करण्याची अट घालतात. अडाणी बेरड-रामोशी ऐनवेळी कच खाऊ लागतात तेव्हा त्यांच्या महिलांना जागे करून पुढाकार घ्यायला लावून गस्ती इष्ट साध्य प्राप्त करून घेतात. या प्रकरणी बेरडांमधीलच थोडे चलाख नेते गस्तींकडून काम करवून घेण्यासाठी मधल्यामधे हजारो रुपयांची दलाली उपटतात. कुट्टीमनी शिवाप्पासारखेगावगुंड त्यांच्या जिवावर उठतात. या सर्व प्रसंगी मनाची शांती ढळू न देता आणि पोलीस आणि कोर्टकचेरी यांच्या माध्यमातून गुन्हेगाराला शिक्षादेवविण्याऐवजी गस्ती तडजोडीचा मार्ग पत्करून प्रकरण आपसात मिटवितात. बाहेरच्या शत्रूशी कायदेशीर लढाई लढत असताना स्वकीयात शत्रू नको याची खबरदारी घेतात. या आणि अशा सर्व प्रकरणी कळत नकळत गस्ती गांधीजींचा मार्ग अनुसरतात. त्यांनी सदैव सभा, परिषदा, शिबिरे, मोर्चे, धरणे अशा शांततामय अहिंसक मार्गाचा अवलंब केला आणि कायदेशीरपणे जे हक्क त्यांच्या अज्ञ बांधवांना शासनाने दिले होते तेच पदरात पाडून घेण्यासाठी लढे दिले.
बेरड-रामोशी हे चोन्या, खून, दरोडे असे गुन्हे करीत नाहीत असे नाही. परंतु ते मुख्यतः पोटासाठी, नाइलाज झाला म्हणून हे करत. ही चोरी नियमित चालत नसे. घरात धान्य संपलेले आहे, बाहेर काम नाही अशावेळी ते चोरीला जात. त्यांचा चोरी करण्याचा काळ होळीपासून नागपंचमीपर्यंत. चोरी ही नेहमीच्या एकाच पद्धतीने (बेरड २३४). पण केव्हाही आणि कुठेही चोरी, दरोडे पडले की पोलीस आजूबाजूच्या बेरडवाड्यातील बेरडांना पकडून नेत, निष्ठुरपणे बेसुमार मारहाण करत. मोठमोठ्या रकमा उकळून सोडून देत. कित्येक निरपराध बेरड या मारठोकीने प्राणाला मुकत. गस्तींची आजी त्यांना ‘बेरड म्हातारा होऊन मरत नसतो’ असे नेहमी सांगे ते यामुळेच. कधीकधी पोलिसांत रकमा भरण्यासाठीही बेरडांना चोप्या कराव्या लागत. गस्तींनी या सगळ्या कहाण्या वर्तमानपत्रांतून वेशीवर टांगल्या. “बेळगाव समाचार’, ‘तरुण भारत’, ‘रणझुंझार’, ‘पुढारी’, ‘सकाळ’ आणि ‘केसरी’नेही त्यांच्या गार्हामण्यांना वाचा फोडली.गस्तींच्या यशात वर्तमानपत्रांचा वाटा मोठा आहे.
त्यांच्या सहका-यांमध्ये दोन प्रकार आहेत. बंबरग्या, निंगाप्पा, यांसारखे अनपढ़ पण तळमळीचे निष्ठावान बेरड हा एक प्रकार आणि दुसरा म्हणजे गडहिंग्लजचे प्राध्यापक विठ्ठल बन्ने, निपाणीचे प्राध्यापक अच्युत माने यांसारख्या सुशिक्षित शहरी पुढा-यांचा. ही मंडळी पुढारीपणात पुढे येऊन राजकारणात लाभ मिळावा यासाठी धडपडतात. प्रा. बन्ने नगराध्यक्ष पदापर्यंत मजल मारतात पण आमदारकीचे तिकीट मिळवू शकत नाहीत. एकही धनगर अद्याप मंत्री झाला नाही ही त्यांची खंत. आपल्या ‘उपरा’ या आत्मचरित्राने खूप मोठे नाव मिळवून नेते झालेले लक्ष्मण माने गस्तींना ‘तुम्ही फक्त बेरडांपुरते पाहता, तुम्ही जातीयवादी आहात’ म्हणून हिणवतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेरड वस्त्यांनी ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड आणि गस्ती यांचा सत्कार आयोजित केला असता गस्तींसाठी आणलेल्या शालीचे लक्ष्मण माने मानकरी होतात. गस्तींनी केलेले लेखन, काढलेले मोर्चे, घेतलेल्या परिषदा यांचे श्रेय प्रा. बन्ने, लक्ष्मण माने, वर्तमानपत्रांतून आणि पत्रके काढून स्वतः उपटतात आणि अशा कामासाठी झालेले कर्ज गस्ती आठ-आठ वर्षे फेडत बसतात. अशा सहका-यांशी भांडत बसण्यापेक्षा मिळेल तेवढे सहकार्य मिळेल तिथून घेऊन गस्ती अबोलपणे आपले काम करत राहतात. ”
गस्तींची खरीखुरी सहकारी म्हणजे त्यांची धर्मपत्नी ‘कमळी’, पीएच.डी. झालेल्या ह्या माणसाची बायको मोलमजुरी करून घर चालविते. तुरूकमट्टीच्या माळावर गवत कापून मुलाबाळांचे पोट भरते. इतकेच नाही तर नवर्या.कडे कामासाठी येणार्याम जात-बांधवांचे चहापाणी, जेवणखाण, प्रसंगी मुक्काम हे सांभाळता सांभाळता ती टेकीस येते. सामाजिक कामातून थोडा वेळ मिळाला कीघरी शिलाई मशीनवर गस्ती कपडे शिवतात.गावात शाळेत जाणाच्या मुलांना शिकवून कमळीच्या धडपडीला थोडा हातभार लावतात. नादिष्टपणामुळे आई वडिलांपासून वेगळे राहावे लागले. एका पावसाळ्यात घराची मोठी भिंत कोसळते, आणि सुदैवाने वेळीच बाहेर पडल्यामुळे गस्तींचे कुटुंब त्यातून वाचते. भिंतीचा आवाज ऐकून वडील धावून येतात, कमळीला आणि मुलांना आपल्या घरी घेऊन जातात. हा प्रसंग सांगून गस्ती म्हणतात, ‘माझ्याकडे त्यांनी पाहिलेही नाही’. जमलेल्या शेजा-यांना उद्देशून ते ऐकवतात ‘कशाला तोंड दुखवून घ्यायचे, किती सांगितले तरी तो काय आमचे ऐकणार हाय, घर पडू दे नाहीतर तो रस्त्यावर येऊ दे! आम्ही यापुढं तयास काहीबी सांगणार नाही!’ (बेरड ३०९). यानंतर पदयात्रेचा कार्यक्रम दोन दिवसांवर आला होता. ते बायकोची कशीबशी समजूत घालून मनावर दगड ठेवून घराबाहेर पडतात. म्हणतात, “ज्या मार्गावरून मी जात होतो त्या मार्गाला अंतच नव्हता.’ (बेरड ३१०)
आपण बायकोला सुख देऊ शकलो नाही याची सतत खंत त्यांना बाळगावी लागते.‘मी एक वनवासी जीवन जगलो आणि तिलाही ते जगायला लावले’.(२१३) बायकोने सतत अठरा वर्षे वनवासात साथ केली, पण एका बाबतीत मात्र तिने जो पराभव केला तो त्यांच्या जिव्हारी लागला. माझ्या मालतीचे लग्न’ या प्रकरणात ते सांगतात. मालती अभ्यासात हुशार होती. तिला खूप शिकवायचे असे त्यांचे स्वप्न, बायकोला जातिरिवाजाप्रमाणे तिच्या लग्नाची घाई. नाइलाजाने एक होतकरू शिक्षक, एक इंजिनियर, एक एमबीबीएस डॉक्टर, अशी चढती स्थळे ते आणतात ते नाकारून कमळी आपली मोठी बहीण आणि गस्तींची आई यांच्या मदतीने एक स्थळ पक्के करते. मुलगा पोलीस कॉन्स्टेबल असतो आणि शिवाय त्याचे लग्नही झालेले असते. गस्तींच्या अंगाचा तिळपापड होतो, पण त्यांच्या विरोधाला कोणी जुमानत नाही. गस्ती म्हणतात, ‘माणूस बाहेर कितीही मोठा झाला तरी घरात त्याचे काही चालत नाही. बेरड या पुस्तकाने महाराष्ट्रांत विख्यात झालेल्या या लेखकाला आणि समाजकार्यकत्र्याला अक्षरशः धुडकारून त्यांचे आईवडील आणि कमळी मालतीचे लग्न रामतीर्थ या क्षेत्री लावून मुलीला परस्पर सासरी रवाना करतात. गस्तींनी वडिलांशी भांडण करू नये म्हणून बाहेरून कडी लावून घरात बंद करून ठेवतात. या प्रसंगी ‘कोंडलेल्या श्वापदागत माझी दशा झाली.’ ‘लग्नास दहा-पंधरा दिवस झाले तरी संताप कमी होईना’ (२९५) असे आपल्या मनःस्थितीचे वर्णन त्यांनी केले आहे. या प्रसंगाने बेरडांची हिंस जीवनपद्धती आणि पोलिसाचे त्यांना वाटणारे माहात्म्य या दोन्ही गोष्टी वाचकाला उद्विग्न करतात.
देवदासींच्या पुनर्वसनासाठीही गस्तींनी पुष्कळ काम केले आहे. ‘आक्रोश’ या ग्रंथाची सुरुवात १३ डिसेंबर १९९० रोजी घडलेल्या एका घटनेने होते. कारखान्याजवळच्या पुणे-बंगलोर महामार्गावर बेळगाव, हुक्केरी, गोकाक तालुक्यातील संपूर्ण डोंगरच उतरून खाली आला होता’ अशा नाट्यमय शब्दांनी करून गस्ती चार हजार देवदासी आणि बेरड स्त्रिया तसेच पाच हजारांवर बेरड पुरुषांनी महामार्ग अडवून मुख्यमंत्री बंगाराप्पा यांना आपल्या मागण्यांचे निवेदन कसे सादर केले हा प्रसंग सांगतात.बंगाराप्पा७० वर्षांच्या वृद्ध देवदासीला चरणस्पर्श करून सरकारने त्यांच्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली ही माहिती देतात. प्रत्येक जिल्ह्यात देवदासींच्या पुनर्वसनाचेप्रकल्पसुरू होतील याची हमी देतात. देवदासीची प्रथा प्रदेशपरत्वे वेगवेगळ्या नावाने प्रचलित आहे. विजापूर जिल्ह्यात मारुती देवाला (हनुमंत) मुली सोडतात. तिला बसवी म्हणतात. गोव्यातही भावीण प्रथा आहे. शिमोगा जिल्ह्यातील चंद्रवृत्ती येथे रेणुकांबादेवीला मुली सोडतात. होस्पेट येथे हुलगंगा देवीला मुली सोडतात. दक्षिण भारतातील मद्रास, केरळ आणि आंध्र राज्यातही ही प्रथा आहे. गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा यांतून ही प्रथा आली. याच मुली मुंबई पुण्याकडे जाऊन वेश्याव्यवसाय करतात (६६) म्हैसूर भागात पामगित्तेर काही भागात, सुमंगली, सुली, सुलेर, मातुंगी या नावाने देवदासी परिचित आहेत (६७).
‘आक्रोश’ या पुस्तकाचा शेवटही असाच नाट्यमय आहे. १९ एप्रिल १९९१ हा बेरड चळवळीच्या इतिहासात सुवर्णदिन.राष्ट्रपती व्यंकटरामन यांनी बेरड जमातीला अनुसूचित जमातीत समाविष्ट केल्याचे जाहीर केले आणि अकरा-बारा वर्षे गस्ती करीत असलेली मागणी अखेर मान्य झाली. लोकांच्या एकजुटीने हे घडले, ते लोकशक्तीचे फळ होते’ असे गस्ती म्हणतात.
गस्तींनी जे यश मिळविले त्याचे रहस्य त्यांनी जागोजागी उघड केले. सामान्य लोकांना उपदेश करण्यापेक्षा कृतीचीच जास्त गरज आहे’ (८८).गांधीवाद, मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद हे सर्व तत्त्वज्ञान शहरातील लोकांसाठी ठीक आहे हे डोंगरातील लोकांना न समजण्यासारखे आणि न पटण्यासारखे होते. त्यांना पोटाचे तत्त्वज्ञान जास्त महत्त्वाचे होते (९३). गस्तींना अभ्यासू कार्यकत्यांसारखे मुद्देसूद बोलणे जमत नसायचे, परंतु त्याची उणीव त्यांच्या कृतीने भरून निघायची. त्यांचा नशिबावर विश्वास नाही (२२८). सर्वसामान्य माणसांमध्ये जो विश्वास, नीतिमत्ता आहे यालाच मी देवाचा अंश समजायचो. ‘देव आहे ऐसी वदावी वाणी, नाहीं ऐसे मनी ओळखले’ अशी त्यांची भूमिका आहे. नेत्याचे खरे बळ कार्यकत्र्यावर अवलंबून असते म्हणून नेत्याने पापभीरूच कार्यकर्ते घ्यायचे म्हटले तर शंभरात तिघे-चौघे निघतील म्हणून सर्व जातिधर्माच्या आणि सर्व गुणांच्या लोकांना जवळ करून त्यांच्यातील शक्ती चांगल्या कामी वळवून चळवळीचा फायदा होतो असे त्यांनी दाखवून दिले आहे. गस्तींच्या वागण्यात आणि बोलण्यात सवर्णाचा विद्वेष नाही. डॉ. बाबा आढाव यांनी मला कार्यकर्ता बनविले आणि जगविलेही’ (२१४) हे सांगून त्यांनी ‘आक्रोश’ ही कृती त्यांनाच अर्पण केली आहे. एस्.एम्. जोशी, नानासाहेब गोरे, ग.प्र. प्रधान यांच्यासारखे थोर नेते आणि पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे यशवंतराव लेले, डॉ. गिरीश बापट, वामन अभ्यंकर आणि बेळगावचे सदुभाऊ परांजपे, देशपांडे गुरुजी अशा अनेकांचे ऋण त्यांनी जागोजाग नमूद केले आहे. ‘सर्वेषां अविरोधेन’ही कार्यपद्धती गस्तींच्या यशाचे रहस्य आहे असा निष्कर्ष काढावासा वाटतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.