पुन्हा एकदा सत् आणि सत्य

कोणत्याही भाषेत अनेक शब्द असे असतात की त्यांना एकाहून अधिक अर्थ असतात; आणि तसेच अनेक शब्द असेही असतात की दोन शब्दांचा एकाच अर्थाने उपयोग होऊ शकतो. सर्व नैसर्गिक भाषांमध्ये ही गोष्ट दिसून येते. सामान्यपणे याने काही बिघडते असे म्हणता येत नाही. एवढेच नव्हे तर साहित्यात ही गोष्ट अनेक दृष्टींनी उपकारक होते. अलंकार आणि वैचित्र्यनिर्मिती यांच्याकरिता ही गोष्ट उपयोगी पडते. परंतु जिथे शब्दांचा आणि अर्थाचा नेमकेपणा अपेक्षित असतो (उदा. विज्ञानात), तिथे मात्र वरील गोष्ट दोषास्पद म्हणावी लागते. शास्त्रीय भाषेचा आदर्श एका शब्दाला एकच अर्थ आणि एका अर्थाचा वाचक एकच शब्द हा आहे. जी गोष्ट विज्ञानात अनिष्ट असते ती सर्व वैचारिक लिखाणातही सामान्यपणे अनिष्ट मानावी लागेल. उदा. तत्त्वज्ञानातही ती गोष्ट अनिष्ट मानली पाहिजे. परंतु काही तत्त्वज्ञ वैचित्र्यचमत्कृतीने इतके मोहून गेलेले असतात की त्यांना वरील प्रकारचे शैथिल्य आवडते; आणि काही तर शब्दांच्या अनेकार्थतेचा फायदा घेऊन त्यावर आपली तत्त्वज्ञाने उभी करतात, आणि चुकीचे आणि भरमसाठ निष्कर्ष काढण्यास कचरत नाहीत.
दोन शब्द एकाच अर्थाने वापरण्याचा अर्थ असा होतो की त्या दोन शब्दांपैकी एकाच्याच अर्थाने दुसराही वापरला जातो, किंवा दोन्ही शब्द त्यांच्या नेहमीच्या अर्थाहून भिन्न तिसर्यासच एका अर्थाने वापरले जातात. असेच काहीसे सत् आणि सत्य या शब्दांच्याबाबतीत झाले आहे.
प्राचीन काळी जेव्हा संस्कृत भाषेची व्यवस्था लागत होती तेव्हा सत् आणि सत्य हे शब्द अनेकअर्थांनी आणि एकार्थानेही वापरण्यात आलेले आपल्याला दिसतात. सत् म्हणजे अस्तित्वात असणारे, जे आहे ते.‘सदेव सोम्य इदमग्रे आसीत् एकमेवाद्वितीयम् ह्या छांदोग्योपनिषदातील वाक्यात सत्चा ‘असणारे, ज्याला अस्तित्व आहे ते’ हा अर्थ आहे. पण सत्य म्हणजे वस्तुस्थितीबरहुकूम असणारे विधान. उदा. ‘सत्यं वद’, ‘सत्यवचनी’.या ठिकाणी वास्तवाशी संवादी असे वाक्य हा अर्थ अभिप्रेत आहे. या अर्थाने ‘सत्य’ हे विधानांचे किंवा निवेदक वाक्यांचे विशेषण असते. फक्त विधानेच सत्य किंवा असत्य असू शकतात. उदा.‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान सत्य आहे, कारण ते पृथ्वीच्या वास्तव आकाराशी संवादी म्हणजे जुळणारे आहे. म्हणजे सत्याच्या बाबतीत दोन गोष्टी अवश्य असतात, एक, निसर्गातील वस्तुस्थिती, आणि दोन, तिच्याविषयी विधान. परंतु‘सत्य’ हा शब्द सत् या अर्थानेही वापरला गेला आहे. उदा.‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या’या वाक्यात.
परंतु ‘सत्’ला आणखी एक अर्थ आहे. ‘सत्’ म्हणजे चांगला, साधु. उदा. सदाचार, सत्कर्म, सज्जन. आणि गंमत म्हणजे ‘सत्’च्या या अर्थीही ‘सत्य’ शब्दाचा वापर केला जातो. उदा. सत्य उपाय, सत्य धर्म इ.‘स्त्री अथवा पुरुष, जे व्यभिचार करीत नाहीत, त्यांना सत्यवर्तन करणारे म्हणावेत’ (जोतीबा फुले).
आता एकच शब्द अनेक अर्थांनी वापरणे वैचारिक वाङ्मयात अनर्थकारक असते असे मी वर म्हणालो. परंतु अनेक तत्त्वज्ञांना आणि विचारवंतांना तसे वाटत नाही. एका शब्दाला अनेक अर्थ दिल्याने अर्थगौरव होतो असे त्यांना वाटते. या दृष्टीने एका शब्दाला जितका विविध आणि व्यापक अर्थ आपण देऊ तितका तो शब्द अधिक अर्थवान् असे ते समजतात.
असे एक मत आचार्य स.ज. भागवत यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात : ‘सत्य या शब्दाचा अत्यंत व्यापक अर्थउपनिषदांनी शिकविला आहे. त्यामध्ये सर्व शास्त्रीय ज्ञान, नैतिक मूल्ये आणि व्यावहारिक प्रामाणिकपणा यांचा समावेश होतो.
याचा अर्थ ‘सत्य’ या शब्दाला तीन भिन्न अर्थाचा मिळून होणारा व्यापक अर्थ आहे. हे खरे असेल, व आहे, हे मान्य केले तरी ‘सत्य’ या शब्दाचा नेहमीचा प्रमुख अर्थ नाहीसा होत नाही. म्हणजे ‘सत्य’ हा शब्द वरील व्यापक अर्थी वापरणे शक्य असले तरी तो त्याच्या स्वत:च्या वस्तुस्थितीशी संवादी’ या अर्थानही वापरणे शक्य आहे. एवढेच नव्हे तर ‘सत्य’ या शब्दाला तो अर्थ असल्यावाचून व्यापक अर्थ असणे शक्य नाही. म्हणजे त्याचा व्यापक अर्थ काय आहे ते लक्षात येण्याकरिता त्याचा संकुचित अर्थ माहीत असावा लागतो.
सदाग्रह आणि सत्याग्रह
हे विवेचन करण्याचे कारण म्हणजे महात्मा गांधींच्या ‘सत्याग्रह’ या शब्दाने निर्माण होणारे प्रश्न. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनां सत्याग्रहाची कल्पना सुचली, पण तिला नाव काय द्यावे ते त्यांना सुचेना. म्हणून त्यांनी Indian Opinion या आपल्या साप्ताहिकात वाचकांना नाव सुचविण्याचे आवाहन केले. त्याला आलेल्या उत्तरांत श्री मगनलाल गांधी यांनी सुचविलेला ‘सदाग्रह’ हा शब्द महात्माजींना पसंत पडला. परंतु त्यावरून त्यांना सुचलेला ‘सत्याग्रह’ हा शब्द त्यांना अधिक चांगला वाटला, आणि तेव्हापासून ‘सत्याग्रह’ शब्द रूढ झाला.
वस्तुतः ‘सदाग्रह’ हा शब्द इष्टार्थवादी होता. परंतु गांधीजींना मात्र सत्याचे जे माहात्म्य वाटत होते त्याला अनुसरून त्यांनी ‘सदाग्रह’ या शब्दाची फोड ‘सत् (truth)+ आग्रह’ अशी केली असे ते म्हणतात. मगनलालना काय अभिप्रेत होते कोणास ठाऊक.’सदाग्रह’ हा शब्द इष्टार्थव्यंजक होता असे मी म्हणतो, कारण ‘सत्’ चा एक प्रधान अर्थ ‘चांगले’, ‘साधु’ हा आहे, आणि गांधीजींना तेच अभिप्रेत होते असे मला वाटते. निदान त्यांचे म्हणणे आकलनीय होण्याकरिता अस्तित्वात असलेले आणि ‘वस्तुस्थितीशी संवादी’ या अर्थापक्षा साधु (चांगले) हा अर्थ अधिक युक्त आहे असे मला वाटते.
सत्याग्रहाचे गांधीजींनी दिलेले एक उदाहरण पाहू.
कस्तूरबा आफ्रिकेत असताना एकदा खूप आजारी झाल्या. तेव्हा त्यांच्यावर उपचार करणार्याु गोर्यार डॉक्टरने त्यांना गोमांसयुक्त चहा देणे अवश्य आहे असे गांधीजींना सांगितले. पण गांधीजींना ही कल्पना मुळीच पसंत पडली नाही. ते म्हणाले ‘तिला गोमांस किंवा कुठलेही मांस देण्याची मी कोणालाही कधीही परवानगी देणार नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला तरी नाही. कस्तूरबांचेही म्हणणे हेच होते, आणि त्यांनी डॉक्टरांना संमती दिली नाही. त्यामुळे गांधीजींना त्या डॉक्टरच्या दवाखान्यातून कस्तूरबांना काढून घ्यावे लागले. या प्रसंगी ते जसे वागले त्याला गांधीजींनी ‘सत्याग्रह हे नाव दिले आहे.
आता या ठिकाणी कोणत्या सत्याचा आग्रह होता? खरी गोष्ट अशी आहे की मांस खाणे धर्माविरुद्ध वागणे आहे अशी गांधीजींची श्रद्धा होती, आणि तिचा आग्रह त्यांनी धरला. म्हणजे त्यांना जे सत् म्हणजे चांगले वाटत होते त्याचा आग्रह त्यांनी धरला होता.
किंवा त्यानी ब्रह्मचर्यावर दिलेला भर आपण घेऊ. त्यात एखादे विधान वस्तुस्थितीबरहुकूम आहे की नाही हा प्रश्न नव्हता. ब्रह्मचर्य ही पुण्यकारक गोष्ट आहे असे त्यांचे मत होते. म्हणजे हीही त्यांची श्रद्धा होती. ब्रह्मचर्य पालन चांगले आहे एवढेच त्यांचे म्हणणे होते. त्यात सत्याचा संबंध नव्हता.
मग सताचा आग्रह म्हणजे सदाग्रह ह्यापेक्षा सत्याचा आग्रह ही फोड त्यांना अधिक बरोबर का वाटली?मला वाटते की ‘सत्य’ शब्दाच्या वस्तुस्थितीशी संवादी’ या प्रमुख अर्थाने त्यांची फसगत झाली असावी. ‘सत्’म्हणजे चांगले याच्यापेक्षा ‘सत्य’ म्हणजे यथार्थ हा अर्थ उघडच अधिक निश्चित आणि आकलनीय आहे. सत्य म्हणजे काय याबद्दल फार थोडा मतभेद आहे; पण चांगले’ किंवा ‘साधु’ म्हणजे नेमके काय या प्रश्नावर जितका मतभेद आहे तितका क्वचितच अन्य कोणत्या शब्दाविषयी असेल. तिच्याइतकी दुर्बोध कल्पना सापडणे कठीण आहे. तत्त्वज्ञांनी आणि नीतिमीमांसकांनी साधुत्वाची डझनावारी विश्लेषणे गेल्या अडीच हजार वर्षात केली आहेत. कोणी म्हणतात सदाचार म्हणजे वडिलांच्या मनाप्रमाणे वागणे किंवा राजांचे दंडक पाळणे. अन्य काही म्हणतात की चांगले काय आणि वाईट काय हे ठरविण्याचा उपाय म्हणजे अंतःकरणप्रवृत्ती, ‘आतला आवाज’. काही म्हणतात की चांगले म्हणजे सुख किंवा सुखदायी; तर अन्य म्हणाले की सुख आणि चांगले यांत विरोध आहे. काही म्हणतात की जे काळात टिकून राहते ते चांगले, अन्यम्हणतात की चांगले स्थलकालसापेक्ष आहे. आता अशा मतमतांतरांच्या गर्दीतून जिथे मोठमोठे पंडित वाट काढता काढता थकले तिथे सामान्य मनुष्याची काय कथा?पण गांधीजींनी ‘सत्य’ शब्दाचा अर्थ निःसंदिग्ध आहे असे मानले, आणि त्यांच्या कोट्यवधि अनुयायांनीही निःशंकपणे त्याचा स्वीकार केला. म्हणून गांधीजींना अभिप्रेत ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ पुन्हा विचारावासा वाटतो. त्याचे उत्तर स्पष्ट नाही, उलट मती गुंग करणारेआहे.
नीतीचे आणि सदाचाराचे प्रश्न सत्यासत्याचे आहेत असे म्हणणे उघडच दिशाभूल करणारे आहे. स्वातंत्र्य, समता, स्त्रीमुक्ती इ. विषयांत सत्य काय आहे ते कळू शकत नाही. उदा. बहुतेक माणसे पारतंत्र्यात आहेत हे सत्य आहे. मनुष्य स्वतंत्र असावा, सर्व माणसे समान असावीत ही वाक्ये सत्य आहेत असे म्हटले जाईल, पण ते कोणत्या अर्थाने हे सांगणे कठीण आहे. खरी गोष्ट अशी आहे की ‘मनुष्य स्वतंत्र असावा’ किंवा ‘सर्व माणसे समान असावीत’ ही वाक्ये विधानेच नाहीत. विधानेच फक्त सत्य किंवा असत्य असतात, आणि ती यांपैकी काय आहेत हे जगाशी, परिस्थितीशी ताडून पाहून ठरवावे लागते. पण ‘सर्व मनुष्ये समान असावीत’ हे सत्य की असत्य हे ठरविण्याकरिता ते कशाशी ताडून पाहणार? ती सत्यही नाहीत आणि असत्यही नाहीत. ती वस्तुस्थितीविषयी नाहीतच. म्हणून अलीकडे तत्त्वज्ञ नैतिक वाक्यांना विधाने मानीत नाहीत. त्यांचे तर्कशास्त्र विधानांच्या तर्कशास्त्रासारखे सत्यासत्याचे तर्कशास्त्र नाही. ते वेगळेच आहे.
आचार्य भागवत म्हणतात त्याप्रमाणे ‘सत्य’ शब्दाचा व्यापक अर्थ असेलही कदाचित्; पण तो काय आहे ते स्पष्ट नाही. गांधीजींना तो किंवा त्यांच्यासारखा दुसरा एखादा अर्थ अभिप्रेत असावा. पण तो काय आहे हे त्यांनी कुठे स्पष्ट केलेले नाही.
नैतिक वाक्ये सत्य किंवा असत्य असू शकत नाहीत असा आधुनिक तत्त्वज्ञांचा निष्कर्ष आहे. त्यासंबंधी थोडे लिहिणे उपयुक्त होईल.
‘सत्यभाषण चांगले’, किंवा ‘परोपकार आपले कर्तव्य आहे’, किंवा ‘देव तुझे भले करो’, ‘आपण सर्वदा अहिंसा पाळावी ही सर्व वाक्ये नैतिक आहेत. पहिली दोन वाक्ये ‘ही भित पांढरी आहे’ किंवा ‘हे मला आवडते’ या वाक्यासारखी वर्णनात्मक विधाने वाटतात. पण त्यांची विधेये चांगले’ आणि ‘कर्तव्य’ हे नैतिक शब्द आहेत, आणि ते इंद्रियगोचर गुणांचे वाचक नाहीत. निसर्गाच्या अवलोकनाने ती खरी आहेत की नाहीत ते कळू शकत नाही. तिसरे आणि चौथे वाक्य उघडच नैतिक आहे, हे त्यांच्या विध्यर्थी विधेवरून (mood) कळते. त्याही वाक्यांची सत्यासत्यता अवलोकनाने कळू शकत नाही. कर्तव्य दृश्य किंवा संवेद्य गुण नाही, आणि विधि बोलून चालून काही तरी करायला सांगणारी वाक्ये आहेत. ‘सत्य बोलावे’, ‘अहिंसा पाळावी’ इत्यादि वाक्ये वास्तवाचे (fact) वर्णन करणारी वाक्ये नाहीत; आणि म्हणून ती सत्य आहेत की असत्य आहेतहा प्रश्न त्यांना लागू पडत नाही. ‘रामा, तू नेहमी खरे बोलतोस,हे विधान आहे, आणि म्हणून ते सत्य तरी आहे किंवा असत्य तरी. पण ‘तू नेहमी खरे बोलावेस’ हे सत्य किंवा असत्य नाही, कारण त्यात एखाद्या वास्तवाचे वर्णन नाही, तर आपण काय करावे याचे निवेदन आहे.
या कारणांस्तव नैतिक वाक्ये विधाने नाहीत, ती सत्य किंवा असत्य असू शकत नाहीत असे आधुनिकांचे मत आहे. हे मत फार चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे, आणि त्याच्याविषयी अनेक प्रश्न उद्भवतील. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे : जर नैतिक वाक्ये सत्य किंवा असत्य नसतील तर सर्व नैतिक वाक्ये सारखीच बंधनकारक समजायची काय? तर असे समजण्याचे कारण नाही; नैतिक वाक्यांपैकी काही इतरांपेक्षा अधिक स्वीकार्य असतील, आणि त्यांच्या स्वीकार्यतास्वीकार्यता यासंबंधी निकष असू शकतील. उदा. ‘राजाचे किंवा नेत्याचे म्हणणे नेहमी ऐकावे’ हे स्वीकार्य नाही असे आपण मानतो; उलट ‘सर्वांना मतस्वातंत्र्य असावे’ हे आहे असे मानतो. त्यातील निकष शोधावा लागेल. पण हा विषय मोठा आहे, आणि अजून वादग्रस्त अवस्थेत आहे. म्हणून सध्या एवढेच पुरे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.