प्राथमिक उर्दू शाळामधील मुलींचे शिक्षण

समाजातील स्त्री शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करावा आणि अभ्यास करता करताच काही कृती कार्यक्रम घ्यावे या उद्देशाने आम्ही मुलींच्या शिक्षणासंबंधी काम सुरू केले. भारतीय शिक्षणसंस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुलींच्या शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही दोन उर्दू प्राथमिक शाळा निवडल्या. त्यात एक सरकारी आणि एक खाजगी शाळा निवडावी असे आम्हीठरवले होते. मात्र खाजगी शाळेने शाळा अभ्यासासाठी घ्यायला परवानगी नाकारली.. मात्र एक गोष्ट याबाबतीत विशेष वाटली ती म्हणजे या खाजगी शाळेच्या संस्था चालकांपैकी सर्वच सदस्याचे मत परवानगी नाकारण्याचे नव्हते. काही सदस्यांना वाटत होते की, या शाळेत बाहेरच्या काही सामाजिक आणि शिक्षणात संशोधन करणार्या. संस्थांचे लोक आले तर त्यात वाईट असे काही नाही.
मात्र ही परवानगी नाकारली गेल्याने आम्ही दोन्ही प्राथमिक सरकारी उर्दू शाळा निवडल्या.
या उर्दू शाळांमध्ये काही गोष्टी निदर्शनाला आल्या,
– या शाळांमध्ये ८०% मुली आहेत आएणि २०% मुले आहेत.
– त्या शाळांमध्ये येणारी मुले-मुली खालच्या आर्थिक गटातील कुटुंबांमधून आली आहेत.
– या मुलांचे पालक श्रमिक गटात मोडतात. साधारणपणे ७३% पालक ड्रायव्हर, गॅरेजमधे काम, फेरीवाले, न्हावी, भंगार गोळा करणे, भाजी विकणे या व्यवसायात आहेत. ११% कनिष्ठ स्वरूपाच्या पण कायम स्वरूपी नोकरीत आहेत. ११% पालक बेरोजगार आहेत. ५% पालकांची कधी काम, कधी नाही अशी स्थिती आहे.
– वरच्या जाती-गटात मोडणारी मुले या शाळांमध्ये फारशी नाहीत.
– औद्योगीक विभागातूल उर्दू शाळेत परप्रांतीय मुले-मुली जास्त आहेत.
– शहरातील शाळेत महाराष्ट्रातील खेड्यांमधून स्थलांतरित कुटुंबातील मुलेमुली जास्त आहेत.
– या मुलांपैकी उत्तरप्रदेशातील काही मुले सोडली तर मातृभाषा उर्दू नसणारी मुले-मुली ९९% आहेत.
शाळेत येण्याचे कारण काय?
आम्ही या मुलांना प्रश्न विचारला होता, ‘शाळेत कां येता?’ त्यापैकी मुलांचे उत्तर होते, ‘आई वडील पाठवतात म्हणून.’ आणि मुलींचे उत्तर येत होते ‘सहेलियों से खेलने मिलता है, सहेलियां मिलती है इसलिए.’ शाळेसंबंधी मुले आणि मुलींच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक जाणवत होता. मुलांना असे वाटत होते की घरी असतांना त्यांना खेळण्याचेआणि एकूणच स्वातंत्र्य जास्त मिळते. त्या उलट मुलींना असे वाटत होते की, घरी आई सतत कामाला लावते त्यापेक्षा शाळेत येऊन मैत्रिणींशी गप्पा मारता येतात, थोडेफार खेळताही येते. मात्र हेही तेवढेच खरे की, शालेने ही मैत्रिणींशी खेळता येण्याची योजना केलेली नाही. मुलींना मात्र ती गरज आहे आणि त्यातून वर्गात सोबत बसण्यापासून ते मधल्यासुट्टीत खेळून घेण्याच्या रूपाने त्या हा वेळ आणि मैत्री मिळवतात.
शिक्षकांची भूमिका :
प्राथमिक शाळांमध्ये स्त्री शिक्षकांचे प्रमाण जास्त आहे. या शाळांमध्ये असलेल्याशिक्षिका मुस्लिम आहेत. त्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गटातून येतात.
महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियमानुसार शिक्षक काम करीत असतात. पाठ्यक्रम मुलांना शिकवणे, या व्यतिरिक्तही काही घटक शिक्षक-विद्यार्थी संबंधात काम करत असतात. ते म्हणजे शिक्षकाचा स्वतःचा वैचारिक विकास आणि स्पष्टता आणि कृतीतून येणारे त्याचे प्रत्यंतर, खरे तर याही आधी शिक्षकाचे स्वत:चे समाजातील, कुटुंबातील स्थान.
या शिक्षिकांच्या बाबतीत हे निदर्शनाला आले की, त्या समाजातील स्त्री घटक असल्याने स्त्रीचा समाजातील दुय्यम दर्जा त्यांच्या वाट्याला आलेला आहे. कुटुंबातील आई-पत्नी-सून या विविध भूमिका बजावणे त्याच सोबत बाहेरच्या जगात भूमिका बजावणे अशी दुहेरी भूमिका त्या बजावत आहेत. मात्र या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांचे अस्तित्व स्वतंत्र नाही. कुटुंबामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य नाही. भारतीय शिक्षण संस्थेच्या शिबिराला येण्यासाठी एक महिनाभर आधी त्यांना कुटुंबात भूमिका तयार करावी लागते. त्याचा ताण ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जाणवतो.
तसेच शाळेत कोण लोक आले?कशासाठी आले?तुम्ही त्यांच्याशी काय बोललात?कशाला बोललांत?अशा शिक्षण विभागाकडून येणाच्या आक्रमक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. कुटुंब आणि नोकरी दोन्ही ठिकाणी त्यांना बायकांच्या जातीला काय कळते?अशा तुच्छतेच्या भावनेलाच सामोरे जावे लागते. यातून शिक्षिकांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट, कणखर न राहता ठिसूळ होत जाते.
अल्पसंख्याक समाजातील स्त्री शिक्षिकांचे प्रश्न: स्त्री म्हणून येणारी दुय्यम भूमिका पार पाडतांना अल्पसंख्याक समाजाचा घटक असणार्यां या शिक्षिकांना आणखी एका समस्येला तोंड द्यावे लागते. ते म्हणजे त्यांच्या मुस्लिम वेगळेपणाच्या. शाळेच्या शिक्षिका आणि मी एकदा शाळेतच न येणार्याअ मुलीच्या घरी जाण्यासाठी निघालो आणि बसस्टॉपवर उभे असतांना एक माणूस म्हणाला, “लांड्याच्या बायका दिसतात वाटते!” कारण एका शिक्षिकेने बुरखा घातला होता. त्या शिक्षिकेच्या डोळ्यात संताप आणि अपमानाने पाणी उभे राहिले. त्यानंतर शाळेत जाऊन शिकवणे या गोष्टीवर निश्चितच परिणाम होणे साहजिक होते.
याशिवाय बाबरी मशीद पाडली गेली त्याची अस्वस्थता आणि कायम मुस्लिम समाजाला आपले अस्तित्व टिकवण्याचा झगडा द्यावा लागणार आहे याची अस्वस्थता ही मुस्लिम शिक्षिकांच्या व्यक्तिमत्त्वात आम्हांला जाणवली.
अर्थातच या सर्व गोष्टींचा परिणाम पाठ्यक्रमाव्यतिरिक्तही विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन भिडत असतो.
शिक्षकांना व्यापक संदर्भात विकासाची संधी मिळणे आवश्यक. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना औपचारिक प्रशिक्षण दिले जाणे, हा एक कर्तव्य कर्माचा भाग मानलाजातो. मात्र त्या व्यतिरिक्त त्यांना विविध विषयांची माहिती मिळावी, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून माहिती घेता यावी, अनौपचारिकपणे एक-दोन दिवस इतरही शाळांमधील शिक्षिकांच्या सोबत शाळांमधील, कुटुंबातील अनुभवांची देवाणघेवाण करता यावी अशीही संधी उपलब्ध झाली पाहिजे.
विविध विषयांवरील भारतीय शिक्षण संस्थेच्या पुस्तिका आम्ही जेव्हा या उर्दू प्राथमिक शाळांमधील शिक्षिकांना दिल्या तेव्हा त्यांनी त्या पुस्तिका अगदी नंबर लावून वाचायला घेतल्या आणि वाचायला घेतल्या आणि माहितीची गरज असल्याचे सांगितले.
भारतीय शिक्षण संस्थेने घेतलेल्या शिबिरात खेळ, गाणी, गप्पा अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतले तेव्हा, “हमे हमारा बचपन फिर से याद आया’ असे त्या म्हणाल्या.
शिक्षिकांना जर हे निरोगी, आनंददायी वातावरण मिळाले तर ते विद्याथ्र्यांपर्यंत पोचू शकते. मात्र आज तसे चित्र दिसत नाही.
शाळेत मुलींच्या वाट्याला येणारी भूमिका : शाळांमध्ये मुली आनंदाने येतात याची कारणे जरी वेगवेगळी असली तरी शाळेकडे मुली ज्या भूमिकेतून बघतात याची पूर्तता शाळा करत नाही हे निश्चित.
या शाळांमध्ये मुले खूपच कमी असली तरी त्यांच्या आणि मुलींच्या बाबतीत काही फरक निश्चितपणे केले जात असल्याचे दिसते. ते म्हणजे –
या शाळांमधे शिपाई नसल्याने बाहेरून काही आणायचे असेल तर ते काम मुलांनी करायचे, चहा करायचा असेल तर तो मुलींनी करायचा.
– मुलांचे खेळ मैदानी, मुलींचे खेळ त्यातल्या त्यात कमी श्रमाचे निवडायचे.
– मुलींसाठी कौशल्याच्या स्पर्धा वेगळ्या. मुलांसाठी वेगळ्या.
– एवढेच नाही तर पाठ्यक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये जी चित्रे, जे धडे आहेत त्यातून ही स्त्रीची भूमिका दुय्यमच दाखवलेली आहे. त्यामुळे विद्याथ्र्यापर्यंत तीच पोचते. भाजी निवडणारी आई, टी.व्ही. बघणारे वडील, विनोदी स्त्री पात्र इ. त्यामुळे मुली जरी खूप आशेने घरातील कामापासून सुटका म्हणून शाळेकडे बघत असल्या तरी शाळा त्यांना ती संधी फारशी देत नाही.
मुलांच्या शाळेतील गळतीची कारणे: या शाळांतील मुलांची गळती साधारणपणे चौथी पाचवीपासून सुरू होते. बाहेरील अर्थार्जनाच्या कामासाठी त्यांना शाळेतून काढले जाते. शालेय शिक्षण जीवन जगण्यासाठी उपयोगी नाही. जर पुढे घर मुलांनाच चालवायचे असेल तर त्यांनी आत्ताच कामाला लागले पाहिजे असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलांची गळती होताना दिसते.
– शाळेत रस न वाटणे.
– घरून शाळेसाठी फार दबाव नसणे.
– अर्थात गरीबी, शिक्षण महाग असणे, इत्यादी कारणे आहेतच. मुलींच्या शाळेतील गळतीची कारणे : समाजात मुलगी म्हणून असणारीअसुरक्षितता हे एक फार मोठे कारण दिसते. त्यामुळेच लवकर लग्न होणे हेही कारण आहे.
-घरातील जबाबदार्याण अंगावर पडणे.
– दोन समाजांमधे तेढ निर्माण होउन दंगलीसारख्या घटना घडल्यावर मुलींना शाळेसाठी बाहेर पाठवणे बंद केले जाते.’
– पालकांची मुलींकडे बघण्याची दुय्यमत्वाची दृष्टी.
– शिक्षण महाग असणे.
पालकांचा मुलींच्या शिक्षणासंबंधी दृष्टिकोन :
आम्ही या शाळांमधील विद्याथ्र्यांच्या पालकांच्या बैठका आयोजित केल्या. यांत महत्त्वाची गोष्ट अशी दिसून आली की, स्त्री पालक या बैठकांना मोठ्या प्रमाणावर हजर राहिल्या. आम्ही त्यांना विचारले की, मुलींना शिकवावे, शाळेत पाठवावे असे तुम्हाला वाटते का?बैठकीला आलेल्या सर्व पालकांनी ‘होय’ असे उत्तर दिले. “मुलींनी शिकावे असे तुम्हांला का वाटते?” या प्रश्नाचे उत्तर देतांना एक वयोवृद्ध महिलेने सांगितले — ‘‘इन्सान बूढा हो जाता है, इल्म (ज्ञान) बूढा नही होता, इन्सान मर जाता है, इल्म नही मरता” आणि म्हणून मुलींनी शिकले पाहिजे.
या शिवाय इतर गोष्टी ज्या समोर आल्या
– वो खत लिख सकेगी, पढ़ सकेगी।
– पढलिख लेने से कोई धोखा नही दे सकता।
– वो अपने बच्चों को अच्छा पढ़ाएगी ।
– हिसाब कर सकेगी।
– बस का बोर्ड पढ़ सकेगी।
यातून मुलींनी शिकावे ही भावना जशी ठळकपणे समोर येत होती तशीच दुसरी भावना ही समोर येत होती की, समाजात तिची दुय्यमत्त्वाची जी भूमिका आहे त्याच अनुषंगाने शिक्षणाचे फायदे मांडले जात होते. या व्यतिरिक्त एक गोष्ट विशेषत्वाने समोर आली, ती म्हणजे बर्या च पालकांनी आपल्या मुलांना मराठी वा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घातले आहे आणि मुलींना मात्र उर्दू. याचे कारण विचारता असे कळले की, मुलींना कुठे कमवायला जायचे आहे?त्यांनी धर्म आणि घर नीटपणे सांभाळले म्हणजे पुरे. आणि दुसरे कारण समोर आले ते म्हणजे महाग शिक्षण मुलांना देण्याचे प्राधान्य आहे आणि स्वस्त शिक्षण मुलींना. पालकांची त्यात ही स्त्री पालकांची दृष्टी फार लांबवर जाऊ शकावी असे वातावरण त्यांनाही कुटुंब आणि समाजात लाभलेले नाही. तसेच या स्त्री पालकांपैकी ६४% गृहिणी आहेत. मात्र परिस्थितीने व्यावहारिक शहाणपण थोड्याफार प्रमाणात त्यांना शिकवले आहे.
बिहारमधून आलेल्या काही स्त्री पालकांनी सांगितले की, त्यांच्या मुलींना बिहारमध्ये आजीकडे यासाठी ठेवले नाही की त्यांना तिथे शिकायला मिळणार नाही. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेशच्याही स्त्री पालकांचे म्हणणे होते, “महाराष्ट्रात आलो म्हणूनआमच्या मुली शिकत आहेत, अन्यथा आमच्या प्रांतात त्यांना संधी उपलब्ध झाली असती का? याबद्दल आम्हाला शंका आहे.”
प्रशासनाचा दृष्टीकोन :
या शाळांच्या अभ्यासाला आम्हाला म.न.पा. प्राथमिक शिक्षण विभागाकडून परवानगी मिळाली. मात्र त्यात बर्यालच अडचणी आल्या.
– त्यात मुख्य अडचण या विषयाबद्दल संवेदनशील नसणे. (कारण उर्दू शाळा आणि मुसलमानांशी संबंधित विषय.)
– पर्यवेक्षकांची विविध सामाजिक राजकीय कारणांमुळे सहकार्याची तयारी नसणे.
-या शाळा आणि शिक्षिकांवर असणारे प्रशासकीय, सामाजिक, राजकीय दबाव.
या अडचणींमुळे सर्वच स्तरावर मानसिक वैचारिक आणि कृतिशील बदलाची गरज पदोपदी जाणवली.
आशादायी अनुभव :
या शाळांमधील मुलामुलींसाठी जेव्हा आम्ही खेळघर आणि सहलींसारखे कार्यक्रम घेतले त्यातून मुलामुलींचे प्रसन्न चेहरे, त्यांचा आनंद, त्यांच्याकडून न घाबरता येणारे विविध प्रश्न, आमच्याशी झालेली मैत्री, आम्हाला त्यांच्याकडून शिकता आलेल्या गोष्टी, सामाजिक एकतेचा त्यांच्या वागण्याबोलण्यातून येणारा प्रत्यय, त्यांनी काढलेल्या चित्रांमधून व्यक्त झालेल्या त्यांच्या भूमिका हे सारे फार आशादायी आहे. त्याहीपेक्षा आहे त्या परिस्थितीला समजून घेऊन त्यावर मात करण्याची (तेही फार कडवट न होता) त्यांची आकांक्षा महत्त्वाची वाटली.
शिक्षिका आणि आमच्यात एकत्र येतांना कधी ताणही जाणवला. पण यंत्रणेपलीकडे जाणारी सहज सुखद मैत्रीही होऊ शकली.
प्रशासनाचे सहकार्यही हळूहळू वाढत गेले.
आज अल्पसंख्याक समाजाबद्दल फारशी निरोगी आणि वस्तुनिष्ठ माहिती समोर येऊ शकत नाही. अल्पसंख्याक समाजाचा शिक्षण, रोजगाराचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत नाही. जिथे एकूण सामाजिक शांततेला तडा गेलेला असतो अशा वातावरणात आणि जिथे केवळ स्त्रियांचाच नाही तर संपूर्ण समाजाच्याच वंचिततेचा प्रश्न असतो तिथे या प्रश्नावर सहकार्य व्यापक प्रमाणात मिळावे आणि काम वाढत जावे, प्रश्न समोर यावेत, उत्तरे शोधण्याचे प्रयत्न व्हावेत ही आशा आपण करूच शकतो ना?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.