रोमन लोकशाही

रोमन नागरिकांची स्वतःच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची (identity) जाणीव दोन कल्पकथांमध्ये (myth) रुजलेली होती.
एनियस हा रोमचा मूळ पराभूत संस्थापक ट्रॉयच्या युद्धानंतर (१२०० ख्रिस्तपूर्व) वडिलांना खांद्यावर घेऊन, मुलाला हाताशी धरून निर्वासितांसह देशोधडीस लागला. त्याच्या वडिलांच्या हातात त्यांच्या देवाच्या मूर्ती होत्या. एनियस ट्रॉयमध्ये युद्धात हरणेआवश्यकच होते. कारण त्याच्या नियतीत (destiny) रोमची स्थापना करणे होते. (प्रत्यक्षात एनियसच्या नंतर अनेक पिढ्या उलटल्यावर रोमची स्थापना झाली ही गोष्ट वेगळी.)
हा एनियस वाटेत निर्वासितांसह थांबला. तिथे तो डो डो ह्या विधवेच्या प्रेमात पडला. डोडोवरच्या प्रेमामुळे त्याला पुढे निघून जाण्याची इच्छा नसते. पण शेवटी तो डो डो चा त्याग करून निघून जातो. कारण त्याचे कर्तव्य त्याच्या प्रेमापेक्षा महत्त्वाचे असते. त्याची होडी निघाली असताना किनार्यानवर उभी राहून डो डो स्वतःला जाळून आत्महत्या करते. तिचे शाप रोमला भोवतात. दुसरी कल्पकथा रोमस वरेम्युलस या दोन बाळांची आहे. ही दोन बाळे रोमचे कायदेशीर वारस असतात. त्यांचे चुलत आजोबा त्यांना पुरात टोपलीतून सोडून देतात. ही टोपली डबक्यात अडकून बाळे वाचतात व एक लांडगी त्यांना आपले दूध पाजून वाढवते. पुढे ही बाळे मोठी झाल्यावर आजोबांना मारून रोमचे राज्य काबीज करतात. नंतर त्या दोघांत रोमच्या तख्तासाठी युद्ध होते. सत्तेची हाव हा रोमन दुर्गुण त्यांच्यातही असतो (curse or hunger for power).
ह्या दंतकथांत रोमन साम्राज्याच्या स्थापनेपासून विनाशापर्यंतची लाक्षणिक चिह्न (symbols) आहेत. त्या रूपककथा आहेत.
एनियसचे वडील हे रोमन लोकांचे त्यांच्या भूतकाळाशी असलेले पूज्य नाते, वडिलांच्या हातातले देव (साक्रेर – sacrare, sacred) हे रोमन लोकांचे धर्माशी (religio) असलेले नाते, एनियसच्या हातातला मुलगा हा उज्ज्वल भविष्यकाळ, डोडोचा एनियसने केलेला त्याग हे रोमन लोकांचे समाजाबद्दलचे (communitas – community) कर्तव्य. कायदे (Lex-Laws) हे रोमन लोकांना समाजाशी बांधणारे नियम, रेमस् व रोम्युलस्चे युद्ध हे साम्राज्याच्या विनाशाचे सत्तेच्या हावेने दिसणारे चिह्न.
(आपल्याकडे रामायण-महाभारताचे बाळकडू मिळते तसे रोमन मुलांना ह्यादंतकथांचे बाळकडू मिळत असावे.)
रोमन लोकांच्या जीवनाची पाच मुख्य सूत्रे होती. धर्म, कायदे, समाज, पवित्र प्रदेश (जेथे देवांची वस्ती असते) व सद्वर्तन. (लॅटिन मध्ये – Religio, Lex, Communitas, Sacrare, Pietas). सद्वर्तन म्हणजे सचोटी, राज्याशी इमान, कुटुंबाचे पालन, स्वतः श्रम करून कुटुंबाचे पोट भरणे. धर्मबंधने ही व्यक्तीला व समाजाला पवित्र देवांशी बांधणारी सूत्रे. (धर्मपालन केले नाही तर रोमन माणसाला गावाबाहेर हद्दपार करून टाकण्याची शिक्षा करीत असत.) कायदे ही समाजाला एकमेकाशी बांधणारी सूत्रे. (दोन व्यक्ती एकमेकांशी भांडल्या तर त्य.ची रोमन समाजाला फारशी पर्वा नव्हती. पण त्यांच्या भांडणाचा एकूण समाजाच्या स्वास्थ्यावर परिणाम होत असेल तर त्या गावचा न्यायाधीश (magistrate) त्या भांडणात पडून ते मिटवण्याचा प्रयत्न करीत असे.) समाज हा रोमन दृष्टीने महत्त्वाचा होता. समाजाचे हित ते व्यक्तीचे हित अशी धारणा होती.
मूळ रोमन राज्यात सर्व नागरिक (पुरुष) समान मानले जात. ह्या नागरिकांनी निवडलेल्या ज्येष्ठ (तीसच्या वर) नागरिकांची सभा (सिनेट-सिनेक्स – Senex वयाने मोठी व्यक्ती) राज्यकारभार चालवीत असे. ह्या सिनेटचा प्रमुख, ‘‘कॉन्सुल’ निवडला जायचा. दरवर्षी नवा कॉन्सुल निवडून पूर्वीचा कॉन्सुल परत साधा नागरिक होत असे. परिणाम कॉन्सुलच्या सत्तेच्या दुरुपयोगाच्या प्रवृत्तीवर बंधन पडत असे. (कॉन्सुल हा राष्ट्राध्यक्ष अथवा प्रधानमंत्र्यासारखा [प्राइम मिनिस्टर सारखा] असे.)
रोमन नागरिकांना हुल्ली लोकहीत असतात तसेच हक्क होते. (मतदान, अन्यायाविरुद्ध फिर्याद, कोर्टाने दिलेल्या निकालाविरुद्ध अपील, रोमन राज्यात मुक्तपणे हिंडण्याची मुभा).
सुरुवातीची रोमन राज्यातील नागरिकांमधली समानता पुढे टिकली नाही. पाट्रेस किंवा पॅट्रिशियन्स् (patricians) व प्लेब्स् किंवा प्लेबियनस् (plebeins) असे भेद निर्माण झाले. पॅट्रिशियनस् उच्च मानले जाऊ लागले. शेवटी प्लेब्स्नी बंड केले व त्यांना परत त्यांचे हक्क मिळाले. त्यांतील महत्त्वाचे हक्क पुढीलप्रमाणे: (१) देशाचे कायदे बारा टॅब्लेटस्वर कोरून (दगडावर) कुणालाही वाचता येतील अशा सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. (२) सिनेटर्ससारखे ट्रिब्युन्स् (Tribunes) म्हणून प्लेब्चे प्रतिनिधी निवडून देण्याची व्यवस्था झाली. सिनेटसारखी ट्रिब्युनेट ही प्लेब्सूची सभा स्थापन झाली. (३) ट्रिब्युनेटने केलेले कायदे सिनेटला व्हिटो करण्याची परवानगी होती. ती रद्द केली गेली. (४) प्लेब्सुना पाट्रेसशी विवाह करता येऊ लागला.
प्रत्येक समाजात समानता पाळायची म्हटली तरी कठीण होते. प्रत्येक व्यक्तीची हुषारी, कर्तृत्व कमी जास्त असते. त्यानुसार ती व्यक्ती जास्त शिकते, पैसे जास्त कमावते, नोकर ठेवते व स्वतःच्या मुलांना स्वत:च्या पैशाचा फायदा करून देते. येथपर्यंत समाजात येणारी विषमता अटळ आहे. पण जेव्हा ही उच्चता केवळ कर्तृत्ववान व्यक्तीच्या पोटी जन्मघेतला म्हणून मुलाला चिकटवली जाते तेव्हा समाजात अन्याय्य विषमता निर्माण होते. उदा. पाट्रेसचा मुलगा म्हणून तो जन्मतः पाट्रेस व सिनेटरचा मुलगा म्हणून सिनेटर.
अशी अन्याय्य विषमता रोमन समाजातही निर्माण झाली. त्या काळच्या सर्व समाजात अशी विषमता प्रचलित होतीच. अनेक देशांत पुढे दिले आहेत त्या धर्तीचे वर्ग होते. गुलाम, पेझंटस किंवा शेतकरी, धंदेवाईक, पुजारी, सैनिक, नोबल्स, रॉयल्स्, राजा व त्याचे कुटुंब. रोमचे वैशिष्ट्य हे की रक्तपात न होता पॅट्रिशियन वर्गाने स्वतःहून प्लेब्स्ना हक्क (rights) दिले व राज्य करण्यात भागीदारी दिली.
माझ्या मते रोम ही लोकशाही होती म्हणूनच हे शक्य झाले.
रोमच्या राज्यानंतर असे हक्क उच्चवर्गीयांकडून कामकन्यांना मिळण्यासाठी क्रान्त्या (revolution) व्हाव्या लागल्या. उदा. फ्रेंच क्रांती किंवा रशियन क्रांती.
आता रोम स्थापन करणार्याउ समाजाची मूलभूत तत्त्वे व आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती याबद्दलची चर्चा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
मूळ रोमन लोकांची राज्यशासन व जनता ह्यांच्या परस्पर संबंधाबद्दलची तत्त्वे पुढीलप्रमाणे होती.
(१) सर्व नागरिक समान दर्जाचे आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपले पोट भरण्यासाठी कष्ट केले पाहिजेत. त्यावेळी जगात इतरत्र प्रचलित असलेली गुलामगिरीची पद्धत त्यांना अमान्य होती. ह्या तत्त्वांमागची विचारसरणी काय होती?आजच्या जगात ही तत्त्वे पाळली जातात काय?
कोठल्याही समाजात उच्च व कनिष्ठ असे जन्मजात वर्ग निर्माण झाले की उच्चवर्गीय कनिष्ठांचे शोषण करतात. त्यातून उच्चवर्गीयांचा फायदा होतो. ते श्रीमंत, सुशिक्षित व जमीनदार होतात. उच्चवर्गीयांचा असा तात्पुरता फायदा झाला तरी पूर्ण समाजाचे नुकसान होते.
कनिष्ठ वर्गाच्या गरिबीतून गुन्हेगारी, दुर्व्यसने, सांसर्गिक आजार, हेरगिरी, बेकायदेशीर व्यवहार, राष्ट्रघातक प्रवृत्ती असे समाजघातक दोष कनिष्ठवर्गात उगम पावून पसरतात. त्यांना आळा घालायला पोलिस, न्यायखाते, वैद्यकीय उपचार यांची किंमत द्यावी लागते. अगदी श्रीमंत माणसेही समाजाला लागलेल्या किडीपासून स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत. गरिबांच्या रोगांचा संसर्ग त्यांनाही होतो. गुन्हेगारीची झळही उच्चवर्गीयांना लागतेच,
उदा. अमेरिकेत पसरलेला एडस् हा सुरवातीला “होमोसेक्शुअल पुरुषांचा आजार असे वाटले होते. कारण तो प्रथम त्या वर्गात पसरला. ह्या वर्गाकडे त्यावेळचे राज्यकर्ते थोड्या तुच्छतेने पाहात असल्याने सुरवातीला ह्या रोगावरच्या संशोधनाकडे द्यावे तसे लक्ष दिले गेले नाही. शेवटी अमेरिकेत “रक्तातून एड्स रोग पसरतोय” हीजाणीव झाल्याबरोबर सरकार व जनता खाडकन जागे झाले व संशोधनाला सुरवात झाली. (त्याआधी हा रोग आफ्रिकेत होता. त्याकडे तर पूर्ण दुर्लक्ष केले गेले.) कोकेनसारखी “ड्रगस्’ जेव्हा अमेरिकेत प्रथम येऊ लागली तेव्हा ती ‘‘घेटोमध्येच राहणार’ असे सांगणारे महाभाग मला आठवत आहेत. आता ही ड्रगस् व त्यामुळे निर्माण झालेली गुन्हेगारी सर्व समाजात पसरली आहे.
तसेच “भारतात एड्स येणार नाही. आमची मॉरल्स लूज नाहीत’ असेही वक्तव्य मी ऐकले आहे.
कनिष्ठ वर्गीयांची पूर्ण बौद्धिक उन्नती न झाल्यानेही समाजाचे नुकसान होते. सर्व समाजाची मिळून काही brain power असते. जर समाजातल्या ३० ते ४० टक्के नागरिकांना स्वतःच्या potential पर्यंत पोचण्याची संधीच मिळाली नाही तर त्यात त्या घटकांचीच नव्हे तर पूर्ण समाजाची हानी आहे. (भारतात आइनस्टाइनच्या बुद्धीचा माणूस दलितवर्गात जन्मला असता तर त्याला पुढे येण्याची पन्नास वर्षांपूर्वी संधी मिळाली असती काय?)
येवढेच नव्हे तर पुष्कळदा समाजाने संधी दिली नाही तर हुषार व्यक्ती समाजकंटक होऊन बसतात. गुन्हेगार होतात. गुन्हेगारी नॅग्स्मध्ये मुख्यतः अशिक्षित गरिबांचाच भरणा असतो. रोमनांनी नागरिकांच्या समानतेची तत्त्वे मानलेली होती. त्यामुळे वर्ग निर्माण होत आहेत असे वाटले की वर्गभेद कमी करण्याचे प्रयत्न सुरू होत.
समाजात अन्यायामुळे असंतोष निर्माण होत आहे असे वाटले की अन्याय्य कायदे बदलण्याचे प्रयत्न होत असत.
ग्रीक लोकांकडून रोमनांनी लोकशाहीचे धडे घेतले, पण गुलामगिरीची ग्रीक प्रथा मात्र टाळली. (ग्रीक पराभूत जनतेला गुलाम म्हणून राबवत असत.)
गुलामगिरीतली माणसे परकीयांची स्वारी आली की फितूर होऊन शत्रूला सामील होत असत. गुलामांच्या अस्तित्वामुळे राज्याला पोचणारा हा धोका रोमनांनी ओळखला होता.
तसेच “गुलाम असणे किंवा ठेवणे हे सर्व व्यक्ती समान आहेत” ह्या रोमन तत्त्वाविरुद्ध होते.
रोमन सत्ता जशी पसरू लागली, तसतसे रोमन अमलाखाली आलेल्या प्रदेशातले गुलाम त्यांच्या राज्यात आले. त्यांना एकदम मुक्त केले तर पराभूत जनता असंतुष्ट होईल; म्हणून रोमनांनी गुलामांना मुक्ती मिळविण्याचे कायदेशीर मार्ग खुले करून दिले. (उदा. पैसे मिळवून ते मालकाला देऊन स्वातंत्र्य मिळवायचे.) मुक्त गुलामाला नागरिक होण्याचाही हक्क दिला.
त्याउलट अमेरिकेत अमेरिकन राज्यघटना लिहिण्यासाठी कन्व्हेन्शन झाले तेव्हागुलामगिरीला तात्त्विक विरोध झाला. पण ती थांबवली गेली नाही. दक्षिण अमेरिकेचे कापसाचे पीक काढण्यासाठी गुलामांची जरूर होती. हा त्या प्लांटेशनच्या मालकांचा फायदा होता. त्यावेळी ह्या “evil trade” मुळे भविष्यात अमेरिकेला मोठा भुर्दंड पडणार आहे असे भविष्य वर्तवले गेले होते. ते खरेही ठरले. अंतर्गत यादवी झाली. गुलामगिरीच्या प्रथेचे दुष्परिणाम अमेरिका अजूनही भोगत आहे.
(२)कुठलेही राज्य चढाई करून जिंकायचे नाही. आपल्यावर परकीयांनी स्वारी केली तर मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी लढाई करायची असे रोमन धोरण होते.
तरीही युद्ध शक्य तो टाळायचे. वाटाघाटी करीत राहायचे असा त्यांचा प्रयत्न असे.
“पराभूत राज्यांना शिक्षा करायची नाही, त्यांच्याकडून खंडणी घ्यायची नाही, उलट त्यांनाच रोमन देशात सामील करून घेण्याचा प्रयत्न करायचा’ असेही त्यांचे धोरण होते. पराभूत देशाच्या नागरिकांना ते रोमन नागरिकत्व देऊ करीत असत. त्यांना रोमन नागरिक व्हायचे नसेल तर अंशतः नागरिक होण्याची व्यवस्था होती. पराभूत देशाला वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देऊ केल्या जात. त्यांना स्वतःची राज्यव्यवस्था, न्यायसंस्था, भाषा, धर्म व संस्कृती पूर्ववत् ठेवण्याची मुभा होती. रोमशी वेगवेगळ्या पातळीवरचे संबंध ठेवता येत असत. पराभूत देशाने रोमन राज्यात सामील व्हायचे ठरवले तर तेथे रोमन राज्यव्यवस्था स्थापन होत असे.
रोमन लोकांनी जबरदस्तीने आपले राज्य वाढवले नाही. परिणामी कुठलेही रोमन नागरिक रोमशी इमान राखून असत. हे मूळचे परदेशी नागरिक सिनेटमध्येही निवडून येत. असा एक स्पेनचा माणूस रोमचा सम्राट (एम्परर)ही झाला.
पराभूत राज्यांशी रोमन एकमेकांच्या संरक्षणाचा करार करीत असत. परिणामीसरहद्दीवरची राष्ट्रे रोमन राज्यांचे शत्रूपासून रक्षण करीत.
व्यापार, एकाच प्रकारचे चलन, सुरक्षित दळणवळण, मुक्तपणे वेगवेगळ्या देशांत हिंडण्याची मुभा व करांपासून कमीत कमी त्रास यामुळे रोमन राज्याची भरभराट झाली.
खंडणी घेऊन मांडलिक केलेल्या कमकुवत नामोहरम अशा दोस्त राष्ट्रापेक्षा संपन्न असे, रोमचे संरक्षण करील असे दोस्त राष्ट्र आपल्या फायद्याचे’ असा रोमनांचा हिशोब होता. हळूहळू सर्व अंकित देशांच्या सैनिकांना त्यांनी रोमन नागरिक करून घेतले.
रोमन धोरणाच्या अगदी उलट मार्ग पहिल्या महायुद्धानंतर जिंकलेल्या राष्ट्रांनी जर्मनीच्या बाबतीत स्वीकारला. पहिल्या महायुद्धातल्या पराभवाची जर्मनीला प्रचंड किंमत मोजायला लावली. परिणामी जर्मन जनतेचे हाल होऊन हिटलरचा उदय व दुसरे महायुद्ध झाले. ह्या दुसर्याव महायुद्धानंतर मात्र अमेरिकेने जर्मनी व जपान ह्या उद्ध्वस्त राष्ट्रांना तत्परतेने मदत करून त्या देशांत लोकशाहीची स्थापना घडवून आणली.
(लोकशाही असलेली राष्ट्रे युद्धाला सहजासहजी प्रवृत्त होत नाहीत अशी धारणा आहे.)
रशियालाही जर्मनी व जपानसारखेच आर्थिक व तांत्रिक साहाय्य करायला हवे असे मतप्रवाह अमेरिकेत वाहात आहेत. लोकसत्ताक, स्थिर (stable) रशिया जगाच्या हिताचा
आहे असे त्यांचे मत आहे.
आता अमेरिकेचे व मेक्सिकोचे काय चालले आहे ते पाहू. या दोन राष्ट्रांनी धंद्याच्या दृष्टीने नॅफ्ता हा करार केलेला आहे. हा करार काँग्रेसमधून पास झाला तेव्हा ह्या कराराला बराच विरोध झाला. तरी पण तो करार पास झाला.
व्यापारासाठी दोन्ही देशांचे दरवाजे उघडले तर त्यामुळे दोन्ही देशांची भरभराट होईल अशी विचारसरणी ह्या करारामागे आहे. तरीही गरीब मेक्सिकोचे नागरिक कॅलिफोर्नियातून अमेरिकेत बेकायदेशीरपणे येण्याचा प्रयत्न करतात. तसेच अमेरिकेत बंदी असलेल्या, पण अमेरिकनांना हव्या असलेल्या बेकायदेशीर अंमली पदार्थांचा अव्याहत प्रवाह मेक्सिकोतून अमेरिकेत वाहत असतो. हे सर्व थांबवण्यासाठी अमेरिकन सरकार कोट्यवधी डॉलर्स खर्च करीत आहे. तरी पण काही फायदा होत नाही.
आता रोमन लोकांनी या परिस्थितीत काय केले असते? मेक्सिकन् जनतेला अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करण्याचे प्रयत्न केले असते का?अमेरिका जो पैसा ड्रग्स् रोखण्यासाठी व बेकायदेशीर नागरिकांना अडवण्यासाठी खर्च करीत आहे तो मेक्सिकोला दिला तर त्या देशाची भरभराट होईल. जोपर्यंत अमेरिकेतील भरभराट पैसा देऊन ड्रग्स् घेत राहणार, तोपर्यंत ड्रग्स्ची वाहतूक थांबणार आहे का?
मेक्सिको गरीब आहे. त्याउलट कॅनडा साधारण अमेरिकेएवढाच संपन्न देश आहे. लोक कॅनडातून अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश का करीत नाहीत? त्या देशातून बेकायदेशीर ड्रग्स का येत नाहीत? (हे दोन्ही देश अमेरिकेच्या सरहद्दीवरचे देश आहेत.)
आता भारत व पाकिस्तान यांचा प्रश्न पाहू. गेली पन्नास वर्षे ह्या दोन्ही देशांनी लष्करासाठी प्रचंड खर्च केला आहे. त्यातून काय निष्पन्न झाले आहे?रोमनांनी हा प्रश्न कसा सोडवला असता?
(३)रोमन राजवटीची सुव्यवस्था रोमच्या यशाचा पाया होती. कर गोळा करणारे अधिकारी व प्रत्येक प्रान्ताचा गव्हर्नर यांच्यावर केन्द्रीय सरकारची कडक नजर असे. न्यायाधीश निःपक्षपाती होते. प्रत्येक प्रान्त स्वतःचे अधिकारी निवडत असे. सैन्यामध्ये कडक शिस्त होती.
(४)परदेशीयांचा धर्म, संस्कृती, रीतिरिवाज ह्यात रोमन ढवळाढवळ करीत नसत.
(५)रोमन रिपब्लिकमध्ये खरी लोकशाही होती (ख्रिस्तपूर्व ५०९ ते ३०). त्यावेळी अनेक फिलॉसफर्स सिनेट व कॉन्सुल लोकांच्या हक्कांची पायमल्ली करीत नाहीत ना ह्याकडे लक्ष ठेवून असत. उदा. सिसरो. रोमची मूळ तत्त्वे रोमनांना येवढी पूज्य होती की ज्यूलियस सीझरने एम्परर झाल्यावर सिनेटचे हक्क परत देण्याचा प्रयत्न केला.ऑगस्ट हा पहिला एम्परर. तो व नंतरचे एम्परर सुद्धा आम्ही पूर्वजांच्या पूज्य तत्त्वानुसार राज्य चालवतो’ असे सांगत राहिले.
रोमन जनता हळूहळू तिच्या पूर्वजांनी केलेल्या नियमांपासून विचलित झाली. गुलामगिरीची पद्धत त्यांनी स्वीकारली, रिपब्लिक (लोकशाही) अस्ताला गेली, पराभूत राष्ट्रांकडून खंडणी घेण्याची पद्धत सुरू झाली, सिनेट लाच घेऊ लागले व सत्ता मिळवण्यासाठी खून होऊ लागले. सिनेटर्सने स्वतःसाठी मोठ्या इस्टेट्स निर्माण केल्या.जे सैनिक युद्ध जिंकून रोमला परतले ते बेकार झाले.
टायबेरियस् व त्याचा भाऊ गायस् यांनी जमिनीचे न्याय्य वाटप करण्याचा व नवे श्रीमंत धंदेवाईक यांना राजकीय सत्तेत भाग घेऊ देण्याची परवानगी सिनेटकडून मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांचेही खून झाले.
त्यावेळी माजलेल्या अंदाधुंदीतून सीझरचा उदय झाला व लोकशाही संपुष्टात आली.
पुढा-यांच्या दुर्वर्तनामुळे रोमन लोकशाही नष्ट झाली हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर एम्परर्स झाले. शेवटी (५०० A.D.) रोमन साम्राज्य नष्ट झाले.
लोकशाही व रोमन कायदे हा रोमने जगाला दिलेला वारसा आहे. रोमचे कायदे (Justinian code) अजूनही वापरले जातात.
जुन्या काळातच नव्हे तर विसाव्या शतकातल्या बर्या)च देशांपेक्षा रोमन राजवट व त्यांची मूलभूत तत्त्वे उदारमतवादी होती. त्यांचे साम्राज्य प्रचंड होते. (आताच्या अमेरिकेपेक्षा मोठे. त्यात स्कॉटलंड, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, हंगेरी, रुमेनिया, आफ्रिकेचा काही भाग, मेसोपोटेमिया, सिरियाचे वाळवंट यांचा समावेश होता.)
रोमचे नागरिक जागरूक होते. तरीही रिपब्लिक अस्ताला गेले.
रोमच्या इतिहासावरून कुठल्याही देशाला लोकशाही कायमची टिकेल हे गृहीत धरता येणार नाही हे सिद्ध होते (cannot take democracy for granted). लोकशाहीचे यश जागरूक नागरिकांवर व तत्त्वनिष्ठ पुढा-यांवर अवलंबून असते.
टीपा
(१)रोमच्या इतिहासाबद्दल मतभेद आहेत. ह्या लेखाचा मुख्य हेतू इतिहासाची चर्चा नसून मूळच्या रोमन लोकांच्या शासनांबद्दलच्या तत्त्वांची चर्चा करण्याचा आहे.
(२)सत्ता रोमन सेनापतींच्या हाती जाऊ नये म्हणून रूबिकॉन ही रोम शहराबाहेरची नदी सैनिकांसह ओलांडण्याची रोमन सेनापतीला परवानगी नव्हती. हा नियम ज्यूलियस सीझरने मोडला, हा नियम मोडण्यास कायद्याने देहान्ताची शिक्षा होत असे.
(३)रोमन राज्याची स्थापना, ख्रिस्तपूर्व ७५३, रिपब्लिकची स्थापना ख्रिस्तपूर्व ५०९, रिपब्लिक संपून पहिला एम्परर ज्यूलियस सीझर ख्रिस्तपूर्व ५८ साली.
(४)Ref. रोमच्या इतिहासाची माहिती.
Life and Legacy of the Roman Empire, Professor Ori Soltes, Georgetowne University, Superstar Teacher Series.
(५)रोमन राज्यातही स्त्रियांचे स्थान दुय्यम होते.
(६)हा लेख लिहिल्यावर माझ्या वाचनात पुढील उतारा आला.
Helping Russia;
SOROS’S RUSSIA SUBSIDY
American financier George Soros said last Sunday that he would donate $500 million to Russia in an attempt to improve that nation’s health care, to expand educational opportunities, and to assist in retraining military personnel for civilian jobs. The gift, which would exceed last year’s US foreign aid grant of $95 million, would make Soros the leading philanthropist in Russia. Soros has long been a benefactor of “”open societies,” spending $1.5 billion to promote civil liberties, a free press, and political freedom.

65 Oxford Road Newton Centre,
MA 2159, U.S.A.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.