कहाणी – एका ज्ञानपिपासू तपस्विनीची

१९३४ सालची गोष्ट. एका १६ वर्षांच्या उपवर मुलीचे लग्न ठरले अन् त्याप्रमाणे नाशिक क्षेत्री झाले पण. त्यावेळचे ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक श्री रा.रा. वामनराव चितळे, हे होते वरपिता. वर चि. दिनकर, वकील अन् ‘युवराज’, तर वधू होती मराठी लेखक श्री. वि.मा.दी. पटवर्धन यांची एकुलती एक भगिनी, व शेंडेफळ चि. सौ. कां. श्यामला. मुलीच्या जन्मानंतर अल्पावधीतच मातृच्छत्र हरपले व लगोलग वडील, प्रा. ग.स. दीक्षित, प्रकृति-अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या फर्म्युसन महाविद्यालयांतून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ही चिचुंद्री (आजमितीसही जेमतेम ५ फूट उंचीची बुटकी अन् शिडशिडीतच मूर्ति आहे ही) तीन बंधू व वडील यांचा जीव की प्राण होती. शिक्षणही साथ साथ पित्याकडून घरच्या घरीच पण शिस्तबद्धरीत्या चालू. या सर्व पार्श्वभूमीमुळे चि.सौ.कां. श्यामला जेव्हा बोहोल्यावर चढली तेव्हा ना कुणा शाळेची आजी वा माजी विद्यार्थिनी, ना कुठली अधिकृत शालेय परीक्षा उत्तीर्ण झालेली.
सासरी नागपूरला घरात आजे-सासू-सासरे, सासू-सासरे आणि धाकटे दीरनणंदा, तेव्हा सौ. श्यामलाने भीतभीतच, स्वतःचे काम सांभाळून अधिक शिकायची इच्छा व्यक्त केली यजमानांच्याजवळ. तुरंत मॅट्रिकची पुस्तके घरात आली. अशा तर्हेीने सौ. श्यामलाने तिच्या आयुष्यातली दुसरी परीक्षा दिली. (अर्थातच ‘वधूपरीक्षा’ ही पहिली.) नंतर ओघानेच महाविद्यालय पण चालू झाले. दरम्यान दोन बाळंतपणेही झाली व दोन वर्षे शिक्षणांत खंडही पडला अन् जबाबदारीही वाढली. तिच्या अभ्यासक्रमाचा विषय होता वनस्पतिशास्त्र. त्यामुळे दुपारचे वर्ग व प्रयोगाप्रीत्यर्थ क्वचित अवेळी द्यावा लागणारा दीर्घकाळ. हा व्याप कमी पडला म्हणून की काय इतर उद्योग, छंद पण सुरळीतपणे चालूच. घरचाच छापखाना तेव्हा तेथल्या स्त्रियांना खिळे जुळवणी, छपाई, बांधणी आदि कामे शिकवणे, नाटकांत हौसेने भूमिका करणे, स्वैपाक, रांगोळी काढणे, काव्यरचना. नागपूर हेरा.स्व. संघाचे उगमस्थान व आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्याशी तर घरोब्याचे जिव्हाळ्याचे संबंध. सबब ‘धंतोली’ या राहत्या विभागांत संघाची एक शाखा चालू करणे, वगैरे वगैरे. धीम्या गतीने का होईना, पण सौ. श्यामला चितळे घरच्या सर्व जबाबदार्या सांभाळत, द्विपदवीधर झाल्या. योगायोगाने त्याच वेळी नागपूरच्या सायन्स कॉलेजात प्राध्यापकाची जागा भरावयाची असल्याची पब्लिक सव्र्हिस कमिशनची जाहिरात त्यांच्या वाचनात आल्याने त्यांनी अर्ज भरला. अन् त्या महाविद्यालयात वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून काम पण करू लागल्या.
येथवर वाटचाल झाली तरी उपजतच रक्तात असलेली अधिक शिकायची तळमळ
” त्यांना स्वस्थ बसू देईना. ‘दक्षिणांगाकडून परवानगी मिळाली तशी १९५२ साली त्या
रीडिंग, इंग्लंड, येथे आल्या प्रो. थॉमस हॅरिस यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी. (निघताना भावांची मुक्ताफळं. “आता इतकं शिकलीस. लोकप्रिय प्राध्यापिका म्हणून नोकरी पण करतेस, मग आता आजारी पती व यौवनाच्या उंबरठ्यावर उभे असलेले दोन मुलगे यांना सोडून इंग्लंडला गेलंच पाहिजे का?” तर ‘सौभाग्याने स्पष्ट सांगितले – “माझी नीट काळजी घेऊन इकडचे सर्व काही व्यवस्थित बघेन मी. तुझ्यापुढे चालून आलेली संधी मात्र तूं दवडू नकोस.) तीन वर्षांतच सुयश प्राप्त करून स्वगृही परतल्यावर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नागपूर येथे असोशिएट प्रोफेसर म्हणून नेमणूक. १९७६ साली वयाच्या ५८ व्या वर्षी जेव्हा त्या सेवानिवृत्त झाल्या तेव्हा त्यांचा हुद्दा होता Professor & Head of the Department. शैक्षणिक क्षेत्रात असताना त्यांनी अनेक मानसन्मान व पारितोषिके मिळवली आहेत. Fossil Plants या त्यांच्या निरतिशय आवडीच्या विषयावर त्यांनी शंभराचे वर निबंध (papers) लिहिले आहेत. अगणित परिषदांना उपस्थित लावली आहे. आपल्या विद्याथ्र्यांना Fossils Collections साठी कैक ठिकाणी नेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे.
त्यावेळी उभयता आपापल्या क्षेत्रांतून सेवानिवृत्त झाले होते. दोन्ही मुले मार्गी लागून घरात दोन सुविद्य लक्ष्म्या पण आल्या होत्या. दररोज नियमित होणारी पूजाअर्चा करीत. पोथीपठण, जपजाप्य, उपासतापास करीत, दुपारी कथाकीर्तने ऐकत, अधूनमधून तीर्थयात्रा करीत, जर काही फावला वेळ मिळाला आणि अंगात उत्साहही असला तर थोडेफार संशोधन केले असते, तर काय कुणाची ना होती? (संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे – सुखार्थिनः कुतो विद्या, नास्ति विद्यार्थिनः सुखम् – त्याची यथार्थतेने वारंवार आठवण मात्र होते. परंतु विधात्याने दुसरेच काही योजून ठेवले होते.
धाकटे चिरंजीव, चि. अनिरुद्ध, दरम्यान अमेरिकेस जाऊन क्लीव्हलंड, ओहायो येथे स्थायिक झाले होते. त्यांनी मातोश्रीला कळवले की येथे काम करण्यासाठी वयाची आडकाठी नाही. संशोधनासाठी योग्य असे वातावरण, साधने, काम, पैसा असे सर्व कांही उपलब्ध होऊ शकते. हवामानही प्रकृतीला चांगले. सबब तुम्ही येथेच या कायम माझ्याकडेच. त्यावर चर्वितचर्वण होऊन उभयतांनी लेकाकडे जायचे ठरवले. आता सेवानिवृत्त होऊन साठीत असता, नागपूरची आवरासावर करून, १९७८ साली त्यांनी अमेरिकेस कूच केले.
क्लीव्हलंडला सुरुवातीचे काही दिवस मुलगा, सूनबाई व नातवंडे यांच्याशी समरस होण्यात गेले. पण नवी नवलाई संपल्यावर डॉ. सौ. श्यामलाबाईंनी परिस्थितीचा आढावा घेतला. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे यजमानांच्याकडून, श्री. दिनकरराव उर्फ अण्णासाहेब, यांजकडून तर काहीही होणे नाही. मुलगा व सूनबाई कामानिमित्त दिवसभरबाहेर, मुलेही पोटोबा एकदा भरल्यावर त्यांच्या खेळात मश्गूल, तेव्हा त्यांनी दोन गोष्टी केल्या. शिक्षणक्षेत्रातली परिचित मंडळी, तसेच परिषदांच्या वेळी भेटलेले लोक यांचे कडे आपला फ्व (ब्रिटनमध्ये curriculum vitae; कॅनडात Cross of Velour. अमेरिकेत त्याला Resume तर भारतात Biodata अशा संज्ञा आहेत.) पाठवला व जेथे कुठे स्वतःच्या अनुभवांचा फायदा होईल असे त्यांना वाटले तेथे त्याची प्रत पाठवण्याबद्दल त्यांनाच विनवले व फावल्या वेळात Avon Lady या नात्याने लोकांच्या दारी जाणे सुरू केले. शेवटी काय तर ‘काखेत कळसा अन् गावाला वळसा’ असे होऊन त्यांची माहिती Cleveland Museum of Natural History यांचेकडे जाऊन पोहोचली. त्या संग्रहालयात Palaeontology चा विभाग होता; पण तो Palaeobotany वाचून अपुरा होता. त्याची संपूर्ण जबाबदारी व नवनिर्मिती करायचे आव्हानात्मक काम १९८० मध्ये स्वीकारून Curator and Head of Palaeobotany Department या पदावर त्यांची नेमणूक झाली.
वयाची साठी उलटल्यावर, त्या संग्रहालयात शून्यापासून सुरुवात करून त्यांनी कुठवर मजल मारावी? क्लीव्हलंडच्या आसमंतातील फॉसिल्सवर (fossils) संशोधन सुरू झाले. संग्रहालयाची वाढ, नूतनीकरण पण चालू झाले. १९८० साली स्वतः पुढाकार घेऊन, वाटाघाटी करून सिनन्सिनाटी विद्यापीठाकडून जगभरचे तीस हजार Plant Fossils, ज्यांची किंमत त्यावेळी १० लाख डॉलर्स (१,०००,०००) केली गेली होती, त्यांनी देणगी म्हणून संग्रहालयात जमा केले. त्यांची वर्गवारी, व्यवस्थित नोंदणी, देखभाल, जपणूक हे सर्व त्यांना करावे लागे. सर्वात जास्त स्वयंसेवक Palaebotony विभागात काम करतात. फॉसिल्स साफ करणे, क्रमांकवार नोंदवणे तसेच साथसाथ नोंदपत्र (catalogue) तयार करणे, आदि वरकड कामांत ते मदत करतात. तथापि Microscope खाली त्यांची परीक्षा करून, कुठला कोणत्या झाडाचा आहे इत्यादि काम त्यांना स्वतःलाच करावे लागे, त्यांनाच ठरवावे लागे. तसेच १९८० पासून Upper Devonian Cleveland Shale मधील वनस्पति-अश्मांवर त्यांचे संशोधन सुरू आहे. Evolution & Environment यातील त्यांचे स्थान व संबंध याचे आतापर्यंत कोणाकडूनही, कधीही न झालेले संशोधन त्या करत आहेत. या विषयांत सर्वसामान्य लोकांना रस उत्पन्न व्हावा, अन्यथा ते नष्ट केले जाऊ नयेत म्हणून व एरवीही ते कसे ओळखावेत, साधारणपणे ते कुठे आढळतात, जमिनीतून काढताना काय व कशी काळजी घ्यावी लागते वगैरेंबद्दल जनताजागृती करून त्यांना शिक्षण व माहिती देण्यासाठी १९८२ मध्ये त्यांनी तेथे Fossil Society ची स्थापना केली. आज त्या संस्थेत शंभराहून अधिक सभासद आहेत. त्यांच्यासाठी व्याख्याने, स्लाइड शो, वनभोजने, सहली आदि कार्यक्रम आखले जातात. संग्रहालयात Prof. Kremp यांचे कडून देणगी म्हणून मिळालेली Palaeobotony या विषयावरील ३०० पुस्तके व १०,००० प्रबंध आहेत. विशेष म्हणजे चीन, जपान, ऑस्ट्रेलिया आदि देशोदेशींचे विद्यार्थी तेथे विशेष अभ्यास करायला येतात व डॉ. सौ. श्यामलाबाईंच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण करतात. खुद्द त्या International Botanical Congress च्या निमित्ताने जगभर हिंडलेल्या आहेत. Pyritized Specimens and rotting coal balls टिकवण्याच्या नवीन पद्धती त्यांनी विस्तारित केल्या आहेत. संग्रहालयात एकमेव अद्वितीय चार फूट उंचीच्या क्लब माँस झाडाचा, जो मुळापासून वर आलेल्या कोनापर्यंत अश्म होऊन सलग शाबूत आहे, त्यांनी त्याला Clevelandodendron Ohioensis असे नाव दिले आहे. आणखी एक विशेष म्हणजे हे सर्व, योगायोगाने, क्लीव्हलंड शहराच्या २०० व्या तर संग्रहालयाच्या ७५ व्या वाढदिवसाच्या वर्षांत घडले. त्यांच्या कष्टांचे चीज व कर्तबगारीचे कौतुक म्हणून संग्रहालयाने २४ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांचा सत्कार करून Jared Potter Kirtland पारितोषिक देऊन (for excellence in Natural Science) गौरव केला.
ऑक्टोबर १९९६ च्या बृहन्महाराष्ट्रवृत्तमध्ये डॉ. सौ. श्यामलाबाई चितळे यांच्याविषयी आलेला (पहिला) लेख माझ्या वाचनात आला. दूरध्वनीवरून त्यांच्याशी बोलताना मी त्यांना पहिला प्रश्न विचारला.“नागपूरचे लॉ रिपोर्टर चितळे हे आपले सासरे का?”त्यांच्याकडून सकार आला आणि आता श्री. रा.रा. अण्णासाहेब व डॉ. सौ. श्यामलावहिनी आणि मी असा आम्हा तिघांत नियमित पत्र्यव्यवहार चालू आहे. इतकेच नव्हे तर अधूनमधून एखादी विनोदी कोपरखळी मारण्यापर्यंत प्रगती पण झालीआहे. अर्थातच हा त्या उभयतांचाच मोठेपणा आहे.
रीडिंग विद्यापीठाला भेट द्यायची उभयतांची तीव्र इच्छा आहे. त्यानिमित्याने माझ्याकडे येण्यासाठी (हाय विकम्बपासून रीडिंग उण्यापुर्या. वीस मैलांवर आहे.) मी दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारलेले आहे. केव्हा हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे अजून. नुकत्याच त्यांना लिहिलेल्या पत्रात (अद्यापिही त्यांचे संशोधन, परिषदा व दौरे चालूच आहेत (जूनच्या शेवटी पोलंडला, बॉस्टनच्या अधिवेशनानंतर तीन आठवडे रशियाला, माँट्रियलला तीनचार दिवस जाऊन आता ८ ऑगस्टला पुनरपि क्लीव्हलंडला) हे कळताच विचारले मी, “अहो वहिनी. आता ते स्वीडिश शास्त्रज्ञ त्यांचं ते कुठलंसं पारितोषिक देईतो थांबायचंच नाही, असा काही वसा घेतला आहे का तुम्ही?”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.