विकृत संस्कार

श्रीमती कल्पना कोठारे यांनी डिसेंबर ९७ च्या आजचा सुधारक मध्ये एक चांगला लेख लिहून माझ्या लेखातील वैगुण्ये दाखवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.

पण ब्रेन-ड्रेन किंवा काही भारतीयांची पाश्चात्त्य देशांत होणारी कुतरओढ हा माझ्या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा नव्हताच. माझ्या मुंबईत राहणार्याो मराठीभाषक भावाची दोन मुले अनुक्रमे सातवी व नववीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांना प्रादेशिक भाषा म्हणून ‘मराठी हा विषयही शिकावा लागतो. या मुलांना सोमवार, मंगळवार, मराठी आकडे, वगैरे नेहमीच्या वापरातील मराठी शब्दांचे अर्थ समजत नाहीत, मराठी वृत्तपत्र नीट वाचता येत नाही. हे लक्षात आल्यावर माझ्या मनाला ज्या वेदना झाल्या, त्या वेदनांनी मला हा लेख लिहायला प्रवृत्त केले. अशी अनेक मुले मराठीभाषक घरांत जन्मून व वाढूनही मराठी भाषेपासून तर दुरावतातच, पण ती अगदी लहान वयापासूनच अमेरिकेत स्थायिक होण्याची स्वप्ने पाहू लागतात. त्यामुळे त्यांना भारत हे तात्पुरते निवासस्थान वाटू लागते. ‘ने मजसी ने, परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला असे वाटणे तर दूरच राहिले, पण ‘ने मजसी ने त्वरितु मम आंग्लभूमीला, अंतराळा प्राण तळमळला’ असे ही मुले म्हणू लागतात. याबद्दल वाईट वाटणे हे कदाचित माझ्या संकुचित भाषाप्रेमाचे, संस्कृतिप्रेमाचे वा देशप्रेमाचे लक्षण असेल; मुलांची अशी परदेश-धार्जिणी वृत्ती निर्माण होण्यास शाळेत इंग्रजी माध्यम असणे हे एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते.

माझ्या पुतण्यांनाही प्रादेशिक भाषा म्हणून मराठी शिकणे अत्यावश्यकच होते. पण त्याचा ‘मराठी येण्याचे दृष्टीने परिणाम शून्यवत् असतो ही वस्तुस्थिती आहे. माझ्या सुदैवाने “माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्लिश?’ हा ना. रो. दाजीबा यांचा लेख आजचा सुधारक- डिसेंबर मध्येच प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे माध्यमाच्या प्रश्नावर मला अधिक लिहिण्याचे कारण उरले नाही.
कावळा-कावळीला जर मानवी भावना असत्या, तर आपण वाढवलेले पिल्लू “कुहूकुहू’ करत उडत जाताना पाहून त्यांच्या मनात जो कल्लोळ उठला असता तो मला मराठी घरांत भारताला तात्पुरते निवासस्थान मानणार्यान “परदेशी मुलांना वाढताना पाहून अनुभवायला मिळतो. या भावनांच्या कल्लोळाबद्दल मी काही आकडेवारी किंवासंशोधनाचे दाखले देऊ शकत नाही.

राहिला प्रश्न पाश्चात्त्य देशांत (किंवा कोणत्याही परदेशात) भारतीय लोकांना नागरिक म्हणून स्वीकारण्याचा. सुमारे तीस वर्षांपूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रम अवघड व फार दीर्घ म्हणून अमेरिकन विद्याथ्र्यांत लोकप्रिय नव्हता. त्यामुळे डॉक्टर्सची तेथे कमतरता होती. त्यावेळी डॉक्टर्सना सञ्ज प्रवेश मिळत असे. आता वातावरण बदलले आहे. आता डॉक्टर्सना प्रवेश मिळणे फार अवघड झाले आहे. पण आता तेथे कमतरता आहे ती सॉफ्टवेअर तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट व गैरेंची. त्यामुळे त्यांना सध्या प्रवेश मिळतो. ज्या धंद्याच्या अभ्यासक्रमाची व नंतरच्या आयुष्याची अमेरिकन विद्याथ्र्यांना आवड नसते, त्या पेशाच्या व्यक्तींची तेथे कमतरता असते व त्यांनाच फक्त तेथे प्रवेश दिला जातो. यात मी अमेरिकेला दोष देत नाही; असेच धोरण असायला हवे. शिवाय अमेरिकन मुलांना कंटाळवाणे वाटणारे अभ्यासक्रम व जीवनक्रम भारतीय मुलांना कंटाळवाणे वाटतील असे अजिबात नाही.
ट्रकसूट, बूट, पिझ्झा वगैरेंना माझा विरोध आहे तो प्रत्यक्ष त्या वस्तूंना नाही, तर अंधानुकरणाला-त्या वस्तू केवळ पाश्चात्त्य आहेत म्हणून स्वीकारण्याला आहे. येथील हवामानाला, राहणीमानाला योग्य अशा गोष्टी जगातून कोठूनही घ्यायला हरकत नाही. पिझ्झा आवडतो म्हणून खायला काहीच हरकत नाही, पण पिझ्झा पाश्चात्त्य आहे, म्हणूनतो मला किंवा माझ्या मुलांना आवडायलाच हवा, या वृत्तीला माझा विरोध आहे.

अमेरिकेत मिळणारे जॉब-सॅटिस्फंक्शन, तेथील शिक्षणाच्या व संशोधनाच्या सुविधा या गोष्टी सर्वज्ञात आहेत. पण तेथे जाऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून घेणार्या व्यक्तींनी मातृभाषेच्या माध्यमांतून शिक्षण घेतलेले असते असा माझा अंदाज आहे. (श्री कोठारे यांनी सौ. श्यामला चितळे यांच्याकडे याबद्दल विचारणा करावी.)

इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊन सुद्धा जर भारतीयांनी असा सर्वांगीण विकास करून घेतला असेल तर त्यांनी आपले परिश्रम व बुद्धिमत्ता यांच्या जोरावर इंग्रजी माध्यमामुळ येणार्याे अडथळ्यांवर (handicaps) मात केली आहे असे मला म्हणावे वाटते. अर्थात् याबद्दल दुमत असू शकेल!
मातृभाषेशिवाय अन्य माध्यमातून शिक्षणघ्यावे लागणे ही एक विकृती आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलांना निव्वळ इंग्रजी चटपटीतपणे बोलतात म्हणून शासकीय/खाजगी नोक-यांत प्राधान्य मिळावे ही देखील एक विकृती आहे. आमच्या मुलांना मराठी भाषा, मराठी संस्कृत परकी वाटावी व त्यांना भारत हे एक तात्पुरते निवासस्थान वाटावे, ही एक जास्त भयानक विकृती आहे -निदान याबद्दल तरी दुमत नसावे

एक स्पष्टीकरण. माझ्या लेखात “काव काव’ हा शब्द कोठेही अवहेलनार्थी वापरलेला नाही. ‘काव काव’ हा शब्द मातृ-भाषा, स्व-संस्कृति या अर्थाने वापरला आहे, तर “कुहू-कुहू” हा शब्द परभाषा या अर्थी वापरलेला आहे.

कदाचित् या सर्व बाबतीत मी जरा जास्तच हळवा आहे. व कदाचित् असे हळवे असणे व ते व्यक्त करणे “आजचा सुधारक’च्या वाचक-लेखकांना शोभून दिसत नसावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.