डॉ. राममनोहर लोहिया यांचे स्त्रीविषयक विचार

‘जातिप्रथा आणि स्त्रिया हे भारतीय समाजातील दोन मोठे पिंजरे होत. स्त्रिया आणि शूद्र मिळून बनलेल्या ९० टक्के समाजाला अलग आणि बहिष्कृत केल्यानेच भारतीय आत्म्याचे पतन झालेले आहे.वस्तुतः ह्या दोहोंत कमालीची शक्ती आहे. परंतु हे तुरुंग कायम ठेवल्याने समाजातील सारा उल्हास, साहस आणि कर्तृत्व कुजत पडले आहे. हे दोन्ही कैदखाने परस्परसंबंधित असून परस्परांचे पोषण करतात आणि म्हणूनच ते नष्ट करण्याचे बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्याशिवाय क्रांतीची भाषा फोल आहे. आर्थिक क्रांती झाली की हे पिंजरे आपोआप तुटतील असे मानणे बरोबर नाही.
‘स्त्रियांची स्थिती तर फारच भयंकर आहे’. बोलण्यापुरते स्त्रियांचे स्थान मोठे आहे. तिला देवीही म्हणण्यात येते. पण प्रत्यक्षात ते नगण्य आहे. एक सुंदर खेळणे, उपभोग्य दासी यापलीकडे प्रत्यक्षात तिचे स्थान नाही.
उपर्युक्त विचार व्यक्त केले आहेत चतुरस्र बुद्धीचे व मूलग्राही विचारांचे श्रेष्ठ समाजवादी लोकनेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी! स्त्रियांना वर उठविण्यासाठी त्यांनी विशेष राजकीय प्रयत्न केलेले होते.
स्त्रियांच्या सन्मानाशी जोडला गेलेला एक मूलभूत प्रश्न शौचालय हा होता आहे. पुरूष कुत्र्यासारखा कुठेही लघ्वी करू शकतो, पण स्त्रियांना ती कित्येक तासांपर्यंत रोखून धरावी लागते, कारण सार्वजनिक ठिकाणी शौचालये नव्हती. अजूनही थोडीच आहेत. यासाठी १९६३ साली लोकसभेत सर्वप्रथम आवाज उठविणारे डॉ. लोहियाच होते. कारण त्यांना स्त्रियांविषयी चिंता सतत वाटत असे.
युरोपीय संस्कृतीत स्त्री आणि पुरुष यांना बरोबरीचे मानतात, पण भारतीय स्त्री त्या अवस्थेपासून अजून खूपच दूर आहे, इतकी की तिची ती अवस्थाच देशाच्या अधःपतनाचे मोठे कारण बनले आहे. स्त्रिया आणि योनिपावित्र्य याबाबतच्या आमच्याकल्पना सडलेल्या आहेत. शुचितेचा, पवित्रतेचा आणि शुद्धतेचा विचार स्त्रियांच्या शरीराच्या एका छोट्याशा भागापुरता केंद्रित करण्यात येत असतो. स्त्रीला परपुरुषाचा स्पर्श होता कामा नये, लग्नाच्या पूर्वी तर मुळीच होता कामा नये, असे मानण्यात येते. त्यामुळे अन्य देशांपेक्षा भारतातील स्त्री अधिक जखडली आहे. डॉ. लोहिया म्हणतात, “स्त्रीपुरुषांना नीति-अनीतीच्या अलग अलग कसोट्या लावणे चूक आहे. भारतीय पुरुषांनी स्त्रीला शुद्ध राखण्याच्या प्रयत्नात तिला लांछित आणि अपमानित केले आहे. योनिशुचितेच्या ओझ्यामुळे कितीतरी घाणेरडे असे मानसिक आणि शारीरिक परिणाम स्त्रियांवर होतात. रजस्वला स्त्रीबाबत असाच विकृत विचार केला गेला आहे. तसे म्हटले तर स्त्रीपुरुषांच्या शरीरात मलमूत्र नेहमीच असते. म्हणून कायम अशुचि अवस्थेत त्यांना कोणी बाजूला बसवीत नाही. तेव्हा योनिशुचिता हाच एकमेव केंद्रबिंदु मानून स्त्रीचा विचार झाला तर ती खचितच निष्प्राण बनून राहील. योनिशुचितेच्या बाबतीत चूक झाली तर घाणीत पाय पडल्यावर जसे पाय धुवून भागते तसेच याहीबाबत मानले पाहिजे. त्यामुळे कायमची आत्मग्लानी किंवा तिरस्कार स्त्रीच्या वाट्याला येणार नाही”.
मुलीचे लग्न करणे ही आईबापांची जवाबदारी नाही असे सांगून डॉ. लोहिया म्हणतात, ‘चांगले शिक्षण आणि सुदृढता प्राप्त करून दिली की आईबाबांची जवाबदारी संपते. पुढे आपला विवाह जमविण्याच्या प्रयत्नात मुलगी चुकली, समजा तिला विवाहबाह्य संबंधातून मूल झाले, तरी स्त्रीपुरुषांमधील स्वाभाविक संबंध प्राप्त करून घेण्यासाठी दिलेली ती किंमत यादृष्टीने त्याकडे पाहावे. त्यामुळे मुलीच्या चारित्र्याला कोणताही कलंक लागत नाही. स्त्रीपुरुषसंबंधात फक्त दोनच अपराध मानले पाहिजेत. ते म्हणजे बलात्कार आणि वचनभंग. मध्यमवर्गीय स्त्रियांबद्दल डॉ. लोहिया म्हणतात, की या स्त्रिया अग्निपरीक्षेनंतर देखील सीतेला वनवासाला पाठविणार्याग रामाला आपले मनाने व वाचेने आराध्य दैवत मानतात. त्याची कृती मग भले विपरीत होत असो. रामाने सीतेशी केलेला व्यवहार पाहिला की या स्त्रिया रामभक्ती कशी करू शकतात याचे आश्चर्य वाटते.
चित्तोड पडल्यावर पद्मिनीने अन्य स्त्रियांसह जोहार केला. या उलट गेल्या महायुद्धातील रशियन हेर नटालीचे उदाहरण पहा. नटालीला युक्रेनमध्ये जर्मन पलटणीने पकडले. जर्मन अधिकार्या च्या स्वयंपाकघरात नोकरी करता करता तेथून जर्मन पलटणीच्या हालचालींच्या गुप्त बातम्या बिनतारी यंत्राच्या द्वारे ती आपल्या मायदेशात, रशियात पाठवी. या उपक्रमाद्वारे नटालीने जवळपास साठ/सत्तर हजार जर्मन फौजेला धारातीर्थी लोळवले. नटालीच्या हालचाली जर्मनांच्या लक्षात येताच त्यांनी तिला फाशी दिले. नटालीचे उदाहरण देऊन डॉ. लोहिया म्हणतात, आपल्या भारतात आता पद्मिनी नकोत, तर नटाली हव्या आहेत. जोहार करणाच्या पद्मिनीपेक्षा रणरागिणी पद्मिनी हवीआहे.
स्त्रियांच्या जागृतीसाठी व हक्कांसाठी डॉ. लोहियांनी सतत संघर्ष केला. स्टालिन कन्या स्वेतलाना हिला आश्रय देण्यास भारत सरकारने तांत्रिक बाबी पुढे करून नकार दिला. त्यावेळेस तो प्रश्न लोहियांनी लोकसभेत अतिशय जिद्दीने धसास लावला आणि भारताच्या परराष्ट्रविषयक धोरणामध्ये एक महत्त्वाचे मानवीय तत्त्व – निर्भयताप्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. एका सुकुमार फुलाला भारत सरकार संरक्षण देऊ शकले नाही’ अशा शब्दांत आपल्या मनातील क्रोधमिश्रित विषाद लोहियांनी प्रगट केला. स्वेतलाना आपल्या मृत भारतीय पुतीच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासाठी १९६६ साली भारतात आली होती. स्वेतलानाला भारतात आश्रय दिला तर रशिया रुष्ट होईल अशी भारत सरकारला भीती वाटली. या प्रकरणात सरकारचा असभ्यपणा तर उघड झालाच, परंतु भारताचे तटस्थेचे परराष्ट्रधोरण व सार्वभौम स्वातंत्र्य हे भयनिरपेक्ष नाही हे सिद्ध झाले.
मिथ्याभिमान आणि श्रेष्ठत्वाचे चुकीचे आदर्श यामुळे भारतीय मन छिन्न भिन्न झाले आहे. डॉ. लोहिया म्हणतात, ‘केवळ एका या पातिव्रत्याच्या कसोटीवर हिन्दु माणूस सावित्रीला श्रेष्ठ मानतो. स्त्रीपुरुष समानता अभिप्रेत असणा-यांनी द्रौपदीला आदर्श मानले पाहिजे. द्रौपदी इतकी सुजाण, समंजस, शूर, धैर्यशील आणि हजरजवाबी होती की अशी दुसरी स्त्री सान्या जगाच्या इतिहासात सापडणार नाही. तिच्या तेजस्वी बुद्धीपुढे, वादविवादांत कोणीच टिकत नसे. राजनीती, न्याय, धर्म आदि अनेक विषयांवर तिने मतप्रदर्शन केले आहे. सामान्यपणे हिंदू माणूस भावा-बहिणीचा संबंध ज्याला मानतो तसा कृष्ण-कृष्णेचा (द्रौपदीचा) संबंध आहे असे महाभारत वाचल्यावर वाटत नाही. ते सखा-सखीचे नाते आहे. यात भावाबहिणीचे प्रेम नाही. प्रियकर-प्रेयसीचे नाते आहे.
खुद्द डॉ. राम मनोहर लोहियांच्या जीवनात सखा-सखीचे नाते असणार्याख काही स्त्रिया आल्या होत्या. पण डॉ. लोहियांचे लग्न व लग्नांतर्गत लैंगिक निष्ठा याबद्दलचे विचार लक्षात घेतले तर लग्नाच्या औपचारिकपणाची त्यांना गरज नव्हती. त्यांचा त्यावर विश्वास नव्हता म्हणून ते अविवाहितच राहिले.
डॉ. राम मनोहर लोहिया स्वतंत्र प्रतिभेचे एक महान कर्मयोगी होते. आयुष्यात त्यांनी जी विचारधारा मांडली तिच्याप्रमाणे ते जगले. लोहियांच्या रसिकतेवर, तीक्ष्ण बुद्धिमत्तेवर, अन्यायाविरुद्ध सतत संघर्ष करणार्या् वृत्तीवर अपरंपार प्रेम करणार्या अनेकांतला मी एक त्यांच्या स्मृतीला मनोमन वंदन करतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.