भारतीयांचे सामाजिक चिंतन

प्रस्तुत लघुलेख हा एका वैयक्तिक(?) जिज्ञासेची प्रकट मांडणी करण्यासाठी लिहीत आहे. ‘वैयक्तिक’ पुढे प्रश्नचिन्ह अशासाठी टाकले आहे की आजच्या बर्याचच विचारंवतांच्या मानसांतही कुठेतरी ही जिज्ञासा सुप्त स्वरूपात वास करत असावी अशी लेखकाची समजूत आहे. तसे असल्यास(च) या प्रकटीकरणाला थोडाफार अर्थ येईल.अन्यथा लेखकाने आपला वैयक्तिक शोध वैयक्तिकपणेच चालू ठेवणे इष्ट.
अशाच दुसर्याअ एका गोष्टीचाही खुलासा सुरुवातीलाच करणे आवश्यक आहे. ती म्हणजे प्रस्तुत लेख एका प्रामाणिक (genuine) वैचारिक जिज्ञासेपोटी लिहिला आहे. त्यामागील अज्ञानाचे कुणी वाभाडे काढले किंवा त्याची कीव केली तर त्यात वावगे काहीच ठरणार नाही कारण ती वस्तुस्थिती आहे. पण त्याला हेतुप्रेरित (motivated) कोणी ठरवू नये एवढीच विनंती करावीशी वाटते. कारण या लेखात नकारात्मक उत्तर अभिप्रेत असलेले एक प्रश्नचिन्ह अध्याहृतपणे उमटत असलेले वाचकाला सतत जाणवेल. त्यामुळे कोणाच्या सांस्कृतिक, धार्मिक, जातीय, किंवा अन्य कुठल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आजच्या तंग आणि तणावपूर्ण वैचारिक वातावरणात अगदीच नाकारता येणार नाही. इतक्याउपरही तसे झालेच तर प्रथमच माझ्या या प्रतिपादनाचा तो उद्देश नाही हेआग्रहपूर्वक स्पष्ट करावेसे वाटते.
आता विषय :
एकोणविसाव्या शतकापूर्वीच्या कालातील भारतीय सामाजिक चिंतनासंबंधात मूलत: हा प्रश्न आहे. प्रश्न असा की भारतीयांजवळ सलग, समग्र आणि एकसंध असे सामाजिक तत्त्वज्ञान कधी होते काय? ह्या प्रश्नावर काही मंडळी ताडकन ‘हा काय प्रश्न झाला?भारतीयांजवळ काय नव्हते?ज्योतिष, गणित, विज्ञान, आयुर्विज्ञान, भाषाविज्ञान, एवढेच काय विमानविद्या, संगणकविद्या इ. सगळे काही होते. अशा प्रकारचे उत्तर देऊन वर मनु, गीता, उपनिषदे, संतवाङ्मय, रामायण, महाभारत, न्याय, द्वैतवाद, अद्वैतवाद यांमधून उद्धरणे देऊन भारतीयांजवळ जगातील सर्वश्रेष्ठ सामाजिक तत्त्वज्ञान होते अशी ग्वाही देतील. परंतु दुर्दैवाने हे माझ्या मनात उपस्थित झालेल्या प्रश्नाचे उत्तर नाही. ‘तेन त्यक्तेन मुंजीथाः मा गृधः कस्यस्विद् धनम् “चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः’, न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति’ या प्रकारची इतस्ततः विखुरलेली उद्धरणे इतरांप्रमाणे मलाही ठाऊक आहेत. भारतीयांच्या श्रेष्ठ आणि अनेक बाबतींत श्रेष्ठतम, सांस्कृतिक आणि वैचारिकसंपदेबद्दल माझ्या मनांत यत्किंचितही संदेह नाही. एवढेच नव्हे तर सामाजिक संदर्भात । अनेक मौलिक निरीक्षणे, निदाने आणि विचार भारतीय ग्रंथांमधून आपल्याला पाहायला मिळतात हेही खरे आहे. त्यांपैकी अनेकांमध्ये सैद्धांतिक विस्ताराच्या शक्यता दडलेल्याआहेत हेही मला जाणवते. (नव्हे, त्याकडे भारतीयत्वाचा शोध घेणार्यास विचारवंतांनी तर्कशुद्ध पद्धतीने आणि व्यापक दृष्टिकोनाने पाहून त्यांचा विस्तार करणे निकडीचे आहे असेही मला वाटते.)
पण तरीही हे सर्व माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. त्यासाठी माझा प्रश्न अधिक स्पष्ट करून सांगायला हवा. प्रयत्न करून पाहतो. .
उदाहरणाने कदाचित तो स्पष्ट होईल. भारतीय विचारधारेत अध्यात्माचा विचार अतिशय काटेकोरपणे आणि सर्वंकष रीतीने झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे ते एक संपूर्ण तत्त्वज्ञान आहे. (शाखापरत्वे येणार्याल भिन्नतेचा इथे विचार करण्याचे प्रयोजन नाही.) योगशास्त्रही एक संपूर्ण शास्त्र आहे. त्याचप्रकारे विश्वोत्पत्तिशास्त्र (cosmology) देखील बर्यायच परिपूर्ण स्वरूपाचे आहे. (त्याला वरील अन्य दोन उदाहरणांच्या पंक्तीत बसविणे योग्य नाही; पण तेवढ्यानेही माझ्या प्रश्नाच्या मांडणीला साह्य मिळेल असे वाटते म्हणून निर्देश केला आहे.) परंतु अशाच प्रकारे ‘समाज’ ह्या वैश्विक आणि मानवीय वास्तवाला केंद्रस्थानी ठेवून, त्याला अध्ययनविषय करून त्याची सांगोपांग चर्चा करणारा एखादा ग्रंथ किंवा एखादी विचारधारा भारतीयांजवळ कधी होती का?वेद हा विचार करतात का?उपनिषदे किंवा अन्य तात्त्विक, धार्मिक ग्रंथ हा विचार करतात का?संत हा विचार करतात का? एखाद्या तत्त्वज्ञानाचा एखादा ग्रंथ (वरील उदाहरणातील तिसर्यार उदाहरणाइतपत तरी) या विषयाचा ऊहापोह करतो का?
पाश्चात्त्यांमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला हॉब्ज, लॉक, रूसो, कॉम्प्ट, माक्र्स, मॅक्स वेबर इ. विचारवंतांचे समाजाला केंद्रविषय करून केलेले चिंतन आढळते, तशा प्रकारचे चिंतन या ठिकाणी अभिप्रेत आहे. (तुलना मुळीच अभिप्रेत नाही.)
समाजाला चिंतनाचा मुख्य विषय करून त्याच्या उत्पत्तीसंबंधी, त्याच्या उत्क्रांतीविषयी, त्याच्या विकासाच्या दिशेविषयी, त्यातील घटकांच्या स्तरांच्या परस्परसंबंधाविषयी, समाजाच्या आंतरिक संरचनेसंबंधी अन्वेषक बुद्धीने आणि शास्त्रीय पद्धतीने केलेले चिंतन कोठे आढळते का हा प्रश्न आहे. (ह्या संबंधात केलेल्या वैयक्तिक प्रयत्नांतून फारसे समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून हा प्रपंच.)
या ठिकाणी घेतला जाऊ शकणारा एक आक्षेप वेळीच बाजूला सारलेला बरा. आक्षेप असा की या प्रकारचे चिंतन प्राचीन काळापासून अपेक्षिणेच मुळात चूक आहे. कारण या प्रकारचे चिंतन ही एक आधुनिक गोष्ट आहे. पाश्चात्त्यांमध्येही पूर्वी हे चिंतन नव्हते. वर उल्लेखिलेले पाश्चात्त्य विचारवंतही गेल्या दोन-अडीचशे वर्षांतलेच आहेत इ.तर हा आक्षेप रास्तच आहे. पण त्यात एक कबुली आहे. ती ही की या प्रकारचेचिंतन भारतीयांजवळ नव्हते. पण असे जर कबूल केले तर आमच्यापाशी ‘सगळे काहीहोते ह्या गर्वोक्तीला फारसा अर्थ राहत नाही.
या कबुलीबरोबर इतरही अनेक निष्कर्ष समोर येऊ लागतात. त्यांतील पहिला हा की आपल्याला ह्याविषयीच्या आधुनिक चिंतनाला सामोरे जायला हवे हे स्पष्ट होते, त्यातील तथ्ये स्वीकारावी लागतात. आपल्याला आपल्या स्वतःच्या चिंतनाला पारंपारिक चौकटीतून मोकळ्या हवेत आणावे लागते. सोयिस्कर उद्धरणाच्या छोट्या-छोट्या काड्यांच्या आधारावर आधुनिक भवसागर तरून जाण्याचा प्रयत्न करणे आडमुठेपणाचे किंवा वेडेपणाचे ठरू लागते. या नव्या चिंतनाच्या संदर्भात आपल्याला भारतीय समाजाकडे, त्याच्या समस्यांकडे पाहावे लागते. थोडक्यात, आपल्याला आपल्या मनोवृत्तीमध्ये (mind set) एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणावे लागते.
पण असे जर झाले तर आपण आपले ‘भारतीयत्वच’ गमावून बसू की काय अशी भीती अनेकांना वाटते म्हणून ते आमच्याजवळचे जे सामाजिक चिंतन आहे तेच परिपूर्णआहे अशा प्रकारची ठाम भूमिका घेतात.
तसे असण्याची शक्यता न नाकारता आपण थोडा सकारात्मक विचार करून पाहू शकतो. जर तारांगण किंवा विश्वोत्पत्ती हे आमच्या चिंतनाचा विषय झाले होते तर ‘समाज’ ह्या वास्तवावर समग्र चिंतन झालेले नसेल असे संभवत नाही. कदाचित ही पण शक्यता आहे की हे चिंतन पौराणिक मिथकांच्या माध्यमातून झाले असेल. अशीही शक्यता आहे की अशा प्रकारचे चिंतन मांडणारा एखादा किंवा अनेक ग्रंथ असू शकतात. ते कसेही असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की ज्याप्रमाणे अनेक विषयांवरचे प्रगल्भ चिंतन सांस्कृतिक वारशाच्या रूपाने सामान्य भारतीयापर्यंत येऊन पोहोचले आहे तसेया विषयाचे झालेले नाही.
फारसा माहीत नसलेला असा ग्रंथ खरोखरच आहे का?ग्रंथ नसल्यास वेळोवेळी निरनिराळ्या ग्रंथांतून जे भारतीयांचे सामाजिक चिंतन आढळते त्याचे संकलन कोणी केलेआहे का? ह्या संकलनावर कोणी साकल्याने लिहिले आहे का?
माझ्या प्रश्नाचे स्वरूप काहीसे अशा प्रकारचे आहे. त्या दृष्टीने आजचा सुधारकच्या विद्वान लेखक-वाचकांनी त्यावर प्रकाश टाकावा म्हणून त्याची ही प्रकट मांडणी केली आहे.
या संदर्भात आजचा सुधारक एक-दोन गोष्टी करू शकतो, त्यांचा उल्लेख करून हा लेख संपवितो :
लगेच करता येण्यासारखी पहिली गोष्ट ही की या प्रश्नाच्या उत्तराच्या दृष्टीने एखाद्या
जाणकाराचा माहितीपर लेख व शक्य असल्यास एक उपयुक्त संदर्भग्रंथसूची प्रकाशित करणे. सामाजिक विचारमंथनासाठी ही माहिती चार पंडितांपुरतीच मर्यादित न राहता सामान्यांच्या विचारकक्षेत यायला हवी.
दुसरी गोष्ट ही की भारतीय सामाजिक चिंतनाच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांच्या लेखांची एखादी मालिका सुरू करणे.
आणि तिसरी गोष्ट : भारतीयांच्या विखुरलेल्या सामाजिक चिंतनाचे आधुनिक परिप्रेक्ष्यातून केलेले संकलन आणि संपादन ग्रंथरूपाने प्रसिद्ध करणे. खरे तर हा एक स्वतंत्र प्रकल्पच करायला हवा.
१. या कबुलीला जर पुरेसा आधार असेल तर त्यातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो हा की भारतीयांचे सर्व चिंतन हे व्यक्तीला केन्द्रस्थानी ठेवून झालेले होते, आणि तिच्या सामाजिक’ आचारसंहितेची मांडणी केवळ आदेशात्मकच होती. भारतीयांच्या आजच्या सामाजिक अनास्थेचे मूळ हे तर नाही?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.