जगावेगळं नातं ‘एकत्वाचं’

दूरवर बिहारमधील राजगीर परिसरातील पहाडांच्या पायथ्याशी पिलखी निवासात मिणमिणत्या दिव्यांनी दिवाळी प्रकाशली होती. सारा परिसर आनंदित होता.
प्रत्येक कुटुंब ही एक संस्था असते. तिच्यातील समाधान, प्रेम, जिव्हाळा, सुख, शांती हीच एक शक्ती बनते. त्याच शक्तीतून स्नेहाचा परिघ विस्तारत जातो. आणि मग व्यक्तिगत कुटुंबाचे विश्वकुटुंब बनते. सहजतेने समाजाशी वेगळेच स्नेहपूर्ण नाते जुळते.
असेच घडत गेले! आजपर्यंत… पण आता?माझी मैत्रीण उषा शरण सांगत होती.
‘आयुष्यात कधी-कधी अचानक अशा काही घटना घडतात की ज्यांचा अर्थ लावणं मानवी शक्तीच्या आवाक्यातलं राहत नाही.’
बिहारचे मेजर शरण व नागपूरची उषा मोहनी एकत्र का आले व आज अचानक का दुरावले, ह्याला उत्तर नाही. पण वस्तुस्थिती स्वीकारावीच लागते.
नागपूरच्या मोहनी कुटुंबातली उषा ही अनेक भावंडांपैकी एक. सुंदर, हुशार,संगीत-साहित्यात रस घेऊन रसपूर्ण जीवन जगणारी. ती सांगत होती –
“लहानपणापासून खूप शिकावं, विविध विषयांवर लिहावं, वाचावं, अनेकांशी मैत्री जोडावी व काही तरी करून दाखवावं हे स्वप्न पाहात होते. शिक्षणाच्या पायर्या, भराभरचढत गेले आणि उच्च पदवी प्राप्त करून पुढची दिशा ठरवण्याकरता मुंबई गाठली ती वेगळ्याच उत्साहात.
तोच अचानक एका जबरदस्त फटक्यात नियतीने मला काटेरी मार्गावर नेऊन उभं केलं. मला पूर्णपणे दृष्टिहीन अवस्था प्राप्त झाली होती. असं का घडलं?कसं घडलं?ह्या जीव तोडून विचारलेल्या माझ्या प्रश्नाला कोणाजवळ उत्तरं नव्हती. पुढचा जीवनप्रवास दृष्टिहीन अवस्थेत अंधाराच्याच सोबतीने, त्याचेच बोट धरून करावा लागणार होता. आणि तेच ठरवलं, स्वीकारलं. आयुष्यात काही करून दाखवायचं आहे ना? त्याच पूर्वीच्या जिद्दीने, निष्ठेने, उत्साहाने हे अपंगत्वही स्वीकारायचं ठरवलं. कारण थांबून चालणार नव्हतं. मला पुढे जायचं होतं. मी निश्चय केला, दृष्टिहीन अवस्था हीच माझी शक्ती; हीच माझी प्रेरणा बनेल. आणि…..
मुंबईतच ऑक्युपेशनल थेरपीचा दोन वर्षांचा डिप्लोमा घेण्याचे ठरवले. दिसत नसताना माझ्याने हा कठीण कोर्स पूर्ण होईल का?ह्याबद्दल सर्वच साशंक होते. पूर्वी मुंबईतच नव्हे तर इतर कुठल्याही देशात अंध व्यक्तीनं हा कोर्स विद्यार्थी म्हणून पुरा केल्याचे उदाहरण नव्हतं. पण एक प्रयोग म्हणून श्रीमती कमलाबाई निमकर यांनी पुढाकार घेऊन प्रवेश मिळवून दिला. मध्यवर्ती सरकारने अंध विद्याथ्र्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती दिली आणि वसतिगृहात प्रवेश दिला. शिक्षणाचा नवा प्रयोग म्हणून माझ्यापासून सुरुवात झाली. नवं क्षितिज विस्तारत गेलं, सहकार्य मिळत गेलं आणि अंधत्वाने आलेलं अपंगत्व विसरून सहजतेने उच्चश्रेणीत अभ्यासक्रम पूर्ण करून उत्साहात नागपूरला परतले ती अपंगांच्या शिक्षणाच्या कार्यात काही करून दाखवण्याच्या निश्चयाने. कारण मोहनीकुटुंबातील सामाजिक जाणिवांच्या संस्काराने मन लहानपणापासून संस्कारित झालेले होतेच.
संस्थाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्याइतकी योग्यता असताना ती मान्य करूनही मला केवळ अंध-अपंग म्हणून त्या कार्याकरता स्पष्ट नकार देण्यात आला.
अचानक नियतीने दिलेला हा दुसरा तडाखा… पण का?ह्याला उत्तर नव्हतं… तितकंच मला खचून जाऊनही चालणार नव्हतं. मला पुढे जायचं होतं. मार्ग शोधायचा होता.
तोच अमेरिकेतील बोस्टन येथील ‘पर्किन्स स्कूल फॉर द ब्लाईंड’ ह्या संस्थेत टीचर्स ट्रेनिंग करता प्रवेश मिळाला. आनंदून गेले, उत्साहित झाले. दृष्टिहीन अवस्थेत शिक्षणाकरता आपली माणसं, आपला देश सोडून एकटी निघाले, ते उत्तम तर्हेउने अभ्यासक्रम पूर्ण करीन व भारतात परतल्यावर अपंगांच्या पुनर्वसनाकरता स्वतःची संस्था उभारून माझं जीवनकार्य सुरू करीन असं स्वप्न रंगवून. त्याच धुंदीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना लागले. जीवनमार्ग निश्चित केला होता. मार्गात येणार्याअ असंख्य अडचणी परदेशात स्वतःच्या हिमतीवर पार करीत होते. झपाटल्यासारखी उत्साहात, अभ्यासात गुंग होते. दिवस संपत होते.
तोच पुन्हा एकदा जीवन अस्थिर करणारा प्रसंग अचानक समोर आला.
एक दिवस ब्रेलमध्ये लिहिलेलं एक जाडजूड पत्र माझ्यापर्यंत येऊन पोचलं. पाठवणारी व्यक्ती कोण, कुठली हे माहीत नव्हतं, पण पत्रातील मजकुराने, स्थिरावलेलं… दिशा सापडलेलं माझं जीवन मुळापासून ढवळून निघालं. मी हादरून गेले… पत्रात होतं
‘मी भारतीय सैन्यातील एक अधिकारी मेजर परम शरण’. आपल्याच शोधात इतके दिवस होतो. आपल्याबद्दलची सर्व माहिती मुंबईतील ‘नॅशनल अॅसोसिएशन फॉर द ब्लाईंड’ ह्या संस्थेतून मिळवली. मुंबईतील आपल्या भावांनाही भेटलो. पत्राने आपल्याशी परिचय करून घेणार आहे हे सांगितले.
‘मराठीत आपण लिहिलेले ‘अपंगत्वावर विजय’हे पुस्तक वाचण्याकरता मराठी शिकलो. पुस्तक वाचले. आवडले.
‘आपल्याशी संपर्क साधता यावा म्हणून ब्रेल शिकलो’. त्या लिहिण्याचा सराव केला आणि आज माझ्या भावना ब्रेलमधून पत्र लिहून आपणापर्यंत पोचवत आहे. आपला परिचय प्रत्यक्ष नाही तरी पत्ररूपाने व्हावा हीच अपेक्षा आहे.
सहा वर्षांपूर्वी माझे लग्न झाले होते. माझी पत्नी हिमांशुमयी व छोटी दोन मुले… मुलगी व मुलगा ह्यांच्यासह सुखी जीवन जगत होतो… तोच ‘ट्यूमर’ ह्या रोगाने आमच्या जीवनात वादळ उठवले. हिमांशुमयीला शेवटी दृष्टिहीन बनवून मृत्यूने तिला आमच्यांतून उचलून नेले आणि आता दोन छोट्या मुलांसह माझे जीवन आकाशात उंच गेल्यावर तुटलेल्या पतंगाप्रमाणे निराधार बनले आहे.
‘सैनिकांचे अस्थिर जीवन व आईविना दोन मुलांची जबाबदारी सीमेवर लढणाच्या माझ्यासारख्या सैनिकाला हार पत्करायला लावण्याइतकी कठीण आहे हे जाणवले…“आमची आई कुठे आहे”?ती केव्हा येणार?” ह्या मुलांच्या प्रश्नाला माझ्याजवळ उत्तर नाही. सांगून ते समजण्याइतके त्यांचे वय नाही.
‘त्यांची समजूत घालता येत नाही ही अगतिकता व शेवटच्या अवस्थेतील हिमांशुमयीच्या दृष्टिहीन स्थितीत तिच्याकरता आपण काही करू शकलो नाही ही मनाला सतत लागलेली टोचणी व असहायता मला चैन पडू देत नाही.
‘खूप विचार करतो आहे. मुलांना आई म्हणून प्रतिसाद देणारी व पत्नीच्या दृष्टिहीन स्थितीत अखेरच्या क्षणी आपण जे काही करू शकलो नाही ते करण्याचे समाधान मिळवून देणारी व्यक्ती मला माझ्या जीवनात हवी आहे. ती मी शोधतो आहे. इतक्या दिवसांनी आपल्या रूपाने मला हा शोध लागला आहे, हा माझा दृढ विश्वास आहे. पत्रोत्तरातून आपणच आम्हाला जाणून घ्यायचे आहे. मी पत्र पाठवत राहीन. आपल्या पत्रोत्तराची अपेक्षा करू
ना?”
त्या पत्राने मी खूप अस्वस्थ झाले, चिडले, रागावले. वाटलं का हा मला सारं कळवतो आहे?कोण?कुठला?हा कोण शोध लावणार?काय संबंध माझा?प्रत्यक्ष भेट नाही, परिचय नाही… नाही मी उत्तर पाठवणार… ठरवलं. आणि काही घडलंच नाहीअशी अभ्यासाला लागले.
एखाद्या सैनिकाने गोळ्यांचा वर्षाव करून इच्छित यश खेचून आणावं तशी पत्रं येतच होती. शेवटी रागाने हे सारं थांबवावं म्हणून पत्रोत्तर पाठवलं… वाटलं आता सारं हे संपेल पण..
परिणाम उलटाच झाला. आपुलकीची, स्नेहपूर्ण, विश्वासदर्शक पत्रं येतच राहिली. वेगळी उत्सुकता निर्माण झाली. हे असं का घडतं आहे?समजत नव्हतं. माझं निग्रहाने मौन सुरूच होतं. तोच –
एक दिवस एका पत्रात नेहमीप्रमाणे खूप काही होतं पण पुढचं पान रेघोट्यांनी भरलं होतं… पुढे परमजींनीच लिहिलं होतं…‘माझी छोटी मुलगी जवळ उभी आहे’. रुसली आहे. मी पण लिहिणार, विचारणार… आई तू केव्हा येणार? लवकर ये ना…’ हेच तिनं लिहिलं । आहे. पाठवणार तिला उत्तर? ‘मी थक्क झाले’. त्या रेघोट्यांवरून पुन्हा हात फिरवत राहिले, आणि वाटलं, वात्सल्यात पुरती विरघळून जाते आहे. मी तिच्या गालावरून हात तर फिरवत नाही ना, असा भास झाला. काय उत्तर देणार होते तिच्या निरागस प्रश्नाला?वेगळाच आपलेपणा स्पन गेला, त्यात अडकत तर जात नाही ना?भीती वाटू लागली. मला हे सारं विसरायचं होतं. तरी वाटलं, भावनिक कल्लोळात पुरती गुरफटत तर जाणार नाही ना?नाही, असं होणार नाही. ठरवलं… आणि एक दिवस आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. वॉल्टर शिकवता शिकवता म्हणाले… ‘प्रत्येक अपंग व्यक्तीने आपली अपंगत्वाची त्रुटी विसरून सामान्यांच्या तोडीचे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा… जीवनात हेलन केलर बनण्यापेक्षा चांगली गृहिणी बनणे व कुटुंबस्वास्थ्य उत्तम प्रकारे निर्माण करणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश समजावा. कुटुंबस्वास्थ्यातच विश्वशक्ती:सामावलेली असते.’
हे त्यांचे विचार ऐकले आणि पुन्हा अस्वस्थ झाले. वाटलं ह्या माझ्या दृष्टिहीन अवस्थेतही सुरू असलेल्या जीवतोड प्रयत्नांचा उद्देश काय?मला काही करून दाखवायचं आहे ना?मग परमजींनी प्रश्नरूपाने एक आव्हान समोर उभं केलं आहे. दे उत्तर. स्वीकार ते आव्हान. दाखव काही करून… वाटलं, ‘हो’ म्हणून पराजय स्वीकारण्यातच माझ्या वाट्याला विजय येणार आहे का?
आयुष्यात कधीही न भेटलेल्या व्यक्तीने विश्वासाने आपले व आपल्या दोन मुलांचे जीवन माझ्यासारख्या दृष्टिहीन स्त्रीच्या स्वाधीन करण्याचे धारिष्ट्य दाखवावे ह्याचा अर्थ काय?तोच त्यांचा निर्धार मला ते आव्हान स्वीकारायला लावणार का?उत्तर मलाच द्यायचं होतं. वाटलं, कुठल्या उद्देशाने मी दिशाहीन धावते आहे?जेव्हा काय योग्य, काय अयोग्य हे समजेनासं होतं तेव्हा स्वतःला प्रवाहात सोडून द्यायचं असतं. सर्व चांगलं घडेल ह्या विश्वासावर. अशीच काहीशी समजूत करून घेतली आणि उत्तर पाठवलं.
‘मी ठरल्याप्रमाणे माझा अभ्यास पूर्ण करून भारतात परतणार आहे, तेव्हा भेट होईलच. चिंता नसावी.’
आणि इतकेच दिवस थैमान घालणारं अनिश्चिततेचं वादळ शांत झालं.
उत्तम तर्हेदने अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परतले. ती वेगळ्याच ओढीने… दृष्टिहीन असले तरी एक पत्नी व एक माता बनण्याचं शिवधनुष्य उचलण्याच्या निर्धाराने… हे अवघड काम मी करू शकेन का?निभावून नेता येईल का?माझ्याजवळ उत्तर नव्हतं. होता फक्त निर्धार. कोणत्याही परिस्थितीत काही करून दाखवायचा. यश खेचून आणण्याचा. त्याच निर्धाराला लहानपणापासून खतपाणी घालून मीच जोपासलं होतं. माझ्या अपंग जीवनाचं साफल्य शोधत आजवर भटकत होते. आज परमजींनी विश्वासाचं सुकाणू माझ्या हाती दिलं होतं. त्याच भरवशावर त्या तिघांसह तुफानी काळाच्या ओघातआम्ही तरून जाणार होतो. तसंच घडणार होतं.
कबूल केल्याप्रमाणे परत येताच बिहारमधील एका खेड्यातील परमजींच्या कुटुंबात भावासह जाऊन पोचले, ती लग्नाअगोदरच त्यांच्या मुलांची माता व गृहिणी ह्या माझ्या नव्या जीवनस्वरूपाचं वलय पांघरूनच. आणि प्रत्यक्ष भेट होताच दोन्ही मुलांनी धावत येऊन कवटाळून माझा स्वीकार केला, आणि त्या अवस्थेतील ह्या जगावेगळ्या आमच्या सुंदर नात्याचे ते स्वरूप तृप्त मनाने परमजी व त्यांच्या कुटुंबानं पाहिलं, अनुभवलं, मान्य केलं…. त्या क्षणाला मला स्पन गेलेला वात्सल्याचा आनंद, समाधान, आम्हा दोघांना जीवनभर पुरणारी एकत्वाची जीवनशक्ती मार्गस्थ करती झाली.
त्यानंतर लवकरच नागपूरला आमचं लग्न झालं. सर्वांच्या आशीर्वादानं आमचा संसार सुरू झाला.
सैनिकांचं अस्थिर जीवन, दोन मुलांची जबाबदारी अनेकदा एकटीने पेलावीलागली. मुलांचे शिक्षण, अडीअडचणी, सुख-दुःख एकदा आपलेपणाने स्वीकारल्यावर सर्व सोपं गेलं. माझं अंधत्व तर मान्य केलंच होतं ना…
मुलं मोठी झाली. मुलगी डॉक्टर बनली. समव्यवसायी साथीदार मिळवून संसारी बनली. मुलगा फौजी जीवनात स्थिरावला. संसारी बनला. पति-पत्नीच्या यशस्वी जीवनमार्गावरून आम्ही आजी-आजोबांच्या रूपात आता अलिप्तपणे मुलांची स्थिरावलेली सुखी जीवनं पाहून समाधानाने समाजाभिमुख झालो होतो.
दूरवर राजगीर परिसरात जिथं महावीर व बुद्धदेवांनी तपश्चर्या केली होती, त्याच पहाडांच्या पायथ्याशी आम्ही शेती घेतली. तिथं पिलखी निवास उभारला, तो आजूबाजूच्या मागासवर्गीय गरजूंना सहकार्याचा हात पुढे करण्यासाठी. किसान बनून गावक-यांशी संबंध जोडला. त्यांना रोजगार उपलब्ध करून देता देता त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षण, आरोग्य व इतर सामाजिक कौटुंबिक अडचणी सोडवू लागलो. जवळीक-विश्वास दिला, मिळवला. स्नेहपूर्ण संबंध जुळत गेले. सुरुवातीला ‘आप कौन हैं? आपका यहाँ क्या काम?’ असे दरडावून अंगावर धावून आलेले नंतर आमचे झाले. अंधांकरता ‘विज्ञान भारती’चं काम सुरू केलं. संपादकत्व स्वीकारून दोघं मासिकं काढत होतो.
ज्या परिसरात बुद्धांनी, महावीरांनी तपश्चर्या केली होती, त्याच ठिकाणी समाजपरिवर्तनाच्या कामात समाधानाने आमचं ते निवृत्तिकाळातलं जीवन सतत एकमेकांचे विश्वासाचे हात हाती धरून सुरू होतं. पूर्णत्वात एकत्व हीच आमची प्रेरणाशक्ती होती. कारण अंधांचा तर विश्वास हाच स्थायीभाव असावा. परमजींचं माझ्यात एकत्व जपणं हेच आनंददायी होतं.
माझं एक स्वप्न होतं. विश्वास व एकत्वाच्या नात्याने गुंफल्या गेलेल्या आमच्या जीवनशक्तीच्या जोरावरच आजवर संसार-पालखी सहजतेने उचलून नेली होती. आज समाजापर्यंत पोचताना तीच सहजता जोपासली जावी. उगवत्या दिवसाचे सूर्योदयाचे सुंदर रंग परमजींच्या दृष्टीने व भावपूर्ण शब्दांनी पाहावेत, अनुभवावेत. पिलखी निवासातील आमचा दिवस असाच सुरू व्हावा तो इतरांकरता. ग्रामस्थांच्या श्रमशक्तीच्या, आपलेपणाच्या सहकार्याच्या जोरावर दिवसभर शिक्षणाचे, संपादनाचे, निर्मितीचे कार्य करता करता समाधानाने सूर्यास्ताची शोभा पाहात, कृतज्ञतेच्या भावनेने तृप्त मनाने विश्रांती घ्यावी… हेच सारं घडत होतं… जीवन तरंग विस्तारातच होते. जणू हे सारं चिरंतन घडतच राहणार आहे. क्षितिज, किनारा नाहीच… आणि तोच अचानक माझ्या हाती दिलेला परमजींचा हात २९ जुलै ९७ ला काढून घेतला गेला. पुन्हा नियतीने आपला डाव साधला आहे. ठीक आहे, पुन्हा तोच अंधार, तीच निराधार अवस्था, तेच पुन्हा रंगवलेलं स्वप्न उद्ध्वस्त होतं. पण असं का?उत्तर मिळणार नव्हतं. तोच निर्धार, प्रगट व्हायला हवा आहे… हे दुरावणं मृत्यूलाही शक्य होणार नाही, एकत्वाची परमजींनी बहाल केलेली शक्ती हीच माझी प्रेरणा…‘पिलखी निवास’च्या रूपाने निर्माण केलेलं सामाजिक जीवनाचं अस्तित्व संपलं आहे. एकत्वाच्या बिंदूतून निर्माण झालेले भावतरंग। विस्तारत गेले. आता पुन्हा विलीन झाले. हे सत्य असलं तरी त्याचे स्वरूप पुन्हा निर्मितीच्या बिंदूच्या स्वरूपात नवी शक्ती घेऊन उठणार आहे… हेच घडत राहतं…
तेच घडणार आहे… मला काही घडवून दाखवायचं आहे खरं ना?”
उषाच्या ह्या वृत्तीचे शांत समाधानी निश्चयी स्वभावाचे आकलन होणे माझ्यासारखीला शक्य नव्हते… वाटलं…
तोच उत्साह, तीच आनंदी वृत्ती, तेच समाधान ह्यामागे… त्या दोघांचं जगावेगळं एकत्वाचं नातं हीच शक्ती उभी असेल का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.