बुद्धिवाद विरुद्ध भावविश्व

आंबेडकरी जीवनमूल्यांचा त्यांच्याच अनुयायांकडून पराभव आणि बुद्धिवाद्यांचा त्यांच्याच प्रकृतीकडून पराजय अशा दोन पराजय-कथा आ. सु. च्या जानेवारी अंकात आल्या आहेत. दोन्ही पराजयांचे कारण एकच आहे. ते म्हणजे बुद्धिवाद या नवीन मूल्यानेजुने सगळे काही एकदम बदलते असा समज.
श्री. भोळे यांनी पहिल्या पराभवाची मीमांसा समर्थपणे आणि विद्वत्तापूर्ण भाषेत केली आहे. त्यांच्या मीमांसेचे सार असे की संस्कृतीचे अनेक पैलू असतात, भाषा त्या सर्व पैलूंची अभिव्यक्ती करत असते, त्या संस्कृतीविरुद्ध बुद्धिवादी बंड पुकारल्याबरोबर ती बहुआयामी भाषा पूर्णपणे बदलेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
लग्न-मुंज या समारंभाचेही असेच आहे. आज या समारंभांना धार्मिक अर्थ काही राहिलेला नाही. अर्थ राहिला आहे तो सांस्कृतिक, हे समारंभ ‘शब्दांवाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले’ अशा थाटात काही सांगत असतात. या समारंभांतून यजमान आपल्या आनंदाची अभिव्यक्ती करत असतो, नातेवाइकांशी आणि इष्टमित्रांशी संबंध दृढ करत असतो, मिळालेल्या स्नेहाची व प्रेमाची परतफेड करत असतो. या मेळाव्यातले स्वतःचे स्थान जाहीरपणे दाखवत असतो, विशिष्ट व्यक्तींचा खास मानपान करून त्यांचे स्वतःच्या जीवनातील स्थानही दाखवत असतो.
रोनाल्ड इंडन याने भारताच्या इतिहासावर समाजशास्त्रीय अंगाने काही लिखाण केले आहे. Imagining India ह्या ग्रंथात त्याने हे दाखवले आहे की मध्ययुगीन हिंदू राजे जे धार्मिक समारंभ करत असत त्यांना राजकीय अर्थ पुष्कळ होता. यात काही नवीन आहे असे नाही. पुराणकाळातील राजसूय यज्ञांना राजकीय अर्थच जास्त होता.
सांस्कृतिक सौंदर्य हा या समारंभांचा आणखी एक पैलू आहे. रवीन्द्रनाथ टागोरांना Nobel Prize मिळवून देणार्यााYeats या कवीने तर “A prayer for my daughter
या कवितेत म्हटले आहे –
“And may her bridegroom bring her to a house
where all’s accustomed, ceremonious
………
……….
How but in custom and in ceremony
Are innocence and beauty born?
Ceremony’s a name for the rich horn
And custom for the spreading laurel tree.”
अशा या बहुगुणी समारंभांच्या आस्वादाने बुद्धिवादाशी द्रोह होतो असे मला तरी वाटत नाही.
बुद्धीच्या क्षेत्रात बुद्धीलाच प्राधान्य द्यावे हे जितके योग्य तितकेच हेही योग्य ठरावे की भावविश्वाचे सौंदर्य बुद्धिवादाने नासवू नये

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.