समाजस्वास्थ्य

‘…. असेच एक विद्वान ‘मन्वंतर’ मासिकात देशभक्तीच्या गोष्टी लिहीत असतात आणि बूटपाटलूण पाहिली की त्यांच्या पायाची तिडीक पुस्तकाला जाते. का ? कारण बूटपाटलूण हा राज्यकर्त्यांचा वेश आहे. पण त्यांच्या एक साधी गोष्ट लक्षात येत नाही, की देशभक्ती वेशावर अवलंबत नाही. हा त्यांचा न्यूनगंड आहे. शिवाजीच्या गोष्टी सांगताना त्यांच्या हे लक्षात राहत नाही की शिवाजीनेही राज्यकर्त्यांचाच वेश उचलला होता, असे त्याच्या चित्रावरून दिसते. तेव्हा राज्यकत्र्याचा वेश घेण्यात त्याला काही कमीपणा वाटत होता असे दिसत नाही. आणि स्वतंत्र राष्ट्रातले लोक देखील परक्या रीतिभाती उचलीत नाहीत असे थोडेच आहे ? लंडनची फॅशन उचलणारे लोक पॅरिसमध्ये सापडतात. ‘ड्युक ऑफ विंडसर’ हे ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ असताना त्यांचा पोशाख सर्व युरोपभर आदर्श समजत असत आणि पॅरिसमधील स्त्रियांचा वेश तर युरोप आणि अमेरिकेत सर्वप्रमाण मानतात. अमेरिकेत पॅरिसचे वेड इतक्या प्रमाणात आहे की पुण्यवान अमेरिकन मेल्यावर तो स्वर्गात न जाता पॅरिसला जातो असे चेष्टेने म्हणतात. तेव्हा लोक राज्यकर्त्यांचाच वेश उचलतात असे नाही, तर परक्या चाली उचलण्याची मनुष्याची एक प्रवृत्ति असते आणि अगदीच जुन्याला चिकटून राहणे हे थोडेसे कूपमंडूकत्वाचे लक्षण आहे. आणि खरोखरच सर्व लोक जुन्याला चिकटू लागले, तर जुन्यात कधीही कोणताही फरक होणे अशक्य होईल, आणि हे इष्ट आहे असे बुरसट सनातन्यांशिवाय कोणीही म्हणणार नाही.’

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.