संपादकीय

मित्रहो,
अलीकडे जाणवत असलेल्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि वाढत्या वयामुळे संपादकमंडळाकडे मी संपादकत्वाच्या जबाबदारीमधून निवृत्त होण्याची इच्छा एक वर्षापूर्वीच व्यक्त केली होती. मासिकाचे संपादकत्व नव्या संपादकाकडे सोपविण्याची वेळ आता आली
आहे.
संपादकपदाची धुरा कोणाकडे सोपवावी याचा मी पुष्कळ विचार केला, बहुतेक सर्वांशी चर्चा केली. या सर्व विचारातून एक योजना मला सुचली. ती अशी –
संपादकमंडळ एकूण पाच जणांचे करावे, आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने एक एक वर्षभर संपादकत्व करावे.
संपादकमंडळ पुढीलप्रमाणे असावे :
दिवाकर मोहनी, प्र. ब. कुळकर्णी, बा. य. देशपांडे, नंदा खरे आणि सुनीती देव.
सल्लागार मंडळ : पु. वि. खांडेकर आणि भा. ल. भोळे
मासिकाचे स्वरूप व धोरण
मासिकाचे स्वरूप व धोरण गेली आठ वर्ष राहिले तेच राहावे. उदा. त्यात जाहिराती घेऊ नयेत. देणग्या मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत. विशेषतः ज्यामुळे आपल्याला किंचितही मिंधेपणा येईल अशा देणग्या अनाहूत आल्या तरी स्वीकारू नयेत.
मासिकाचे गेल्या आठ वर्षांत एक विशिष्ट रूप बनले आहे. त्याला एक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून त्याला एक दर्जा आहे. या दोन्ही गोष्टी कायम राहाव्यात, मासिकाला वर्गणीदार फार नाहीत हे खरे आहे. पण केवळ वर्गणीदार वाढावेत म्हणून त्याचा दर्जा खाली आणू नये. तसेच ते रंजक करण्याकरिताही त्यात फारसा बदल करू नये.
मासिकाचे स्वरूप विवेकवादी आहे. केवळ विवेकवादाला वाहिलेले दुसरे मासिक महाराष्ट्रात नाही असे मला वाटते. ते त्याचे वैशिष्ट्य टिकवून ठेवावे. त्याचा कटाक्ष श्रद्धेचा उच्छेद, विचार आणि जीवन यात विवेकावर भर देणे, जीवनाच्या विविध क्षेत्रांत समंजसपणा, विवेकीपणा अंगी बाणेल असे प्रयत्न यावर असावा. लोक पूर्ण विवेकवादी होतील अशी आशा करणे भाबडेपणाचे होईल. पण तरीही विवेकवाद जितका वाढेल तितका वाढविण्याचा प्रयत्न
करावा.
मासिकाचे धोरण व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि समतावादी राहिले आहे. सर्व मानव समान आहेत, त्यात स्त्रियांचाही समावेश आहे. तसेच त्याचा विज्ञानावर भर असावा. वैज्ञानिक दृष्टी अंगी बाणेल असा प्रयत्न करावा. विज्ञानाच्या विकृतीपासून सावध राहावे.
आपले मासिक सामान्य नाही. ते एका हेतूने, एका ध्येयाने प्रेरित झालेले आहे. ते तसेच राहावे, त्यामुळे ते केवळ विद्वानांकरिताच, किंवा विवेकवाद्यांकरिताच आहे अशी टीका कोणी केली तरी हरकत नाही. विद्वानांकरिताही मासिक चालवणे महत्त्वाचे आहे.
राजकीय विषय आपल्याला वज्र्य नाहीत. पण सर्व राजकीय घडामोडींचा समाचार आपण घेतला पाहिजे असे नाही. ज्याने बुद्धी सुसंस्कृत होईल असे काहीही वर्ण्य नाही.
संपादकाला संपादक म्हणून अन्य चार सहसंपादकापेक्षा काही जास्त मोकळीक अर्थात् असावी. पण त्याने वरील चौकटीत सामान्यपणे राहून काय उपक्रम किंवा प्रयोग करायचे असतील ते करावेत. त्याला सहसंपादकांचे साह्य आणि पाठिबा असावा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.