बरट्रॅंड रसेल, जॉन एकल्स आणि अतीत

या टिपणाचा उद्देश प्रा. रसेल आणि प्रा. एकल्स या सुविख्यात, स्वतःच्या क्षेत्रात उच्च दचि वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेल्या दोन तत्त्वचिंतकांचे अतीताविषयी (transcendence) काय विचार होते हे समजून घेण्याचा आहे.
हा लेख वाचण्यासाठी पार्श्वभूमि म्हणून रसेल यांच्या चरित्राचा संक्षिप्त आलेख लक्षात घेणे योग्य होईल. त्यांचे जीवन १८७२ ते १९७० या काळातले म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटापासून तो जवळजवळ २० व्या शतकाच्या अखेरीपर्यंत. इतक्या दीर्घकाळात जगातील अनेक महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या क्षेत्रात आल्या. त्यात पहिले जागतिक महायुद्ध आणि विज्ञानातील भरीव, लक्षणीय प्रगती या मुख्य घटना. ते इंग्लंडमधील प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात गणितशास्त्राचे प्राध्यापक होते. अव्वल दर्जाचे तर्कशास्त्रज्ञ (logician) म्हणून त्यांची ख्याती होती. ए. एन. व्हाइटहेड यांच्या सहकार्याने, Principta Matli et attitu हा ३ खंडांचा प्रदीर्घ ग्रंथ त्यांनी १९१० ते १९१३ या काळात प्रसिद्ध केला. ही कामगिरी गणितशास्त्रात अभूतपूर्व (monumental) महत्त्वाची समजली जाते. गणितशास्त्रात त्यांचे संशोधन अत्यंत अमूर्त (abstract) अशा Theory of Sets and Real Numbers या विषयांवर होते. २० व्या शतकातील तत्त्वचिंतनाची दिशा Idealism कडून Realism कडे नेण्याच्या उपक्रमाचे ते अध्वर्यु होते. १९१९ साली ‘‘गणिती तत्त्वज्ञानाची ओळख’ (Introduction 10 Mathematical Philosophy) हा ग्रंथ त्यांनी लिहिला. १९०८ साली F.R.S. १९४९ मध्ये Order of Merit हा इलंडमधील उच्चतम किताब व १९५० मध्ये साहित्यक्षेत्राचे Nobel Prize असे सन्मान त्यांना देण्यात आले.
पहिल्या महायुद्धानंतर रशियाला भेट देऊन आल्यानंतर त्यांनी सोवियट बोल्शेव्हिजम वर प्रखर टीका केली. बोल्शेविजम् मध्ये प्रसार करण्यासाठी मांडलेली उच्च ध्येये पण प्रत्यक्षात वापरलेली स्टालिन यांची भीषण, क्रूर कृती यांवर ही टीका केंद्रित केली होती.
पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांची युद्धविरोधी भूमिका शांततावादी (pacifist) होती. त्यामुळे त्यांना काही महिने तुरुंगवास भोगावा लागला. केंब्रिज विद्यापीठाने त्यांना सेवेवरून काढून टाकले. १९३८-४३ या काळात अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांत ते व्याख्याते होते व १९२०-२१ या वर्षी पेकिंग विद्यापीठात. १९२७-३२ या काळात इंग्लंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक पुरोगामी शाळा त्यांनी चालविली.
वरील वर्णनावरून वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ या दोन्ही भूमिकांत रसेल यांच्या थोर व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. त्यांचे अतीताविषयी काय विचार होते हे त्यांनीच लिहिलेल्या Religion and Science या ग्रंथावरून समजून घेणे योग्य होईल. या पुस्तकातील गूढवादावरील (mysticism) चर्चा असलेल्या प्रकरणाचा अनुवाद प्रा. दि. य. देशपांडे यांनी आ. सु. च्या नोव्हेंबर १९९५ च्या अंकात दिला आहे. रसेल यांनी गूढवादाचा इतिहास व आढावा प्राचीन काळापासून तो अर्वाचीन तत्त्वज्ञांच्या विचारापर्यंत घेतला आहे. गूढवादाबद्दल साधकबाधक चर्चा ख-या वैज्ञानिक दृष्टिकोनातून, खुली मनोवृत्ती ठेवून केली आहे. या अनुवादातील रसेल यांचे खालील प्रतिपादन विशेष विचारार्ह व महत्त्वाचे आहे असे वाटते.
आ. सु. नोव्हेंबर ९५, पृ. २४१ :- (१) “जेव्हा गूढवादी सत् आणि भासमान यांत विरोध दाखवितात, तेव्हा ‘सत्य’ (Real) या शब्दाला तार्किक नव्हे भावनिक अर्थ देतात; कोणत्यातरी अर्थी ते महत्त्वाचे आहे असा त्यांचा अर्थ असतो. जेव्हा ते म्हणतात की काळ असत् आहे तेव्हा त्यांना म्हणायचे असते की कुठल्या तरी अर्थी आणि केव्हातरी सबंध विश्वाचा विचार, निर्मात्याने हे जग निर्माण करण्याचे ठरविले तेव्हा त्याने केला असेल तसा, आपणही करावा. तसे कल्पिल्यास सर्व बदल, परिवर्तने एका पूर्ण संबंधांत (whole) येतात. भूत, वर्तमान आणि भविष्य कोणत्यातरी अर्थी एकदम राहतात आणि वर्तमानाला आपल्या दैनंदिन व्यवहारात असते तशी अग्रगण्य सत्ता राहणार नाही. जर हा अर्थ आपण स्वीकारला, तर गूढवाद एक भावना व्यक्त करतो, वास्तव नाही; तो काही प्रतिपादीत नाही आणि म्हणून त्याचे खंडन किंवा मंडन करणे शक्य नाही. गूढवादी प्रतिपादने करीत असतात याचे कारण ते आपल्या भावनेचे वैज्ञानिक वास्तवतेहून वेगळे महत्त्व दाखवू शकत नाहीत. ते हे मत स्वीकारतील असे अर्थातच नाही, परंतु ज्याचा दावा काही प्रमाणात मान्य करणे वैज्ञानिक बुद्धीला त्याज्य वाटणार नाही असे हे एकमेव मत मला दिसते.”
(अनुवादित प्रकरणाचा शेवटचा छेदक; आ. सु. नोव्हेंबर १९९५, पृ. २४३) : (२) गूढवादी भावना जर निराधार समजुतीपासून मुक्त झाली, आणि जर ती मनुष्याला सामान्य व्यवहारातून उठवण्याइतकी तीव्र नसेल, तर ती तत्त्वचिंतनात मिळते त्याच प्रकारचे पण अधिक उत्कृष्ट स्वरूपाचे काही तरी मूल्यवान देऊ शकेल. व्यापकता, शांतपणा आणि गाढता यांचे मूळ या भावनेत असू शकेल, कारण तिच्यात सर्व स्वार्थ लुप्त झालेला असतो, आणि मन विश्वाच्या विराट पसा-याचा आदर्श (आरसा) बनते. ज्यांना हा अनुभव आलेला असतो, आणि जे त्याला विश्वाविषयीच्या प्रतिपादनाशी संबद्ध मानतात हे ते स्वाभाविकच त्याला बिलगून राहतात. मला स्वतःला ती प्रतिपादने आवश्यक वाटत नाहीत आणि ती खरी मानण्याचे कारणही दिसत नाही. सत्याप्रत जाण्याच्या वैज्ञानिक रीतीहून अन्य रीत मी मानू शकत नाही. पण ज्या अनुभवातून धर्म उद्भवला त्याचे मूल्य मी भावनांच्या क्षेत्रात नाकारीत नाही. असत्य समजुतींशी संबद्ध झाल्याने त्यांतून पुष्कळ शिवाबरोबर पुष्कळ अशिवही निर्माण झाले आहे; त्या संबंधातून सुटल्यामुळे शिव तेवढेच शिल्लक राहील अशी आशा करता येईल.”
बरर्त्रड रसेल यांनी ‘मी खिस्ती का नाही?’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. म्हणजे आपण धार्मिक श्रद्धा का स्वीकारीत नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. पण वरील विवेचनावरून दिसून येते की केवळ बुद्धिप्रामाण्यावर अवलंबून न राहता जर ‘भावनेला योग्य स्थान विवेकवादात दिले तर त्यांनी स्पष्ट केलेल्या वरील दोन अटींवर, गूढवाद व त्यात अंतर्भूत असलेले अतीत तत्त्व हे काही विशिष्ट परिस्थितीत, स्वीकार्य व मूल्यवान असू शकेल. रसेल हे स्वतः प्रस्थापित वैज्ञानिक, निधर्मी व rationalist असल्याने त्यांना स्वतःला गूढवाद व अतीत मान्य नाही हे योग्यच आहे. पण असे असणे शक्य आहे की स्वभावतःच धार्मिक व आस्तिक असणान्यांच्या बाबतीत त्यांचा पवित्रा उदारमतवादी होता. मला येथे हे सुचवायचे आहे ते असे की जॉन एकल्स, मानवी मेंदूवर प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन करणारे एक नामांकित वैज्ञानिक, आस्तिकतेकडे का वळले, विज्ञानाच्या क्षेत्रात कधीही येऊ शकणार नाही अशी काही तरी शिल्लक बाकी (supermatural residue) निसर्गात असू शकते असे विधान त्यांनी त्यांच्या The Human Mystery या ग्रंथात का केले याचा उलगडा रसेल यांच्या वरील, गूढवादाबद्दलच्या विवेचनावरून होऊ शकतो. आ. सु. च्या फेब्रुवारी १९९७ च्या अंकात (पृ. २६८) ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद–आस्तिकतेविषयी’ या माझ्या लेखात एकल्स यांच्याबद्दल बरेच काही लिहिलेलेच आहे. त्यात सूचित केले होतेच की प्रा. एकल्स हे या विश्वातील अवकाश व काळ यांचा प्रचंड पसारा, त्यातील व्यवस्था आणि गणिती नियमानुसार चालणारा कारभार यांनी प्रभावित झाले असतानाच त्यांचा स्वतःच्याच संशोधनक्षेत्रातील मानवी मेंदू व मज्जातंतूंचे जाळे यांतील निष्कर्ष व अनुभव यांचा निकटचा संबंध आला आणि त्यांची स्वभावतःच असलेली धार्मिक प्रवृत्ती व निष्ठा अधिक दृढ झाली. पॉपर यांची नास्तिकता व एकल्स यांची आस्तिकता अशा रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न त्या लेखात केला होता. रसेल यांच्यावर दिलेल्या (२) या उता-यात एकल्स यांच्या आस्तिकतेच्या भावनेबद्दल समाधानकारक उत्तर मिळू शकते. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “गूढवादी भावना जर निराधार समजुतीपासून मुक्त झाली आणि जर ती मनुष्याला सामान्य व्यवहारातून उठवण्याइतकी तीव्र नसेल, तर ती तत्त्वाचिंतनात मिळते त्याच प्रकारचे पण अधिक उत्कृष्ट स्वरूपाचे काहीतरी मूल्यवान देऊ शकेल. व्यापकता, शांतपणा आणि गाढता यांचे मूळ या भावनेत असू शकेल, कारण तिच्यात सर्व स्वार्थ लुप्त झालेला असतो आणि मन विश्वाच्या विराट पसा-याचा आदर्श (आरसा) बनते…” प्रा. एकल्स यांच्या बाबतीत अशीच मानसिक अवस्था झाली असली पाहिजे. पण अशी अवस्था अर्थातच भावनात्मक आहे आणि मुळातच धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या बाबतीतच हे शक्य आहे. वरील उता-यातील “…. आणि मन विश्वाच्या विराट पसा-याचा आदर्श (mirror) बनते…’ हे वाक्य प्रा. एकल्स यांच्या बाबतीत लागू पडत असले पाहिजे. कारण त्यांनी आपल्या The Human Myster) या ग्रंथात विश्वाच्या विराट पसोप्याविषयी प्रदीर्घ विवेचन केल्यानंतरच निसर्गापलीकडे व विज्ञानाच्या कक्षेत कधीही न येणारे असे काहीतरी (residue) असले पाहिजे अशी आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. कार्ल पॉपर हे स्वभावतःच भक्कम नास्तिक, तेव्हा या बाबतीत एकल्स यांच्याशी त्यांचा तीव्र मतभेद होता. प्रा. दि. य. देशपांडे यांनी सुद्धा विवेकवादाच्या प्रस्थापित भूमिकेतून माझ्या आ. सु. तील फेब्रुवारी १९९७ च्या लेखावर आक्षेप घेतले आहेत. (आ. सु. मार्च १९९७). काही वैचारिक दोषही दाखविले आहेत. पण या विषयावर अधिक सखोल चर्चा होणे शक्य आणि इष्ट आहे असे वाटते.
एकल्स व मे. पुं. रेगे
मला या संदर्भात एक विचार मांडावासा वाटतो. जॉन एकल्स आणि थोर तत्त्वचिंतक प्रा. मे. पुं. रेगे यांच्या आस्तिकतेविषयीच्या विचारसरणीत लक्षणीय साम्य आहे. एकल्स हे वैज्ञानिक आणि रेगे मानव्याच्या क्षेत्रातले श्रेष्ठ तत्त्वचिंतक, प्रा. रेग्यांच्या “मी आस्तिक का आहे ?” या लेखावरून (आ. सु. जानेवारी १९९५) हे स्पष्ट दिसून येते. त्यांची बालपणापासून जोपासलेली ईश्वरविषयक श्रद्धा विचलित झाली नाही, होईल असे काही घडले नाही. सातारा येथील विचारवेध संमेलनात त्यांनी ‘धर्म’ या विषयावर प्रदीर्घ भाषण दिले.
मला नेहमी एक कूटप्रश्न मनात येत असे. प्रा. रेगे हे आस्तिक पण बड रसेल यांना गुरूसमान मानणारे आणि रसेल हे तर निधर्मी, नास्तिक आणि प्रस्थापित विवेकवादी व rationalist. या विरोधाभासाचा उलगडा काय ? वर निर्देश केलेल्या ‘मी आस्तिक का आहे ?’ या प्रा. रेग्यांच्या लेखांतील शेवटच्या छेदकातील युक्तिवादातच याचे उत्तर सापडते. तो छेदक असा : (आ.सु. जानेवारी १९९५, पृ. २९६) “मला गुरूसमान असलेले बटैंड रसेल ह्यांनी “मी खिस्ती का नाही ?” या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. म्हणजे आपण धार्मिक श्रद्धा का स्वीकारीत नाही ह्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. एकदा मध्यपूर्वेत प्रवास करीत असताना ते एका चर्चमध्ये, केवळ ते चर्च पाहण्यासाठी म्हणून शिरले आणि एकाएकी ‘आपण ख्रिस्ती आहोत’ अशी जाणीव त्यांना झाली असे त्यांनी नमूद केले आहे. जगात शांतता नांदावी, अणुयुद्ध होऊ नये म्हणून आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, तुरुंगवास भोगला. हा जगण्याचा खिस्ती, धार्मिक मार्ग होता. जे स्वतःला नास्तिक म्हणवतात आणि ह्या मार्गाने जगतात ते श्रद्धावान माणसाच्या दृष्टीने आस्तिकच असतात. काही माणसांनी ईश्वराला नाकारावे ही ईश्वराचीच लीला आहे.”
प्रा. रेण्यांचा वरील युक्तिवाद कट्टर विवेकवादी विचारवंतांना अर्थातच मान्य होईल असा नाही. आ. सु.च्या त्याच अंकात (जानेवारी, १९९५, पृ. २९७) प्रा. दि. य. देशपांडे यांनी “मी आस्तिक का नाही?” या लेखात प्रा. रेग्यांच्या लेखासंबंधी आक्षेप घेतले आहेत व काही वैचारिक दोषही दाखविले आहेत. पण त्यांनी त्या लेखात, बरड रसेल मध्यपूर्वेत एका चर्चमध्ये शिरले असताना, एकाएकी आपण खिस्ती आहोत ही जाणीव त्यांना झाली याला उद्देशून काही लिहिलेले नाही पण त्याची गरजच नव्हती. प्रा. रेग्यांचे विवेचन श्रद्धावान लोकांसाठी ‘श्रद्धेवर आधारलेले आहे. पण ‘श्रद्धा’ म्हणजे ‘ज्ञान’ नाही हे विवेकवादाच्या बाजूने प्रा. देशपांडे यांनी स्पष्ट केलेच आहे.
याच संदर्भात, माझा एक लेख, “अतीतवाद, विवेकवाद व विज्ञान’ हा आ. सु.च्या सप्टेंबर १९९४, (पृ. १६३) अंकात प्रसिद्ध झाला त्याकडे वाचकांचे लक्ष ओढू इच्छितो. त्या लेखाचा उद्देश प्रा. रेग्यांचे साताव्याचे संपूर्ण भाषण व त्यांचा “मी आस्तिक का आहे’ हा लेख वाचल्यानंतर मनात आलेले काही विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाचकांसमोर ठेवण्याचा होता. त्या लेखाचा धर्मकल्पनेशी, आस्तिकतेशी काही संबंध नाही हे तेथे स्पष्ट केले होते. प्रचलित भौतिकीतील (modern physics) नव्याने प्रस्थापित झालेल्या सिद्धान्तामुळे जर quantum mechanics व relativity, विज्ञानामागच्या तत्त्वज्ञानात काही फरक करून गूढवादाकडे जाण्याची आवश्यकता आहे काय हाच विचार त्या लेखात केला होता आणि तशी गरज नाही असे प्रतिपादन केले होते. विश्वातील अचेतन सृष्टिविषयक विज्ञान पूर्णतः विवेकवादात समावले जाते असे मत मांडले होते. डार्विन यांच्या उत्क्रांतितत्त्वाचा उल्लेख करून या क्षेत्रात नवीन विकसित होणा-या उत्क्रांतितत्त्वाकडे म्हणजे स्वयंनिर्मित, स्वयंचलित विश्व, Self-Organizing Universe, याकडे लक्ष वेधले होते. आणि हे तत्त्व मान्य केले तर, सचेतन सृष्टिविषयक विज्ञानसुद्धा अतीताकडून विवेकवादाकडे वाटचाल करीत आहे असे म्हटले होते. सचेतन सृष्टिविषयक विज्ञान आणि मानवी मेंदूविषयीचे संशोधन याचा घनिष्ठ संबंध आहे. हाच प्रा. एकल्स यांच्या संशोधनाचा विषय आणि त्याबद्दल त्यांनी त्यांच्या दोन ग्रंथांत, The Human Mystery व Facing Reality यांत विस्ताराने लिहिलेच आहे. मध्यंतरीच्या काळात म्हणजे १९९४ नंतर मानवी मेंदूविषयक ज्ञानात बरीच भर पडली असणार, तरीसुद्धा माझ्या त्यावेळच्या लेखातील शेवटचा छेदक अजूनही गैरलागू होत नाही असे वाटते. तो छेदक असा : सध्या तरी असे म्हणण्यास हरकत नसावी की विश्वातील निर्जीव सृष्टिविषयक विज्ञान हे पूर्णपणे विवेकवादात सामावले जाते. सजीव सृष्टिविज्ञानसुद्धा नव्या विकसित होणा-या उत्क्रांतितत्त्वामुळे अतीताकडून विवेकवादाकडे वाटचाल करीत आहे.”
या नवीन विकसित होणा-या उत्क्रांतितत्त्वावरचे Erich Jantsch यांचे “Self-organizing Universe” हे पुस्तक उद्बोधक आहे. या नवीन उत्क्रांतिवादात ‘ईश्वर’ संकल्पना सार्थ नाही. Jantsch यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे God is not the Creator of the Universe but the Mind of the Universe. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या नवीन उत्क्रांतितत्त्वाबद्दल वाचनीय विवेचन F. Capra यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध The Turning Point या ग्रंथातही केले आहे. ते या लेखाच्या संदर्भातही वाचनीय आहे.
नवीन विकसित होणा-या उत्क्रांतिवादातील विचारसरणी ईश्वराचे अस्तित्व न मानणाच्या विवेकवादी चिंतकांना पूर्णतः ग्राह्य अशीच आहे.
C-2-13 टेरेस व्यू सोसायटी,
जीवन बीमा नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई ४०० १०३
संदर्भ : Bertrand Russel : गूढवाद, अनुवादित प्रकरण, *Religion and Science” दि. य. देशपांडे, “आजचा सुधारक, नोव्हेंबर १९९५
J. Eccles : The Human Mystery (1979), Springer International. Fritjof Capra : “The Turung Point”, Bantam, 1988, New York. :

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.