माध्यमिक शिक्षणसंस्थांपुढील आह्वान

माध्यमिक शिक्षणक्षेत्रात शिकवणीवर्गाचे वाढते प्रस्थ याविषयी बरीच उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांतून होत असते. सामान्य पालकवर्गास आपल्या पाल्यास शिकवणी लावणे हे एक अप्रिय परंतु आवश्यक कर्तव्य वाटू लागले आहे. मोठ्या महानगरांपासून तर अगदी तालुक्याच्या गावांपर्यंत सर्वत्रच शाळांबरोबरच लहानमोठे शिकवणी वर्गही उत्तम व्यवसाय करीत आहेत. पूर्वी, म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वी काही मोजकेच सुखवस्तु पालक आपल्या मुलांना शाळेतील नाणावलेल्या शिक्षकांच्या घरी शिकण्यासाठी पाठवीत असत. त्यामध्ये परीक्षेत अधिक गुण मिळावेत या ऐवजी विद्यार्थ्याचा विषय पक्का व्हावा हीच अपेक्षा महत्त्वाची असे. परंतु हे साधे, सरळ समीकरण गेल्या अर्धशतकात पार बदलून गेले असून, आता केवळ परीक्षेत अधिक गुण मिळावेत याच एकमेव उद्देशाने शिकवणी लावली जाते, कारण बोर्डाच्या
परीक्षेत उत्तम गुण मिळविल्याखेरीज आयुष्यातील उत्कर्ष शक्य होत नाही. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे कसब ज्या शिक्षकांजवळ असते, त्यांच्या शिकवणीवर्गात प्रवेशासाठी २-३ वर्षांपासूनच प्रतीक्षा करावी लागते ! आमच्या दौंडसारख्या लहान गावातही शिकवणी-वर्गाचे लोण पोचले असले तरी प्रस्तुत लेखक अध्यापन करीत असलेल्या शिक्षणसंस्थेतील काही मोजकेच विद्यार्थी शिकवणी वर्गाकडे आकृष्ट होतात हेही सत्य आहे आणि आमच्या शाळेचे निकालही समाधानकारक लागतात हे पालकांनाही मान्य आहे. आमच्या शाळेत शिकलेले काही विद्यार्थि-विद्यार्थिनी गेल्या १०-१२ वर्षांत डॉक्टर, इंजिनियर व वकील झाले आहेत, परंतु सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही शालान्त परीक्षांत समाधानकारकपणे उत्तीर्ण होऊन पोटापाण्याला लागलेले आहेत याबद्दल मुळीच शंका नाही. पुण्यासारख्या शेजारच्या शहरात जाण्याचा प्रसंग अनेक वेळा येतो व तेथील शिकवणीवर्गाचा बोलबाला, गर्दी, आर्थिक उलाढाल आणि चढाओढ पाहून थक्क व्हायला होते. परंतु अगदी अलीकडे मुंबई महानगरात प्रदीर्घ वास्तव्याचा योग आला, तेव्हा येथील शिकवणी वर्ग या औद्योगिक (?) क्षेत्राचा परिचय झाल्यावर मात्र मन विषण्ण झाले.
मुंबईत माध्यमिक शालेय शिक्षण घेणाच्या मुलापैकी सरासरी ७० ते ८० टक्के विद्यार्थी, शिकवणी वर्गात अथवा खाजगी वैयक्तिक शिकवणीसाठी जातात असा जाणकारांचा कयास आहे. विशेषतः ज्या पालकांना स्थिर उत्पन्न आहे अशा पालकांची ९० ते ९५ टक्के मुले शाळेबाहेरील शिकवणी घेतात. ज्या पालकांचे उत्पन्न स्थिर नाही अथवा अल्प आहे असे पालकही शाळेत शिकणाच्या आपल्या पाल्यांना आपल्या ऐपतीनुसार शालाबाह्य शिकविण्यासाठी धडपड करतात असे आढळले. विशेषतः ८ व्या इयत्तेनंतर ८० ते ९० टक्के विद्यार्थी कोणत्यातरी शिकवणी वर्गात जातात. सुस्थितीतील पालकांची ३० ते ४० टक्के मुले एकाहून अधिक शिकवणी वर्गात नावे नोंदवितात असे आढळते. बहुतेक सगळेच शिकवणी वर्ग वर्षभर चालू असतात. त्यात जुलै ते मार्च दरम्यान त्या वर्षीच्या शालान्त परीक्षेचा अभ्यास करवून घेण्यात येतो व उन्हाळ्याचा एप्रिल, मे व जून या महिन्यात पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाचा प्रारंभ करण्यात येतो. हे शिकवणी वर्ग पहाटे ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत अखंड चालू असतात.
सामान्यतः शिकवणी वर्गाच्या प्रसिद्धीप्रमाणे व लोकप्रियतेप्रमाणे एका वर्षाचे एका विषयाचे रुपये एक हजार ते रुपये दहा हजार शुल्क घेतले जाते. काही शिकवणी वर्गाचे संचालक प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याच्या हमीसाठी, तसेच विषयात प्रावीण्य मिळवून देण्यासाठी अथवा बोर्डाच्या गुणवत्ता सूचीत नाव येण्यासाठी विशेष जादा शुल्क आकारतात व ते विद्यार्थ्यांची बौद्धिक व आर्थिक कुवत तसेच परीक्षा कोणती याचा विचार करून साधारणपणे दहा हजार रुपयांपासून एक लाख रुपये इतके असते. या शुल्कामध्ये दैनंदिन वर्गात बसण्याची परवानगी, टिपणे (Notes), प्रश्नपत्रिका संच, प्रयोगशाळेचा वापर, परीक्षेपूर्वीचा विशेष सराव, अपेक्षित प्रश्न-पत्रिका आणि परीक्षेनंतर करावी लागणारी खटपट या सर्वांचा
समावेश असतो. शुल्काची पावती दिली जात नाही व कोणत्याही स्वरूपाच्या लेखी नोंदी (Record) ठेवल्या जात नाहीत. सर्व व्यवहार तोंडी आणि रोखीने होतात!
शिकवणी-वर्गासाठी मोक्याच्या ठिकाणी प्रशस्त जागा भाड्याने घेतल्या अथवा बांधल्या जातात. उत्तम फर्निचर व कित्येक वर्गात वातानुकूलनाची व्यवस्था असते (गलका टाळण्याच्या सबबीवर), उत्तम गुळगुळीत कागदावर संगणकावर मुद्रित केलेली टिपणे (Notes) दिली जातात. बहुसंख्य शिक्षक स्वतःच्या कारने शिकविण्यासाठी येतात व वर्गाचे संचालक वातानुकूलित गाड्यांतून शहरातील आपल्या सर्व शाखांवर नियंत्रण ठेवतात. संचालक व शिक्षक वारंवार सामाजिक स्वागत समारंभासारखे कार्यक्रम योजून, उपयुक्त अधिकारी, परीक्षक व राजकारणी पुढारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवतात. शिक्षकांना किती पगार मिळतो हे कोणीच बोलत नाही पण तो दरमहा ५ अथवा ६ आकड्यांमध्ये माणूस पाहून असतो असे म्हणतात. याखेरीज विशेष कामगिरीसाठी शिक्षकांना भेट वस्तू, बोनस वगैरेची रेलचेल असते. एकूण या उद्योगात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. एक चांगला उच्च दर्जाचा शिकवणी वर्ग काढण्यासाठी संचालकांना ४-५ कोटींची गुंतवणूक करावी लागते असे म्हणतात. वृत्तपत्रांतून व दूरदर्शनवर प्रचंड खर्च करून आकर्षक जाहिराती कराव्या लागतात. एकूण मुंबईतील एखाद्या मोठ्या शाळेचे जेवढे वार्षिक अंदाजपत्रक असते तेवढा खर्च काही शिकवणी वर्ग दरमहा करतात. या उद्योगावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. वस्तुतः अनेक शासकच या उद्योगाशी संलग्न असतात.
आता अशा महागड्या शिकवणी वर्गात कोणाची मुले जातात असा प्रश्न साहजिकच पडतो. पण मुंबईच्या आर्थिक सुबत्तेची ज्यांना माहिती आहे त्यांना हा प्रश्न अनाठाई वाटावा. दरमहा १० लाख रुपये उत्पन्न असणारी लाखो कुटुंबे मुंबईत आहेत (उगाचच भारतीय शासनाच्या आयकर अधिका-यांची एक अख्खी पलटन मुंबईत तैनात आहे काय?) ही कुटुंबे – २५ लाख ते २ कोटीपर्यंत किंमतीच्या घरात राहतात व त्यांच्या घरी एकूण १० लाख ते ५० लाख किंमतीची एकाहून अधिक वाहने असतात. या कुटुंबातील मुलांना दैनंदिन १०० रुपयापासून ५०० रुपये एवढा पॉकेटमनी मिळतो. अशा कुटुंबांना स्वतःचे कुटुंब व त्यांच्याचसारखे मुंबईकर मित्र व नातेवाईक या पलीकडे काही जग आहे याची जाणीवही नसते. फक्त मुंबई आणि अरब देशातील, तसेच अमेरिका युरोप येथील स्थळेच माहीत असतात आणि उर्वरित भारताचा भूगोल फक्त शालेय पुस्तकात वाचला एवढेच त्यांना आठवते. राष्ट्राचे शासन तर दूरच, आपल्या शहरातील रस्ते व स्वच्छता याची व्यवस्था कोण पाहते, पिण्याचे पाणी कोठून येते याविषयी ही मंडळी सर्वस्वी अनभिज्ञ असतात. बिल्डिंगचा वॉचमन कोठला आहे, मुंबईत कोठे राहतो, काय खातो याविषयी त्यांच्या मनाला कधी विचारही शिवत नाही. घरगड्याला रोजची ४-५ माणसांची भाजी आणण्यासाठी १०० रुपयांची नोट देऊन गृहिणी : बाजारात पाठविते. भाजी आणल्यावर भाजी केवढ्याची झाली, काही पैसे उरले काय अशी चौकशी करण्याचे भानही त्या गृहिणीला नसते. या महिला आपला वेळ कसा घालवितात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. कुटुंबप्रमुख व्यापारात, डॉक्टरी अथवा कंत्राटी कामे वगैरे उद्योगातून दररोज १० ते ५० हजार रुपये कमावतो व आपली मुले येनकेनप्रकारेण आपल्या धंद्यात हुशारीने प्रवेश करण्यापुरती शिकली तरी पुरे एवढीच त्यांची अपेक्षा असते. भारतीय प्राशासनिक सेवेत अथवा सेनादलात आपल्या मुलांनी जावे अशी त्यांची मुळीच इच्छा नसते. उगाच नाही मुंबईतील काय पण पूर्ण महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवांमधील बहुसंख्य अधिकारी मराठीतर गुजराती व उत्तर भारतीय आहेत! यामुळे मुंबईचे सुखवस्तू पालक आपल्या प्रत्येक पाल्याच्या शिक्षणासाठी वर्षाला लाख दोन लाख रुपये सहज खर्च करू शकतात. अशी ही मुले ‘नीरोची पिल्ले” म्हणून वाढत राहिल्यास त्यात नवल ते काय ? ही झाली मुंबईच्या श्रीमंतांची कहाणी. उच्च मध्यमवर्गीयांमध्ये (यांत दुहेरी अथवा क्रमांक दोनचे उत्पन्न असणा-या चाकरमान्यांचाही समावेश होतो) अशीच मानसिकता आढळते. फरक एवढाच की या कुटुंबातील व्यक्तींचा बराचसा वेळ भडक स्वरूपाचे लेखन असलेली वृत्तपत्रे, आणि दूरदर्शनवरील ५० वाहिन्यांवर प्रसारित होणा-या निर्बुद्ध सिरियल्स आणि सिनेमावर आधारित कार्यक्रम ह्याच्या सांनिध्यात जातो. स्वतःचे जीवन सुखासीनपणे आणि निर्बधरहित व्यतीत व्हावे हीच यांची धडपड असते. | कोणत्याही राष्ट्रीय व सामाजिक समस्येची सावलीही आपल्या कुटुंबावर पडू नये याची ही मंडळी काळजी घेतात. मुंबईच्या पलीकडे आपली भारत नावाची मातृभूमी आहे (केवळ सहलीवर पाहिलेली स्थळे सोडून) व एकेकाळी आपले पूर्वज या देशातील कोणत्या तरी ठिकाणचे रहिवासी होते व आजही तिकडे आपले गणगोत राहते याचे मुळीच भान या मध्यमवर्गीय मुलांना नसते!
आता वाचकांना प्रश्न पडेल की या सविस्तर वर्णनाचा माध्यमिक शाळांशी संबंध काय? संबंध आहे हे थोड्या विचारान्ती ध्यानात येईल. हल्ली नवी पिढी घडते कशी? घरातील पालकांच्या भूमिकेविषयी तर आनंदी आनंदच आहे! आठ दहा वर्षांच्या मुलांना आईवडील इष्ट काय व अनिष्ट काय हे सांगू शकत नाहीत. अनेकदा पालकांनाही ते कळत नाही व मुले काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. मनमानी करण्याचे बाळकडू त्यांना आईवडिलांच्या फाजील लाडामुळे लहानपणीच मिळालेले असते. मी मुंबईत वास्तव्याला होतो तेथील एक अनुभव सांगण्याचा मोह टाळता येत नाही. ७ मजली निवासी इमारतीतील १०-१२ वर्षांची ४-५ मुले खालच्या मोकळ्या जागेत प्लास्टिक चेंडूने टुकूटुकू क्रिकेट (हे आणखी एक राष्ट्रविघातक खूळ, खेळत होती. थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर आइस्क्रीम खाण्याची टूम निघाली. एक चिरंजीव खालूनच ओरडून (इमारतीला लिफ्ट होती) आईला १०० रुपये खाली टाकण्यास सांगत होते. आणि काय नवल, त्या माउलीने १०० रुपयांची नोट हातरुमालात गुंडाळून आपल्या लाडक्या कुलदीपकाकडे टाकली! ही कपोलकल्पित गोष्ट नसून अगदी चक्षुर्वैसत्यम् घटना आहे. असे पालक मुलांवर कोणते संस्कार करू शकतात ? घरातील पालकांनंतर मुलांचा सर्वाधिक वेळ शाळेत व आपल्या मित्रमंडळींच्या संगतीत जातो व तेथेच मुलांवर काही भलेबुरे संस्कार होतात.
पूर्वी शाळांना विद्यामंदिरे म्हणत असत आणि ही मंदिरे समाजसेवकांनी अथवा मिशनन्यांनी काढलेली असत व त्यातून केवळ कोरडे ज्ञान देण्याशिवाय काही अधिक देण्याचा संकल्प असे. त्यात मुलांना प्रेम, सहिष्णुता, बंधुभाव, जिज्ञासा, वडीलधाग्यांविषयी आदर, आस्था, परोपकार, चांगले वर्तन इत्यादी गुण मुलांच्या ठिकाणी जोपासण्यासाठी प्रयत्न केले जात असत. शाळेतील शिक्षकवृंद आपल्या स्वतःच्या उदाहरणाने हे आदर्श विद्यार्थ्यांपुढे मांडीत असत. परंतु आज हे सगळे काही दुर्मिळच झाले आहे एवढेच नव्हे तर चेष्टेचा विषय झाले आहे. शाळा या केवळ मुलांना परीक्षांना बसण्यास पात्रतेसाठी आवश्यक ते उपस्थितीचे प्रमाणपत्र देणारे कारखाने झाल्या आहेत ! विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, उपर्युक्त गुणांची जोपासना करणे हे तर दूरच राहिले, किमान क्रमिक अभ्यास तरी शाळांतील शिक्षक पूर्ण करून घेतात काय ? याचे उत्तर निराशाजनकच आहे. शिकवणी वर्गात विद्यार्थी आवश्यक तेवढे शिकतीलच असे शिक्षकांना व शाळा संचालकांना वाटते त्यामुळे आपला पगार (आणि इतरही काही तरी) पदरात पाडून घेण्यासाठी हजेरीपटावर सही करणे एवढेच कार्य शिक्षक आस्थेने करतात. काही उत्साही मंडळी क्रीडा, संमेलन, सहली यांमध्ये नको तेवढा रस घेताना दिसतात.
मुलांना घरात वळण लागत नाही, शाळेतही ती कोरडी ठणठणीत राहतात मग भावी जीवनात माणसासारखे जगण्याचे वळण कोण लावणार ? यातून एकच मार्ग दिसतो तो म्हणजे शाळांमधील वातावरण बदलणे हाच होय. शाळासंचालकांनी पैसे अवश्य कमवावेत, राजकारणही करावे परंतु विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करावे. त्यासाठी चांगल्या जाबाबदार व कर्तव्यदक्ष शिक्षकांना विशेष लाभही द्यावेत परंतु नियत कामाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सद्भुणी करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे. तद्वतच शिक्षकांनीसुद्धा आपल्या पेशाचा अभिमान जागृत ठेवून केवळ चैनीत पोट भरण्याचे एक साधन एवढाच व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आपण राष्ट्र घडविण्याच्या पवित्र कार्यातील एक प्रमुख घटक आहोत याचे सदैव भान ठेवून कार्य करावे असे त्यांना आवाहन आहे. शाळेचे नाव केवळ गुणवत्ता सूचीत येणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येवर अवलंबून नसून सामान्य विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतल्यापासून शाळा सोडण्यापर्यंतच्या कालखंडात कसा घडतो यावरही अवलंबून असते हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्याथ्र्यामध्ये प्रेम, बंधुभाव, सहिष्णुता, आस्था, आदर, सहकार्याची वृत्ती व कष्ट करण्याची कुवत यांसारखे गुण निर्माण करून विद्यार्थ्यांची भावनात्मक गुणवत्ता (Emotional Intelligence) कशी वाढविता येईल यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे. हल्लीच्या बिघडलेल्या वातावरणात हे एक प्रचंड आह्वानच आहे. परंतु ते शिक्षकांनी व शाळासंचालकांनी सतीचे वाण म्हणून स्वीकारावयास हवे, अन्यथा सर्वत्र अंधारच आहे.
निवृत्त झाल्यावर, गात्रे शिथिल झाल्यावर आयुष्याच्या सायंकाळी जर खरे आत्मिक समाधान आणि प्रामाणिक कर्तव्यपूर्तीचा आनंद हवा असेल तर सर्व शिक्षकबांधवांनी हे आह्वान पेलले पाहिजे अशी कळकळीची प्रार्थना करावीशी वाटते. समाजसुधारणेसाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी हे कार्य व्रत म्हणून करणे हाच एकमेव मार्ग आहे व या व्रतात शिक्षकांसोबतच समाजधुरीणांनी, विचारवंतानी आणि पुढा-यांनी सहभागी होणे आवश्यक आहे. अन्यथा हे राष्ट्र, हा समाज केवळ एक माफिया राज्य म्हणूनच शिल्लक राहील!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.