रक्तदान व एडस् ह्यांविषयी शासकीय धोरण

रक्तदात्यांना त्यांच्या रक्त-तपासणीत दोष सापडल्यास तसे कळवावे की नाही याबद्दल वृत्तपत्रांत सध्या चर्चा चालू आहे. त्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. नमुन्यादाखल कोल्हापूर शहराचा विचार करू. कोल्हापूर शहरामध्ये गेल्या वर्षी २५,००० जणांनी स्वेच्छेने (त्याबद्दल आर्थिक मोबदला न घेता) रक्तदान केले. त्यापैकी ५% म्हणजे १२५० जणांचे रक्त एडस् व्हायरस युक्त, १०% म्हणजे २५०० जणांचे रक्त हिपॅटायटिस बी (एक प्रकारच्या काविळीने युक्त) व १% म्हणजे २५० जणांचे रक्त व्हीडीआरएल पॉझिटिव्ह म्हणजे गुप्तरोग युक्त निघाले. काही जणांच्या रक्तात दोन किंवा तीनही दोष निघाले पण या ४००० व्यक्तीपैकी एकालाही, “तुला असा रोग आहे व तू उपचार करून घे, किंवा तुझ्यापासून इतरांना हा आजार होऊ नये यासाठी काळजी घे” असे सांगितले जात नाही.

एडस् व्हायरसयुक्त रक्तदात्यापैकी बहुतेक सर्व १८ ते ३० वयोगटातील असतात व त्यांच्यापैकी निम्म्यांपेक्षा अधिक अविवाहित असतात. त्यांना आजार असल्याचे माहीत नसल्याने ते खुशाल लग्न करतात. अर्थात नंतर त्यांच्या बायकांना व होणा-या २-३ मुलांनाही हा आजार होतो व नंतरच्या ७-८ वर्षांच्या काळात सर्व कुटुंब मृत्युमुखी पडते.

विवाहित एडस्-बाधित रक्तदात्यापैकी देखील अनेकांच्या पत्नी/पतींना तोपर्यंत एडस्ची बाधा झाली नसण्याची शक्यता असते. अशावेळी या रक्तदात्यांना आपल्याला रोग आहे असे समजल्यास ते योग्य काळजी घेऊन आपल्या पतीचा/पत्नीचा बचाव करू शकतील व मुले होऊ देणार नाहीत. तसेच एडस् पॉझिटिव्ह व्यक्तींचे विवाहबाह्यसंबंध असण्याचे प्रमाणही जास्त असते व स्वतःच्या रोगाबद्दल अज्ञान असल्यास या व्यक्ती इतर कुटुंबांतही रोग पसरवू शकतात. अशा रीतीने हे १२५० रक्तदाते, त्यांना शासनाने त्यांच्या रोगाची माहिती न दिल्याने, पुढील काही वर्षांत २ ते ४ हजार व्यक्तींना हा आजार देतात किंवा जन्मजात एडस्ग्रस्त मुलांना जन्म देतात.

आता एड्‌सवर काही प्रमाणात का होईना, व महाग का होईना, पण औषधोपचार उपलब्ध आहेत. ते उपचार करून घेण्याचा प्रत्येक रुग्णाला मूलभूत अधिकार आहे. रक्तदात्याला त्याच्या आजाराची माहिती नाकारून उपचार करून घेण्याच्या त्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यात येते. अमेरिकेत सध्या उपलब्ध असलेली तीन औषधे एकत्रित घेतल्यास, लक्षणे व मृत्यू बरेच पुढे ढकलले जातात. मात्र याचा खर्च दरवर्षी १० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ही माहिती न देण्याची कारणे कोणती देण्यात येतात?

१. काउन्सेलिंग करता येत नाही: या काऊन्सेलिंगचा फारच बाऊ करण्यात येतो. आता समाजात वृत्तपत्रे, रेडिओ, दूरदर्शन यावरून एडविषयक इतका प्रचार केला जातो, की सर्वसाधारण माणसाला बरीच माहिती असते. व त्याप्रमाणात काउन्सेलिंगची गरज कमी झाली आहे. एडस् विषयक पुरेशी माहिती असलेली व त्यात रस असलेली कोणीही सहृदय व्यक्ती काउन्सेलिंग करू शकते. त्यासाठी खास शिक्षणाची किंवा डॉक्टरची गरज नाही. काउन्सेलिंगची सोय नाही, ही सबब पटण्यासारखी नाही.

२. रक्तातील दोषाबद्दल गोपनीयता: रक्तदात्यांना त्यांच्या रक्तातील दोषाची माहिती गोपनीयता पाळून खाजगी रीत्या दिली, तर त्यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी होईल ही भीती देखील खोटी आहे. असे घडत नाही, घडलेले नाही, व घडले तरीही रक्तदात्याला अंधारात ठेवणे त्यामुळे समर्थनीय ठरत नाही.

३. रक्ततपासणीसाठी रक्तदानाचा मोफत उपयोग: आजार असण्याचा संभव असलेले रक्तदाते रक्तदानाचा उपयोग विनामूल्य रक्ततपासणीसाठी करतील, ही देखील एक अवास्तव कपोलकल्पित भीती आहे. समजा तसे झाले तरी ते स्वीकारले पाहिजे, शिवाय, तुझ्या रक्तात काहीतरी दोष आहे. पण नक्की रिपोर्ट पाहिजे असल्यास रक्त परीक्षेची काही रक्कम भरावी
लागेल, असे त्याला सांगता येईल.

४. विंडो-पीरियडमध्ये दिलेल्या रक्ताचे प्रमाण वाढून त्यामुळे एडस्चा धोका वाढेल: या संशयाला देखील प्रत्यक्ष पुरावा काही नाही. सर्वसाधारणपणे हा धोका २० हजार बाटल्या ते १ लाख २० हजार बाटल्यांमागे एक इतका कमी मानला (संभाव्यतेचे गणित मांडून) जातो. त्यात दुप्पट वाढ झाली, तरी त्यामुळे फारतर दर वर्षी एका अधिक रुग्णास (रक्त घेतल्याने) एडस्चा आजार होईल. याउलट रक्तदात्यांना खरे न सांगितल्यामुळे प्रतिवर्षी ४००० अधिक व्यक्तींना एडस् होण्याची भीती आहे.

५.रक्तजन्य कावीळ किंवा गुप्तरोगाचा प्रादुर्भावः रक्तजन्य कावीळ म्हणजे हिपॅटायटिस ब्री किंवा सिफिलिस हा रोग जर रक्तदात्याला असल्याचे आढळले तरी त्याला तसे का सांगितले जात नाही? हे दोनही आजार एड्स्प्रमाणे भयंकर नाहीत. सिफिलिस तर सहजपणे पूर्ण बरा होऊ शकतो. हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असलेले रक्तदाते स्वतःच्या आरोग्यासाठी काही पथ्ये व काही उपचार करू शकतील, व आपल्या संसर्गातील लोकांना त्यावरील लस देऊन त्यांना रोग होणार नाही अशी दक्षता घेऊ शकतील. त्यांना (म्हणजे पर्यायाने कोल्हापूरचा विचार करता २५०० रक्तदात्यांना) ही संधी का दिली जात नाही?

६. रक्तदात्यांना त्यांच्या रक्तात सापडलेला दोष न सांगणे: हे शासनाचे धोरण केवळ चुकीचेच नव्हे तर उघड उघड धोक्याचे आहे. शासन असंवेदनशील (गेंड्याच्या कातडीचे) आहे. त्यांच्या या धोरणामुळे फक्त कोल्हापूरमध्ये दरवर्षी ४००० अधिक व्यक्तींना एडस् व ७५०० पेक्षा अधिक व्यक्तींना हिपॅटायटिस बी होण्याची अशी दाट शक्यता आहे. सर्व भारताचा विचार करता हे आकडे लाखांत पोचतात.

७. वारंवार दूषित रक्ताचा पुरवठा: शिवाय काही नियमित रक्तदात्यांना त्यांच्या रक्तात दोष असल्याचे सांगितले नसल्यामुळे ते वारंवार दूषित रक्त देत राहतील आणि ते ओतून टाकले जाईल. एडस् बाधित व्यक्तीच्या बाबतीत हे घडल्यास त्याला मृत्यूकडे लवकर ढकलण्यास शासनच जबाबदार ठरणार नाही का?

८. सत्य हा परमेश्वर: असे आपण म्हणतो. शासनाच्या व्यवहारातही सत्य सांगणे (माहितीचा अधिकार) व पारदर्शकता यांना महत्त्व आहे. गोपनीयतेमुळे असत्य, आजार व गैरव्यवहार यांना संरक्षण मिळते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.