ताहेरभाई पूनावालांचे अभीष्टचिंतन

… आज मी नास्तिक आहे. पूर्वी जच्या यात्रेला गेलो होतो. काबाच्या मशिदीत तेथल्या धर्मपंडिताने माझ्याकडून काही गोष्टी वदवून घेतल्या, त्यांत ‘मी स्त्रीकडे पाहणार नाही’ अशी एक शर्त होती. मी चक्रावलो. हे कसे शक्य आहे ? माझा श्रद्धेवरचा विश्वास डळमळला. पुढे नाथवानी कमिशनच्या स्वागतपत्रांवर मी सही केली. वृत्तपत्रांतून ते पत्रक प्रसिद्ध झाले. परिणाम काय झाला?
‘… माझ्या दुकानात शिरल्याबरोबर इमानी नोकरांनी सांगितले. सोमवारपासून आम्ही कामावर येणार नाही. बोहरा धर्मगुरू सय्यदनांच्या वतीने बहिष्काराचा फतवा निघाला आहे. जवळच्या नातेवाईकांनीही अगदी जन्मदात्री आई, भावंडे यांनीसुद्धा बहिष्कार सुरू केला. व्यापारीपेठेत व्यवहार बंद झाले. माझी झोप उडाली. आता कसे होणारे?
… परंतु माझी पत्नी झैनबबी हिने आधार दिला. ती दुकानावर येऊ लागली. आज मी सय्यदनांचे आभार मानतो. त्यांनी बहिष्कार घातला नसता तर तुम्हा मंडळींची गाठभेट झाली नसती. बोहरा वर्तुळातून मी बाहेर पडलो हे फार बरे झाले. आम्ही सारे मुक्त झालो. विशाल विश्वाचे दालन आम्हाला उघडे झाले. मराठी भाषा शिकता आली- सांस्कृतिक जीवनाचा ढाचा बदलला–चाकोरी बदलली–अनुभवविश्व बदलले. जीवनाची आगळीवेगळी अनुभूती आली. देव, धर्म, जात, कुलकुटुंबांच्या भिंती ओलांडता आल्या …
ताहेरभाई पूनावाला बोलत होते. आम्ही ऐकणारे मंत्रमुग्ध होतो. ती संध्याकाळच न्यारी होती. ‘ताहेरभाई नाबाद ७५ मेळावा’ महात्मा फुल्यांच्या राहत्या वाड्यात भरला होता. महात्मा फुल्यांनाही अशाच बहिष्काराला तोंड द्यावे लागले होते.
ताहेरभाई पूनावाला महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, सामाजिक कृतज्ञता निधीचे खजिनदार, लोकस्वतंत्रता संघटनेचे मानद सदस्य आहेत, सुधारणावादी बोहराचळवळीचे ते आधारवड आहेत. त्यांच्या वयाला वास्तविक २१ डिसेंबर ९७ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. परंतु समारंभ व्हायला तारीख उजाडली ६ मार्च ९८!
समारंभ असा तो नव्हताच, ताहेरभाईंची मित्रमंडळी एकत्र जमली होती. बहारदार कार्यक्रम झाला. ताहेरभाई तीन पिढ्यांसह आले होते. पत्नी झैनबबी, कन्या शबनम, नात सना.
झैनब व शबनम दोघींनीही आपले मनोगत व्यक्त केले. मित्रमैत्रिणींची तर आठवणी सांगण्यासाठी चढाओढ लागली होती–सर्वश्री निळू फुले, अन्वर राजन, अरुणा तिवारी, रा. प. नेने, वसुधा सरदार, सीता भाटिया, सदा डुंबरे, विजूभाई, जया सागडे, सत्यरंजन साठे, चंदू बोराटे, डॉ. बाबा आढाव आणखी कितीतरी.
अध्यक्षस्थानी होत्या विद्या बाळ! ताहेरभाईंनी व झैनबबींनी काही न खाल्ल्याने त्यांनाही काही खाता आले नाही ! एवढा एक अपवाद वगळता कार्यक्रम विलक्षण हृद्य झाला.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.