विज्ञानाची शिस्त

वैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे ठरणे, या क्रमाने ‘सिद्ध झालेल्या गोष्टीबद्दल वाद असेलच कसा?
गंमत म्हणजे ही विज्ञानाच्या निर्विवाद असण्याची बाब फार सामान्य पातळीवरच्या विज्ञानाबाबतच खरी आहे. पाणी किती तापमानाला उकळते, यावर प्रयोग करून ते तापमान कोणते, हे सिद्ध करणे तसे सोपे असते. मग या ‘पाणी १००° (शंभर अंश) सेल्सियसला उकळते’ या तत्त्वाला पुस्त्या जोडल्या जाऊ लागतात. वातावरणाचा दाब, पाण्याची शुद्धता वगैरे मर्यादा या तत्त्वाला ‘दुरुस्त करून घेण्यासाठी घातल्या जातात. शुद्ध पाणी समुद्रसपाटीवरच्या नेहमीच्या वातावरणातील दाबाखाली असले, तर ते १००° सेल्सियसला उकळते, असे एक नवे, सुधारित तत्त्व निघते.
या पातळीवरच्या विज्ञानात सुचलेली कल्पना—प्रयोग–तपास–सिद्धता, ही साखळी घडून निर्विवाद तत्त्वे घडू शकतात. पण यांपेक्षा वेगळ्या पातळ्यांवरही ही क्रिया इतकी सरळ, सोपी असते का?
उदाहरण म्हणून आपण भूगर्भशास्त्रातील एक तत्त्व पाहू. पृथ्वीचा गाभा द्रव धातूंच्या रसाचा व लाव्हा रसाचा आहे. या रसावर घनरूप झालेली जमीन आहे. येथपर्यंतचे ज्ञान अक्षरशः शाळकरी आहे. आता ही घनरूप जमीन स्थिर, अचल आहे असे साठ एक वर्षांपूर्वी पर्यंत मानले जात असे. नंतर मात्र एक सूचना आली की हा कडक थर अचल नाही. या थरात मोठाले, खूपसे न बदलणारे तुकडे आहेत. पण हे तुकडे मात्र खालच्या द्रवावर तरंगत एकमेकांपासून कधी दूर सरकत असतात, तर कधी एकमेकांना रेटत असतात.
या सूचनेबद्दल ‘प्रयोग’ करणे अर्थातच शक्य नाही. आपण लाखो चौरस किलोमीटर आकाराच्या भूखंडांना ‘हलवू शकत नाही. मग ही सूचना करणा-यांनी पुरावा तरी काय दिला ? अनेक प्रकारचे पुरावे दिले.
जगाचा नकाशा पाहताना आफ्रिका खंडाची पश्चिम किनारपट्टी आणि अमेरिका खंडाची पूर्व किनारपट्टी यांच्यात साम्य दिसते. कधीकाळी या दोन किनारपट्टया जुळलेल्या तर नसतील ? जर तसे असेल, आणि नंतर हे दोन खंड सुटे होऊन दूर सरकले असतील, तर या किनारपट्टयांजवळ खडकांचे प्रकार समान असायला हवेत. ‘प्रयोग’ नाही, पण निरीक्षणांची नवी दिशा तर सापडली. या नव्या संशोधनाने खडकांमध्ये साम्य दाखवले. खडकांच्या सारखेपणासोबत ते खडक घडतानाच्या काळातल्या जीवांच्या अश्मीभूत (fossilized) अवशेषांमध्येही साम्य सापडले.
पृथ्वीच्या पृष्ठावरचे तुकडे एकमेकांशी ‘हलते’ असतात, या संकल्पनेला ‘काँटिनेंटल ड्रिफ्ट’ (continental drift) असे म्हणतात. खडक, त्यांमधली रसायने, त्यांच्यातले जीवाश्म, लोखंडाच्या कणांची पृथ्वीच्या चुंबकत्वाने पाडलेली दिशा, अनेकानेक पुराव्यांनी आज खंडांचे ‘वाहवणे’ सिद्ध करता आले आहे. दोन भूखंड दूर सरकतात तेव्हा मधली ‘मेग’ कशी भरली जाते, हे समजले आहे. दोन तुकडे जवळ सरकताना काय होते, हे सांगता आलेले आहे. जेमतेम साठ एक वर्षांपूर्वी सुचलेली आणि दशकभर टिंगल केली गेलेली संकल्पना आता सर्वमान्य झाली आहे. आणि येथे प्रायोगिक तपास शक्य नव्हता!
यासारख्या इतरही अनेक संकल्पनांची उदाहरणे देता येतात. आणि याचा ‘नक्त’ परिणाम म्हणजे वैज्ञानिक तपासाच्या यंत्रणेबद्दलचे समज बदलले आहेत. आज तत्त्व तपासायला प्रयोग घडवावे, हे केंद्रस्थानी नाही. आज एखादे नवे तत्त्व सुचले, तर जगाबद्दलच्या कोणकोणत्या निरीक्षणांचा सुसंगत अर्थ आपण लावू शकतो, याला महत्त्व आले आहे. पृथ्वीच्या पृष्ठाचे तुकडे दुधावरच्या सायीच्या तुकड्यासारखे हलतात, हे खरे तर एक रूपक होते – एक विस्तृत अशी उपमा होती. या आधाराने आज वैज्ञानिक तत्त्वांचे एक नवे रूप बहुमान्य होत आहे.
वैज्ञानिक तत्त्वे ही निरीक्षणांना सार्थ ठरविणारी रूपके असतात!
आता एकाच क्रियेसाठी वेगवेगळी रूपके सुचणे शक्य आहे. यांतली काही रूपके गणिती भाषेतली असणेही शक्य आहे. मग अशा दोन रूपकांमध्ये डावे-उजवे ठरवायला कोणते रूपक किती नेमकेपणाने, किती निरीक्षणांना सामावून घेते, हे तपासावे लागते. जास्त निरीक्षणांमध्ये सुसंगती आणते, ते तत्त्व जास्त चांगले! पण नवनवी रूपके, जास्त काटेकोर, जास्त गणिती रूपके सुचत राहणारच.
प्रत्येक रूपकावर बंधन असेल ते हेच की त्याने हातातल्या माहितीला अर्थ द्यावा. ही एक शिस्त पाळली, की रूपक निवडायचे स्वातंत्र्य वापरायला हरकत नाही.
फ्रीमन डायसन (Freeman Dyson) गणिती-भौतिकीतज्ज्ञ या शिस्तीचे वर्णन aed, ‘Discipline to submerge the individual fantasy in a greater whole’ वैयक्तिक कल्पनाविलासाला एका मोठ्या एककात विलीन करायला शिस्त! शिस्त आणि कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य या दोन्ही बाबींना डायसन वजन देतो. “Without discipline there can be no greatness. Without diversity, there can be no freedom.’ शिस्तीशिवाय थोरखी नाही, विविधतेशिवाय स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य घ्यावे, त्याचा वापर करत विविध कल्पना मांडाव्या; यांच्यापैकी ज्या शिस्तीत बसतील, त्यांनाच ‘थोर कल्पना’, तत्त्व वगैरे सन्मान मिळतील.
डायसन या शिस्त-स्वातंत्र्य जोडीशी आणखीही खेळ करतो. तो सांगतो की विज्ञान, धर्म, कला, साहित्य, संगीत, या क्षेत्रांमध्येही ही शिस्तीतल्या स्वातंत्र्याची कल्पना वापरता येते. डायसन या प्रत्येक क्षेत्रात ही जोडी कशी लागू पडते ते सांगत नाही. इथे मला डायसनची मांडणी थोडीफार बदलावीशी वाटते. क्रीडा आणि राजकारण ही क्षेत्रेही त्याच्या यादीत
घालाविशी वाटतात. पण अशा दुरुस्त्या करण्याऐवजी स्वत:शी काही खेळ खेळून पाहण्यासारखे आहेत.
एखाद्या क्षेत्रात, समजा ‘संगीत’, शिस्त नसेल तर काय होईल ? किंवा दुस-या टोकाला, स्वातंत्र्य नसेल तर काय होईल ? असल्या कल्पनांना ताण देणा-या खेळांमधून डायसनचे मत तपासायला मजा येईल. स्वयंपाक’ हे क्षेत्र कसे वाटते?
शेवटी काय–विज्ञानातही सारे काही निर्विवाद, एकसुरी नसते. पण त्यातल्या शैलीचे वैविध्य समजायला वर्तमानपत्री पुरवण्यांमधल्या बातम्यांपेक्षा बरेच ‘वरचे’ विज्ञान पाहावे
लागते!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.