संपादक

मासिकाचा प्रकाशक म्हणून अगदी पहिल्यापासून मी त्यांच्याशी संबंध ठेवून असल्यामुळे आणि आता संपादकांनी त्यांची सूत्रे खाली ठेवली असल्यामुळे हे सारे लिहिण्यास प्रवृत्त झालो आहे.)
ह्या अशा प्रकारच्या मासिकाचा खप फार होणार नाही ह्याची संपादक-प्रकाशकांना पुरेशी कल्पना होती. त्याशिवाय ह्या मासिकाच्या जाहिराती जिकडेतिकडे फडकवून वाचकांचे लक्ष त्याकडे वेधून घेणे इष्ट होणार नाही ह्याचीही संपादकांना जाणीव होती. आपल्या मासिकाची कीर्ती ज्यामुळे आपोआप पसरेल असे वर्तन ठेवण्याचे बंधन ह्या मासिकाच्या संपादकांनी आपल्यावर घालून घेतले होते, त्यामुळे काही ठिकाणी नमुना अंक पाठविण्यापलीकडे त्यांनी ह्याच्या प्रचाराचा कोठलाही प्रयत्न केला नाही. नाही म्हणावयाला
ह्या मासिकाचा प्रकाशन-समारंभ त्यांनी नागपुरात घडवून आणला.
उपरिनिर्दिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संपादकांनी ह्या मासिकात कोणत्या प्रकारचे लेख प्रकाशित व्हावे ते ठरविले ते असे (मासिकासाठी कोणताही विषय वर्त्य नसला तरी ज्या काही विषयांना प्राधान्य द्यावे असे त्यांना वाटले ते विषय) :
१) स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीपुरुष-समता : मर्यादित की संपूर्ण?
२) कुटुंब : समतावादी कुटुंब कसे असेल, घटस्फोट, स्त्रियांचे अर्थार्जन लोकसंख्येचा प्रश्न, कुटुंबनियोजन, देवदासी आणि वेश्याव्यवसाय
३) शिक्षण : प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था, कॉन्व्हेंटस्, धंदेशिक्षण आणि उदार (liberal) शिक्षण, उच्चशिक्षण, आरक्षण, साक्षरता, लैंगिक शिक्षण
४) सामाजिक, धार्मिक, शुभाशुभविचार, मुहूर्त, धार्मिक विधी, फलज्योतिष, पत्रिका, हस्तसामुद्रिक, निधर्मवाद (secularism)
५) आर्थिक : ग्रामीण दारिद्रय, वेठबिगार, धंदा विरुद्ध नोकरी
६) राजकीय : धर्म आणि राजकारण, जातीयता म्हणजे काय, अल्पसंख्यकांचा प्रश्न, निधर्मवाद
७) साहित्य : मराठीतील किंवा अन्य भारतीय किंवा जगातील कोणत्याही भाषेतील लक्षणीय ग्रंथांचा परिचय किंवा समीक्षा
८) समाजसेवी संस्था : देशातील समाजसेवी संस्थांच्या कार्याचा परिचय
ही यादी पहिल्या वर्षाच्या दुस-या अंकात प्रकाशित झाली. पण आता आठ वर्षे पूर्ण झाली तरी त्यापैकी काही विषयांवरचे लेख आम्हाला मिळू शकले नाहीत.
ज्या विषयांवर संपादकांना स्वतः लेख लिहावे लागले त्यांतील दोन महत्त्वांचे विषय म्हणजे विवेकवाद आणि स्त्रीपुरुषसंबंध. अगदी पहिल्या अंकापासून विवेकवादावरची लेखमाला सुरू झाली. ती वीस लेखांक होईपर्यंत सलगपणे चालली, तिच्यावर म्हणजे ह्या लेखमालेत संपादकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर काही प्रतिक्रिया अर्थातच आल्या. परंतु बहुतेक साच्या प्रतिक्रिया ह्या परंपरेच्या अभिमानातून जन्म पावलेल्या आणि अभिनिवेशपूर्ण भाषेत लिहिलेल्या होत्या. त्यांच्या प्रकाशनामुळे मासिक निःसंशयपणे अधिक वाचनीय झाले परंतु
विवेकवाद अधिक स्पष्ट होण्याला अथवा त्याचे पाऊल पुढे पडण्याला त्यांचा उपयोग झाला
असे म्हणणे अवघड आहे.
पहिल्या अंकापासूनच सुरू केलेली दुसरी लेखमाला ही बण्ड रसेल ह्यांच्या Marriage and Morals ह्या पुस्तकाच्या अनुवादाची. ‘विवाह आणि नीती’ ह्या नावाने हा अनुवाद मनूताई नातू आणि दि. य. देशपांडे ह्यांनी केला आणि त्याचे एकवीस लेखांक क्रमशः प्रकाशित झाले. वैवाहिक नीतिविषयीच्या संकल्पनांना हादरा देणारी ही लेखमाला वाचकांनी बहुधा काळजीपूर्वक वाचली; परंतु संपादकांना अभिप्रेत असलेली चळवळ त्यातून उभी होऊ शकली नाही.
आजचा सुधारक ह्या मासिकामध्ये चर्चेला घेतलेला आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे धर्म आणि धर्मनिरपेक्षता. ह्या चर्चेमध्ये आमच्या अनेक वाचकांनी हिरिरीने भाग घेतला. अगदी पहिल्या अंकामधील पत्रव्यवहारापासून धर्मविषयक चर्चेला आरंभ झाला
आणि कमी जास्त प्रमाणात आजपर्यंत धर्मविषयक किंबहुना धर्मनिरपेक्षताविषयक संकल्पनांचा ऊहापोह चालूच राहिला आहे.
काही शिक्षणविषयक लेख आजचा सुधारक प्रकाशित करू शकला असला तरी एखादी व्यावहारिक, परिपूर्ण अशी शिक्षणविषयक योजना आपल्या सुजाण आणि सुबुद्ध वाचकांच्या विद्यमाने तो समाजापुढे मांडू शकला नाही हे त्याचे अपयश मान्य केलेच पाहिजे. समाजातील शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की ही चिंता फार थोड्या लोकांना जाणवते आणि आहे ती स्थिती बदलण्यासाठी ठोस पावले उचलण्याची तीव्र इच्छा कोणीच दाखवीत नाही.
आमच्या ह्या मासिकात चर्चिलेला एक महत्त्वाचा विषय स्त्रीपुरुषसंबंध अथवा वैवाहिक नीती हा होय. प्रारंभी जरी तो बटॅण्ड रसेल ह्यांच्या ‘विवाह आणि नीती’ ह्यातूनच जन्म पावलेला असला तरी पुढे त्याने वेगळे रूप धारण केले, आणि तो एक स्वतंत्र विषय म्हणून चर्चेला आला.
आठ वर्षांच्या आमच्या कामाचे फलित पाहू गेल्यास ते फारच अल्प आहे. पुष्कळश्या चर्चा ह्या एका विशिष्ट परिघात गरगरत राहिल्या आहेत. आमच्या वाचकांनी घेतलेले बहुतेक सगळे आक्षेप फार क्वचित मौलिक स्वरूपाचे आहेत. आजचा सुधारकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या (परंपरावादी) दृष्टिकोनाचा प्रचार करण्याचे माध्यम आपणाला उपलब्ध झालेले आहे असा विचार करून बहुतेक सारे आक्षेप मांडले गेले आहेत असे. सगळे लेख साकल्याने वाचल्यानंतर, वाटल्यावाचून राहत नाही. वाचकांचे आक्षेप हे। त्यांच्या स्वतःच्या अनुभवाला धरून असल्यामुळे आणि एका अर्थी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून जन्म पावलेले असल्यामुळे, त्यांची दखल घेणे आम्हाला भागच होते. आम्ही ती तशी घेतली परंतु एखाद्या मुद्द्यावर पुन्हापुन्हा चर्चा करून देखील सश्रद्धांना त्या समस्येचे (प्रश्नाचे) होणारे दर्शन कसे पूर्वग्रहदूषित आहे हे समजावून देण्यात आम्ही कमी पडलो हे मान्यच केले पाहिजे.
मानवी समाज अनेक समस्यांनी ग्रासलेला समाज आहे. ह्या समस्या विवेकाभावामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि विवेकाभाव श्रद्धेतून उदय पावला आहे असे विवेकवादी म्हणतो. तो श्रद्धाजन्य वर्तन आणि उपार्जित वर्तन ह्यांत फरक करीत नाही. समस्येचे सम्यक दर्शन सर्वांना झाले तर त्या सोडविण्यासाठी सर्वांचे प्रयत्नही सारखे होतील असा आमचा विश्वास आहे. पण आजपर्यंत तरी समस्यांचे दर्शन सर्वांना समान अशा त-हेने घडविण्यात आम्ही असमर्थ ठरलो आहोत.
आपल्या संस्कारांबद्दलचा आपल्या मनांमध्ये बसणारा अहंकार वा अभिमान हाच विवेकाच्या मार्गातला सर्वांत मोठा अडथळा आहे. मानवी मनाची आजवर जी वाढ झालेली आहे ती स्वप्रयत्नाने थोडी आणि परस्परांच्या प्रभावाने जास्त अशी झालेली आहे. एखाद्या प्रदेशात अथवा एका विशिष्ट काळात मानवी समाजाची काही एका प्रकाराने घडी बसते, आणि ती त्या काळामध्ये राहणा-या लोकांना नकळत बसते. तिला त्या काळाची आणि प्रदेशाची सामाजिक स्थिती असे नाव थोड्या वेळासाठी द्यावयाला हरकत नाही. त्या त्या काळातल्या त्या घडीची किंवा त्या विशिष्ट परिस्थितीच्या वृक्षाची पाळेमुळे इतकी खोलवर आणि इतकी दूरवर पसरतात तसेच त्याची छायाही इतक्या विस्तीर्ण प्रदेशावर पसरते की तिला संस्कृती (येथे हा शब्द civilization आणि culture ह्या दोन्ही अर्थांनी वापरला आहे) ह्या शब्दाने संबोधता येईल. तर अशा ह्या संस्कृतीचा प्रत्येक मानवी मनाला आधार वाटू लागतो. त्या विशाल वृक्षाच्या छायेतच आपण कायमचे राहावे अशी इच्छा त्याला होते. त्या झाडाच्या छायेत त्याला सर्व सुखच सुख असते असे नाही. त्या जुन्या वृक्षाच्या फांद्या कधी त्याच्या डोक्यावर कोसळतात व दुसरे आश्रयस्थान शोधावयाला पाहिजे अशी गरज एकीकडे त्याला वाटत असली तरी ते निर्माण करण्याची, नव्या विचारांचे नवे रोपटे लावण्याची हिंमत त्याला होत नाही. देवावर अविश्वास दाखविणे किंवा कुटुंबाची नवी रचना करणे म्हणजे ज्या फांदीवर
आपण बसलो आहोत ती फांदी स्वतःच तोडण्यासारखे त्याला वाटते.
मानवी वर्तनामध्ये बहुतेक सारे वर्तन हे एकमेकांकडून शिकलेले असते म्हणजे संस्कारजन्य असते. हे संस्कार प्रत्येक पिढी मुख्यतः आपल्या वडील पिढीकडून घेत असते. आणि हा संस्कार कोणी जाणीवपूर्वक दुस-यांना देत असतो अशातलीही गोष्ट नाही. ती एक हवा असते. ते एक वातावरण असते. हे संस्कार इतके मुरलेले असतात की ते सुटता सुटत नाहीत. परंतु एका बाजूला ते अत्यंत मंद गतीने बदलत असतात हेही खरे. वस्तूंची खाजगी मालकी आपण आपल्या संस्कारामधून शिकतो. कागदी पैशाच्या ठिकाणी असणारे मूल्यसुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनावर झालेल्या समान संस्कारामुळे येते. सामाजिक विषमता म्हणजे स्त्रियांची शूद्रांची स्थिती हे सारे आपण संस्कारांतून शिकत असतो.
लहान शेतक-यांची आजची आत्महत्या करण्यासारखी जी दयनीय अवस्था झाली आहे ती आमच्या सगळ्यांच्या मनात खाजगी मालकीसंबंधी ज्या कल्पना प्रचलित आहेत त्यामुळे उद्भवली आहे. ही अवस्था परमेश्वराने निर्माण केलेली नाही. आमचे हे सारे वर्तन संस्कारजन्य वर्तन आहे. शेतीचे चांगले उत्पन्न (मग ते कोणालाही झालेले असो) म्हणजे सर्वांचा फायदा आणि कोणाच्याही शेतीचे नुकसान म्हणजे सगळ्यांचे नुकसान हा विचार समाजातल्या प्रत्येकाला मान्य असता तर आजच्या नापिकीचे परिणाम एकेकट्याला भोगावे लागले नसते. आज ते भोगावे लागतात ह्याचे एकमेव कारण आमच्या मनावरचे संस्कार हे आहे.
वर्तनामध्ये परिणत होणारे मानवी संस्कारांचे हे माहात्म्य कमी करण्याचा आणि तेथे विवेकाची प्रतिष्ठापना करण्याचा एक क्षीण प्रयत्न म्हणून आजचा सुधारकचे अस्तित्व आहे. कोणकोणत्या बाबतींत संस्कार आपले वर्तन ठरवितात व त्यांच्या अभिमानापोटी संघर्ष कसे निर्माण होतात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे – म्हणून आपण येथे थांबू या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.