स्फुटलेख

अकारविल्हे रचनेमध्ये ‘अ’ चे स्थान
एकदोन महिन्यांपूर्वी सत्यकथा साहित्यसूची ह्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे झाले. ही सूची श्री. केशव जोशी ह्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक सिद्ध केली आहे. सूची नुसती चाळली तरी त्यांच्या परिश्रमाच्या खुणा जागोजाग दिसतात. सूची सहजिकच अकारानुक्रमाने रचली आहे. आणि येथेच म्हणजे अकारानुक्रमाच्या बाबतीत आजवर एक विवाद्य राहिलेला प्रश्न पुन्हा चर्चेला घ्यावयाचा आहे. तो वर्णमालेमधल्या ‘अ’ ह्या वर्णाबद्दल आहे.
वर्णमालेतल्या अं ह्या अक्षराच्या, नव्हे वर्णाच्या, स्थानाबद्दल कोशकारांचा नेहमीच घोटाळा होत आला आहे. मराठीतले निरनिराळे कोश अं चे स्थान निरनिराळ्या जागी कल्पून रचले गेले आहेत. सुमारे वीस वर्षांपूर्वी मराठी विश्वकोशाच्या प्रकाशनाला आरंभ झाल्यापासून कोशकारांमधला किंवा सूचिकारांमधला ह्याविषयीचा मतभेद मिटला असावा असा आमचा समज होता. विश्वकोशामधील नोंदींची सुरुवातच मुळी अंक ह्या शब्दाने झाली आहे. प्रस्तुत सूचीत हा क्रम पाळण्यात आलेला नाही आणि तो न पाळण्याची कारणे देण्यात आलेली नाहीत.
अं संबंधी घोटाळा होण्याचे कारण तो अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ ह्यांसारखा स्वतंत्र स्वर आहे की तो स्वरादि वर्ण आहे अथवा ते अनुनासिकाचा बोध करून देणारे ( )
हे चिन्ह आहे हे कोशकारांना ठरविता आलेले नाही. अनुनासिकांमध्येही कमीत कमी दोन * प्रकार आहेत. पहिला इन ण न म ह्या अनुनासिक व्यंजनांचा. (हे स्पष्ट व्यंजनोच्चार असून त्यांच्या उच्चारांमध्ये आघात येतो व त्यामुळे त्यांच्या अगोदरच्या अक्षराच्या ठिकाणी गुरुत्व येते. उदा अंक, शंख, वंग, संघ, चंचु वगैरे अनेक संस्कृत शब्द. ह्या संस्कृत शब्दांचे लेखन अनुस्वाराऐवजी परसवर्ण वापरूनही करता येते. उदा अङ्क, शङ्ख, वङ्ग, सङ्घ, चश्च वगैरे. मराठी शब्द पुंगळी, उंट, भिंत वगैरे. दुसरा प्रकार यूँ वा यूँ च्या उच्चाराचा. यरलवशषसह ह्या वर्षांपूर्वी अनुनासिक व्यंजन आल्यास त्या व्यंजनाचा आघातपूर्वक उच्चार वर उल्लेखिलेल्या यूँ वा सारखा होतो. हा उच्चार अनुस्वारानेच दाखविता येतो, (येथे परसवर्ण वापरता येत नाही) आणि तो संयम, संरक्षण, पुंलिंग, किंवा, वंश, मांस, सिंह अशा शब्दांमध्ये आढळतो. तिसरा प्रकार हा अं, हं ! सू सू अशा मराठी उद्गारांमध्ये क्वचित् । दिसतो, पण हिंदीमध्ये कहां, जहां, वहीं, हैं, हूं, कुंवारा ह्या शब्दांचा आहे. हा निराघात अनुनासिक स्वराचा उच्चार आहे. हा संस्कृतांतल्या हाँ हाँ ह्या बीजमन्त्रांत आढळतो. हा नाकातून उच्चारलेला स्वर आहे. हा पूर्वी नेहमी ह्या , चिह्नाने दाखविला जात होता. अलीकडे तो केवलानुस्वाराने (ॐ) दर्शविला जातो.
अनुस्वार फक्त अ ह्या स्वराला लागत नसल्यामुळे आणि सगळ्याच स्वरांना लागून अं आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औं अथवा अँ, आँ, ईं, ईं, उँ, ऊँ अशी त्या स्वरांची रूपे होऊ शकत असल्यामुळे त्याचे स्थान आपण समजतो तसे बारखडीमधले अकरावे नाही. तो अ आ इ ई सारखा स्वतंत्र स्वरवर्णच नाही. तो. विभिन्न स्वरांना होणारा त्रिविध विकार आहे म्हणून संस्कृत कोशकारांप्रमाणेच आधुनिक कोशकार त्याचा स्वतंत्र वर्ग मानतात आणि त्याला त्या त्या अक्षराच्या प्रारंभी घेतात. त्याचे स्थान बाराखडीमध्ये अकरावे मानणे चूक आहे.
स्त्रीवाद आणि राजस्नुषा डायना
ग्रेट ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) हिची सून आणि विद्यमान युवराजाची माजी पत्नी तसेच भावी राजाची आई डायना हिच्या वर्तनाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. तिची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी भाचित्रकार सावलीसारखे तिच्या मागे लागले होते. त्या प्रकरणावर आता पडदा पडला असला तरी तिच्या आयुष्याचे तटस्थपणे समालोचन करून त्यापासून योग्य तो बोध घेण्याची वेळ आता आली आहे.
कोणत्याही त्यांतल्या त्यांत (ग्रेटब्रिटनच्या)—राजघराण्याचा आपल्या कुटुंबात घटस्फोट टाळावे असा आग्रह आम्हाला सहज समजू शकतो. तसा तो प्रत्येकच कुटुंबात असतो आणि असावयाला हवा. त्यांतून जेथे यौवराज्याभिषेकाचे आणि पुढे राज्यारोहणाचे समारंभ वडावयाचे असतात तेथे युवगनाच्या दोन किंवा अधिक, आजी माजी पत्नींचे अथवा युवराज्ञीचे किंवा राज्ञी सम्राज्ञीच्या दोन किंवा अधिक आजी माजी पतींचे स्थान ठरविणे ब्रिटनसारख्या परंपराप्रिय राष्ट्राला अतिशय अडचणीचे वाटावे आणि असे प्रश्न मुळात निर्माणच होऊ नयेत असा प्रयत्न सुरुवातीपासून केला जावा ह्यात काही नवल नाही. अशा राजघराण्यात सून म्हणून जाणा-या मुलीने हे सारे जाणूनच तेथे प्रवेश करणे योग्य झाले असते.
राजाची सून निवडताना नेहमी तोलामोलाचे घराणे पाहिले जाते. त्यामुळे तेथे राजकुमाराच्या प्रेमाला आणि आवडीनिवडीला जसा अजिबात वाव नसतो. तसा तो उपवर कन्येच्या निवडीलाही नसतो. ब्रिटनचे राजघराणे त्याला अपवाद नाही. अशी स्थिती पुढे राहू नये म्हणजे राजघराणीच राहू नयेत व त्यामुळे दुसन्यांच्या खानदानाचाही विचार होऊ नये ही आमची इच्छा असली तरी आजचे वास्तव तसे नाही. आणि हे सारे आपल्या विवाहप्रसंगी डायना जाणत होती. त्यामुळे राजस्नुषेच्या घटस्फोटाच्या मागणीचे समर्थन आम्हाला करता येत नाही.
स्त्रीपुरुषांच्या वैवाहिक एकनिष्ठेचे माहात्म्य जरी आम्ही मानत नसलो तरी हा विषय कधीही सार्वजनिक चर्चेचा होऊ नये असे आमचे मत आहे. हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे म्हणून, इतकेच नव्हे तर राजघराण्यामध्ये अशी लफडीकुलंगडी असणार हे मान्य करून, ती चव्हाट्यावर आणू नयेत एवढे पथ्य वृत्तपत्रांनी आणि प्रसारमाध्यमांनी पाळावालाच हवे होते. वेल्सच्या राजपुत्राच्या आणि राजस्नुषेच्या वर्तनापेक्षा प्रसारमाध्यमांचे वर्तन केवळ अश्लाघ्य नव्हे तर स्पष्टपणे गर्हणीय आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. ह्या संदर्भात स्वाभाविकपणेच एका जुन्या घटनेचे स्मरण होते.
१९३६ मध्ये आठव्या एडवर्डने आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय मिसेस सिम्प्सन ह्या, पूर्वी दोनदा घटस्फोट घेतलेल्या, अमेरिकन महिलेशी विवाह करण्याचा निर्णय केल्यामुळे त्याला पदच्युत व्हावे लागले होते. त्यावेळी प्रधानमंत्री बॉल्डविन ह्यांचा विरोध होता तो मिसेस सिम्प्सन सामान्य घराण्यातल्या होत्या ह्यासाठी नव्हता. तो, इंग्लंडचा राजा तेथला धर्माध्यक्ष असतो. त्याने घटस्फोटितेशी विवाह करण्याला होता. त्यावेळी ह्या समस्येवर उपाय सुचविला गेला तो त्या राजपत्नीला राज़ीपदापासून वंचित ठेवून सामान्य स्त्री म्हणून वागविण्याचा. मंत्रिमंडळाने सुचविलेला उपाय प्रजेला मान्य न झाल्यामुळे आणि कोणालाही प्रजेने मान्य केल्याशिवाय राजपद भोगता येत नसल्यामुळे राजाला प्रजानुरंजन करावेच लागते. अखेर आठव्या एडवर्डला राजसिंहासन आणि मिसेस सिम्प्सन ह्यांमध्ये निवड करणे भाग पडले आणि त्याने पदच्युती स्वीकारून सिंहासनाचा त्याग केला.

वाचनाची आवड अणि टेलिव्हिजन
नवीन पिढीला वाचनाची आवड नाही ह्याविषयी सर्वांचे एकमत आहे आणि त्याचे खापर टी.व्ही.च्या माथ्यावर फोडले जात आहे. पण आमचे असे करणे बरोबर नाही. टी. व्ही.च्या आक्रमणावर मात करण्यासाठी आम्ही एकमेकांच्या सहकार्याने त्यावर इलाज शोधलाच पाहिजे आणि तो ताबडतोब अमलात आणला पाहिजे. आम्हाला आमच्या स्वतःवर तसेच मुलांवर वाचनाचा अमीट संस्कार घडविता आला पाहिजे.
आमचे एक मित्र संगणित्राच्या साह्याने भाषांतर करण्याच्या खटपटीत आहेत. त्यात त्यांना बरेचसे यश आले आहे. त्याचबरोबर ते संगणित्राला वाचावयाला आणि बोलावयाला लावीत आहेत. संगणित्राला शिकविलेल्या भाषांपैकी कोणत्याही भाषेचे पुस्तक त्याच्यापुढे धरल्यास ते यन्त्र तो मजकूर घडवड मोठ्याने वाचू शकेल इतकेच नाही तर ते वाचन त्याला अवगत असलेल्या भाषापैकी एका भाषेत क्षणार्धात भाषांतरित करून सांगेल. आणखी दोन चार वर्षांत हे सहजशक्य आहे आणि तेवढे काम झाले की आज जे निरक्षर आहेत त्यांना साक्षर होण्याची गरज राहणार नाही असे ते म्हणतात. आम्हाला मात्र त्यांचे म्हणणे मान्य नाही. आमचा त्याला असलेला मुख्य आक्षेप श्रवणाच्या गतीला आहे. वाचनाची गती जशी अभ्यासाने वाढू शकते तशी श्रवणाची वाढू शकत नाही. वाचनामध्ये डोळ्यांसमोरच्या मजकुरातील महत्त्वाचे शब्द टिपत आपण बराच मजकूर झटक्यात वाचू शकतो. तसे श्रवण होऊ शकत नाही. गरज पडल्यास संदर्भासाठी पुन्हा मागे जाणे जसे वाचनात सहजशक्य आहे तसे श्रवणात नाही, म्हणून थोड्या वेळात जास्त ज्ञान ग्रहण करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. Internet चे जाळे जरी घराघरात पसरले तरी त्यावरचा मजकूर नजर फिरवून वाचावाच लागेल. वाचन श्रवणाची जागा घेऊ शकत नाही हे जसे खरे, तसे श्रवण वाचनाची घेऊ शकत नाही हेही खरे. चित्रे, आकृती ह्या वाचनातूनच प्राप्त होतात. वाचनाला पर्याय नाही हे एकदा ठरल्यानंतर वाचकाला वाचनाची गोडी कशी लागेल ते समजून घेणे आवश्यक होते. टी. व्ही. च्या आगमनापूर्वीसुद्धा प्रत्येक साक्षराला वाचनाची गोडी नव्हती. निरक्षरावर जसा साक्षरतेचा संस्कार चिकाटीने करावा लागतो, तो न केल्यास माणूस साक्षर होत नाही तसा साक्षरावर वाचनाचा संस्कार चिकाटीने करावा लागतो. वाचनातून रसास्वाद मिळतो ही अनुभूती वाचकाला द्यावी लागते. ती अनुभूती येईपर्यंत वाचन हे नीरस आणि त्यामुळे कष्टप्रद असते. मुद्दाम सराव करून हा टप्पा ओलांडला की त्यामध्ये गती येते. गती आली की वाचनाचे भ्रम होईनासे होतात. सायकल चालवावयाला शिकताना आरंभी तोल सांभाळावा लागतो. ते एकदा साध्य झाले की सायकल चालविण्याचे श्रम होत नाहीत. तसेच वाचनाचे.
मराठी भाषकांपेक्षा बंगाली आणि मलयालम् ह्या भाषा बोलणारे लोक सरासरीने अधिक वाचतात. तेथे वाचकांची संख्या अधिक आहे त्याचप्रमाणे प्रत्येक वाचक अधिक पुस्तके वाचतो. तेथे महाराष्ट्राच्या तुलनेने वाचनाची संस्कृती आहे. किंवा असे म्हणू या की वाचन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग झालेला आहे. वाचनाची त्यांना अधिक चटक लागली आहे. अशी चटक एकदा लागली की करमणुकीसाठी सुद्धा टी. व्ही. ची गरज राहत नाही.
वर सायकल चालविण्याचे उदाहरण दिले त्याच्या साह्याने आणखी एक मुद्दा मांडावयाचा आहे. सायकल शिकताना जर सायकल मोडकी असेल, सारखी एका बाजूला वळणारी असेल. भारी चालत असेल तर ती चालविण्यात मौज वाटणार नाही. वाचनाची मौज वाढवावयाची असल्यास वाचनसाहित्य निर्दोष पाहिजे, म्हणजेच लेखन शुद्ध पाहिजे, लेखननियमांत सातत्य पाहिजे. मजकुरावरून नजर घरंगळत गेली पाहिजे. लेखन तसे नसेल, अर्थ समजून घेण्यासाठी दरवेळी उच्चार करून पाहावा लागत असेल, नजर पुन्हापुन्हा थबकत असेल तर वाचनात आनंद वाटू शकत नाही. अशुद्ध लेखन आणि अपरिचित जोडाक्षरांचा वापर ह्यांमुळे नजर थबकते. वाचनात व्यत्यय येतो – ‘नकोच ते वाचन!’ असे होते. आज मराठीमधील लेखनमुद्रणाची स्थिती मोडक्या सायकली सारखी झालेली आहे, वाचकांची वाचनातली गोडी वाढवायची असेल तर ही परिस्थितीसुद्धा आपणाला सुधारावी लागेल.

पत्रव्यवहार
संपादक आजचा सुधारक ह्यांस
प्रकृतीच्या कारणामुळे व प्रवासामुळे एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झालेला श्री. निरंजन आगाशे ह्यांच्या पत्रावर आजवर काही लिहू शकलो नाही. आताही उशीरच झाला आहे. फार उशीर झाला असला तर पत्र प्रसिद्ध नाही केले तरी माझी काही हरकत नाही.
१) चीनचा उल्लेख आला म्हणून मी ह्या वादात पडलो हे रा. निरंजन आगाशे ह्यांचे म्हणणे रास्त आहे. पण माझ्या ‘‘भाष्यांत शेरेबाजीच जास्त आहे असा त्यांचा समज का व्हावा ते कळत नाही. माझी शैली व माझा आशय ह्यात बरीच मंडळी बरेच वेळा गफलत करीत असतात. तसाच हा प्रकार दिसतो!
२) “चीनच्या जडणघडणीत राष्ट्रवादाचेही स्थान महत्त्वाचे आहे हे कबूल करणे मला अजिबात जड जात नाही. तसा श्री. आगाशे ह्यांचा समज आहे हे उघड दिसते. राष्ट्रवादासंबंधीची ‘डावी भूमिका अमुक अमुक आहे व गो. पु. देशपांडे, ते डावे असल्याने, ती भूमिका मांडत असणार असे त्यांनी गृहीत धरलेले दिसते. राष्ट्रवाद राष्ट्रवाद म्हणून त्याज्य ठरत नाही हे मी माझ्या या आधीच्या टिपणातही मांडले होते. ते पुनः मांडतो. चीनमधला राष्ट्रवाद कायमचा प्रगमनशील आणि इथला कायमचा प्रतिगामी असे मी कधीही म्हटलेले नाही. किंबहुना राष्ट्रवादाची प्रगमनशीलता भूगोलावर आधारित नसते असेच मी मानतो. प्रगमनशीलतेची व्याख्या करायला हवी हे एक आणि एकदा भौगोलिक व्याख्या नाकारल्यावर एका देशांतील राष्ट्रवाद हा सर्वकाळ प्रगमनशील असत नाही हे लक्षात घ्यावे लागेल हे दुसरे. जर्मन भाषकांना एकीकडे नेणारा १९ व्या शतकातला जर्मन राष्ट्रवाद आणि त्याच जर्मनांचा हिटलरच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवाद ह्यांत मी फरक करतो. श्री. आगाशेही करत असतील. असे फरक करायचे तर त्याचे आधार काय असावेत हा खरा प्रश्न आहे. चीनचा राष्ट्रवाद थोर आणि भारतीयांचा राष्ट्रवाद गौण अशी मांडणी मली तरी अभिप्रेत नाही. फक्त श्री. आगाश्यांनी केलेल्या मांडणीतील “चीनचा राष्ट्रवाद प्रगमनशील आणि परंपरेची केंद्रे उज्जीवित केली पाहिजेत असे सांगणारा भारतातील राष्ट्रवाद’ (तिर्यकीकरण माझे) हा फरक मला हुषारीचा वाटतो. “त्यांचा” आपला विशेषणरहित राष्ट्रवाद आणि आमचा एक विशिष्ट (Specific) राष्ट्रवाद अशी जोडी वाचकापुढे ठेवणे ह्यात हुषारी आहे. ती त्यांना । करायची तर त्यांनी करावी. पण त्या दृष्टिकोनाविषयी शंका असणारे मात्र मुदलात राष्ट्रवादाविरुद्ध आहेत, किंवा राष्ट्रवाद हे संशयित मूल्य (doubtful value) मानतात असे सुचविणे रास्त नव्हे.
३) मी श्री. आगाश्यांचा बंदोबस्त करायला निघालो नव्हतो. ते चौसाळकरांचा बंदोबस्त करायला निघाले होते. मी फक्त काही शंका व्यक्त केल्या एव्हढेच.
४) हान वंशाचे लोक अल्पसंख्य प्रदेशात वसवून अल्पसंख्यकांना कायमचे अल्पसंख्यक बनविणे चालले आहे हा आरोप नेहमी होत आलेला आहे. माझा प्रतिवाद त्यांना ‘‘संदिग्ध’ वाटला तर ते चांगले आहे कारण पुरेशा व ठोस पुराव्याशिवाय अशी मांडणी हसमानबाईंनी केली तर ते त्यांना शोभून दिसते. मला दिसणार नाही. अशा बवंशी सगळ्या लेखनात ‘ठोकून देतो ऐसा जे’ असे बोलणे/लिहिणे फार असते. प्रांतवार आकडेवारी दिलेली नसते. जिथे दिलेली असते तिथे चिनी सरकारची आकडेवारी नाकारलेली असते. अमेरिकन समाजशास्त्रज्ञांनी दिलेली आकडेवारी आणि खुद्द चिन्यांनी दिलेली आकडेवारी ह्यांत पहिली जास्त विश्वासार्ह मानण्याचे मला तरी कारण दिसत नाही. आगाश्यांना तो तर्क मान्य असला तर माझा स्नेहाचा सल्ला असा आहे की अमेरिकन मतमतांतरे – विशेषतः आशियाई देशांच्या बाबतीतली त्यांनी काळजीपूर्वक तपासून पाहावीत. त्यांनी तीच ग्राह्य वाटत असतील तर मात्र माझे काही म्हणणे नाही.
५) राष्ट्रवादाची विवेकशील चर्चा आपल्याकडे होत नाही, फारशी झालेली नाही. राष्ट्रवाद ही संज्ञा आजकाल विशेषणे घेऊनच अवतरत असते. वांग गुंगवू ह्या चिनी राज्यशास्त्रज्ञाचा पुढील परिच्छेद आगाश्यांना उद्बोधक वाटावा.
Nationalism is usually qualified by a name or an adjective. Most commonly, it is preceded by the name of the country or territory, or the people….. for other purposes, generic adjectives are used. Political, economic and linguistic nationalism are some common examples, but also religious nationalism, developmental, multinational, ideological. cultural, historical, revolutionary, and sQ on. Some of these usages have been applied to China at one time or another during this century…
(Wang (Gung wu : The Revival of Clan Nationalisa, Leiden. 1996. P. 7)
६) सारांश काय की विशेषणापासून सुटका नाही. राष्ट्रवाद” हा श्रद्धेचा विषय असतोच, पण त्याच्या जोडीला जर तो विवेकाचा विषय व्हायचा असेल तर त्याला लागणाच्या किंवा राष्ट्रवादाच्या वापरातून ध्वनित होणा-या विशेषणांकडे वळावे लागते.
आमच्यासारख्यांचे काही राष्ट्रवादांशी भांडण असलेच तर ते ह्या विशेषणांतून निर्माण होते. भूगोलातून नव्हे. कारण भूगोलाच्या सर्वच भागांत हे विशेषणांचे प्राबल्य आहे व असते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.