संपादकीय

(१) आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
(पुढे चालू)
मागच्या लेखात आम्ही परिस्थितिशरणतेचा उल्लेख करताना ही शरणता फक्त ऋणकोची असते असे नाही, ती धनकोचीदेखील तितकीच असते असे विधान केले आहे. आम्हाला असे म्हणावयाचे आहे की धनकोच्या कल्पनाविश्वांत-मनोविश्वात दुस-या कोणत्याही शक्यतेचा, वेगळ्या परिस्थितीचा विचार डोकावत नसल्यामुळे, त्यापेक्षा निराळी परिस्थिती त्याने स्वप्नातदेखील पाहिलेली नसते त्यामुळे; इतकेच नाही तर ऋणकोची ही दुःस्थिती त्याच्या पूर्वजन्मीच्या दुष्कृतांमुळे आणि आपली स्वतःची सुस्थिती आपल्या बापजाद्यांच्या शेवटल्या जन्मातल्या आणि आपल्या पूर्वजन्मातल्या सुकृतामुळेच आपल्या वाट्याला आली आहे अशी त्याची बालंबाल खात्री असल्यामुळे धनकोच्या मनाला अन्यायाची टोचणी लागत नाही. (यह तो दुनिया का दस्तूर है !) ही परिस्थिती बदलविण्यासाठी आपली इच्छाशक्ती तो लावत नाही.
ह्याप्रमाणे ऋणकोदेखील आपले जीवन दैवाधीन आहे असे मानून चालत असल्यामुळे आपल्या वाट्याला आलेले भोग स्वीकारून ‘ठेविलें अनन्ते तैसेचि राहावे, चित्तीं असों द्यावे समाधान’ ही वृत्ति बाणविण्याचा प्रयत्न करीत असतो. (आणि बाकीच्या बहुतेक सान्यांना परदुःख शीतल असते.)
ह्या साच्या परिस्थितीमागे असलेली माणसाच्या मनाची गुंतागुंत-माणसाच्या विचारव्यूहाच्या उत्क्रान्तीचा टप्पा- हे सारे त्याला म्हणजे ऋणकोला पूर्णपणे अनाकलनीय असल्यामुळे त्या परिस्थितीचे कर्तृत्व तो देवाला देतो आणि आपल्या भोगांचे जनकत्व, ज्यांचे त्याला, किंवा त्याच्या माहितीतल्या कोणालाही, स्मरण नाही अशा आपल्या पूर्वजन्मींच्या पापाला देतो. देवावरच्या विश्वासामुळे ह्या परिस्थितिशरणतेला एक जास्तीचा आयाम प्राप्त होतो. ते एक वेगळेच रसायन बनते. एवढ्यामुळेच ईश्वरावर ठाम विश्वास ठेवणारे लोक वास्तव परिस्थितीचे यथार्थ दर्शन घेऊ शकत नाहीत, त्यांना आपली बुद्धि तेथपर्यंत शिणविता येत नसल्यामुळे ते ईश्वरावर भार टाकतात असे आम्हाला वाटते.
परिस्थितिशरणांचा एक आणखी (तिसरा) प्रकार आहे. ही व्यक्ती स्वतः ऋणको किंवा धनको नाही. हा एक ज्याच्या मनात दयाबुद्धि आहे, ज्याला परदुःख शीतल नाही, असा तिहाईत आहे. त्याने आपले मनोगत आपल्या शब्दांत व्यक्त केले तर ते खालीलप्रमाणे असेल :
‘ईश्वर आहे’, ही सृष्टि ईश्वराने निर्माण केली आहे. ती निर्माण करतानाच तिच्यामध्ये विषमता निर्माण केली गेली आहे. (एका हाताचीं पांची बोटे सारखी नसतात.) परंतु मानव म्हणून माझे कर्तव्य आहे की मी इतर मानवांना समानतेने वागवावयाला पाहिजे. मी जरी काहींपेक्षा जन्माने श्रेष्ठ असलो तरी, इतरांपेक्षा धनाने श्रेष्ठ असलो तरी, मी न्यायी असावयाला पाहिजे. न्यायी असणे माझ्या हातांत आहे. माझ्या आटोक्यात आहे.
‘ईश्वराची लीला आम्हाला कळत नाही. ती अगाध आहे. त्याच्या दरबारात देर आहे पण अंधेर नाही. तो अन्यायी नाही. आम्ही अजाण असल्याकारणाने आम्हाला त्याचे हेतु आज समजत नाहीत. कोणावर अन्याय होत असलेला दिसत असला तरी तो अन्यायग्रस्ताच्या अंतिम हितासाठीच आहे. ईश्वराची तशीच इच्छा आहे. मी तो अन्याय पूर्णपणे दूर करू शकत नाही. माझ्या ठिकाणी ते सामर्थ्य ईश्वराने निर्माण केलेले नाही. मी केवळ त्या अन्यायाचा साक्षी आहे. परमेश्वराच्या मनात हा अन्याय दूर करण्याचे जेव्हा येईल तेव्हा तो सर्वांना तशी प्रेरणा देईल आणि तेव्हाच तो नष्ट होईल. त्या सर्वशक्तिमान ईश्वराच्या इच्छेपुढे माझे पामराचे काय चालणार!
‘मात्र माझ्या मनात जी करुणा आहे ती ईश्वरानेच निर्माण केली आहे. वैयक्तिक पातळीवर दुःख आणि पीडा निवारण करण्याचे कार्य केल्याने मी ईश्वराचेच कार्य करणार आहे असे मानावे आणि मी अन्यायाचा प्रतिकार, अन्यायाचे निर्मूलन करू नये तर त्याचे निवारण सेवेच्या, दानधर्मादींच्या साहाय्याने करावे. मी माझ्या शक्तीप्रमाणे इतरांवर कृपा करावी. आप्पलपोटेपणा करू नये. गर्वाने फुगून जाऊ नये. पुण्य मिळवावे.
‘अन्यायनिर्मूलन, अन्यायाचे उच्छेदन करण्याचे सामर्थ्य ईश्वर फक्त आपल्या अवतारांमध्ये त्याचा कृपाप्रसाद प्राप्त झालेल्या प्रेषितांमध्ये निर्माण करीत असतो. तसा प्रसाद प्राप्त करण्यासाठी जन्मोजन्मीची तपश्चर्या आवश्यक आहे. मी ती केलेली नाही. तो प्रेषित मी आहे असे जर मी मानू लागलो तर माझ्यासारखा अहंकारी मीच!’
ह्या साच्या विचारसरणीचा परिणाम असा होतो की आम्हाला आमच्या समाजात अन्याय आणि विषमता कायम राखणे जरूर होते. ‘ह्या जगातून अन्याय आणि तज्जन्य विषमता नष्ट झाल्यास मला कोणावरच उपकार करता येणार नाहीत; दयाधर्म, उपकार, करता येणार नाहीत; मला पुण्यलाभ होणार नाही. चित्रगुप्ताकडचे माझे खाते, माझे जमेचे पान, कोरे राहील.’ असा विचार करून ती दीनदयाळू व्यक्ती विषमता टिकविण्यास कारणीभूत ठरते.
ह्या उलट विवेकवादी म्हणतो :
‘ईश्वर नाही. ही सृष्टि आणि तदंतर्गत विषमता ईश्वरनिर्मित नाही, ती मानवनिर्मित आहे. ती त्याने अबोधपणे (unconsciously) केली असेल, मानवाला त्याची जाणीव नसेल पण तेवढ्या कारणावरून तिचे कर्तृत्व मला ईश्वराच्या ठिकाणी कल्पिता येत नाही. एका माणसाने दुस-या माणसाला दिलेली समतेची वागणूक ही एकाने दुस-यावर केलेली मेहरबानी नाही. मानवांमध्ये गुणदोष कमी जास्त असले तरी सर्व मानवांचा दर्जा समानच हवा. जो ईश्वर नाही तो एखाद्या मानवप्राण्याच्या अंतिम हितार्थ अन्याय कसा करू शकेल? अन्याय मानवी आहे, तो मानवच दूर करू शकेल. तेव्हा तो दूर करण्याचे कार्य माझे आहे, आमचे आहे. तो आम्ही आणि आताच दूर करणार ! अन्याय दूर करण्याच्या बाबतीत मी एकटा दुर्बल असलो तरी समूहशः आम्ही दुर्बल नाही. थोडक्यात, समूहशः आम्ही परिस्थितिशरण असण्याचे काहीएक कारण नाही.’
संस्कारजन्य परिस्थितिशरणतेचे आणखी काही किस्से आपणास पाहायचे आहेत. त्यापैकी एक आता पाहू. पी. साईनाथ ह्यांनी लिहिलेली आणखी एक हकीकत एका प्रास्ताविक टिप्पणीनंतर त्यांच्या शब्दांत पुढे येत आहे.
काही दशकांपूर्वी बिहारमधल्या पालामाऊ येथे विनोबा गेले होते. ‘भूमिदान यज्ञ हम सफल बनायेंगे’ असा संकल्प करून त्यांनी तेथले वातावरण भारून टाकले होते. भूदानयज्ञाची कामे त्यांच्या गैरहजेरीतही पुढे चालावी म्हणून त्या गावी त्यांनी एक आश्रमदेखील स्थापन केला होता. विनोबांचा हेतु आणि प्रयत्न अत्यन्त स्तुत्य ह्यांत अजिबात शंका नाही. पण आम्हा भारतीयांचे आचरण ठरविणा-या आपल्या मनावरच्या दृढ संस्कारांमुळे तेथल्या जनतेने विनोबांचा पूर्ण पराभव केला. ही सर्व हकीकत वाचल्यानंतर आपली सगळ्या भारतीयांची आजची संस्कृती कोणत्या दर्जाची आहे त्याची स्पष्ट कल्पना येते.
गोपालसिंग एका आगळ्यावेगळ्या कज्ज्यामध्ये गेली वीस पंचवीस वर्षे अडकलेला आहे. दशावधि वर्षांपूर्वी विनोबांचे भूदान-आरोहण पालामाऊला पोचले होते. संपन्न जमीनदारांनी स्वतःच्या मनातील करुणाभावाचा आदर करावा आणि भूमिहीन जनतेला आपलेच भाऊबंद मानून आपल्या भूमीपैकी कमीतकमी षष्ठांश भाग भूदानचळवळीत आपण होऊन द्यावा असे त्यांनी आवाहन केले आणि त्याला प्रतिसाद म्हणून ज्या अनेकांनी भूमिदान केले, त्यांत गोपालसिंगाचा शेजारीही होता. ती त्याची कृती औदार्याची होती त्यात संशय नाही. फक्त त्या शेजा-याने जी जमीन दिली ती त्याची स्वतःची नव्हती, ती ज्याच्याशी त्याचे भांडण चालू होते त्या गोपालसिंगाची होती. गोपालसिंग तेव्हापासून आपल्या दानात गेलेल्या जमिनीचा पुन्हा ताबा मिळविण्यासाठी, गेली अनेक दशके, वकिलांच्या घरांचे आणि कोर्टाचे उंबरठे झिजवतो आहे.
भूदानयज्ञात ज्यांनी मोठी दाने दिली त्यापैकी एक शकूरमियाँ आहे. त्याने विनोबानगराला आपली अठ्याऐंशी एकर जमीन दिली. ही जमीन एका टेकडीच्या माथ्यावर
आहे. गेल्या काही वर्षांत त्या प्रदेशाच्या सुधारणेसाठी सार्वजनिक पैसा पुष्कळ प्रमाणात खर्च झाला आहे रस्ता, शाळा, आरोग्याचे उपकेन्द्र वगैरे पण प्रत्यक्षात तेथे एका कच्च्या रस्त्याशिवाय काहीच नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की शकूरमियाँच्या दातृत्वामुळे त्याच्या वारसांनी काहीच गमावले नाही. त्यांच्या बेनामी जमिनींमध्ये त्यांच्या भूदानपूर्व जमिनीपेक्षा भरच पडली आहे!
रिहालदाग ह्या खेड्यातला मुनेश्वरसिंह जेव्हा मला लटेहरच्या कोर्टात भेटला तेव्हा तो तावातावाने बोलत होता. त्याचा राग मी समजू शकलो. सुमारे पंचवीसतीस वर्षांपूर्वी मोंग्रा
आणि गंगा ओराँव ह्यांनी आपली काही जमीन भूदानात दिली होती. त्या जमिनीचा लाभार्थी होता बिट्टसिंग-मुनेश्वरसिंगाचा बाप. गेल्या पाव शतकामध्ये ओराँव मंडळींनी जमिनीवरची
आपला ताबा सोडलेला नाही आणि मुनेश्वरसिंगाची कोर्टकचेयांपायी दमछाक झाली आहे.
वीसपंचवीस वर्षांपूर्वी के. सुरेश सिंग नावाचे एक डेप्युटिकमिशनर (कलेक्टर किंवा प्रान्तसाहेब) पालामाऊ भागात होऊन गेले. माणूस भला होता. त्यांचे आदरपूर्वक गुणगान करणारी मंडळी अजून तेथे भेटतात. तर ह्या सुरेशसिंगांनी भूदानयज्ञाचे मर्म जाणून ते अमलात आणण्याचा यत्न केला. पण भूदानाचा विचार तेथे रुजला नाही. जमीनमालकवर्गाने जे स्वयंप्रेरणेने केले असे बाहेरच्यांना दिसले तो वास्तवात एक संधीसाधूपणा होता. भूमिदान यज्ञाची आदर्शवादापासून जी चलाखीपर्यंत किंवा धोकेबाजीपर्यंत घसरण झाली तिचे दर्शन ज्याला कुरूप, हिडीस म्हणावे असे आहे. पालामाऊच्या वाट्याला अनेक बुद्धिमान, साधुवृत्तीचे उत्तम वरिष्ठ शासक आले पण ही घसरगुंडी ते रोखू शकलेले नाहीत.
काही थोडे चकित करणारे अपवाद आम्हाला आढळले नाहीत असे नाही. त्यापैकी एक चांदवा गावाच्या, साठी उलटलेल्या, सायकलीवर हिंडणाच्या विश्वभर दबे ह्यांचा. ते भूमिहीनांना जीव तोडून मदत करतात. भांडणे सोडविणे, भ्रष्ट जमीनमालकांनी गिळंकृत केलेली जमीन त्यांच्या घशातून काढणे ही कामे भूमिहीनांसाठी ते आपली समजून करतात. दुबेजी हे रचनात्मक कार्यकर्ता समाज ह्या सेवाभावी संस्थेचे क्षेत्रीय उपाध्यक्ष आहेत. माणूस कसा निर्मळ, पारदर्शक आहे. दुर्दैव असे की आपले अर्धे आयुष्य त्यांनी ज्या कार्यासाठी वेचले त्याच्या अधःपाताचेही तेच साक्षी आहेत. ज्या जमीनमालकांनी भूदानयज्ञाच्या माध्यमातून आपल्या जमिनीं भूमिहीनांमध्ये भ्रातृभावाने वाटून द्याव्या अशी अपेक्षा होती त्याच जमीनमालकांनी ह्या आंदोलनाचा फायदा घेऊन बेकायदेशीरपणे आणखी जमिनी बळकाविल्या आहेत हे बघून दुबेजी अतिशय उद्विग्न झाले आहेत.
‘१९५२ मध्ये विनोबांच्या पदयात्रेपासून भूमिग्रहणाला सुरुवात झाली आणि १९५७ पासून तिचे वितरण सुरू झाले,’ दुबेजी सांगत होते. प्रत्यक्ष जमीनदाराला साद घालून, त्याच्या हृदयातल्या करुणेला आवाहन करूनच भूमिहीनांचा प्रश्न सुटेल असा विनोबाजींना विश्वास होता. ही साद त्यांच्या हृदयापर्यंत पोचली तर ते आपण होऊन आपल्याजवळच्या जास्तीच्या भूमीचा हिस्सा आपल्या बांधवांना देतील असे ते मानत होते. भूमीच्या विषमवाटपामुळे जे संघर्ष होतात, रक्तपात होतात ते सारे आपण जमीनदारांचे हृदयपरिवर्तन घडवून आणू शकलो तर टळतील असे विनोबांना वाटत होते. पण विनोबांच्या अपेक्षेप्रमाणे काही घडले नाही. खुद्द विनोबाजींचा आश्रम जमीनदारांच्या जमिनीच्या हावेतून सुटला नाही. तोही ज्यांनी राखावयाचा त्यांनीच बळकावला आहे. मूळ आश्रमापैकी फक्त एक विहीर शिल्लक राहिली आहे…..
भूदानयज्ञविषयक सगळे आकडे दुबेजींना तोंडपाठ आहेत. त्यांनी भराभर जी आकडेवारी सांगितली तीवरून असे समजले की महुवादानी, बरवडी आणि गारू ह्या पालामाऊ जिल्ह्यामधल्या तहसिलींत २६८ गावांमध्ये १०३२ लाभार्थीना २७३४ एकर जमीन वाटण्यात आली. इतक्या मोठ्या जिल्ह्यात हे काम म्हणजे दर्या में खसखस! पण हे आकडेही आपली फसवणूक करतात. ह्या जमिनीपैकी अर्थी जमीन वाहितीखाली कधीच येऊ न शकणारी निव्वळ बरड आहे. काही जेमतेम पिकविणारी आहे. भाकड गाय भटाला दान असा सारा प्रकार ! १९८८ नंतर पालामाऊ जिल्ह्याच्या बालुभाट तालुक्यात १५०० एकर जमीन भूमिहीनांना वाटली पण त्यांना आजपावेतो त्यांचे पट्टे मिळालेले नाहीत. चांदवा तहसिलीत ४०० एकर दिली, तेथेहि हेच घडलेले आहे. अर्ध्याहून पुष्कळ अधिक, जवळजवळ ७५% टक्के लाभार्थी, जी त्यांना अजिबात परवडत नाही, अशा कोर्टकचेप्यांच्या दलदलीत फसले आहेत.
‘अनेक न्यायालये ह्या खटल्यांनी संत्रस्त, भ्रान्तचित्त झालेली आहेत. चांदवा तहसिलीतल्या शेराख गावाची गोष्ट. तेथल्या एका माणसाने सामाईक मालकीची अशी जमीन भूदानात दिली की जिचे त्याच्याशिवाय आणखी तीन मालक होते. ते कोर्टात गेले आणि आता तो खटला कोणालाच सोडविता येत नाही असा होऊन बसला आहे.
ज्या गावात विनोबांचा आश्रम होता तेथल्या ग्रामसभेत एका गटाचे वर्चस्व होते. त्या गटाने तेथली भूदानसमितीच बरखास्त केली. इतकेच नाही तर कामाचे सगळे कागदपत्र नाहीसे केले. जी पूर्वीपासून गावाची सार्वजनिक जमीन होती तीही त्यांनी बळकावली. भूदानात जमिनीची देवाणघेवाण झाली; त्यामुळे गावातल्या जमिनीविषयीचे अभिलेख काहींच्या हाती पडले. त्यांत ज्यांना हस्तक्षेप करता आला त्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे.
‘चांदव्यामध्ये लाल कुंदरलाल साहुदेव ह्याचे वारस त्याने पूर्वी दानात विनोबांना दिलेल्या भूमीसाठी आता कोर्टात गेले आहेत. जे आदिवासी लाभार्थी ती जमीन आज कसतात, वाहतात, त्यांच्या ठिकाणी असे खटले वर्षानुवर्षे चालविण्याचे आर्थिक बळ नाही हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे त्या वारसांना जमिनीचा लोभ सुटला आहे. लटेहरच्या कोर्टातही असेच खटले आहेत. रसूल मियाँची जमीन भूदानामधून जाफर मियाँना मिळाली. रसूल मियाँच्या मुलाने जाफरमियाँना एके काळच्या आपल्या बापाच्या मालकीच्या जमिनीवरून तर हाकललेच पण त्याबरोबर जाफरचा स्वतःचा जमिनीचा तुकडा बळकावला. अशा घटनांची यादी न संपणारी आहे, गोंधळवून टाकणारी आहे.’ दुबेजींनी सांगितले.
ज्यांनी दाने दिली पण आपली जमीन सोडलीच नाही असे पुष्कळ आहेत. ज्यांनी दानात दिली आणि काही दिवसांतच परत घेतली असेही आहेत. जिच्यावर आपली मालकीच नव्हती अशी जमीन दानात देणारेही महाभाग आहेत आणि दानात दिलेल्या जमिनीवरच्या झाडझाडोप्याचा, फळांचा मोबदला मागणारेही आहेत. ह्या खटल्यांमध्ये काही साम्य आहे. सारखेपणा आहे. त्यांतून एक प्रकारचा आकृतिबंध नजरेला येतो.
*काही खटल्यांत दाता एक एकरापेक्षा कमी भूमीचा मालक असतो. अशावेळी गोपालसिंगासारखी परिस्थिती असू शकते. गावातल्या त्याच्या शत्रूनी अभिलेखांमध्ये, हेराफेरी केली असण्याची जास्त शक्यता असते.
*दान केलेली जमीन मूळ मालकांनी पुन्हा हस्तगत केलेली दिसते. नवीन मालकाला त्या जमिनीवरून हाकून देताना त्याची स्वतःचीसुद्धा ते हिसकावून घेतात. जमिनीसंबंधाचे खटले वीसपंचवीस वर्षे सहज चालतात त्यामुळे दुबळा पक्ष पूर्ण जेरीला येतो. त्या खटल्यांचा खर्च त्याला भरडून टाकतो.
*जमीनदारीप्रथा नष्ट करण्याच्या सुमारास काहींजवळ जास्तीची जमीन होती. ती जास्तीची जमीन त्यांनी भूदानात दिली आणि तीच सरकारलाही दिली. त्यामुळे प्रचंड गोंधळ माजला. एकच जमीन ताब्यात घेण्यासाठी एकाच वेळी भूदानमंडळ आणि सरकार पुढे सरसावले. त्यांतून खटले उद्भवले आणि ते खटले चालू असेपावेतो मूळ मालक सुखेनैव आपल्या जमिनींचा उपभोग घेत राहिले.
इतक्या वर्षानंतर आता परिस्थितीत थोडा फरक पडला आहे. के. सुरेशसिंगांसारखे सनदी अधिकारी आणि दुबेजींसारखे निःस्वार्थ कार्यकर्ते तेथे लाभल्यामुळे क्वचित् न्यायाची सरशी झाली आहे. पण पी. साईनाथ पुढे म्हणतात की जमीनदारांच्या औदार्यावर आपणाला अवलंबून राहता येत नाही.
हा इतका वृत्तान्त देऊन आता आपण मूळ मुद्दयाकडे वळू या.
दुर्बलांची ससेहोलपट हीच आमच्या देशातील परंपरा आहे. ती शतकानुशतके चालू राहते त्या अर्थी आम्हा सर्वांचा तिला मूक पाठिंबा आहे. ती आमच्या संस्कृतीचा भाग बनून राहिली आहे. आमच्या देशात सहृदयांची संख्या अत्यल्प आहे आणि ते निष्प्रभदेखील आहेत. पिढ्यानुपिढ्या चाललेले अन्याय पाहून त्यांची मने निढवली आहेत. हे सारे आम्ही परिस्थितीतून शिकलो आहोत. आम्ही सारे परिस्थितिशरण आहोत. येथेच विवेकवादी अतिशय अडचणीत येतात कारण विवेकाला परिस्थितिशरणतेचे वावडे आहे.
(२) आमचे धोरण
प्रस्तुत अंकात एकापाठोपाठ दोन संपादकीये येत आहेत ह्याचे कारण अलिकडेच आमचे मित्र श्री. प्रभाकर नानावटी आणि श्री. टी. बी. खिलारे या दोघांनी मिळून आमच्याकडे एक पत्र पाठविले आणि आम्हाला आनंदाश्चर्याचा धक्का दिला. आमच्या ह्या वर्तनामध्ये परिणत होणा-या मानवी संस्कारांचे माहात्म्य कमी करण्याचा आणि तेथे विवेकाची प्रतिष्ठापना करण्याचा एक क्षीण प्रयत्न” म्हणून चालविल्या जाणा-या मासिकाकडे काही मंडळी इतक्या आपुलकीने पाहतात हे समजून आल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला. ह्या पत्राबद्दल आम्ही लेखकद्वयाचे ऋणी आहोत. लेखकद्वयाने निःसंकोचपणे मांडलेली समस्या आमच्या स्वतःच्याही मनात उद्भवली होती, परंतु तिचे स्वरूप त्यांच्यापेक्षा वेगळे होते. आपल्या मासिकात अमक्या जातीचे प्रतिनिधित्व कमी, तमकीचे जास्त असा विचार आमच्या मनात आलेला नव्हता, तर एकूणच आमच्या प्रयत्नात जास्तीतजास्त विचारी-विवेकी-लोकांचा सहभाग कसा वाढेल असा होता. त्यांच्या पत्रीच्या निमित्ताने हा विषय चर्चेला घेणे सोपे झाले. त्यांचे पत्र पुढे देणार आहोत.
पत्र उद्धृत करण्यापूर्वी काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे. आजचा सुधारक या मासिकामध्ये प्रकाशित करण्यासाठी आम्हाला मजकुराची सदैव चणचण भासत आलेली आहे. तेवढ्या कारणामुळेच पुष्कळदा अंकाच्या प्रकाशनाला विलंबही झालेला आहे. मजकुराची गरज भागविण्यासाठी संपादकांना स्वतःला व त्याचबरोबर सहायक संपादक व संपादकीय सल्लागार यांच्यापैकी अनेकांना वेळोवेळी मुद्दाम लिहिते करावे लागले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मासिकाच्या एकंदर स्वरूपात अपरिहार्यपणे आलेला तोचतोपणा उघड्या डोळ्यांनी स्वीकारावा लागला आहे. काही लेखकांना लेख लिहायला सांगितल्यानंतर त्या लेखाचा दर्जा समाधानकारक न वाटल्यामुळे तो पुन्हा लिहायला लावला आहे आणि त्यासोबत त्या-त्या लेखकाची नाराजी पत्करावी लागली आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपण आता श्री. प्रभाकर नानावटी आणि श्री. टी. बी. खिलारे यांचे पत्र समजून घेऊ या आणि त्यातून निर्माण होणा-या प्रश्नांची चर्चा तदनंतर करू या. प्रस्तुत पत्रातील लेखकांच्या विधानांच्या हेतूकडे पाहावे व त्यांच्या हेतूचा कदापि विपर्यास करण्यात येऊ नये अशी आमच्यातर्फेही वाचकांना नम्र विनंती आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.