ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक

गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा चालवणाच्या दि. य. देशपांडे यांनी सुरू केलेल्या आजचा सुधारक ला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या नव्या संपादकांनी ‘सिंहावलोकन आणि थोडे आत्मपरीक्षण केले आहे. (आ.सु. जून ९८) त्यात त्यांनी आजचा सुधारकने केलेल्या कामाचे फलित फार अल्प आहे व पुष्कळशा चर्चा एका विशिष्ट परिघात फिरत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
संपूर्ण ग्रंथव्यवसायाला, त्यातही प्रबोधनपर व गांभीर्यपूर्ण लिखाण असलेल्या नियतकालिकांना अवकळा आलेली असताना, गेली आठ वर्षे, न चुकता (व वार्षिक वर्गणीत वाढ न करता) सकस आशययुक्त व विचारशक्तीला चालना देणारे मासिक काढत असल्याबद्दल संपादक-मंडळासहित सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत. परंतु मराठा वाचता येणा-या समाजासाठीच म्हणून काढलेल्या ह्या नियतकालिकात संपूर्ण मराठी समाजाचे प्रतिबिंब उमटायला हवे होते. जीवनाला भिडणाच्या सर्व समस्यांची साधक-बाधक चर्चा अपेक्षित होती. आजचा सुधारकने विस्तृतपणे चर्चिलेल्या विवेकवाद, स्त्रीपुरुषसंबंध, धर्म व धर्मनिरपेक्षता ह्या विषयांवरसुद्धा समाजातील सर्व थरांतील बुद्धिवंतांचा सहभाग अपेक्षित होता. समाजातील कोणत्या वर्गाचे प्रतिबिंब आजचा सुधारकात जास्त प्रमाणात पडले आहे याचा मागोवा घेण्यासाठी आजचा सुधारकमध्ये लिहिणारे लेखक व वाचणारे आजीव सदस्य यांची यादी तपासून काही निष्कर्ष काढता येतात का याची तपासणी केली.
आजचा सुधारकच्या मार्च महिन्याच्या अंकात वर्षभर प्रसिद्ध झालेल्या लेखांची व त्यांच्या लेखकांची यादी उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रमाणे अधूनमधून आजीव सदस्यांची यादी पण प्रसिद्ध केली जाते. मराठी आडनावांवरून व्यक्तीची जन्माने ठरलेली जात ओळखण्याची सोय असल्यामुळे लेखक व आजीव सदस्य यांच्या यादीत ब्राह्मण व ब्राह्मणेतर किती आहेत याची तपासणी केली. काही आडनावांवरून त्यांची जात नेमकेपणाने न कळल्यामुळे त्यांची वेगळी मांडणी ‘कळू न शकलेले’ मध्ये केली. ‘कळू न शकलेले’ या वर्गवारीतही ब्राह्मण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्राह्मणांची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी की ब्राह्मणेतर या वर्गवारीतून मराठा या उच्च जातीस वगळल्यास मागास वर्गातील लेखकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीही नसेल. याचाच अर्थ आजचा सुधारक ह्या मासिकात लिहिणारे व ते वाचणारे केवळ उच्च जातीय आहेत असा होतो. अशा प्रकारे केलेल्या तपासणीवरून खालील दोन तक्ते तयार करण्यात आले. पत्रलेखन हे प्रतिक्रिया-स्वरूपात व लेखाच्या मानाने कमी शब्दांत असल्यामुळे निदान तेथे तरी समाजातील सर्व थरांतील वाचकांचा सहभाग जास्त असेल या कल्पनेने पत्रलेखनाची स्वतंत्र मांडणी केली आहे.
तक्ता-१
लेखक आजीव सदस्य
संख्या । टक्केवारी संख्या । टक्केवारी
ब्राह्मण १५० ७५ १९० ७३.३
ब्राह्मणेतर ३४ १७ ३७ १४.३
कळू न शकलेले १६ ८ ३२ १२.४
एकूण २०० १०० २५९ १००

तक्ता-२
लेख पत्रे
संख्या टक्केवारी संख्या टक्केवारी
ब्राह्मणांनी लिहिलेले ५१५ ८९.४ १४० ८२.२
ब्राह्मणेतरांनी लिहिलेले ३५ ६.१ १५ ८.९
कळू न शकलेले २५ ४.५ १५ ८.९
एकूण ५७५ १०० १७० १००

ब्राह्मणेतर लेखक व ब्राह्मणेतर आजीव सदस्यांची संख्या ब्राह्मणांच्या मानाने फार : कमी आहे हे वरील दोन्ही तक्त्यांवरून जाणवते. लेखांच्या व पत्रांच्या लेखनाची पण तीच गत आहे. म्हणजेच मराठी समाजातील फार मोठा वर्ग आजचा सुधारकच्या लेखनव्यवहारात सहभाग घेत नाही हे वरील अभ्यासावरून स्पष्ट होत आहे. प्रस्थापित समाजाचा फार मोठा भाग असलेला ब्राह्मणेतर समाज या प्रबोधन-प्रक्रियेमध्ये सहभागी होत नसेल तर ‘समाजाची घडी मुळापासून बदलून ती विवेकाच्या आधारावर उभी करण्याचा उद्देश (आ.सु. मार्च ९८) सफल होणार नाही. आपल्या समाजजीवनात न्याय, समता यांसारखी मूल्ये रुजण्यात मोठी अडचण म्हणजे ज्यांच्यावर सतत अन्याय होत आहे ते आपल्यावरील अन्यायनिवारणार्थ पुढे येत नाहीत. मूकपणे सर्व सहन करतात. त्यामुळे प्रस्थापित घड़ी मोडण्याचे काम कठिण होते. कारण ज्यांना अनुचित लाभ उठवायचा असतो त्यांना घडी मोडण्यात रस नसतो. किंबहुना असे प्रयत्न हाणून पाडण्यास ते उत्सुक असतात.
आगरकरांवर ते ब्राह्मणी सुधारक असल्याचा ठपका ठेवण्यात येतो. या संदर्भात राजेंद्र व्होरा यांनी आपले आगरकरांविषयीचे मत महाराष्ट्र फौंडेशनने प्रकाशित केलेल्या मंथन या स्मरणिकेत पुढीलप्रमाणे व्यक्त केले आहे :
प्रत्येक समाजाच्या विशिष्ट स्थितीत वर्णव्यवस्थेसारखा किंवा जातिभेदासारखा लोकविभाग अस्तित्वात आल्याशिवाय राहत नाही. सुधारणेच्या मार्गावर असलेल्या प्रत्येक समाजात कशा ना कशा प्रकारचा जातिभेद येतोच. विशेषतः ‘भट जात’ अस्तित्वात आलेली नाही असे कोणत्याही सुधारलेल्या देशात आढळणार नाही. आगरकरांच्या मते जातिभेदाने आपले फायदेही झालेले आहेत. प्रस्थापित आंचार यथास्थितपणे चालून समाजास एका प्रकारचे स्थैर्य येते. जो तो क्रमागत आलेला मार्ग आनंदाने आचरतो. फायद्यासाठी एक वर्ग दुस-या वर्गाशी स्पर्धा करीत नाही. कलेचे संगोपन होते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागी खिळली जाऊन आपापले कार्य नीटपणे बजाविते. त्यामुळे सामाजिक रचनेस स्थैर्य लाभते. अप्रत्यक्षपणे व प्रत्यक्षपणे त्यांनी जातिभेदाचे समर्थन केले आहे असे थोडक्यात म्हणता . येईल. इतर सर्व बाबतींत जहाल भूमिका घेण्यास न कचरणारे आगरकर जातिसंस्थेबाबत मात्र सामोपचारी मवाळ भूमिका घेतात. त्यांच्या एवढ्या लेखसंग्रहात जातिभेदावर फक्त एका लेखात चर्चा येते आणि स्त्रियांचा किंवा पुरुषांचा पेहराव या विषयावर मात्र लेखमाला येते. यावरून आगरकरांना आपल्या समाजाच्या मुळाशी असलेल्या जातिसंस्थेबाबत व त्यातील विषमतेबाबत किती महत्त्व वाटत होते हे ध्यानात येते. ब्राह्मण स्त्रियांच्या सामाजिक स्थानाबद्दल पानोपाने मजकूर लिहिणारे आगरकर जातिभेदावर मात्र दोन चार पानांत हात आखडता घेतात हेही लक्षात येते.
परंतु आजचा सुधारकासाठी लेखन करणा-यात जरी ब्राह्मणांची संख्या जास्त असली तरी त्यांचे लेखन रूढ अर्थाने ब्राह्मणी वृत्तीला पोषक आहे असा आरोप कोणीही करण्यास धजणार नाही. किंबहुना अत्यंत तळमळीने सर्व समाजाचे व्यापक हित लक्षात ठेवूनच सर्व विवेचन केले जात आहे. व यावर संपादकांनी लक्ष ठेवले आहे. तरीही ब्राह्मणेतर समाजाला आजचा सुधारक आपला का वाटत नाही हे गूढच राहते. कारण शिक्षणाच्या प्रसारामुळे ब्राह्मणेतर समाजातसुद्धा मोठ्या प्रमाणात वैचारिक लेखन करणारे, समाजाचा सर्वांगीण विचार करणारे बुद्धिवंत आहेत. परंतु त्यांचा सहभाग आजचा सुधारकासाठी का। होत नसेल याचा मागोवा संपादकांनी घेणे गरजेचे वाटते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. नाहीतर काही काळानंतर लेखनातील तोचतोचपणामुळे स्वारस्य कमी होईल.
बहुजन समाजातील लेख सुधारकामध्ये का येत नाहीत याचा विचार केल्यास ‘लेख येत नाही’, लेखाचा दर्जा निकृष्ट असतो’ ही कारणे असण्याची शक्यता आहे. आजचा सुधारकातील लेखनाचा दर्जा पाहिल्यानंतर कुठलाही होतकरू लेखक–विशेषतः ब्राह्मणेतर लेखक – बुजून जाण्याची शक्यता आहे. संपादकांनी अशाप्रकारच्या लेखनाचे पुनर्लेखन करून घेऊन लेखकास उत्तेजन दिल्यास काही प्रमाणात ह्या अडचणी दूर होतील. दर्जा, गुणवत्ता, नेमकेपणा, सूत्रबद्धता यांचा जास्त बाऊ तर केला जात नाही ना ? याचाही पुनर्विचार करायला हवा.
समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊन व काही कळींच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा घडविण्याच्या दृष्टीने इतर पुरोगामी नियतकालिकांतील विशेषतः ब्राह्मणेतर विचारवंतांनी लिहिलेल्या लेखनाचे पुनर्मुद्रण केल्यास ही उणीव काही प्रमाणात भरून निघेल.
एखाद्या विद्याशाखेचे मुखपत्र/नियतकालिक चालवताना लेखक/वाचकांना संख्या मर्यादित असणे स्वाभाविक असते. परंतु आजचा सुधारक हे सर्वसमावेशक व व्यापक प्रबोधनास उत्तेजन देत असल्यामुळे काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी व त्यांची बौद्धिक निकड भागवणारे नियतकालिक होऊ नये यासाठी हा सर्व लेखनप्रपंच!
वरील पत्राच्या संदर्भात वाचकांच्या आणखी एक गोष्ट ध्यानात आणून द्यायची आहे. ती अशी गेल्या आठ वर्षात संपादकांनी फारच थोड्या लेखकांना लेख पाठविण्याची विनंती केली आहे. मासिकाच्या अंकांमधून ज्यांवर लेख हवे आहेत अशा विषयांची सूची प्रकाशित करून लेखकांना सर्वसाधारण आवाहन त्यांनी केले असले तरीपण व्यक्तिशः पत्र लिहून त्यांनी कोणाजवळही लेखाची मागणी केली नसावी. विद्यमान संपादकांनी ही प्रथा थोडीफार मोडली आहे.
श्री. नानावटी आणि श्री. खिलारे या उभयतांच्या आणि त्यांच्या या पत्राच्या निमित्ताने आमच्या सर्व वाचकांच्या एक गोष्ट पुन्हा एकदा येथे लक्षात आणून द्यायला हरकत नाही ती अशी की संपादक मंडळाचा प्रश्न सगळ्यांनाच लिहायला कसे लावावे ह्या स्वरूपाचा राहिलेला आहे. अमक्या जातीच्या लेखकांना कसे लिहायला लावायचे असा प्रश्न त्यांच्या मनात आजवर आलेला नाही, तो त्यांच्या मनाला शिवलाच नाही.
आजचा सुधारक चा आजवरचा प्रयास विचारांना महत्त्व देण्याचा राहिलेला आहे; व्यक्तीला नाही, विचार कोणी मांडला हे तो सांगत असला तरी ती माहिती केवळ संदर्भापुरती असते, व्यक्तिमाहात्म्य वाढविण्यासाठी नसते. अर्थात् एखाद्या विशिष्ट जातीचे जातिमाहात्म्य वाढविण्यासाठीदेखील नसते.
वर उद्धृत केलेल्या पत्रातील काही उदाहरणे घेऊन आमचे धोरण स्पष्ट करण्याची संधी आम्हाला घेता येईल. आम्ही त्या पत्रातील शब्दांचा वा वाक्यांचा तपशिलाने विचार करण्याऐवजी पत्रलेखकाच्या हेतूकडेच लक्ष द्यायचे असे ठरवून त्यांच्या काही थोड्या विधानांचाच परामर्श घेणार आहोत. “विवेकवाद, स्त्री-पुरुष-संबंध, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, ह्या विषयांवरसुद्धा समाजातील सर्व थरांतील बुद्धिवंतांचा सहभाग अपेक्षित होता.’ हे त्यांचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. समाजातील सर्व थरांतील बुद्धिवंतांमध्ये स्त्रियांचाही समावेश होतो हे पत्रलेखकद्धय मान्य करील. इतकेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांचा देखील होतो. त्या सर्वांच्या मतांचे स्पष्ट प्रतिबिंब वरील सर्व विषयांच्या संदर्भात आजचा सुधारक मध्ये पडावे अशी आमची उत्कट इच्छा असून स्त्रियांच्या बाबतीत ती अजिबात फोल ठरली आहे. धर्माच्या आणि स्त्रीपुरुषसंबंधांच्या आमच्या चर्चेत त्यांना पुनःपुन्हा प्रोत्साहित करूनसुद्धा लिहिते करण्यात आम्ही पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहोत. हे प्रोत्साहन पत्रे लिहून आम्ही दिलेले नसले तरी प्रत्यक्ष भेटींमध्ये आपले मत मांडा आम्हाला ते हवे आहे’, अशा स्वरूपात दिलेले आहे.
जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांमध्ये बुद्धिवंतांची वाण नाही; विवेकी, त्याचप्रमाणे सहृदय मंडळींचीही नाही हे आम्हाला पुरते ठाऊक असून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचण्यात अयशस्वी झालो आहोत. आमच्या म्हणजे संपादकमंडळाच्या मनात असलेल्या विषयांवर जनमत आजमावावे ही आमची इच्छा आम्हाला आजवर पूर्ण करता आलेली नाही. त्या दृष्टीने एक दोन प्रश्नावली आम्ही प्रकाशित केल्या परंतु त्यांचा पाठपुरावा करणे आम्हाला प्रायः अशक्य झाले.
आमच्या वाचकांना आणि लेखकांना पुन्हा एकवार स्पष्ट सांगण्याची पाळी आली आहे की समाजातील वर्ग विचारसरणीमुळे पडतात, जन्मामुळे अथवा आर्थिक संपन्नतेमुळे वा विपन्नतेमुळे नव्हे असे आजचा सुधारक आपल्या प्रतिपाद्य विषयाच्या संदर्भात आजवर मानीत आला आहे. जन्माने वा आर्थिक बळाने समाजात त्यात्या व्यक्तीला प्राप्त होणारा दर्जा त्याला मान्यच नाही. समाजात आज आढळणा-या विषमतेचे मूळ जन्मात किंवा काही व्यक्तींच्या खिशात खुळखुळणाच्या पैशात नाही, तर ते आपल्या विचारसरणीत आहे. त्यामुळे आम्हाला विचारसरणीवर हल्ला करायला हवा, वर्गावर नको हे आजचा सुधारक नीट उमजून आहे. एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला केल्यास, त्याला खाली ओढल्यास, अथवा त्या वर्गाचे लाड पुरविल्यास विषमतेचे दृढीकरण होईल; आणि त्यायोगे आमच्या विचारसरणीमधल्या हल्ल्यामध्ये त्याचा अडथळा होऊन बसेल, हेही आजचा सुधारक जाणून आहे. एवढ्याच कारणामुळे आजचा सुधारक आजपावेतो विचार कोठून येतो, विचार कोण देतो ह्यापेक्षा विचार चुकीचा आहे की बरोबर आहे ह्याकडे लक्ष पुरवीत आला आहे. व ह्यापुढेही तेच करण्याचा त्याचा मानस आहे. आजचा सुधारक मध्ये लिहिताना लेखकांनी मी अमक्या धर्माचा, पंथाचा, अमक्या जातीचा वा अमक्या पक्षाचा किंवा मी स्त्री, पुरुष, असा भेद मनात न आणता त्या-त्या समस्येवर तुटून पडावे; जन्माने ठरणाच्या उच्च-नीचतेचे भान त्याने विसरावे; सुधारकांनी धर्मजातिनिरपेक्षसमुदाय म्हणून आपले वेगळेपण सिद्ध करावे अशी आमची इच्छा राहिली आहे.
वरील परिच्छेदाचा अर्थ असा नव्हे की आम्हाला ज्यांच्या लेखनावर हात फिरवून घ्यावा लागेल असे लेखन नको. असे मुळीच नाही. नवीन मुद्दा मांडणाच्या सर्व लेखनाचे मनःपूर्वक, दोन्ही बाहू उभारून, स्वागत आहे. चुकून कोणाच्या लेखनात पक्षपाती मुद्दे आले तर त्यांचे अनाक्रमक भाषेत खंडन करणा-या लेखनाचेही हार्दिक स्वागत आहे.
आपल्याला विवेकाचा वापर निरनिराळ्या क्षेत्रांत करायला पाहिजे. आजवरचे आपले सर्वांचे वर्तन हे संस्कारबद्ध असल्यामुळे पुष्कळ ठिकाणी त्याची विवेकाशी फारकत झालेली आहे. संस्कारप्रभावित आचरण कोणते आणि विवेकपूर्ण आचरण कोणते ह्यांविषयी आमच्या सगळ्यांच्याच मनात असलेला संभ्रम एकमेकांशी बोलून, एकमेकांच्या विचाराने, सल्ल्याने, आम्हाला दूर करायचा आहे म्हणून आम्हाला सगळ्या दिशांकडून प्रश्नांची उप-प्रश्नांची, त्या प्रश्नांच्या उत्तरांची त्याचप्रमाणे प्रत्युत्तरांची अपेक्षा आहे. त्यांमध्ये अर्थातच हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, अमीर-गरीब, शिक्षित-अशिक्षित आणि अर्थातच स्त्री आणि पुरुष असा भेदभाव आम्हाला अपेक्षित नाही,
आगरकरांविषयीचे आपले जे मत श्री. राजेन्द्र व्होरा यांनी नोंदलेले आहे त्यावर चार शब्द लिहून बाकीच्या मुद्यांसंबंधी गरज पडल्यास पुढील अंकात त्यांचा परामर्श घेऊ असे सांगून हा लांबलेला लेख संपवू या.
आजचा सुधारक ने आगरकरांचा वारसा पुढे चालवायचा याचा अर्थ आगरकर जेथे थांबले तेथेच आम्हीही थांबले पाहिजे असा नाही, आणि जातिभेदाच्या बाबतीत त्यांची काही चूक झाली आहे असे आम्हाला वाटत नाही. त्यांच्या डोळ्यांपुढचा समाज वेगळा होता. आगरकरांच्या अल्पायुष्यात जातिभेदाच्या पलिकडे जाणारा समाज निर्माण करण्याची निकड त्यांना जाणवली नसावी. आज त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनी आम्हाला ती जाणवते. औद्योगिकीकरणामुळे आज जे समाजाचे अभिसरण झाले आहे त्याची कल्पनाही त्यांच्या काळात कोणी केली नसेल. समाजरचनेला जे स्थैर्य पाहिजे ते स्थैर्य आज यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन केल्यामुळे आलेले आहे. ते पूर्वी जातींना नेमून दिलेल्या कामांमुळे आलेले होते. उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी आता कोणत्याही जातीची माणसे चालतात. ही स्थिती पूर्वी अज्ञात होती. यंत्रे चालविण्याचे शिकण्यासाठी पिढिजात कौशल्याची गरज नसते.
येथे आणखी एक उदाहरण देतो. आजचे लोक कुटुंबसंस्थेला आज जो आकारबंध आलेला आहे त्याहून वेगळ्या कुटुंबरचनेची कल्पना करू शकत नाहीत. सामाजिक स्थैर्याकरिता कुटुंब-संस्थेची गरज आहे. तेव्हा आज ज्या प्रकारचे कुटुंब त्यांच्या परिचयाचे आहे त्याचप्रकारचे ते भविष्यात असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. तसाच विचार आगरकरांनी कदाचित त्या काळात केला असेल. पण जन्माने माणसाचा समाजातील दर्जा निश्चित होतो असे आम्हाला वाटत नाही. आगरकरांनाही वाटत नसावे.
जातिभेदाविरुद्ध लढा देण्याला ज्यांनी प्रारंभ केला त्यांच्या आयुष्यात त्यांचे कोठे ना कोठे अपमान झाले आहेत असे आढळते. त्या अपमानांमुळे वेगळा विचार करण्यास फुले, आंबेडकर, गांधी यांच्यासारखी मंडळी प्रवृत्त झाली. आगरकरांच्या आयुष्यात तसे निमित्तकारण घडले नसावे, त्यामुळे तर त्यांनी हा विषय मागे टाकला नसेल?
ज्या समाजरचनेच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्या रचनेत मी कोणत्या जातीत जन्मलो हे प्रत्येक माणूस विसरून गेलेला असेल. जुने संदर्भ आणि इतिहास ह्यांवर पूर्ण पडदा पडलेला असेल. आम्हाला जातींच्या ह्या इतिहासातून ताबडतोब बाहेर पडण्याची घाई झालेली आहे. आजच्या विवाहसंस्थेची मोडतोड करण्याची आणि नवीन कुटुंबरचनेची मांडणी करण्याची गरज ह्या जातींच्या दलदलीमधून बाहेर पडण्यासाठीच आम्हाला वाटत
आलेली आहे.
कोणत्याही एखाद्या वर्गाला (जन्माने ठरणाच्या) मुद्दाम प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केल्यास बहुधा धर्मविहीन आणि अर्थात् जातिविहीन समाजनिर्मितीचे लक्ष्य दूर जाते, उद्दिष्ट दुरावते आणि वैयक्तिक वा त्या त्या जातींच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात उभयपक्ष गुंतून पडतात असा आमचा आजवरचा अनुभव असल्याकारणाने आम्ही कोणत्याच पक्षाला, कोणत्याच वर्गाला, बुद्ध्या प्रोत्साहन दिलेले नाही.
श्री. नानावटी आणि श्री. खिलारे यांनी आम्हा संपादकांचे मानस व्यक्त करण्यासाठी एक अनुपम संधी दिली ह्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. अर्थातच ह्या निमित्ताने
उपस्थित झालेल्या म्हणजे लोकांस कृती करण्यास, कार्यप्रवण करण्यास, (ह्यात लेखनही आले) उद्युक्त कसे करावे, त्यांचा सहभाग कसा वाढवावा ह्याविषयी वाचकांच्या आणखी पत्रांची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.