‘एकविसाव्या शतकात संतविचाराची सोबत’

‘ललित’ मासिकाचा मे ९८ चा अंक ‘संतसाहित्य आणि एकविसावे शतक’ या विषयावर विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्यात एकूण सोळा व्यासंगी विद्वानांचे लेख आहेत. त्यापैकी पाच मराठीचे प्राध्यापक असून, दहा संतसाहित्याचे अभ्यासक, हरिभक्तिपरायण, प्रवचनकार इ. आहेत. उरलेले सोळावे एकमेव वैज्ञानिक श्री. वि. गो. कुळकर्णी आहेत. त्या दृष्टीने लेखकांची ही निवड प्रातिनिधिक म्हणता येणार नाही. अशी निवड करण्यात कदाचित् अशी दृष्टी असू शकेल की संतसाहित्यावर लेख मागवायचे तर त्यांचे लेखक त्या विषयाचे अभ्यासक असले पाहिजेत. ते काही का असेना, परिणाम असा झाला आहे की हा विशेषांक संतसाहित्याच्या प्रशंसेकरिताच काढला आहे असा समज होतो; कारण श्री वि. गो. कुळकर्णी या वैज्ञानिकाचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्वांनी संतसाहित्य एकविसाव्या शतकात अतिशय उपयुक्त नव्हे, तर अत्यंत आवश्यकही राहणार आहे असे प्रतिपादन केले आहे. श्री. वि. गो. कुळकर्त्यांनी मात्र असे मत दिले आहे की कालचे संतसाहित्य नव्हे, उद्याचे विज्ञानच विश्वाला तारील.’ संत साहित्याची एकविसाव्या शतकात कसलीही जरूर भासणार नाही, एवढेच नव्हे तर एकविसाव्या शतकातील समस्यांना तोंड देण्याची ताकद त्या साहित्यात नाही.
या अंकातील संतसाहित्याला अनुकूल लेखापैकी एक लेख तत्त्वज्ञानाच्या ज्येष्ठ प्राध्यापकाने लिहिला आहे. ते प्राध्यापक म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञानविभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेले डॉ. शि. स. अंतरकर. त्यांच्या लेखात संतसाहित्याची आवश्यकता विशेष बलपूर्वक प्रतिपादलेली असल्यामुळे त्यांच्या लेखावर चार शब्द लिहावयाचा मानस आहे.
विषयाला हात घालण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. ती म्हणजे संतांविषयी माझी नेमकी तक्रार काय आहे ही. संत खरोखरच संत होते, अत्यंत सज्जन होते याविषयी माझ्या मनात किंचितही संदेह नाही. ते जे जे बोलले, त्यांनी जे काही लिहिले, ते सगळे पूर्णपणे प्रामाणिक आणि अत्यंत शुद्ध हेतूने हे निर्विवाद आहे. मग माझी त्यांविषयी तक्रार काय आहे? तक्रार असण्याचे कारण उदात्त हेतूने प्रेरित झालेले कर्मही अतिशय अनिष्ट असू
शकते; अनर्थकारक घटनांना कारणीभूत होऊ शकते. तसे संत साहित्याच्या बाबतीत झाले आहे असे मला म्हणावयाचे आहे.
संतांविषयी माझी मुख्य तक्रार ही आहे की त्यांनी समाजाला श्रद्धावादी बनविले. श्रद्धा ही गोष्ट सर्वथा असमर्थनीय असून ती अनेक अनर्थांना जन्म देणारी आहे. तिच्यामुळे स्वतंत्र विचार करण्याची शक्ती नाहीशी होते. आपल्या देशात विज्ञानाचा उदय झाला नाही याचे एक कारण हे स्वतंत्र विचाराचे खच्चीकरण असले पाहिजे. नाही तर तत्त्वज्ञानात आणि काही अन्य क्षेत्रांत अनेक पराक्रम करणारी आमची बुद्धी विज्ञानात का शिरली नाही ? संतांच्या विचारामुळे कोट्यवधींचा हा समाज असे मानू लागला की नामस्मरण केल्याने, भजन केल्याने, गंगेत स्नान केल्याने मनुष्य कृतकृत्य होतो. याचे प्रत्यंतर आजही कुंभमेळे, शिवरात्री इत्यादि प्रसंगी हटकून होणारी लक्षावाधि भाविकांची गंगास्नाने, एकादशीच्या दिवशी पंढरीच्या विठोबाची मुख्यमंत्र्यांच्या हातून होणारी पूजा, अयोध्येत राममंदिर बांधण्याचा अट्टाहास, इत्यादींतून मिळते. कोट्यवधी लोक अशाप्रकारे निरर्थक मूल्यहीन व्यवहारात वर्षातून अनेक वेळा, देशात सर्वत्र दिवसचे दिवस आणि महिनेही व्यतीत करतात ही माझ्या मते मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या गोष्टींचे वैयर्थ्य अजूनही लोकांना पटू नये हे आपण श्रद्धावादी नसून आपली बुद्धी टाकून दिली आहे आणि पशुतुल्य जीवन जगतो आहोत याचेच निदर्शक आहे.
एवढ्या प्रस्तावनेनंतर आता मी प्रा. अंतरकरांच्या लेखाकडे वळतो.
या लेखाबद्दल लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रा. अंतरकरांनी संतांची वकिली बरीच हात राखून केली आहे. कारण ते संतविचार पूर्णपणे स्वीकरणीय मानीत नाहीत. त्यांच्या मते त्या विचाराची बरीच अंगे त्याज्य आहेत. संतसाहित्यात ‘देशकालपरिस्थितिसापेक्ष खूप भाग आहे आणि तो आपण टाकून दिली पाहिजे असे ते म्हणतात उदा. वर्णाश्रम, जातिव्यवस्था, स्त्रिया व शूद्र यांच्याबद्दलचे संतांचे विचार, किंवा देव, राक्षस इत्यादि योनी, स्वर्ग, नरक, वैकुंठ लोक, यांच्याबद्दलच्या त्यांच्या समजुती; कर्मसिद्धान्त, जन्ममृत्युपरंपरा, आणि यांतून सुटका म्हणजे मोक्ष; आत्मा, ईश्वर इ. धार्मिक श्रद्धा. ‘मानवापुढील आजच्या संदर्भात संतविचाराची सोबत घेताना ही विशिष्ट धार्मिक चौकट बाजूला सारावी लागेल’ असे ते स्पष्ट म्हणतात, एवढेच नव्हे तर ‘संत दुःख सहन करायला सांगतात, दारिद्र्याचे उदात्तीकरण करतात म्हणून संतविचार निराशावादी, पलायनवादी आहे, त्यामुळे समाज निष्क्रिय व दैववादी बनला या आरोपात तथ्यांश आहे हे ते मान्य करतात. तसेच संतसाहित्यात आढळणारे देह, प्रपंच, विषयसुख, गर्भावस्था, जन्म, म्हातारपण, आजारपण इत्यादि विषयांची घृणास्पद, निंदाव्यंजक वर्णने, मृत्यूविषयीचे भयानक वर्णन टाळण्यात यावीत असे ते निक्षून सांगतात, ‘रडके अध्यात्म’ टाकून ‘उमदे। अध्यात्म स्वीकारले पाहिजे’ असे ते म्हणतात.
या सर्व गोष्टी आपण त्याज्य मानल्या पाहिजेत असे प्रा. अंतरकर कशाच्या आधाराने म्हणतात ? त्या देशकालपरिस्थितिसापेक्ष आहेत, आणि आज त्या गतार्थ झाल्या आहेत असे म्हणताना त्या पूर्वीच्या काळी योग्य होत्या, खय्या होत्या, आणि आज खोट्या झाल्या आहेत असा ध्वनि त्यात आहे. पण त्या जुन्या झाल्या म्हणून केवळ टाकाऊ होत नाहीत. त्या आज खोट्या असतील तर त्या पूर्वीही असत्यच असल्या पाहिजेत. त्या असत्य आहेत, गैर आहेत, अन्यायकारक आहेत, अंधविश्वासावर आधारलेल्या आहेत हे मान्य करावयास हवे.
आणि या सर्व त्याज्य मानलेल्या गोष्टी टाकून दिल्यानंतर संतविचारात शिल्लक काय उरते? ईश्वर, आत्मा, मोक्ष इत्यादि धार्मिक श्रद्धा’ टाळून दिल्यावर संतविचार संतविचार काही उरतच नाही. प्रा. अंतरकर म्हणतात की संतांची शिकवण आत्मविकास आणि चित्ताचे समत्व यांची आहे. पण एकतर हा प्रा. अंतरकरांनी काढलेला निष्कर्ष आहे, आणि दुसरे म्हणजे आत्मविकास आणि चित्ताचे समत्व साधण्याचे साधन ईश्वरभक्ती आहे असे संतांचे सांगणे आहे. ईश्वर, मोक्षप्राप्ती, जन्ममृत्यूतून सुटका, इत्यादींवरील विश्वास वजा केला तर त्यांचे तत्त्वज्ञानच नाहीसे होते. त्यांची ईश्वरावरील श्रद्धा हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे, ज्याच्याजवळ श्रद्धा नसेल तो संतविचाराकडे वळणारच नाही. त्यांचा प्रधान उद्देश मोक्षमार्गाचे निरूपण करणे हा होता. जे मोक्ष मानीत नाहीत, आणि म्हणून जे मुमुक्षु नाहीत, ते चित्ताचे समाधान प्राप्त करण्याकरिता संतविचाराच्या वाटेला जात नाहीत.
प्रा. अंतरकरांचे वर्तमान मानवी समस्यांचे निदान असे आहे की त्या सर्व, ज्याला ते आधुनिकवाद हे नाव देतात, त्यातून उद्भवल्या आहेत. आधुनिकवादाची वैशिष्ट्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इहवाद, विज्ञानवाद, मानववाद आणि उपयुक्ततावाद ही आहेत. परंतु यापैकी इहवाद तर त्यांना मान्य असायला हवा, कारण ईश्वर, पुनर्जन्म, इत्यादि परलोकवादी गोष्टी त्यांनी त्याज्य ठरविल्या आहेत. त्यामुळे इहलोकाखेरीज अन्य लोक नाही असे त्यांचे मत । असले पाहिजे. मानववाद म्हणजे मानवाने स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपले जीवन जगण्याखेरीज जगण्याचा अन्य मार्ग नाही. उपयुक्ततावाद म्हणजे मनुष्याने सामान्यपणे मनुष्यजातीचे आणि शक्य त्या सर्व जीवांचे सुख वाढविण्याचा प्रयत्न करावा. आणि विज्ञानवाद म्हणजे जगाचे ज्ञान मिळविण्याचा विज्ञानाखेरीज अन्य मार्ग नाही आणि विज्ञानाधिष्ठित तंत्रविद्या आपल्या गरजा पुच्या करील.
पण प्रा. अंतरकर म्हणतात की आपल्या सर्व वर्तमान समस्या या आधुनिकवादामुळे उद्भवल्या आहेत, आणि त्या सोडविण्याचा उपाय आधुनिकवादाजवळ नाही. पण हे खरे नाही. मानवाच्या समस्या मानवी स्वभावातून आणि विज्ञानाच्या शोधातून निर्माण झाल्या आहेत. आदिमानवापासून युद्धे चालू आहेत, आणि ती अधिकाधिक भयंकर होत आली आहेत. शेवटी मानवजातीचाच संहार करू शकणारे एक अस्त्र मानवाने निर्माण केले आहे, हे खरे आहे. पण या अस्त्राच्या भयंकरपणातूनच युद्धे समाप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. सर्व अण्वस्त्रे नष्ट करणे हाच त्यावर उपाय आहे हे बहुतेक लोकांना पटले आहे, आणि ते पटण्याचे कारण आत्मनाशाची भीति, संतविचार नव्हे.
प्रा. अंतरकर म्हणतात की आधुनिकवादाने आपल्याला सामर्थ्यशाली बनविले, पण ते सामर्थ्य पीडितांच्या दुःखनिवारणार्थ वापरण्याच्या इच्छाशक्तीची जोड दिली नाही. पण हेही खरे नाही. कारण पीडितांच्या दुःखांच्या, गरिबीचा आज जितका विचार होतो आहे तितका पूर्वी कधी झाला नव्हता. अनेक मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. उदा. गुलामांची प्रथा आज बंद झाली आहे. सुधारलेल्या देशात गरिबी पुष्कळ कमी झाली आहे. काही देशांत पूर्णपणे किंवा अंशतः समाजवाद प्रस्थापित झाला आहे, आणि औषधोपचार फुकट करण्याची सोय झाली आहे, आणि ती सेवा वाढत्या प्रमाणात होत आहे. बेकारांना बेकारभत्ता देण्याची सोय अनेक देशांत आहे.
पर्यावरणाचा मानवाने मोठ्या प्रमाणात नाश केला आहे हे खरे आहे. पण ते किती हानिकारक आहे याची जाणीव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रदूषण नाहीसे करण्याचे प्रयत्नही वाढत्या प्रमाणात होत आहेत.
तेव्हा आधुनिकवादाने निर्माण केलेल्या समस्यांना त्याच्याजवळ उपाय नाहीत हे खरे नाही. तसे मानणे म्हणजे फार लवकर हातपाय गाळणे झाले. या समस्या अलीकडे मानवाच्या लक्षात आल्या आहेत, आणि त्या जसजशा दृष्टोत्पत्तीस येतात तसतसे त्यांच्यावर उपायही शोधले जातात.
प्रा. अंतरकर म्हणतात की संतांच्या विचाराचा गाभा म्हणजे चित्ताची समता प्रस्थापित करणे. त्याकरिता मीपणाचा, अहंकाराचा त्याग करणे हा उपाय आहे. मीपणाचा त्याग करणे ही एक अशक्य कोटीतील गोष्ट मानावी लागेल. ज्यांनी मीपणा टाकून दिला असे किती संत गेल्या आठशे वर्षांत दाखविता येतील? संत म्हटले म्हणजे ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादि आठदहा नावे आपल्या समोर येतात. त्यांनी मी जिंकला होता असे आपण मानू या पण बाकीच्या ईश्वरभक्तांविषयी आपण एवढेच म्हणू शकतो की त्यांनी शुद्ध स्वार्थ सोडला होता. याअर्थी मीपणा जिंकणे शक्य आहे हे मी मान्य करतो. पण अन्य कोणत्याही अर्थी ती अशक्य गोष्ट आहे असे म्हणणे भाग आहे. संत झाला म्हणून त्याला तहान, भूक, झोप इ. जीवधर्म सुटले आहेत असे होत नाही. जीवरक्षणाकरिता त्याला मीपणा सांभाळावा लागतो. मीपणा टाकून देण्याचा अर्थ एवढाच केला पाहिजे की मनुष्याने केवळ स्वतःच्या सुखार्थ जगू नये, इतर मानवांचा, प्राण्यांचाही विचार करावा. सारांश, मनुष्याने स्वार्थाला लगाम घालावा आणि परार्थही साधावा. यालाच मीपणा टाकणे म्हणायचे असेल, तर हा उपदेश करण्याकरिता कोणी सामान्य माणूसही पुरेल. त्याकरिता संतांची अतिरेकी भाषेत केलेली मागणी आवश्यक नाही.
प्रा. अंतरकरांचे एक म्हणणे असे आहे की आधुनिकवादाचा एक परिणाम असा झाला आहे की सबंध सृष्टी आणि मनुष्य यांचा संबंध भोक्ताभोग्य संबंध आहे अशी मानवाची समजूत झाली आहे. मनुष्य समजतो की आपण सबंध सृष्टीचे स्वामी आहोत, आणि आपण तिचा हवा तसा उपभोग घेऊ शकतो. पण ही समजूत चूक आहे. वास्तविक मनुष्याने सृष्टी आणि आपण यांचा ऋणानुबंध आहे असे मानले पाहिजे. याविषयी असे म्हणावे लागेल की हा आक्षेप बराच अतिशयोक्त आहे. सृष्टीचा एक मोठा भाग निर्जीव, जड आहे. त्यामुळे त्याच्याशी आपला संबंध ऋणानुबंधाचा असू शकत नाही हे उघड आहे. राहिली मानवेतर जीवसृष्टी. तिच्याशी मानवाचा संबंध ऋणानुबंधाचा असावा असे म्हणण्याचा अर्थ काय आहे? गायी, म्हशी, बक-या, मेंढ्या, घोडे आणि गाढवे यांच्याशी ऋणानुबंधाचे संबंध असावेत म्हणजे काय ? आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा निसर्गाचा नियम आहे, माणसाने अन्य प्राण्यांवर उपजीविका केली नाही तरी त्याला वनस्पतींवर जगावे लागते. वनस्पतींनाही जीव असतो, आणि त्यांना संवेदनाही असते हे सिद्ध झाले आहे. म्हणून शाकाहारी माणसेही जीवहत्या करीत असतात हे मानले पाहिजे. यांतून मार्ग एवढाच दिसतो की आपण विनाकारण जीवहत्या करू नये. प्राण्यांशी क्रूरपणाने वागू नये. त्यांची हत्या करतानाही आपण जर त्यांना उदा. गुंगीचे औषध दिले तर आपले वागणे माणुसकीला धरून होईल. आज कत्तलखान्यात पशृंशी अगदी बेदरकारपणे आपण वागतो, गायी, बैल इत्यादींना ट्रक्समध्ये दाटीवाटीने कोंबून शेकडो मैल नेतो आणि निर्दयपणे त्यांच्याशी वागतो. तसे न करता माणुसकीचा व्यवहार केला तर ते सुखाचे होईल हे सांगणे नको. अशा व्यवहाराला ऋणानुबंधाचा व्यवहार म्हणायचे असेल तर हरकत नाही. पण ऋणानुबंध या शब्दाच्या रूढ अर्थी अन्य प्राण्यांशी आपले वागणे ऋणानुबंधाचे कसे होईल हे सांगणे कठीण आहे.