पुन्हा एकदा नियतिवाद

‘नियति’ म्हणजे केव्हा काय घडणार आहे हे पूर्वीपासूनच ठरलेले आहे असे प्रतिपादणारे मत. हे मत ज्याला Determinism म्हणतात त्यासारखे आहे असे वाटते, पण ते त्याहून वेगळे आहे. नियति म्हणजे जिला इंग्रजीत ‘Fate’ हे नाव आहे ती गोष्ट. नियतिवाद म्हणजे fatalism, या मतानुसार केव्हाही काय घडणार आहे ते पूर्ण तपशिलासह अनादि काळापासून पूर्वनिश्चित आहे. नियतीचे दुसरे नाव आहे भवितव्यता.
या मताहून Determinism भिन्न आहे. त्याला नियतिवाद या नावाऐवजी नियमबद्धतावाद हे नाव अधिक अन्वर्थक होईल. आपल्या सबंध जगाचे मार्गक्रमण अनेक नियमांनी बद्ध असे असून ते सर्व नियम शेवटी कारणाच्या नियमातून उद्भवले आहेत असे
आपण सामान्यपणे मानतो. विज्ञानाचेही तेच मत आहे. कारणावाचून कोणतीही घटना घडत नाही असे त्या नियमाचे प्रतिपादन आहे. कारणकार्यसंबंध हा असा संबंध आहे की एका घटनेचे कारण एकच आणि एका कारणाचे कार्यही एकच. त्यामुळे कोणत्या कारणाचे कोणते कार्य हे जर आपल्याला ज्ञात असेल, आणि तसेच जगाची वर्तमान स्थिती जर माहीत असेल, तर जगाचा भविष्यातील प्रवास काय होईल हेही आपण जाणू शकतो असे लाप्लास म्हणाला होता ते खरे होते असे म्हणता येते. आणि जरी कोणाही माणसाला एवढे तपशीलवार आणि विस्तृत ज्ञान शक्य नसले, तरी आपण म्हणू शकतो की भविष्य काय असणार आहे ते नियमबद्ध आहे. हा Determinism किंवा नियमबद्धतावाद. हा वाद म्हणजे fatalism किंवा नियतिवाद नव्हे. नियतिवादाचा कारणाच्या नियमाशी संबंध नाही.
नियतिवाद खरा आहे असे मानायला काही कारण आहे काय? भवितव्यता किंवा fate नावाची गोष्ट आहे या मताला पोषक पुरावा काय आहे? निर्णायक पुरावा सोडा, परंतु भलाबुरा कसलाही पुरावा आहे काय?
खरे सांगायचे म्हणजे असा कसलाही पुरावा काय असू शकेल याची कल्पना करता येत नाही. नियतीचा साधक पुरावा काय असू शकेल बरे?
**१. पण लाप्लासचे मत सध्या विज्ञानात मानीत नाहीत. नियमबद्धतावाद मान्य आहे, पण भविष्य वर्तविता येत नाही. श्री. नंदा खरे यांचा ‘नियमबद्धतावादाच्या मर्यादा’ हा आजचा सुधारक जानेवारी ९६ च्या अंकातील लेख पाहावा.
आपण नियतीच्या हातातील बाहुली आहोत हे मत प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. मनुष्याचे कर्तृत्व पूर्णपणे नाकारणारी ही उपपत्ति आहे.
आदिमानव खरोखरच अतिशय दुर्बल होता. या दुर्बलतेतून दोन कल्पनांचा जन्म झाला, एक नियतीची आणि दुसरी ईश्वराची, आणि त्या कल्पनांनी त्याचा पूर्ण ताबा घेतला. जे होते ते होणारच होते, जे होणार आहे तेच होते, ते कधी चुकत नाही, असे मानणे स्वाभाविक वाटावे अशी स्थिती आरंभी होती हे खरे आहे. मनुष्याचे प्रयत्न वारंवार विफल होताना दिसत होते; आणि अनेकदा पूर्ण अनपेक्षित घटना घडताना दिसत होत्या. त्यामुळे आपला कोणताही प्रयत्न सफल होण्याकरिता ‘दैवं चैवात्र पंचमम्’ अशी नियतीच्या अनुकूलतेची गरज सतत भासत होती.
त्यामुळे प्राचीन काळापासून नियति ही वस्तुस्थिती आहे ही गोष्ट मनुष्याने गृहीत धरली. तिला भिन्न काळांत भिन्न कथांनी दुजोरा मिळत गेला. नियतिवादाचे समर्थन करणारे वाङ्मय सर्व काळांत प्रसिद्ध होत आले आहे. आजही ते प्रसिद्ध होत आहे. जी. ए. च्या कथा मनाला भुरळ पाडतात याचे एक कारण त्यांत नियति गृहीत धरलेली असते.
पण नियति आहे, किंवा एखादी गोष्ट पूर्वनियत आहे याचा पुरावा देणे अशक्य आहे, त्याकरिता भविष्यात काय घडणार आहे ते आपल्याला आधीच माहीत असावे लागेल. एखादी घटना घडल्यावर ती घडणारच होती हे म्हणता येण्याकरिता ती घडणार आहे असे आधीच सांगता आले पाहिजे. असे वारंवार झाले तर तो नियतीचा पुरावा म्हणता येईल का?
खरे सांगायचे म्हणजे ही भविष्यवेत्ती मंडळी सगळी भूतकाळात होऊन गेलेली असतात. वर्तमानकाळांत बिनचूक तपशीलवार भविष्य वर्तविणारा कोणी भविष्यवेत्ता असेल असे दिसत नाही. दुसरे असे की एखाद्याने वर्तविलेले भविष्य खरे ठरले तरी तेवढ्याने नियति सिद्ध होऊ शकत नाही. कारण इतकी भविष्ये खोटी ठरतात की खरी भविष्ये म्हणजे केवळ योगायोग असू शकतात.
भविष्यवेत्त्यांची भविष्ये खरी ठरतात असे असण्यात एक अडचण अशी आहे की भविष्यकथन खरे ठरण्याकरिता भविष्याला अस्तित्व असते असे मानावे लागेल. या मतानुसार काळ अवकाशासारखाच मानावा लागतो. जसे अवकाशात काही प्रदेश जवळचा असतो, आणि अन्य बरेच दूर असतात, आणि दूरचा प्रदेश दृष्टीस पडण्याकरिता काही अंतर पार करावे लागते, तसेच काळाचेही असते असे मानावे लागते. म्हणजे काही काळ समीप असतो, तो अवलोकनाच्या आटोक्यात असतो. पण भविष्यातील काळ अवलोकता येण्याकरिता काही वेळ जावा लागतो; पण याचा अर्थ भविष्य वर्तमानकाळी अस्तित्वात नसते, तो कालांतराने अस्तित्वात येते असे नव्हे. भविष्य अस्तित्वात असतेच, पण ते हळू हळू उलगडत जाते आणि क्रमाने दृष्टिगोचर होते. अशी कल्पना काही विचारवंतांनी केली आहे.
पण अन्य काही विचारवंत म्हणतात की अवकाश आणि काळ हे सर्वथा भिन्न आहेत. अवकाशाचे सर्व भाग एकाच वेळी अस्तित्वात असतात. पण काळाचा फक्त वर्तमानकाळ अस्तित्वात असतो, आणि तोही क्षणमात्र. दुस-याच क्षणी तो भूतात जमा होतो, आणि त्याच्या जागी एक भविष्यरूप वर्तमान होतो. वर्तमानाखेरीज काळाचे अन्य भाग एकतर भूतात नाहीसे झालेले असतात, किंवा अजून अस्तित्वात आलेले नसतात. म्हणजे भविष्य अजून अस्तित्वात आलेले नसते. पण तसे असेल तर त्रिकालदर्शी माणसालाही ते कसे दिसू शकेल? ते जर अस्तित्वात असेल तरच दिसेल.
यावरून असे सुचते की भविष्यकथन हे वर्तमानावरून केलेले अनुमान असेल, पण अनुमान करण्याचा एकमेव उपाय म्हणजे कारणाचा नियम. भविष्यवेत्ता कारणाचा नियम वापरून अनुमाने करतो असे म्हणायला कसलेही कारण नाही. आणि त्याने तसे केले आणि त्याचे अंदाज खरे ठरले तरी त्यावरून नियति सिद्ध होत नाही, कारण नियतिवादाचा कारणाच्या नियमाशी काही संबंध नाही.
भविष्याला अस्तित्व असते या मताच्या समर्थनार्थ वापरण्यात येणारा दुसरा युक्तिवाद असा असू शकेल. ईश्वर सर्वज्ञ आहे. म्हणजे त्याला सबंध वर्तमान ज्ञात असतेच, पण भविष्यही ज्ञात असते, म्हणून भविष्याला अस्तित्व असले पाहिजे. पण सर्वज्ञतेची ही कल्पना केवळ कविकल्पना आहे. ईश्वर सर्वज्ञ असेल, तर तो कारणाच्या नियमानुसार भविष्याचे अनुमान करू शकेल. म्हणजेच याही कारणाने भविष्याचे अस्तित्व सिद्ध होणार नाही.
नियतीची कल्पना गूढ कल्पना आहे. ती आहे असे आपण सहज मानतो, पण तिचे स्वरूप काय आहे हे आपण सांगू शकत नाही. ही एक चमत्कारिक गोष्ट आहे की ज्या वस्तूचे स्वरूप आपल्याला ज्ञान नसते ती अस्तित्वात आहे असे आपण सहज समजतो.
नियतीची कल्पना प्रयत्नांना पूर्ण मारक आहे. नियतिवादावर आधारलेले एक प्रातिनिधिक उदाहरण हे आहे. एखादा गंभीर आजार झालेल्या मनुष्याबद्दल केला जाणारा पुढील युक्तिवाद पाहा. रोगी वाचणार की आजाराने मरणार ही गोष्ट ठरलेली आहे. जर तो। वाचणार आहे हे ठरलेले असेल तर वैद्यकीय उपायांची आवश्यकता नाही; आणि तो मरणार असेल तर वैद्यकीय मदत निरुपयोगी आहे. पण रोगी एकतर वाचणार किंवा मरणार असला पाहिजे. म्हणून वैद्यकीय मदत एकतर अनावश्यक असणार किंवा निरुपयोगी असणार. त्यामुळे आपण काही न केले तरी जे होणार आहे, ते झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हा युक्तिवाद चुकीचा आहे. कारण त्यात नियतिवाद गृहीत धरला आहे. पण आपल्याला माहीत आहे की मनुष्याचे जीवन अन्य सर्व निसर्गाप्रमाणेच कारणाच्या नियमानुसार चालते. औषध घेतले की त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. आणि न घेतले तर आजार कोणताही उपाय न केल्यामुळे वाढत जातो. आता हे खरे आहे की आजार किरकोळ असेल तर चार दिवसांत तो आपोआप बरा होतो. पण तो जर गंभीर असेल, किंवा रोगी म्हातारपणामुळे अतिशय अशक्त झाला असेल, तर औषधोपचाराचा उपयोग होत नाही. पण सामान्यपणे औषधोपचाराने गुण येतोच असा अनुभव आहे. तसेच औषधावाचून रोगी राहिला तर सामान्यपणे आजार वाढतो, आणि गंभीर आजार रोग्याचा बळी घेतो, आणि हेही कारणाच्या नियमानुसारच होते. त्यामुळे नियतीवर आधारलेला हा युक्तिवाद चुकीचा आहे असे म्हणता येते.
पण मनुष्य कधीतरी मरणारच आहे हे आपल्याला माहीत असते ना? मग नियतीचे एक उदाहरण म्हणून त्याकडे आपण का पाहू नये? पण मनुष्य केव्हातरी मरतोच ही गोष्ट नियतीने ठरविली आहे असे म्हणायला कारण नाही. ते निसर्गनियमांनी ठरते असे म्हणता येते. ते मानवी शरीराचे धर्म, त्याची शक्ती आणि त्याच्यावर अन्य गोष्टींचा होणारा कारणिक परिणाम यांनी ठरते. मनुष्याचे शरीर सदाकरिता अस्तित्वात राहू शकत नाही. हे आपल्याला अनुभवाने माहीत आहे. ते कार्यकारणाच्या नियमाने ठरते. नियतीने ठरते असे सुचविणारा पुरावा नाही.
सारांश, नियति ही एक पूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ती दुर्बल आणि भयभीत अशा निराधार मनाची निर्मिती आहे. म्हणून ती खोटी गोष्ट आहे. उलट कार्यकारणनियमामुळे निसर्गात आढळणारा नियमबद्धतावाद मात्र खरा आहे. त्याचा आपल्याला अनुभव आहे,
आणि विज्ञानाच्या वाढीबरोबर तो अनुभव पक्का झाला आहे. कारणे आणि कार्ये आपल्याला प्रत्यक्ष दाखविता येतात, आणि त्यांची आपण परीक्षा करू शकतो. मानवी प्रयत्न हीही कारणेच होत, आणि त्यांचे परिणाम झाल्यावाचून राहात नाहीत हे आपण पाहिले आहे.
त्यामुळे नियतीला आपण जितक्या लवकर विसरू तितके चांगले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.