कार्यक्षम लोकशाही: ब्रिटिशांचा अमेरिकेकडे एक मत्सरग्रस्त कटाक्ष

मागच्या आठवड्यात अमेरिकन लोकांनी आमच्यापासून त्यांना स्वातंत्र्य मिळाले त्याचा उत्सव साजरा केला. त्या उत्सवाप्रीत्यर्थ ते गेल्या ४ जुलैला मिटक्या मारत बियर प्याले, त्यांनी कबाबांवर ताव मारत नयनरम्य आतिषबाजीचे खेळ पाहिले; आणि हे सारे करीत असताना ब्रिटनपासून मुक्तता मिळविल्याबद्दल स्वतःच्या धैर्याची आणि हिंमतीची आठवण करीत जल्लोष केला.
आणि आम्ही काय केले? आमच्या वसाहतींवरील आमचा ताबा सोडून दिल्याबद्दल आम्ही मेजवान्या दिल्या नाहीत. कारण दोन शतकानंतर सर्वच उलथापालथ झाली आहे. पारडे इतके उलटले आहे की जणू काय तेच मालक आणि आम्ही दास अशी स्थिती प्राप्त झाली आहे. त्यांची संस्कृती आणि सभ्यता ह्यांची आमच्या देशात आम्ही भरभरून आयात करतो आहोत. दुकाने २४ तास उघडी ठेवण्यापासून अॅली मॅकबीलपर्यंत. इतकेच नाही तर त्यांच्या राजकारणाचीही आणि इतर प्रघातांचीही चोरी करीत आहोत. त्यात झटपट तयार होणा-या डॉक्टरांपासून आर्थिक नवनीतीपर्यंत (New Deal) आणि त्याशिवाय सहनशीलतेच्या पूर्ण अभावापर्यंत.
पण आम्ही भलत्याच गोष्टींची तर आयात करीत नाही ना ! २२२ वर्षांपूर्वी ४ जुलै या दिवशी ज्या आदर्शाची स्थापना झाली ते आदर्श, ती रत्ने, तर आपण गमावली नाहीत ना? गेल्या किमान एका दशकापासून प्रगतिवादी एका नवीन धर्माच्या, विश्वासाच्या शोधात आहेत, आणि ज्यांना आत्मविश्वास नाही ते एका तिस-याच मार्गाच्या शोधात आहे. (त्यांना ब्रिटिश नकोत की अमेरिकन नकोत.) पण तिसरा मार्ग म्हणजे काय याची स्पष्ट कल्पना फार थोड्यांना आहे. इतके सारे असून आमच्या समस्यांची उत्तरे आमच्याच इतिहासात दडलेली
आहेत आणि आमची प्रतीक्षा करीत आहेत असे मला सांगावयाचे आहे.
अमेरिकेच्या संविधानाच्या पहिल्या तीन शब्दांत आम्हाला जे हवे ते सारे काही सापडणार आहे. त्यातले पहिले तीन शब्द आहेत आम्ही अमेरिकेचे प्रजाजन’ (We the people) ह्या एवढ्याश्या वाक्यांशात ब्रिटनला पूर्ण बदलवून टाकील, त्याचे परिवर्तन करील असे तत्त्व दडले आहे. अमेरिकेच्या वेगळेपणाचे रहस्य केवळ या सरळ तीन साध्या शब्दांत आहे. १८६३ मध्ये गेटिसबर्गला दिलेल्या भाषणात अब्राहम लिंकनने त्यांचाच निराळ्या शब्दांत पुनरुच्चार केला होता. तो म्हणाला होता, ‘लोकांचे राज्य, लोकांसाठी राज्य, लोकांनी चालविलेले राज्य’, ह्याचा अर्थ वस्तुतः सरकार टिकविण्यासाठी लागणारी सर्व तंत्रे आणि प्रक्रिया असा होतो. प्रारंभीच्या अमेरिकनांनी ब्रिटनच्या राजाचे आधिपत्य झुगारून दिले इतकेच नाही तर निवडून न आलेल्यांची सामंतसभा (उमरावसभा) टाकून दिली आणि स्वतः निवडलेल्या लोकांकडून राज्य करून घेणे श्रेयस्कर मानले. मध्यवर्ती सत्तेला त्यांनी तीन ठिकाणी विभागून दिले. (१) कार्यपालिका अर्थात् नोकरशाही, (२) विधानमंडळ आणि न्यायपालिका, आणि आपल्या संविधानाच्या योगाने प्रत्येकाचा एकमेकावर अंकुश ठेवण्यात आणि त्यांचा तोल सांभाळण्यात ते सफल झाले. याऊलट आम्ही ब्रिटनमध्ये सगळे एकत्र गुंतवून टाकले आहे.
त्यांनी त्यांच्या देशाच्या अधिसत्तेचा मोठा भाग केंद्रापासून दूर राज्यांमध्ये आणि नगरांमध्ये ठेवला आहे. ह्या सत्ताविभाजनाला त्यांनी अधिकारनिक्षेप असे नाव दिले नाही. तसे त्यांनी त्याला म्हटले असते तर त्यांची सत्ता वा ते अधिकार केंद्राहून खालच्या पातळीवर झरत गेले आहेत असा त्याचा अर्थ झाला असता. ह्या उलट ती (म्हणजे सत्ता) लोकांपासून उगम पावत असल्यामुळे ती तेथेच त्यांच्याजवळ राहिली, ती जणू काय लोकांच्या परसदारी वावरत आहे असे त्यांनी सुचविले. आमचे ब्रिटिश लोक ज्या उदासीनतेचे, अकर्मण्यतेचे व निष्क्रियतेचे बळी आहेत, त्यापासून अमेरिकन लोक त्यांच्याच हाती प्रभुसत्ता असल्याकारणाने प्रफुल्लितपणे मुक्त आहेत. अमेरिकेतले लोक बसस्टॉपवर बसची वाट पाहात असताना ही सेवा कधी सुधारेल असा; किंवा डॉक्टरच्या दवाखान्यात डॉक्टरची वाट पहात असताना कॅन्सरसाठी कधी औषध उपलब्ध होईल असा विचार करीत नाहीत. त्याउलट ‘आम्ही’ हे कधी घडवून आणू असा विचार ते करतात. अमेरिकेच्या राजकारणाचे व्याकरण पाहिले तर तेथे कर्ता नेहमी प्रथमपुरुषी असतो. हा अमका तमका बदल ‘आम्हाला घडवून आणायचा आहे असा भाव त्यांच्या वाक्यावाक्यातून, शब्दाशब्दातून प्रकट होतो. कारण त्यांची जी राजकारणाची संस्कृती आहे ती त्यांना समाज आपला आहे आणि आपली परिस्थिती बदलण्याचे कार्य आपणच करावयाचे आहे असे सांगत असते. आपापल्या समाजात किंवा परिवारात (कम्युनिटीमध्ये) अमेरिकन लोक जे उत्कट स्वारस्य दाखवितात त्याचे कारण त्यांच्या ह्या ऊर्मीत दिसून पडते. पुष्कळसे ब्रिटिश लोक अमेरिकन लोकांना व्यक्तिकेंद्रित, भौतिकवादी आणि स्वार्थी समजत असतात. (मूर्ख, ढेरपोटे मानत नाहीत हे नशीब!) आम्ही निवडणुकीच्यावेळी मतदानाचे फक्त आकडे पाहतो आणि संपूर्ण राष्ट्र त्याविषयी उदासीन आहे असे म्हणून गप्प बसतो. ह्याउलट अमेरिकेकडे पाहिल्यास तेथली मंडळी नागरी चळवळींमध्ये कितीतरी जास्त प्रमाणात भाग घेतात. उदा. निवडून दिलेल्या शासनाधिका-यांना सार्वजनिक सभांना हजर राहायला लावणे, निरनिराळ्या दबावगटांमध्ये भाग घेणे, राजकीय पक्षांचे सदस्यत्व स्वीकारणे वगैरे. ब्रिटनमधल्या आणि अमेरिकेतल्या आकड्यांची तुलना केली की ब्रिटिश नागरिकांपेक्षा अमेरिकन नागरिक पुष्कळ जास्त धडपडे आहेत हे सहज लक्षात येते.
फारसे गुंतागुंतीत न शिरता याची कारणे आपल्याला पाहता येतील. आपण ब्रिटनचे रहिवासी आपण स्वतः असमर्थ आहोत, निष्प्रभ आहोत असे मानून चालतो, आणि अमेरिकन आपण खरोखरच काही बदल घडवू शकतो अशा विश्वासाने वागताना दिसतात. स्थानिक किंवा राष्ट्रीय राजकारणाच्या कर्दमात जेव्हा एखादा अमेरिकन नागरिक उडी घेतो तेव्हा त्याला आपण तेथे गेल्याने काही फरक पडेल असे वाटत असते आणि त्याचबरोबर आपल्यासाठी हे काम दुसरा कुणी करणार नाही हेही त्याला माहीत असते. अमेरिकन नागरिकाचे हे वर्णन अगदीच सौम्य, मिळमिळीत, निरुपद्रवी आहे पण जरा अधिक विचार केला तर असे लक्षात येईल की त्याचे वर्तन अगदी वेगळ्याच सिद्धान्तांवर आधारलेले आहे. त्यांनी ब्रिटनचे त्यांच्यावरचे आधिपत्य झुगारून देऊन केवळ सामंतशाहीच नाकारलेली नाही तर कोणत्याही राजच्छत्राच्याखाली राहण्याची ऊर्मी नाकारली आहे आणि त्यासोबत आपले प्रश्न सोडविणारा दुसरा कोणी आहे हा भाव मनातून काढून टाकला आहे. ब्रिटनची राजसत्ता नाकारल्याचे परिणाम त्यांच्यामध्ये आजवर टिकून आहेत. युरोपियन जनतेपेक्षा अमेरिकन नागरिकांनी गुंतागुंतीची रचना करून आणि त्यायोगे गहन असे मध्यवर्ती सरकार स्थापून त्यांच्याकडून आपले प्रश्न सोडवून घेण्यामध्ये स्वारस्य दाखविले नाही. ते आपले प्रश्न परस्पर सोडवितात. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांचे गरिबांकडे दुर्लक्ष आहे. परिस्थिती अगदी उलट आहे. केंद्रवर्ती सरकारमार्फत एकमेकांना मदत करण्याऐवजी ते थेट आपल्या पातळीवर ती कामे करतात. अशी अनेक समाजकल्याणाची कामे आहेत की जी करण्यासाठी आम्ही ब्रिटनचे नागरिक सरकारच्या तोंडाकडे पाहतो, पण अमेरिकेमध्ये स्थानिक चर्च (म्हणजे एकेका प्रार्थनागृहाशी जडलेला समाज) आणि मित्रमंडळी तसली कामे करून मोकळी होतात. अमेरिकन लोकांचे दातृत्व आम्हा ब्रिटिशांना लाजवून टाकते. सर्व जगामध्ये ते दानशूर म्हणून ओळखले जात होते. १९९३ मध्ये अमेरिकेतल्या ७३% कुटुंबांनी काहीनाकाही दान दिले आहे आणि त्या दानाची सरासरी एका परिवारामागे ८८० डॉलर्स अशी पडते. ह्याउलट ब्रिटनमध्ये एकूण सगळ्या परिवारापैकी २३% परिवारांनी समाजऋणाची जाण ठेवली आहे आणि त्यांच्या दानाची सरासरी १९६ डॉलर इतकीच येते.
अमेरिकन लोक आपल्या समाजबांधवाची काळजी फक्त रक्कम देऊन करतात असे नाही. पैशापेक्षा इतर मार्गांनी देखील ते एकमेकांच्या उपयोगी पडतात. एखाद्या न्यूयॉर्कमधल्या वकिलाला भेटा किंवा वॉशिंग्टनमधल्या पत्रकाराला भेटा, तो एखाद्या ‘झुणका-भाकर’ केंद्रावर रात्री वाढप करण्यासाठी किंवा एड्स सहायता केंद्रावर रात्रपाळी करण्यासाठी आठवड्यातून एकदा कसा जातो याचा उल्लेख त्याच्या संभाषणात सहज येईल. हे का घडू शकते? परिसरपरिवाराची, गावगल्लीची काळजी घेणे हा तिथला लोकाचार आहे.
मला ब्रिटननेसुद्धा ह्याच दिशेने वाटचाल करायला हवी आहे. त्याने आपली सामंतवादीवृत्ती सोडून द्यावयाला हवी आहे आणि दातृत्व ही आपल्यापेक्षा अधिक सुस्थितीत असलेल्या लोकांची जवाबदारी आहे हा आपल्या इथल्या लोकांचा समज दूर करायचा आहे. आपल्या सोयी सवलतींसाठी आम्ही एकमेकांकडे पाहिले पाहिजे ही वृत्ती आपल्या येथे वाढायला हवी आहे. आमच्या राष्ट्राचे आम्हीच स्वामी’ हा भाव आम्हा सर्वांच्या मनात निर्माण करायचा आहे.
आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही. केंद्रीयसत्तेविषयी अविश्वास आणि जनपदाची प्रभुता ह्या आमच्यासाठी काही परक्या कल्पना नाहीत. नव्या अमेरिकेचा पाया ज्या सिद्धान्तावर झाला आहे ती तत्त्वे मूलतः अठराव्या शतकातील इंग्लिश आणि स्कॉटिश लोकांनीच प्रस्थापित केलेली आहेत. थॉमस पेन आणि विल्यम पेन यांनी आणि त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी जी स्वप्ने पाहिली तो आमचा विस्मृत वारसा आम्हाला पुनरुज्जीवित करायचा आहे.
आम्हाला कुठल्याही वेगळ्या वाटेने जायला नको, कारण आम्हाला आमची वाट फार
पूर्वीच सापडलेली आहे. अमेरिकेने जे काय केले ते आम्ही केले की आम्हाला आमचाही स्वातंत्र्यदिन साजरा करता येईल.
(The Sunday Times, London मध्ये प्रकाशित झालेल्या लेखावरून स्वैर अनुवादित) (Times of India, 17 July 1998 च्या आधारे.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.