प्रो. बा.वि. ठोसर – एक संस्मरण

आजचा सुधारकचे एक लेखक आणि या मासिकाबद्दल विशेष आस्था बाळगणारे प्रोफेसर बा.वि. ठोसर यांचे नुकतेच निधन झाले. नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे त्यांनी त्याच महाविद्यालयात अध्यापन केले. नंतर ते बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सर सी.व्ही. रामन यांचेकडे संशोधन करण्यासाठी गेले. इंग्लंडमधून पीएच.डी. मिळविल्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च या ख्यातकीर्त संस्थेत ३० वर्षे संशोधन केले आणि न्यूक्लीअर स्पेक्ट्रॉस्कोपी, मोसबॉअर परिणाम, आयन इंप्लांटेशन, पॉझिट्रॉन भौतिकी इत्यादि विषयांच्या संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. जवळजवळ सात वर्षे त्यांनी भौतिकीचे अधिष्ठाता (dean) या उच्च पदावर काम केले. एक विशिष्ट तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर इतर क्षेत्रात संशोधनासाठी त्या तंत्राचा वापर होणे अपरिहार्य असते. हे कार्य करण्यासाठी त्यांनी परिश्रमपूर्वक एक उज्ज्वल परंपरा निर्माण केली. संशोधनात सखोल मग्न असताना शास्त्रज्ञाला विज्ञानाच्या प्रभावाच्या इतर पैलूंचे। सामान्यतः अवधान राहत नाही. परंतु संशोधनाचे सक्षम नेतृत्व करताना जो व्यापक अनुभव आला त्यामुळे सक्रिय संशोधनापासून मोकळीक मिळाल्यावर प्रो. ठोसर यांना आधुनिक वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात भारतीय आध्यात्मिक आणि तात्त्विक विचारांविषयी चिंतन करण्यास प्रेरणा मिळाली.

भारतीय तत्त्वज्ञानात विविध प्रकारचे प्रवाह असले तरी त्याचा प्रमुख ओघ निवृत्तिपर विचारांना पुष्टी देणारा आहे असा सामान्यपणे समज आहे. उलटपक्षी विज्ञानाची प्रगती ही इहवादी/विवेकवादी प्रवृत्तिवृक्षाला आलेली फळे आहेत. अशा परस्परविरोधी दृष्टिकोनांच्या संघर्षात भारतीय तत्त्वचिंतकांची वृत्ति कशी होती हे अभ्यसनीय आहे. या दृष्टिकोनातून प्रो. ठोसर यांनी स्वामी विवेकानंद, अरविंद घोष आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचे परिशीलन केले. स्वामी विवेकानंदांची अशी धारणा होती की वेदांमध्ये धर्म आणि विज्ञान यांच्या सामान्य तत्त्वांची अभिव्यक्ती आहे. ऋषींना त्या तत्त्वांचे सविस्तर तपशीलवार विवरण करण्यास वेळ नव्हता. आपल्या मतांच्या पुष्टयर्थ त्यांनी ‘ईथर’चे उदाहरण दिले आहे. स्वामीजींचा असा दृष्टिकोन आज मान्य होईल असे दिसत नाही. परंतु त्यांना भारताची अस्मिता जागृत करावयाची होती, मानखंडित राष्ट्राचे उत्थान करावयाचे होते आणि भारतातील विचारधनाची पाश्चात्य जगामध्ये प्रतिष्ठापना करावयाची होती. या पार्श्वभूमीवर स्वामीजींची भूमिका समजून घेता येते. ठोसरांच्या मते अरविंदांच्या दृष्टिकोनात मायावादाचा त्याग केलेला आढळतो. ते वैज्ञानिक प्रगतीचा पुरस्कार करतात याचा प्रत्यय त्यांच्या मानवाच्या ‘सामुदायिक प्रगतीच्या संकल्पनेत आढळते. डार्विनच्या उत्क्रांतिवादाचे भविष्य म्हणजे अरविंदांची ‘अतिमानवांची कल्पना, रवींद्रनाथ टागोर आणि आइन्स्टाइन यांच्या १९३० मध्ये दोन वेळा भेटी झाल्या. दोघेही मानवतावादी (humanis:) -५रंत अगदी भिन्न क्षेत्रात वावरणारे. टागोरांना हे पुरेपूर पटले होते की विज्ञानाच्या कार्यपद्धतीच्या शिस्तीमुळे मानवाला वैयक्तिक अनुभवाच्या पलीकडे जाऊन वास्तविकतेचे (reality) आकलन होते. तथापि विज्ञानाद्वारे प्राप्त होणा-या ज्ञानाच्या स्वरूपाविषयी टागोर आणि आइन्स्टाइन यांच्यात कसे मतभेद आहेत याचे प्रो. ठोसर यांनी एका लेखात विवेचन केले आहे. विज्ञानाने आकलन होणा-या जगाच्या एकात्मतेचे मूळ मानवी विचारात असते असे टागोरांना अभिप्रेत आहे. आइन्स्टाइनला ही भूमिका मान्य नाही. त्याचा मानवनिरपेक्ष वास्तविकतेच्या अस्तित्वावर दृढ विश्वास होता.

एका बाजूने क्वांटम यांत्रिकीने पारंपरिक न्यूटोनीय कार्यकारणमीमांसेला प्रचंड धक्का दिला तर दुसरीकडे जीवतांत्रिकी, मज्जातंतुशास्त्र यांनी आधुनिक तंत्रप्रगतीचा उपयोग करून पूर्वी प्रयोगक्षमतेच्या पलीकडे समजली जाणारी दालने खुली केली. या पार्श्वभूमीवर जोवात्पत्ती, जाणीव (consciousness) इत्यादींबद्दल पुनर्विचार करण्याची आवश्यकता प्रो. ठोसरांना पटली होती. प्रकृतीचे अस्वास्थ्य आणि दृष्टीचा अधूपणा या विकारांमुळे वाचनावर तीव्र मर्यादा पडल्या तरी त्यांचे डेव्हिड बोम, जॉट्स, पॉपर, एकल्स यांसारख्या आधुनिक शास्त्रज्ञांच्या नव्या ग्रंथांचे वाचन, मनन आणि चिंतन चालू होते. विशेषेकरून स्वव्यवस्थी विश्व (Self-organising universe) या नव्या विचारप्रवाहाने त्यांना आकर्षित केले होते. ऊष्मागतिकी (thermodynamics) च्या दुसर्‍या नियमानुसार कोणत्याही संहतीची (system) सुव्यवस्थेकडून अव्यवस्थेप्रत जाण्याची प्रवृत्ती असते. या सार्वत्रिक नियमाची जीवासारख्या सुव्यवस्थित संहतीच्या निर्मिति-क्रियेशी कशी सांगड घालता येईल याविषयी आपले विचार प्रिओजीन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने एका पुस्तकात या कल्पनेस आधारभूत असलेल्या गणितासह व्यक्त केले आहेत. अशा पुस्तकांचे प्रो. ठोसर यांचे वाचन चालू असे. पारंपरिक भौतिकी आणि जीवशास्त्र यांमधल्या भेदरेषा अस्पष्ट होत असताना या सीमाक्षेत्रात संशोधन करणा-या वैज्ञानिकांच्या वैचारिक संकल्पनांच्या स्वरूपाचा संक्षिप्त परिचय डॉ. ठोसर यांच्या आजच्या सुधारकामधील सात लेख-टिपणे यांच्याद्वारे झाला असेल.

विवेक आणि ज्ञान यांविषयी भिन्न भिन्न दृष्टिकोनांचा परिचय, चर्चा आणि विचारविनिमय करणारे आजचा सुधारक हे मासिक प्रो. ठोसर यांच्या आत्मीयतेस पात्र ठरले होते. जी दोनच मासिके ते दर महिन्याला आस्थेने संपूर्णपणे वाचीत असत त्यात आजचा सुधारक आहे असे त्यांनी कित्येकदा मला सांगितले होते.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या विज्ञान प्रगतीमध्ये सक्रिय भाग घेऊन यशस्वी नेतृत्व करणारे वैज्ञानिक व आधुनिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारे विचारवंत म्हणून प्रो. ठोसर स्मरणात राहतील.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.