खेड्यांतली शाळा कशी असावी?

खेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हां कुणबी हा खेड्यांतला प्रधान घटक आणि कुणब्यासाठी इतर हे नाते लक्षात आणून खेड्यापाड्यांनी शाळा काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे तास व सुट्या असाव्यात. शेतकाम नसेल अशा दिवसांत शाळा दुवक्त असावी, ते बेताचे असेल त्या वेळी एकवक्त आणि त्याचा भर असेल त्यावेळी विद्यार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या बेताने म्हणजे सुमारे एक दोन तास शाळा भरावी. शाळेत शारीरिक बळवृद्धीला महत्त्व दिले पाहिजे; आणि अभ्यासक्रम इतकाच असावा कीं, शिकणाराला बाजारांत अडचण पडू नये, सावकाराशीं तोंड देतां यावे आणि आपल्या धंद्याचे ज्ञान वाढवतां यावे; पाहिलेली व ऐकलेली वस्तु व हकीगत मजकूर जुळवून सांगतां व लिहितां येणे, उजळणी, देशी चालीची कोष्टके, (ज्याला परदेशी कोष्टकांचे कारण पडेल तीं तो जरूरीप्रमाणे पुढे शिकेल.) तोंडचे हिशेब, जमाखर्च, पंचराशिक, व्यवहारी अपूर्णांक, क्षेत्रमापन, व्याज, काळ-काम-वेग वगैरेंचीं साधी उदाहरणे, आणि बेताची चित्रकला हे विषय मेहनतीने शिकविले पाहिजेत, म्हणजे आज बहुतेक तात्यापंतोजीच्या शिक्षणक्रमावर भागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.