संपादकीय

एका वेगळ्या प्रकारची परिस्थितिशरणता
आपल्या देशामध्ये, ह्या भारतभूमीत असे पुष्कळ लोक आहेत की जे आपल्यापुरतेच पाहत नाहीत, आपल्या शेजारपाजारच्यांची त्यांना आठवण असते. त्यांच्या वाट्याला आलेल्या संपत्तीचा एकट्याने उपभोग घेण्याचा त्यांना संकोच होतो. महात्मा गांधींनी तर त्या बाबतीत आपणा सर्वांना आदर्शच घालून दिला. दरिद्रनारायणाला जे मिळत नाही ते वापरण्याला त्यांनी आपल्या उत्तरायुष्यात नेहमीच नकार दिला. सर्वसाधारण भारतीयाइतकेच आपले जीवनमान राखण्याचा त्यांचा कटाक्ष होता. राहण्यासाठी मोठमोठे वाडे त्यांना मिळू शकत असताना त्यांनी झोपडीचा आश्रय केला. अशी दीनदयाळु, सुमनस्, दयार्द्र किंवा करुणाकर मंडळी भारतात बहुसंख्य नसली तरी पुष्कळ मोठ्या संख्येने आहेत. तीही काही बाबतीत परिस्थितिशरण आहेत. त्यांची परिस्थितिशरणता वेगळ्या प्रकारची आहे. उपभोगांचा त्याग करताना ती आपला दृढनिश्चय दाखवितात, अपरिमित कष्ट सोसण्याची तयारी दाखवितात नव्हे ते कष्ट सोसतात; पण इतरांचे किंवा परस्परांचे, एकमेकांचे कष्ट कमी कसे होतील ह्याचा विचार समूहशः करताना दिसत नाहीत. यन्त्रांच्या वापराची आणि शोषणाची सांगड त्यांच्या मनात पक्की बसली आहे: यन्त्रांचा वापर करणे म्हणजे श्रम कमी करणे आणि श्रम कमी करणे म्हणजे कोणाचे तरी शोषण करणे. यन्त्रे उपलब्ध होताना ती क्रमाक्रमाने अधिक लोकांच्या हाती पडतात. ती एका रात्रीतून सगळ्यांना उपलब्ध होत नाहीत, होऊ शकत नाहीत. त्यामुळे काहींचे कष्ट कमी झाल्याबरोबर ज्यांचे कष्ट कमी झाले ते लोक ज्यांना अजून कष्ट करावे लागत आहेत त्यांचे शोषण करीत आहेत – असे दृश्य सर्वांना दिसते. आणि सर्वांसाठी यन्त्रे निर्माण होऊ दिली नाहीत तर खरोखरच तसे घडते. ह्यावर उपाय सर्वांसाठी यन्त्रे लवकर घडवणे हा आहे – सर्वांनाच कष्ट करावयाला लावणे हा नाही. असो. पण आम्ही ह्या अंतिम निष्कर्षाला फार लवकर आलो आहोत. त्या निष्कर्षाकडे दुर्लक्ष करून आम्हाला असे का वाटते ते अगोदर पाहू.
कोणी एकाने श्रम कमी केले म्हणजे त्याच्या वाट्याचे श्रम दुस-या कोणाला तरी करावेच लागणार अशा समजुतीतून आपणा सर्वांचे वर्तन घडत असते. कोणालाच अतिश्रम किंवा कष्ट करावे लागणार नाहीत अशी समाजरचना घडविता येऊ शकते ह्याचे भान आम्हाला अद्याप आलेले नाही. ही समाजरचना देवाने घडविलेली आहे ह्या समजुतीमुळे आणि आपल्या देवावरच्या विश्वासामुळे कदाचित तसे घडत असावे.
त्याग हा एकेकट्याला करता येतो आणि वैभव निर्माण करावयाचे असेल तर त्यासाठी अनेकांचे हात आणि अनेकांची डोकी एकत्र यावी लागतात. आमच्या देशातल्या सगळ्या करुणासंपन्न लोकांनी पहिला, म्हणजे त्यागाचा पर्याय स्वीकारला आहे. एकेकट्याचा विचार केला आहे. आम्ही सगळे मिळून काही विशिष्ट प्रकारचा बदल घडवून आणू असा विचार, त्यासाठी स्वत:मध्ये आणि इतरांमध्ये फरक घडविण्याचा नेट किंवा ही जिद्द त्यांनी फार क्वचित् दाखविली आहे. हा स्वभावविशेष आमच्या परिस्थितिशरणतेचा भाग आहे. आमच्या मनावरच्या संस्कारातून बाहेर पडता न आल्यामुळे आम्ही समूहशः अतिशय दुर्बळ ठरलो आहोत.
ह्या आमच्या स्वभावाचा परिणाम असा झाला आहे की आम्ही नवीन काही घडवून आणण्यासाठी एकत्र येऊच शकत नाही. आमच्या देशात आज वापरात असलेली बहुतेक सर्व महत्त्वाची यन्त्रसामुग्री आम्ही एकतर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान ह्या देशांतून आणली आहे किंवा ती यंत्रसामुग्री तयार करणारे कारखाने आम्ही जसेच्या तसे परदेशातून आयात केले आहेत. आम्ही मुळापासून येथे तयार केलेली यन्त्रसामुग्री अगदी प्रारंभिक स्वरूपाची आहे. ज्या वस्तू आमच्या देशात तयार होतात व आम्ही ज्या स्वदेशी (Made in India) म्हणून वापरतो त्या बनविण्याची यन्त्रे आम्ही खास परदेशातून आणलेली असतात. (उदा. स्कूटर्सचे, मोटारींचे, कागदाचे कारखाने तिकडे टाकून दिले की इकडे येतात.) क्वचित् ती यन्त्रे डोळ्यांपुढे ठेवून त्यांच्यासारखीच यन्त्रे येथे घडविलेली असतात.
आम्हाला जो मुद्दा मांडावयाचा आहे तो पुन्हा एकदा येथे स्पष्ट करतो. त्याग करावयाच्या बाबतीत आम्हाला जिद्द लावता येते. त्या बाबतीत आम्ही परिस्थितिशरण नाही. एकट्याने जे काम पार पाडायचे ते आम्हाला पार पाडता येते पण जेथे सगळ्यांनी मिळून काही नवे घडवून आणावयाचे असेल तेथे आम्ही पूर्णतया परिस्थितिशरण आहोत. आणि ही शरणता आम्ही संस्कारांतून शिकलो आहोत. त्याग करण्याच्या बाबतीत आम्हाला विवेक करता येतो पण त्यापलीकडे नाही. त्याग केला की आम्हाला कृतकृत्य वाटते. पण विवेकवाद्याला तेथे थांबता येत नाही. कारण अजून पुष्कळ मजल आपणाला गाठावयाची आहे ह्याचे भान त्याला विसरता येत नाही. समता आणण्याच्या बाबतीत काही मंडळींनी व्यक्तिशः त्याग केल्याने समाजाच्या पदरात काहीच पडत नाही. उपभोग्य वस्तूंचे अधिक म्हणजे पर्याप्त प्रमाणात उत्पादन आणि त्यांचे न्याय्य वाटप घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली मनोधारणा देशभरात निर्माण होईपर्यंत विवेकवाद्याला चूप बसता येत नाही. ही मनोवृत्ति घडण्यामध्ये असलेले अडथळे हे आमच्या मनावरच्या संस्कारांमुळे येतात ह्याची जाण विवेकवाद्याला असल्याकारणाने त्याचा संस्कारांशी अविरत लढा चालू असतो.
हुकूमशाही ही एकट्याने, एकशः आणि लोकशाही ही समूहाने, संघशः राबविण्याची गोष्ट आहे. आम्हाला सामूहिक रीतीने काहीच करता येत नसल्याकारणाने लोकशाही राबविण्याच्या बाबतीत आम्ही थिटे पडतो. संस्कारजन्य परिस्थितिशरणतेचा आम्ही समूहशः आणि जाणीवपूर्वक त्याग केल्याशिवाय आमची लोकशाही यशस्वी होणार नाही. हा विषय तूर्त येथे थांबवून पी. साईनाथ काय म्हणतात ते पाहू:
सावकारांना जमीन नकोशी
ही घटना ओरिसा राज्यातली आहे. नुआपाडा जिल्हा, खरियार तालुका, आमलापाली हे खेड्याचे नाव. जेथे एका कुटुंबाकडे एका एकरापेक्षाही कमी जमीन असते तेथे जर कोणाकडे वीसपंचवीस एकर जमीन असेल तर त्याची गणना श्रीमंत जमीनदारांत होणार! आमलापालीमधला बिरिंशी हा असा एक ‘श्रीमन्त’ माणूस. पण त्याचबरोबर तो त्या दरिद्री प्रदेशातला एक अतिशय दरिद्री माणूस आहे. जणू काय क्षमायाचना करावी अशा सुरात तो म्हणतो-‘माझी बहुतेक जमीन सावकाराकडे गहाण पडल्यामुळे मला गमावावी लागली. ज्या ज्या वर्षी नापिकी होते त्या त्या वर्षी आम्हाला जमीन गमावावीच लागते. १९६५ च्या दुष्काळात माझ्या बापाला ५० रुपये कर्ज झाले, तेव्हापासून असेच चालू आहे. तो अजून कागदोपत्री पंचवीस एकरांचा मालक असला तरी त्याच्या ताब्यात जेमतेम दोन एकर जमीन आहे. बाकी सगळी निरनिराळ्या सावकारांना ‘ठेक्या’ने दिली आहे. तेथल्या असंख्य कुटुंबांची जमीन अशाप्रकारे त्यांच्या हातून कायमची निसटली आहे. ती पुन्हा त्यांच्या ताब्यात कधीही यावयाची नाही.
जुन्या कलाहांडी जिल्ह्यात मोदन नावाचा तालुका आहे. तेथेही सावकारांचीच सर्वत्र सत्ता आहे. भगवान, लखमीधर हे आणि त्यांच्यासारखे दशकांनी मोजण्यासारखे किसान सावकाराच्या तावडीत सापडले आहेत, आणि पुढच्या वर्षी देखील ते त्याच्या कृपेवर अवलंबून राहतील. पण असे असूनसुद्धा ते खरिआरच्या काही भागातल्या शेतक-यांपेक्षा सुदैवी म्हणावे लागतील. ते सावकारांवर पूर्णपणे अवलंबून असले तरी त्यांनी त्यांची तसूभर जमीन गमावलेली नाही, त्यांची भूमि जाईल अशी शक्यताही नाही.
हे सारे ऐकायला चमत्कारिक वाटते. खरे ना? सिनापाली तालुक्यात तर आणखी गंमत आहे. तेथले सावकार ज्यांच्याजवळ गहाण टाकायला अजिबात जमीन नाही अशांना कर्जे देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. जगत, बाकरधन आणि बंधुहरिजन ह्यांना त्या सावकारांच्या औदार्याचा लाभ मिळाला आहे.
काही अर्थ लागतो? पुष्कळ! प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती पाहून तेथल्या सावकारांनी त्यांच्या योजना आखल्या आहेत. जमिनीची प्रत, साधनांची उपलब्धता आणि त्यांच्या हातांत आधीपासून असलेल्या आणि भविष्यात येऊ शकणा-या आवळनाड्या ह्यांचा अभ्यास करून ते त्यांच्या कर्ज देण्याच्या अटींमध्ये फेरबदल करतात.
तेथला एक आदिवासी भगवान म्हणतो की ‘आमची जमीन इतकी खडबडीत आणि कडक आहे की ती कोण कसेल? सावकार तिच्यातून मिळणाच्या पिकाचा लोभी आहे. ते मिळत असेल तर त्याला जमीन नकोच! त्यातून हा इतका वैराण मुलूख आहे की हंगामाच्या दिवसांत सुद्धा कोणी इकडे यावयाला पाहत नाही. नहरपाटांची, पाणीपुरवठ्याची सोय नाही. म्हणून भोदनची जमीन शेतक-यांच्या हातांतून गेली नाही. सावरकरांना ती नको आहे’.
भगवानने त्याच्याजवळचा, त्याने पिकविलेला बराचसा तांदूळ आधी कर्जापोटी दिला. मागोमाग त्याच्याजवळची शिल्लक आठ पोती रोख रकमेच्या गरजेपायी त्याच सावकाराला विकली. सावकाराने साहजिकच भाव पाडला. परिणामी त्याला दोन रुपये किलोपेक्षा कमी भाव मिळाला. आपला विश्वास बसणे कठीण आहे, पण गोवर्धनचिंदा सांगतो की बियाण्याच्या एका थैलीच्या मोबदल्यात त्याच्या एकूण पिकाच्या निम्मा हिस्सा त्याला सावकाराला द्यावा लागला. ज्यांना इतक्या अमर्याद दराने कर्ज काढावे लागते असे तेथले सगळेच शेतकरी आहेत.
आपापल्या कुटुंबांना जेवू घालण्यासाठीच ह्या लोकांना कर्जे काढावी लागतात. त्यांच्या तंगीच्या दिवसांत सावकार त्यांना धान कर्जाऊ देतो आणि हंगामावर ते दिढीदुपटीने नव्हे तर चौपटी-पाचपटीने वसूल करतो आणि जे काही शिल्लक उरते तेही त्यांना त्यालाच विकावे लागते. त्याशिवाय ते जगूच शकत नाहीत, असे ‘विकल्प’ ह्या गैरसरकारी संस्थेचे डॉ. पटनायक सांगत होते.
ह्या साच्या प्रकरणातला दैवदुर्विलास असा की सावकार त्यांच्याकडून घेतलेले जे धान्य साठवून ठेवतो तेच त्यांना अवाच्या सवा भावाने विकतो. आपल्या निकडीच्या वेळी सावकाराचे जबर व्याज कबूल करून आपणच पिकविलेले धान्य विकत घेऊन किंवा कर्जाऊ घेऊन त्यांना आपले पोट जाळावे लागते. ज्याची परतफेड अशक्य होईल असे व्याज त्यांना दरवर्षी द्यावे लागते.
एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी जावी तशी त्यांच्या भुकेच्या सोबतीला आजारपणे त्यांच्या घरी जातात. त्या आजारातून उठण्यासाठी त्यांना पुन्हा कर्जाचे डोंगर आपल्या शिरावर वाहावे लागतात. मलेरिया हा त्यांच्या पाचवीला पुजलेला आजार आहे. कर्जाचा विळखा इतका जबरदस्त आहे की औषधपाण्यासाठी १०० रुपये घेतले की वर्षअखेर २२० रुपयांचे देणे होऊन बसतेच.
हरिगुणचिंदाने ही स्थिति त्याच्या शब्दांत आम्हाला सांगितली. तो म्हणाला, ‘येथे तुमच्याजवळ किती जमीन ह्याला काही महत्त्व नाही. तुमचे जगणेवाचणे तुमच्याजवळ धान (भात) किती त्यावर अवलंबून आहे. त्याचे मोल जमिनीपेक्षा अनंतपटीने अधिक आहे. तुमचे पोट भरून उरतील अशी पाच पोती जरी तुमच्याजवळ असली तरी तुम्ही त्यांच्या साह्याने खूप मोठी उलाढाल करू शकता. उलट तुम्ही जमिनीचे मालक असाल तर तुम्ही कर्जात खोलखोल रुतत जाता…..’
आपणाला ह्या पी. साईनाथ ह्यांनी लिहिलेल्या घटनांचा शोषणाच्या सुट्या घटना म्हणून विचार करावयाचा नाही. ज्या समाजरचनेमुळे अशा घटना घडतात ती रचना आपल्या स्वभावामुळे, आपल्यावरच्या संस्कारामुळे घडली आहे हे जाणून ही परिस्थिति आपणाला बदलावयाची आहे. ह्या प्रश्नांना संघशः भिडावयाचे आहे. आणि संघशः कोणतेही प्रश्न सोडविण्याचे आपणास माहीत नसल्यामुळे हे विवेकवाद्यांचे कार्य अतिशय अवघड होऊन बसले आहे.
विवेकवादी नीती शक्य आहे काय?
– दि. य. देशपांडे
विज्ञानवादी नीती असू शकत नाही, विज्ञानाकडून चांगल्या-वाइटाचे, मूल्यांचे, दिग्दर्शन होणे शक्य नाही, एवढेच नव्हे, तर केवळ ज्ञानाकरिता ज्ञानाची उपासना करणा-या विज्ञानाजवळ ज्ञान हे मूल्य आहे आणि ज्ञानाकरिता ज्ञानाची उपासना करणे मूल्यवान आहे हेही सांगण्याचे सामर्थ्य विज्ञानात नाही हे अनेक वेळा सांगून झाले आहे. पण विवेकवादी नीतीही शक्य नाही, विवेकवादातही नीतीचे दिग्दर्शन करण्याचे सामर्थ्य नाही असे एक मत अलीकडे व्यक्त झाले आहे. त्या मताची थोडी चर्चा करण्याचा आज विचार आहे.
-१.-
प्रथम विवेक म्हणजे काय याचा विचार करू. आपण ‘विवेक’ हा शब्द ‘reason’ या इंग्लिश शब्दाचा पर्याय म्हणून वापरतो आहोत. त्यामुळे ‘reason’ या शब्दाला नसलेली एखादी अर्थच्छटा जर ‘विवेक’ या शब्दाला असली तर ती बाद समजावी असे मी मानतो.
‘Reason’ चा अर्थ अनेक तत्त्वज्ञांनी सांगितला आहे. त्यापैकी सर्वमान्य अर्थ असा: Reason ही एक बौद्धिक शक्ती असून ती पुढील गोष्टी करू शकते. (१) प्रत्येक विधान सत्य किंवा असत्य यांपैकी एकच असू शकते, आणि निदान एक असले पाहिजे. हे ओळखणे, ओळखता येणे हे reason चे सामर्थ्य आहे. (२) Reason चे दुसरे सामर्थ्य एक विधान सत्य असेल, तर अन्य एक किंवा अनेक विधानेही सत्य असली पाहिजेत हे ओळखण्याचे. उदा. ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे’ हे संयुक्त विधान जर सत्य असेल तर ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे’ हे विधानही सत्यच असावे लागेल. म्हणून पहिले विधान जर सत्य असेल तर त्यावरून दुस-याचा निष्कर्ष आपण काढू शकतो. दोन विधानांतील या संबंधाला ‘implication’ संबंध असे नाव आहे. त्याला आपण व्यंजनसंबंध म्हणू. व्यंजकविधान व्यंजितविधानाला व्यंजित करते असे म्हणतात.
ही दोन सामथ्र्ये reason मध्ये असतात हे सर्वांना मान्य आहे. पण याखेरीज आणखी काही सामर्थ्य reason मध्ये असतात असे काही तत्त्वज्ञ म्हणतात. पण अन्य तत्त्वज्ञांना ते मान्य होत नाही. उदा. काही तत्त्वज्ञांच्या मते reason चे तिसरे सामर्थ्य म्हणजे नैतिक विधींची सत्यता ओळखण्याचे. उदा. ते असे म्हणतात की, “सत्य बोलावे’, ‘अहिंसा पाळावी’ हे reason ला साक्षात् कळते. हे मत असे आहे की जसे रंग डोळ्याला प्रत्यक्ष दिसतात, तसाच सत्याचा साक्षात्कार किंवा प्रत्यक्षदर्शन ज्याने होते असे ‘intuition’ नावाचे सामर्थ्य reason जवळ आहे. त्याला अंतर्दृष्टी म्हणता येईल. या अंतर्दृष्टीचे किंवा प्रत्यक्षदर्शनाचे उदाहरण पुढील देता येईल. ‘दोन राशी तिस-या राशीबरोबर असतील तर त्या परस्परांबरोबर असतात. हे विधान सत्य आहे हे सिद्ध करावे लागत नाही. ते आपल्याला एकप्रकारच्या प्रत्यक्षदर्शनाने कळते. अंतर्दृष्टीने नैतिक विधीही साक्षात् कळतात असे काही तत्त्वज्ञ म्हणतात. पण अन्य तत्त्वज्ञांना ते मान्य नसल्यामुळे तशी अंतर्दृष्टी आपल्याजवळ आहे हे म्हणणे विवाद्य म्हणून सोडून द्यावे लागते.
हे जर खरे असेल, जर reason च्या किंवा विवेकाच्या अंगी वरील दोन सामर्थ्याखेरीज तिसरे सामर्थ्य नसेल, तर विवेकवाद्याला नीती निरपवाद मानता येणार नाही, हा श्रद्धावाद्यांचा विवेकवाद्यावर आक्षेप आहे. मनुष्यमात्रावर निरपवादपणे बंधनकारक असणारी नीती विवेकवाद्याला अशक्य म्हणून सोडून द्यावी लागेल. विवेकवादी यावर काय म्हणतो ते आता पाहावयाचे आहे.
-२-
तत्पूर्वी एकदोन गोष्टींची चर्चा करणे अवश्य आहे. नीतीचे स्वरूप स्थूलमानाने काय आहे ते आधी पाहू.
नीतीची भाषा विज्ञानाच्या भाषेहून दोन बाबतींत भिन्न आहे. (१) तिचा एक खास शब्दसंग्रह आहे, आणि (२) तिच्या वाक्यांचा एक विशिष्ट आकार असतो. शब्दसंग्रह लहानसाच आहे-चांगले, वाईट, योग्य, अयोग्य, विहित, निषिद्ध, कर्तव्य आणि वाक्यांचा खास नीतिशास्त्रीय आकार म्हणजे विध्यर्थी आकार – ‘करावे’, ‘करू नये’ अशा रूपाची क्रियापदे असलेली वाक्ये, यांना विधी म्हणतात,
शब्दसंग्रह आणि वाक्याकार नीतीचे खास आहेत असे वर म्हटले. परंतु ते सर्वथा बरोबर नाही. कारण ‘चांगले’, ‘वाईट’ ही विशेषणे नैतिक वाक्यांखेरीज अन्यत्रही वापरली जातात; उदा. कलास्वादात. एखादे चित्र किंवा गाणे चांगले आहे किंवा वाईट आहे असे आपण म्हणतो ते नैतिक अर्थाने नव्हे. आणि विध्यर्थी क्रियापदे केवळ नैतिक अर्थीच वापरली जात नाहीत, ती उपदेश, सल्ला इत्यादि नीतिभिन्न बाबतींतही वापरली जातात. पण असे असले तरी वरील वैशिष्ट्ये नैतिक भाषेत असतात हे स्थूलमानाने म्हणता येईल.
आता वरील वैशिष्ट्यापैकी शब्दसंग्रहाचा आधी विचार करू.
‘चांगले’ म्हणजे काय? हे विशेषतः कोणत्या गुणाचे द्योतक आहे? जसे रंग, आवाज, इ. शब्द वस्तूंच्या ठिकाणी असणा-या गुणांची नावे आहेत, तसे ‘चांगले’ हे वस्तूंच्या एखाद्या गुणाचे नाव आहे काय? एका अर्थी ‘चांगले’ म्हणजे आपल्याला पसंत असलेली किंवा आपल्याला प्रशंसनीय वाटणारी वस्तू. उदा. चांगली सुरी, चांगली बँट, चांगले घड्याळ, चांगले कर्म. ही सर्व चांगली आहेत, पण खरोखर वरील चार वस्तूंत काय साम्य आहे. आपण सुरीच्या ज्या गुणांमुळे तिला चांगली म्हणतो ते गुण आणि घड्याळाच्या ज्या गुणांमुळे त्याला आपण वाखाणतो, ते गुण सर्वथा भिन्न असल्यामुळे चांगले’ हे विशेषण एका गुणाचे नाव आहे असे म्हणता येत नाही. ‘चांगले’ हा शब्द प्रशंसा करण्याकरिता किंवा एखाद्या गोष्टीची वाखाणणी करण्याकरिता वापरायचा शब्द आहे.
‘चांगले’ या शब्दाने व्यक्त होणारा गुण दोन प्रकारचा असावा असे दिसते: स्वयमेव चांगले किंवा एखाद्या साध्याचे साधन म्हणून चांगले.
ज्याला पूर्वी ‘चांगले’ म्हणत त्याला अलीकडे ‘मूल्य’ हा शब्द वापरतात. वर उल्लेखलेल्या भेदानुसार मूल्यांचे दोन प्रकार होतात; साध्य म्हणून मूल्य आणि साधन म्हणून मूल्य. एखादी वस्तू दुस-या एखाद्या वस्तूचे साधन असू शकेल. तसे असेल तर तिला साधनमूल्य आहे असे म्हणतात. एकाच वस्तूला साध्यमूल्य आणि साधनमूल्य दोन्ही असू शकतील. तिला साध्य म्हणून मूल्य असेल, आणि ती अन्य साध्याचे साधन असू शकेल. साध्यसाधनांची ही शृंखला बरीच दीर्घ असू शकते. उदा. शिक्षणात निम्न पदवी उच्चतर पदवीचे साधन असते, तर उच्चतर पदवी तिच्याहून उच्च पदवीचे साधन असते. परंतु ही शृंखला कितीही दीर्घ असली तरी ती शेवटी अशा साध्यात संपावी लागते की जे केवळ साध्य आहे, आणि अन्य कशाचेही साध्य नाही. म्हणजे साध्य असलेली गोष्ट आपल्याला केवळ तिच्याकरिता हवी असते. अशा वस्तूला स्वतोमूल्य असते असे म्हणतात. काही गोष्टी स्वतोमूल्ये असली पाहिजेत, कारण नाहीतर कशालाही साधनमूल्य असू शकणार नाही. जसे सर्व वस्तू परप्रकाशित असू शकणार नाहीत, काही तरी स्वप्रकाश असावे लागेल, आणि ते स्वप्रकाश आहे म्हणून अन्य गोष्टींना प्रकाश लाभू शकतो, तसेच हे आहे.
एखाद्या गोष्टीला मूल्य आहे किंवा ती चांगली आहे हे आपल्याला कसे कळते? ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. जी वस्तू आपल्याला हवीशी वाटते, जिच्याकरिता आपण कष्ट करायला किंवा अन्य किंमत द्यायला तयार असतो ती मूल्यवान वस्तू. जर एखादी वस्तू आपल्याला केवळ तिच्याकरिताच हवी असेल तर ती वस्तू स्वतोमूल्यवान किंवा स्वयमेव चांगली.
स्वतोमूल्यवान असणे म्हणजे कोणाला तरी केवळ तिच्याकरिताच हवी असणे. असे असल्यामुळे वस्तू कोणाच्या तरी दृष्टीने स्वतोमूल्यवान असणार, शनिरपेक्ष मूल्य अशक्य असणार!
कोणाच्याही इच्छेनिरपेक्ष मूल्य असू शकणार नाही. स्वतोमूल्याची कल्पना विषयनिष्ठ’ (objective) नाही; ती विषयिनिष्ठ (subjective ) आहे. जी वस्तू कोणाला तरी मूल्यवान वाटते तीच मूल्यवान वस्तू.
निर्मनुष्य जगात, निर्मनस्क (mindless) विश्वात काहीही मूल्यवान असू शकत नाही. मूल्य केवळ ज्ञसापेक्ष असणार.
-३-
मग विवेकवादी नीती काय असू शकेल?
**१. विषय म्हणजे object. ज्याला विषय असतात तो विषयी (subject). यावरून ‘विषयनिष्ठ’ आणि ‘विषयिनिष्ट’ हे objective आणि subjective या अर्थाचे शब्द.
कांटने केलेला categorical (निरुपाधिक) आणि hypothetical (औपन्यासिक) विधींमधील भेद येथे उपयुक्त होईल. निरुपाधिक विधी सर्वांवर बिनशर्त बंधनकारक असतो, तर औपन्यासिक विधी आपल्याला हव्या असलेल्या साध्याच्या सिद्धीकरिता बंधनकारक असतो. उदा. जर तुला डॉक्टर व्हायचे असेल, तर तुला डॉक्टरची परीक्षा पास करावी लागेल. हा विधी डॉक्टरी परीक्षा उत्तीर्ण होणे अवश्यमेव आहे असे प्रतिपादतो, पण आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे या अटीवर. जर ती अट आपण पूर्ण केली नाही तर तो बंधनकारक राहात नाही. उलट निरुपाधिक विधी तुम्हाला कोणतेही साध्य असो की नसो, बंधनकारक असतो. उदा. ‘सत्य बोलावे’, ‘वचने पाळावीत’ हे विधी कसल्याही अटीवाचून बंधनकारक आहेत असे कांटचे मत होते. पण असा विधी कसा असू शकेल हे सांगणे कठीण आहे. सर्व परिस्थितीत सत्य बोलावे किंवा वचन पाळावे हे म्हणणे बरोबर वाटत नाही. त्यामुळे विवेकवादी नीतीत विधी निरुपाधिक असणार नाहीत; ते फक्त औपन्यासिक असू शकतील. अशा विधीखेरीज राज्याचे कायदेही बंधनकारक असतात, कारण ते न पाळल्यास शिक्षा होते. ती शिक्षा जर व्हायला नको असेल तर कायदे पाळणे बंधनकारक आहे.
पण या व्यवस्थेत अनर्थ निर्माण होणार नाहीत काय? कारण या व्यवस्थेत फक्त औपन्यासिक विधीच शक्य असल्यामुळे ज्याला कर्तव्य म्हणतात, जे सर्वांवर निरपवादपणे बंधनकारक असते, ते शिल्लक राहणार नाही. प्रत्येक मनुष्य मनःपूत आचरण करील. मग नीती कुठे राहिली?
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की सध्याच्या व्यवस्थेतील स्थितीहून नवीन व्यवस्थेत स्थिती फारशी वेगळी असणार नाही. वर्तमान व्यवस्थेत जरी निरुपाधिक विधी बंधनकारक आहेत असे मानीत असले तरी त्याप्रमाणे वागणारे फारच थोडे असतात, किंबहुना नसतात म्हटले तरी चालेल. सामान्यपणे लोक फक्त नीतीने वागण्याची बतावणी करतात. प्रत्यक्षात बहुतेक लोक मनःपूतच वागत असतात. पारंपरिक नैतिक आवाहनांना फारसे लोक प्रतिसाद देत नाहीत. प्रत्यक्ष प्रतिसाद देणारे अपवादात्मक असतात. वर वर्णिलेल्या विवेकवादी नीतीत याहून वेगळी स्थिती असेल असे मानण्याचे कारण नाही.
-४-
विवेकवादी व्यवस्थेत नीती व अनीती यांचे स्वरूप काय असेल?
प्रथमदर्शनी असे वाटेल की नीति-अनीति हा भेदच नाहीसा झाला आहे. पण हा भ्रम आहे. काळजीपूर्वक पाहिल्यास हा भेद नष्ट होत नाही असे आपल्या लक्षात येईल. मनुष्याला आपल्या इच्छांची पूर्ती व्हावी अशी इच्छा नेहमीच असते, आणि त्याकरिता त्याची धडपड सदैव चालू असते. त्याचबरोबर आपण हेही पाहिले की आपल्या इच्छापैकी एक इच्छा इतरांची इच्छापूर्ती व्हावी अशी असते. मनुष्य स्वार्थी आहे, पण केवळ स्वार्थी नाही. परार्थ हाही त्याच्या इच्छेचा विषय असू शकतो. याखेरीज सर्व मानवांना, प्राणिमात्रालाही, थोडेबहुत सुख लाभावे अशीही त्याची इच्छा असते. या सर्व इच्छांची पूर्ती होण्याकरिता थोडी योजना, थोडी दूरदृष्टी अवश्य असते. आपल्या इच्छापैकी काही इतर इच्छांच्या विरोधी असतात; त्यापैकी एकीची पूर्ती झाली की दुसरी विफल होते. म्हणून आपल्या इच्छांची पाहणी करून ज्या परस्परविरुद्ध नाहीत अशा इच्छांची निवड केली तर आपले सुख वाढते, वैफल्य कमी होते. जी गोष्ट एका मनुष्याच्या इच्छांची, तीच अनेक मनुष्यांच्या इच्छांची. दोन परस्परांविरुद्ध इच्छांची पूर्ती शक्य नाही; पण त्यापैकी अविरोधी इच्छांची निवड केली तर अधिक इच्छांची पूर्ती होऊ शकेल. म्हणून इतरांच्या इच्छांकडे दुर्लक्ष करून केवळ आपल्या स्वार्थी इच्छांची पूर्ती करणे हा अदूरदर्शीपणा होईल. तीच अनीती. शक्यतो इतरांच्या इच्छांच्या अविरोधी इच्छांची निवड करणे म्हणजे नीती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.