दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (१)

भारतातील मध्यम-वर्गाचा हा संशोधनपूर्वक अभ्यास पवन वर्मानी अतिशय प्रभावीपणे आणि आश्चर्यकारक पोटतिडकेने सादर केला आहे. इतिहासाचे आणि कायद्याचे पदवीधर असलेले वर्मा भारतीय विदेशसेवेत एक अधिकारी आहेत. राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी म्हणून आणि इतर अनेक जबाबदारीच्या अधिकारपदांवर त्यांनी काम केले आहे आणि सध्या ते विदेश कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी, प्रवक्ते (spokesman) आहेत.
ह्या आधीची वर्माची पुस्तके वेगळ्या प्रकारची आहेत. उदा. Krishna: The Playful Divine; Ghalib: The Man, the Times; Mansions at Dusk – The Havelis of old Delhi (with Raghu Rai) वगैरे. ह्या पुस्तकांवरून त्यांचा उर्दू काव्याचा, पौराणिक वाङ्मयाचा आणि इतिहासाचा अभ्यास लक्षात येतो. पण The Great Indian Middle-Class ह्या पुस्तकाचा विषय वर्तमानकाळातला. त्याच्या निकटपणामुळेच त्याचा नीट अंदाज येणे कठीण. विविधतेने भरलेल्या आणि विस्तीर्ण पसरलेल्या एका मानवसमूहाचा अभ्यास चिकित्सक नजरेने आणि विश्लेषणात्मक पद्धतीने करणे सोपे नाही. नुसत्या संख्येचाच विचार करायचा झाला तर मध्यमवर्ग जेथे प्रामुख्याने एकवटला आहे तो ‘शहरी भारत’ लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील तिस-या नंबरचा देश होईल. त्या अर्थाने भारतीय मध्यमवर्ग ‘थोर’ आहे.
१९९१ साली नरसिंहरावांच्या सरकारने मनमोहनसिंगच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणा जाहीर केल्या. भारताची अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणुकीच्या स्वागताला सिद्ध झाली आणि जगाच्या नजरेत भारतातला मध्यमवर्ग प्रचंड ग्राहकपेठ म्हणून एकदम भरला. ग्राहक म्हणून त्याच्या वेगवेगळ्या शक्यतांचा संख्याशास्त्रीय अभ्यास सुरू झाला. आपल्या पुस्तकाचा हेतू सांगताना वर्मा म्हणतात,
The purpose of this book is to try and understand this class; not only to map what it buys or would like to own, but to study how it has grown and evolved over the years. The work, thus, analyses the growth of the middle class during the pre-independence years; its progress in the first decades after 1947, when the memory of the freedom movement was still vivid and the Gandhi-Nehru legacy held many of its members in thrall; and its transformation in the years after 1964 (the year Nehru died) when in tandem with the evolution of the Indian State, this class lost its innocence and changed in size and character. It is a study also of the inner landscape of its thinking and its behavioral patterns, of what it likes to believe about itself and what the truth really is.
मध्यमवर्गाबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीच्या प्रचंड साठ्यातून निवड करताना वर्मानी जी पद्धत अंगीकारली त्यानुसार मध्यमवर्गाच्या सर्व अंगांचा यांत्रिकपणे विचार न करता त्यांनी विश्लेषणाकरता एक विशिष्ट चौकट निवडली आणि त्यासंबंधातली माहिती गोळा केली. स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्यापासून नेहरूंच्या मृत्यूपर्यंत आणि तेव्हापासून आजपर्यंत असे मध्यमवर्गात होणा-या बदलाचे ३ टप्पे ह्या पुस्तकात चर्चिले आहेत.
मध्यमवर्गाच्या उदयाची अन्वर्थकता (relevance) वर्माना लॉर्ड मेकॉलेच्या शैक्षणिक धोरणात सापडते. भारतातील शिक्षणाबाबतच्या मेकॉलेच्या कार्यवृत्तात म्हटले आहे:
We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect.
हजारो वर्षांची पुरातन संस्कृती असलेल्या देशात इंग्रजांची ही गर्विष्ठ योजना कमालीची यशस्वी झाली. कारण केवळ इंग्रजांचाच स्वतःच्या वंशाच्या आणि संस्कृतीच्या श्रेष्ठत्वावर विश्वास होता असे नाही तर आंग्लशिक्षित भारतीयांचाही होता. अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या अंधारात चाचपडणाच्या भारतीयांना पाश्चात्त्य मूल्ये आणि संस्कृतीच वाचवू शकेल असे अनेकांना वाटत असे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्रातील मोतीलाल नेहरूंचे वर्णन हे अशा व्यक्तीचे उदाहरण म्हणून वर्मा उद्धृत करतात. राज्यकर्त्यांच्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाबद्दल खात्री असल्यानेच त्यांच्या जीवनपद्धतीचेही निःसंकोच अनुकरण भारतातील आंग्लशिक्षित समाज करीत असे.
मेकॉलेचे धोरण यशस्वी ठरण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण होते इंग्रजांचे उदारमतवादी धोरण. ह्या धोरणामुळे आंग्लशिक्षित भारतीयांना प्रशासनात आणि वकिली कामकाजात नोक-या मिळत गेल्या. सरकारी नोकरी आणि त्यामुळे मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक सुरक्षितता ह्यांचे महत्त्व एवढे होते की अशी नोकरी करण्यात काही अपमानास्पद आहे असे मध्यमवर्गीय समाजाला वाटतच नव्हते.
१८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली ती काही प्रमाणात राजकीय असंतोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी व्यासपीठ असावे म्हणून. पण काँग्रेसचे सदस्य प्रामुख्याने उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय भारतीयच होते आणि सुरुवातीला ह्या व्यासपीठाचा वापर ब्रिटिश राजसत्तेला आह्वान देण्यासाठी न करता प्रशासकीय सेवेत, सैन्यात आणि विधानपरिषदांमध्ये जास्तीत जास्त भारतीयांचा सहभाग असावा ह्याची चर्चा करण्याकरताच केला गेला.
जहाल अथवा मवाळ कोणत्याही बाजूचे असले तरी काँग्रेसचे सर्व सदस्य मध्यमवर्गीयच होते आणि स्वतःच्या प्रगतीकरता झटत होते. भारताच्या राष्ट्रीय चळवळीत कष्टकरी सामान्य जनतेचे आगमन गांधीजींमुळे झाले. पण चळवळीत अंतर्भाव झाला तरी त्यांचे सामाजिक स्थान बदलले नाही. सत्तेचे केंद्र आणि धोरणाची आखणी मध्यमवर्गीय अभिजनांच्याच हातांत राहिली. गांधींनी उपलब्ध करून दिलेले असहकारासारखे क्रांतिकारक शस्त्र परकीय सत्ता उलथून टाकायला उपयोगी पडले पण भारतातील आर्थिक सामाजिक असमतोल कमी करण्याकरता गांधींना त्याचा उपयोग करता आला नाही. वर्यांच्या मते गांधींना समाजाची असलेली घडी बदलायची नव्हती पण त्यातील घटकांमध्ये अस्तित्वात असलेली विषमता स्वतःच्या वैयक्तिक उदाहरणाचा नैतिक प्रभाव वापरून कमी करावयाची होती. हरिजनांचा उद्धार ह्या संदर्भातून पाहायला हवा. श्रीमंतांची संपत्ती ही गरिबांकरता सांभाळलेली ठेव आहे ही गांधींची कल्पनाही ह्याच संदर्भातून पाहायला हवी.
काँग्रेसची सूत्रे उच्च आणि मध्यमवर्गाच्या हातांत असण्याबद्दल सतत जागरूकपणे टीका करणारे फक्त नेहरू होते. सोव्हिएट रशियातील घडामोडीनंतर तर कष्टकरी सामान्य जनतेबद्दल त्यांना वाटणाच्या कळवळ्याला एक वेगळीच दिशा मिळाली. समाजवादाचे महत्त्व पटून जास्त मूलभूत आर्थिक सामाजिक बदल काँग्रेसच्या कार्यक्रमात अंतर्भूत करण्याची त्यांची धडपड सुरू झाली, पण स्वातंत्र्याची चळवळ जास्त निकडीची झाली आणि त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरलीच नाही.
मध्यमवर्गाच्या हाती राष्ट्रीय चळवळीची सूत्रे राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे हिंदू-मुसलमानांमधील वाढता तणाव. दोन्ही धर्मातील संशयाचे वातावरण जरी ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे चेतवले असले तरी त्यांचे प्रयत्न यशस्वी होण्यामागे महत्त्वाचे कारण होते दोन्ही धर्माच्या नेतेपदी असलेले मध्यमवर्गीय लोक ज्यांना या धोरणामुळे स्वतःचा फायदा करून घेता येईल हे जाणवले. परिस्थितीतील मर्म नेमके जाणून घ्यायची हातोटी असलेल्या नेहरूंनी त्याचे नेमके विवरण केले –
“It is extraordinary how the bourgeois classes both among the Hindus and the Muslims, succeeded, in the sacred name of religion, in getting a measure of mass sympathy and support for programmes and demands which had absolutely nothing to do with the masses, or even the lower middle class. Every one of the communal demands put forward by any communal group is, in the final analysis, a demand for jobs, and these jobs could only go to a handful of the upper middle-class. These narrow political demands, benefitting at the most a small number of the upper middle classes and often creating barriers in the way of national unity and progress, were cleverly made to appear the demands of the masses of that particular religious group.’ भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या अग्रभागी मध्यमवर्ग असल्याने धार्मिक संघर्ष मिटले नाहीत हे रविंदरकुमार ह्या इतिहासाचे मत वर्मा नोंदवतात.
पण मध्यमवर्गाच्या हातात असलेले स्वातंत्र्य चळवळीचे सुकाणू हा काही सत्ता हस्तगत करण्याच्या पूर्वनियोजित कटाचा भाग नव्हता हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. देशाला पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे नेणे ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे, अग्रभागी असण्याचा अधिकार हा आपला ऐतिहासिक वारसा आहे अशी त्यांची प्रामाणिक समजूत होती. त्यांची निष्ठा, देशभक्ती, स्वार्थत्याग ह्यांच्या आख्यायिकांनी आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास तेजोमय झाला आहे. पण म्हणूनच एवढ्या मोठ्या जनसमूहाच्या अग्रभागी असण्याचा आपल्याला अधिकार आहे का असा प्रश्नही त्यांच्या मनात आला नाही. आदर्शवादाच्या तेजोवलयात त्यांचा स्वार्थ सुरक्षित राहिला. ब्रिटिशांनी आपल्या प्रतिमेबरहुकूम घडवलेल्या ह्या मध्यमवर्गातील अभिजनवर्गाला आपले आदर्श, कल्पना, मते, गरजा ह्या भारतातील सर्वाच्या नसतील असे वाटलेच नाही. घटना बनवताना, भाषेच्या प्रश्नांची चर्चा करताना ह्याचा ऊहापोह झालेला दिसतो. इंग्रजी भारताची राष्ट्रव्यवहाराची भाषा होऊच कशी शकते? भारतातील सामान्य लोकांच्या शिक्षणाचा, संस्कृतीचा तिच्याशी संबंधच काय असा प्रश्न नेहरू विचारताना दिसतात. स्वातंत्र्य जसजसे जवळ येताना दिसते तसतसे फाळणीच्या वेदना, हिंदू-मुसलमान दंगे, स्वातंत्र्याचा आनंदोत्सव ह्या कल्लोळात महात्मा गांधींचा सत्तेच्या मोहाबद्दल दिलेला धोक्याचा इशारा आणि नैतिक संतुलन सांभाळण्यासाठी त्यांनी दिलेला तोडगा आपल्या मनात घर करतात.
I will give you a talisman. Whenever you are in doubt or when the self becomes too much with you, apply the following test. Recall the face of the poorest and the weakest man whom you may have seen, and ask yourself if the step you contemplate is going to be of any use to him. Will he gain anything by it? Will it restore him to a control over his own life and destiny? In other words will it lead to Swaraj for the hungry and spiritually starving millions? Then you will find your doubts and your self melting away. (अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.