नीती आणि समाज

अनेक व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा समाज तयार होतो. व्यक्तींचे समूहात राहणे सुखकर व्हावे, समाज-जीवन सुरळीत चालावे व समाजाची प्रगत व्हावी यासाठी व्यक्तींनी आपल्या वर्तनावर काही बंधने घालून घेणे आवश्यक असते. किंवा दुस-या शब्दांत, समाजाने, व्यक्तीने कसे वागावे यासाठी, काही मार्गदर्शक नियम घालून द्यावे लागतात व ते नियम पाळले जातील यासाठी प्रयत्न करावा लागतो.

बहुतेक सर्व मानवी समाजांमध्ये आजतागायत ‘धर्म’ मार्गदर्शक नियम घालून देत असे. पण त्यातील अनेक त्रुटी लक्षात आल्यामुळे आता बहुतेक विचारी व्यक्ती धर्माची जागा ‘नीती’ ने घ्यावी असे मानू व बोलू लागल्या आहेत. धर्म म्हणजेच नीति असे काही व्यक्ती मानत व मांडत असल्या, तरी ते खरे नाही. कारण धर्म अनेक वेळा नीतीच्या विरुद्ध भूमिका घेत आला आहे. शिवाय नीतीची पूर्ण संकल्पना ऐहिक आहे. धर्म नीतीपलीकडे जाऊन आत्मा, परलोक, ईश्वर, आत्म्याचे अविनाशित्व वगैरे ऐहिक नसलेल्या गोष्टींचा विचार करतो व त्यांच्या आधारे वर्तनाचे नियम ठरवतो. तेव्हा धर्म म्हणजेच नीति हे समीकरण बरोबर नाही.

नीतीची संकल्पना देखील मानवी ज्ञानाच्या प्रगतीबरोबर उत्क्रांत होत आली आहे. नीतीची कल्पना तशी स्वार्थीच आहे. आपल्याला, आपल्या कुटुंबीयांना व आपल्या वंशजांना सुखाचे दीर्घायुष्य लाभावे हीच नीतीमागील इच्छा असते. ही इच्छा पुरी व्हायची असेल तर आपल्याला कमीत कमी शत्रू निर्माण व्हावे, आपल्याला रोग होऊ नयेत व एकंदरीत मानवी समाजजीवन सुरळीत दीर्घकाळ चालू राहावे या गोष्टी आवश्यक बनतात. ही उद्दिष्टे साध्य करायची असतील तर व्यक्तीने स्वतःला जास्तीत जास्त सुख मिळवण्याचा प्रयत्न करताना पुढील ४ नियम पाळणे आवश्यक आहे.

१) इतर व्यक्तींचे नुकसान होणार नाही व त्यांना सुखाची संधी नाकारली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
२) भावी पिढ्यांना सुखाने जगता यावे यासाठी पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती यांची काळजी घ्यावी, उधळपट्टी करू नये, प्रदूषण मर्यादित ठेवावे.
३) पर्यावरणाचे घटक असलेले जीव, जंतू, कीटक, प्राणी, वनस्पती या सजीवांची व हवा, पाणी, जमीन व अवकाश या निर्जीव घटकांचीही काळजी घ्यावी. हे सर्व घटक परस्परांवर अवलंबून असतात. त्यामुळे यांतील कोणत्याही एक घटकाच्या नष्ट होण्याने सर्व पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो हे ध्यानात धरून वागावे. अखेर मानवी अस्तित्व हे पर्यावरणाचा एक भागच आहे, व मानवी जीवनाची गुणवत्ता पर्यावरणाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.
४) पाळीव प्राण्यांचा अन्न म्हणून किंवा ओझी वाहणारा, वाहने ओढणारा, घराचे रक्षण करणारा, मनोरंजन करणारा प्राणी म्हणून उपयोग करताना शक्य तितका दयाळूपणा दाखवावा. हे चार नियम म्हणजेच नीति अशी नीतीची सोपी व सुटसुटीत व्याख्या करता येईल.

समाजातील प्रत्येक व्यक्तीने नीतीने वागावे हा आदर्श झाला. पण प्रत्यक्षात असे होत नाही. नीतीने वागणा-या व्यक्तींचे प्रमाण एखाद्या समाजात जितके जास्त असेल तितके त्या समाजात राहणे व्यक्तींना सुखकर असते, व तितका तो समाज प्रगतिशील असतो, या उलट अनीतीने वागणा-या व्यक्तींचे प्रमाण अधिक असेल त्या समाजाचे विघटन होण्याची, समाज म्हणून तो नष्ट होण्याची शक्यता वाढते.

व्यक्ती नीतीने वागणार की अनीतीने हे कशावर ठरते? तर याला दोन घटक कारण असतात. एक आनुवंशिक घटक व दुसरा शिक्षण, संस्कार व समाजातील एकंदर वातावरण. यानुसार सर्व समाजाची ढोबळ अशी तीन वर्गात विभागणी करता येईल.

१) मूलतः नीतिमान् – यात अंदाजे पाच टक्के व्यक्ती असतात. या व्यक्ती कितीही कठीण परिस्थितीत नीतीनेच वागतात. फायदा, तोटा, शिक्षा, बक्षीस, प्रशंसा यांचा विचार न करता, व भोवतालचे जग कितीही अनीतीने भरले असले तरी, या व्यक्ती नीतीनेच वागतात.

२) परिस्थिति-शरण – यात साधारणपणे नव्वद टक्के व्यक्ती येतात. या व्यक्तींचे वागणे कसे असेल हे दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे त्यांच्या भोवतालच्या समाजाची सरासरी नीतिमत्तेची पातळी व दुसरी म्हणजे अनीतीने वागल्यास समाजाकडून लगेच शिक्षा होण्याची भीती व शक्यता. या दोन्ही गोष्टी परत एकमेकांवर अवलंबून असतात. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास, कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊन गुन्हा करणान्यास नक्की व लगेच शिक्षा होत असल्यास, समाजातील साधारणपणे ९०% व्यक्ती नीतीने वागतात.

३) मूलतः अनीतिमान् – यांत अंदाजे पाच टक्के व्यक्ती मोडतात. या मूलतःच अनीतिमान् किंवा गुन्हेगारी वृत्तीच्या असतात. समाजातील सर्वसाधारण नीतिमत्तेची पातळी कितीही उच्च असो, किंवा शिक्षेची शक्यता कितीही जास्त असो, या व्यक्ती गुन्हे करतातच. यांतील काही व्यक्तींच्या रंगसूत्रांमध्येच दोष असतो, तर काहींमध्ये मानसिक विकृति असते, तर काही व्यसनाधीन असतात.
वर दिलेले ५%, ९०%, ५% हे प्रमाण एक गृहीत धरलेले, अंदाजी प्रमाण आहे. हा समाजशास्त्रीय, आकडेवारी गोळा करून अभ्यासाअंती काढलेला निष्कर्ष नाही. तसेच हे कप्पे काटेकोर, आखीव नाहीत. काही व्यक्तींच्या निरपेक्ष नैतिक वर्तनापासून तो विकृति म्हणावे इतक्या सरसकट अनैतिक वर्तनापर्यंत, प्रकाशाच्या वर्णपटाप्रमाणे हळू-हळू फरक होत असतो. यातून बोध इतकाच की बहुसंख्य, अदमासे ९०% व्यक्ती कितपत नीतीने वागणार हे अनीतीने वागणाच्या व्यक्तीला अनौपचारिक असा सामाजिक विरोध किती होतो, व औपचारिक अशी कायदेशीर शिक्षा किती जलद, किती नक्की व किती कडक होते यावर अवलंबून असते. एखादा समाज जर अनीतीकडे सहिष्णुतेने पाहील, गुन्हे खपवून घेईल व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ, पैसा व श्रम खर्च करणार नाही, तर असा समाज जास्तजास्त प्रमाणात अनीतीकडे घरंगळत जाईल. उदा. भारतीय समाज. भारतीय समाजात अनीतीबद्दल, अन्यायाबद्दल, गुन्ह्याबद्दल पुरेशी चीड नाही. उलट अन्यायाने मिळवलेल्या सत्तासंपत्तीबद्दल आदर-कौतुकच दिसून येते. बड्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याची शक्यता शून्य. त्यामुळे हळू हळू राज्यकर्ता वर्ग, न्यायसंस्था व पोलीस यंत्रणा या समाजातील महत्त्वाच्या संस्थादेखील गुन्हेगारीने पोखरल्या जाऊ लागल्या आहेत.

याउलट चित्र अमेरिकन समाजात दिसते. साध्या पार्किंगच्या किंवा मोटर चालवण्याच्या नियम-भंगापासून ते राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या गैरवर्तनापर्यंत सर्व गोष्टीची चौकशी जलद होऊन गुन्हेगारांना शिक्षा भोगावी लागते / पदत्याग करावा लागतो. थोडक्यात तेथे कायद्याचे राज्य आहे. आपल्या देशातील शिक्षित तरुण तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ देशत्याग करून अमेरिकेचे नागरिक होण्यास उत्सुक असतात. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे “काय द्यायचे राज्यातून त्यांना कायद्याच्या राज्यात जायचे असते.

दोन समाजांतील अनीतीबद्दलच्या असहिष्णुतेत इतका फरक का पडतो याचाही अभ्यास व्हायला व्हावा. समाजाची पुरातनता, लोकसंख्या, नैसर्गिक साधनांची विपुलता/ कमतरता, धार्मिक व राजकीय इतिहास, वांशिकदृष्ट्या असलेले आनुवंशिक फरक, परकीय आक्रमणे वगैरे अनेक घटकांचा परिणाम होत असावा.

कित्येक व्यक्ती ‘नीति’ याचा अर्थ फक्त स्त्री-पुरुषसंबंधविषयक नियम असा घेतात व त्यामुळे विवाह-पूर्व संबंध, विवाहबाह्य संबंध व घटस्फोट जास्ती आहेत अशी आकडेवारी उपलब्ध असलेल्या काही पाश्चात्त्य समाजात सरसकट अनैतिकता बोकाळली आहे असा आरोप करतात. एकतर आपल्याकडे अशी आकडेवारी उपलब्ध नसल्याने “झाकली मूठ सव्वा लाखाची” असा प्रकार आहे. दुसरे म्हणजे स्त्री-पुरुष संबंधांविषयीचे कोणतेच नियम सर्व मानवजातीसाठी प्रमाण नाहीत. अपवाद फक्त अगदी जवळच्या नातेवाईकातील संबंधांचा दिसतो. विवाहपूर्व संबंध, विवाहबाह्य संबंध, एका स्त्रीने अनेक पुरुषांशी लग्न करणे, एका पुरुषाने अनेक स्त्रियांशी लग्न करणे, लग्न न करता एकत्र राहणे, घटस्फोट, पुनर्विवाह, वेश्याव्यवसाय या सर्व गोष्टी काही समाजांत नैतिक तर काही समाजांत अनैतिक मानल्या जातात. त्यामुळे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही, व ज्यामध्ये होणा-या संततीची पूर्ण जबाबदारी घेतली जाते, असे सर्व स्त्री-पुरुषसंबंध नैतिक समजण्यास सर्वसाधारण हरकत नसावी.

जोपर्यंत समाजाच्या घटक अशा लोकवस्त्यांचा आकार (लोकसंख्या) लहान होत्या, तोपर्यंत समाजाची आपले नीतिनियम व्यक्तींवर लादण्याची व नियमभंगाला शिक्षा देण्याची ताकद भरपूर होती. उदाहरणार्थ, खेडेगावातील प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांना ओळखत असते. प्रत्येक व्यक्ती इतर अनेक व्यक्तींवर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तीला इतरांचा रोष, नाराजी ओढवून घेणे परवडण्यासारखे नसते. शिवाय पंचायतीतर्फे न्यायदानाची प्रक्रिया अत्यंत सोपी, स्वस्त व जलद होत असल्याने, त्याची जब व्यक्तींना असे. त्यातही “बळी तो कान पिळी’ असे होत असे, पण “बळी”पणालाही ब-याच मर्यादा होत्या. इतरांचे सहकार्य सुरक्षिततेसाठी व दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असल्याने कोणीही फार काळ पर्यंत उन्मत्त होऊ शकत नसे. या उलट शहरामध्ये व्यक्ती इतक्या असतात, की त्या एकमेकांना ओळखत नाहीत. व्यक्ती बिनचेहेत्याच्या असतात. सर्व सुखसोयी, व पोलिसांचे संरक्षण असल्याने व्यक्ती इतर कोणावरही फारसे अवलंबून असत नाही. शेजा-यांशीही फटकून वागून, सर्वांचा रोष पत्करूनही व्यक्ती सुखात, सुरक्षिततेत जगू शकते. त्यामुळे अनैतिक वागणुकीबद्दलच्या समाजाच्या अनौपचारिक नाराजीकडे लक्ष देण्याचे कारण नसते. त्यामुळे घटक-लोकसंख्या वाढल्यावर व्यक्तींनी नीति-नियम पाळवे यासाठी समाजाला औपचारिक न्याययंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. निरोगी, स्वतंत्र व परिणामकारक न्याय-यंत्रणा उभी करण्यात ज्या समाजाला यश मिळेल, त्या समाजाची प्रगती होते व त्या समाजाची सर्वसाधारण नीतिमत्तेची पातळी उंचावत जाते, असे दिसते.

भारतातील सर्वच समस्यांच्या मुळाशी कायद्याच्या अंमलबजावणीतील अपयश हे महत्त्वाचे व सर्वसामान्य कारण आहे. शिक्षा होण्याची भीतीच नसल्याने समाजातील अधिकाधिक व्यक्ती अधिकाधिक गंभीर गुन्हे करण्यास धजावतात. अशा अनैतिकतेच्या सर्वसाधारण वातावरणातून शासनयंत्रणा, राजकीय पक्ष, पोलीस यंत्रणा, व न्यायसंस्था यांमध्ये फक्त प्रामाणिक, नीतिमान् व्यक्तींची भरती होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे होईल.

परिस्थिती अशी निराशाजनक असली तरी प्रयत्न हा केलाच पाहिजे. योग्य पदावरील योग्य व्यक्ती किती परिणामकारक ठरू शकते हे श्री. शेषन् यांनी दाखवून दिले आहे. शिक्षणातील कमतरता हे वाढत्या गुन्हेगारीचे, वाढत्या भ्रष्टाचाराचे कारण नाही. त्यामुळे शाळांमध्ये नीति-पाठाचे तास ठेवून उपयोग होणार नाही. आजही गुन्हे करणाच्या व्यक्तीला आपण गुन्हा करीत आहो हे माहीत असते, भ्रष्टाचार करत आहोत हे माहीत असतेच. उलट रोजरोज गुन्हा करून तो इतरांना आह्वान देतो की मी गुन्हा करतो आहे, माझ्यावर कायदेशीर अथवा अन्य कारवाई करून दाखवा! हे आह्वान आपण स्वीकारत नाही हेच वाढत्या गुन्हेगारीचे/भ्रष्टाचाराचे कारण आहे.

प्राप्त परिस्थितीत पुढील पावले उचलणे मला आवश्यक वाटते.
१) सर्व राज्यकारभारात न्याय व कायदे अंमलबजावणी खात्यांना अग्रक्रम देण्यात यावा. त्यासाठी पुरेसा पैसा, माणूसबळ व व्यवस्थापन उपलब्ध करण्यात यावे.
२) ‘पब्लिक प्रॉसिक्युटर’ हे नवीन घटना-मान्य स्वतंत्र पद निर्माण करावे. मुख्य न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त या पदांप्रमाणे हे पद राजकीय/शासकीय हस्तक्षेपाबाहेर असावे. खटले भरणे, चालवणे व काढून घेणे हे पब्लिक प्रॉसिक्युटरच्या अधिकारात राहावे, त्यात शासनाला ढवळाढवळ करता येऊ नये.
३) प्रत्येक व्यक्तीनेच स्वतःवरील अन्याय तर सहन करू नयेच, पण इतरांवरील अन्याय दूर करण्यासाठीही झगडावे. न्याय मिळवण्यासाठी, तसेच गुन्ह्याच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. त्यासाठी वेळ, पैसा व श्रम खर्च केला पाहिजे व धोकाही पत्करला पाहिजे. गुन्हेगार, भ्रष्टाचारी, अनैतिक व्यक्तीबद्दल आपल्याला नाराजी वाटली पाहिजे व ती व्यक्त केली पाहिजे. सामाजिक बहिष्कार हे कायद्यापेक्षाही परिणामकारक हत्यार बनू शकते.

नीतीच्या म्हणजेच मूल्यांच्या स्थापनेसाठी व रक्षणासाठी संघर्षाची आवश्यकता आहे, व नेहमीच राहणार. संघर्षामध्ये सात्त्विकतेचा बळी जाईल ही वृथा भीति आहे. अखंड जागरूकतादेखील आवश्यक आहे. नाहीतर शेकडो व्यक्तींचा जलोदराने (ड्रॉप्सी) बळी गेल्यावर मग जर मोहरीच्या तेलात मोटर-आइलची / आर्गेमोन ऑइलची भेसळ झाल्याचे कळणार असेल तर भेसळ-प्रतिबंधक खात्याचे अधिकारी व कर्मचारी कशासाठी पोसायचे? अन्न व औषधप्रशासन खात्याची मग गरजच काय? सरकारी नोकरांना काम न करता पगार व नोकरी यांची शाश्वती, शिवाय गुन्ह्यांकडे काणाडोळा करण्यासाठी गुन्हेगारांकडून अवांतर प्राप्ती, व कशासाठीही कोणत्याही शिक्षेची भीति नसणे, या गोष्टी चालूच राहणार असतील, तर पूर्वी देवीच्या साथी येत तशा जलोदराच्या साथीच दर २४ वर्षांनी येत राहणार.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.