विवेकाचे अधिकार

विवेकाचे, म्हणजे reason चे, दोन अधिकार सर्वमान्य आहेत असे म्हणायला हरकत नाही. (१) एखादे विधान स्वयंसिद्ध (self evident) आहे हे ओळखणे. उदा. ‘दोन राशी जर तिस-या एका राशीबरोबर असतील, तर त्या परस्परांबरोबर असतात (२) अनुमाने करणे, म्हणजे एक विधान जर खरे असेल, तर त्यापासून निगमनाने व्यंजित होणारी विधानेही खरीच असतात असे ओळखणे. उदा. सर्व मनुष्य मर्त्य आहेत आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे हे संयुक्त विधान जर खरे असेल, तर ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे हे विधानही खरेच असले पाहिजे, ते असत्य असू शकत नाही. या दोन शक्ती विवेकाच्या ठिकाणी आहेत याविषयी कोणाला शंका असेल असे वाटत नाही. विवेकाचे अधिकार मर्यादित आहेत, विवेकाच्या क्षेत्राखेरीज श्रद्धेचेही एक क्षेत्र आहे, असे मानणारे श्रद्धावादीही विवेकाची वरील सामर्थ्य नाकारीत नाहीत. त्यांचे म्हणणे एवढेच असते की ज्यांचे विवेकाने समर्थन करता येत नाही अशा अनेक गोष्टींवर श्रद्धा ठेवण्याचा आपल्याला अधिकार आहे. उदा. तत्त्वज्ञानात श्रुतींचे शब्द प्रमाण आहेत असा दावा केला जातो. केवळ हिंदुधर्मातच नव्हे, तर अन्य धर्मांतही, श्रुतींचा (scriptures) चा अधिकार मान्य केला जातो. खिस्ती तत्त्वज्ञ म्हणतात की बायबलचे शब्द पूर्णपणे खरे आहेत, आणि असाच दावा मुसलमान कुराणासंबंधीही करीत असतात. तेव्हा श्रद्धावाद्यांच्या मतानुसार श्रद्धेचे स्वरूप नेमके काय आहे, अमुक गोष्टीवर माझी श्रद्धा आहे, किंवा ती मी श्रद्धेने स्वीकारतो, असे म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे, इत्यादि अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे देण्याचा थोडा प्रयत्न करण्याचा विचार आहे.
एखादे विधान श्रद्धेने स्वीकारायचे म्हणजे ते खरे आहे असे मानायचे असे समजायचे ना? म्हणजे ज्या अर्थाने वर उल्लेखलेली स्वयंसिद्ध विधाने, आणि सत्य विधानांवरून निगमनाने व्यंजित होणारी विधाने, खरी आहेत असे आपण म्हणतो त्याच अर्थाने विवेकाच्या निकषानुसार जी सत्य मानायला आपल्याला अधिकार नसतो तीही खरीच समजायची असेच समजायचे ना? खरे विधान म्हणजे यथार्थ विधान, म्हणजे वस्तुस्थितीचे निदर्शक असे विधान, ही खरे’ या शब्दाची व्याख्या स्वीकारायची ना? की श्रद्धेने प्राप्त विधाने वरील अर्थाने नव्हे, तर अन्य कोणत्या तरी अर्थाने, खरी असतात असे श्रद्धावाद्यांना अभिप्रेत आहे. तसे असेल तर तो अर्थ काय आहे हे सांगण्याची जबाबदारी श्रद्धावाद्यांची आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे काम कोणी केलेले नाही, निदान माझ्या पाहण्यात नाही. कोणी ते केले असेल, तर त्यांनी ते पुन्हा करावे अशी त्यांना माझी विनंती आहे.
वर म्हटल्याप्रमाणे विवेकाचे एक क्षेत्र आहे हे श्रद्धावादी मान्य करतात. मात्र त्यांचे म्हणणे असे असते की काही गोष्टी विवेकाच्या क्षेत्राच्या पूर्ण बाहेर आहेत. त्या वर स्पष्ट केलेल्या अर्थाने स्वयंसिद्ध नसतात, आणि त्या काही पुराव्यावरून निगमनाने निष्पन्नही होत
नाहीत. उदा. ईश्वर आहे. तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि असीम दयाळू आहे, तो माणसांच्या प्रार्थनांना पावतो; तसेच माणूस अमर आहे, आणि त्याचे असंख्य पुनर्जन्म होत असतात, इ. गोष्टी आपल्याला श्रद्धेने कळतात. या श्रद्धेच्या क्षेत्रात विवेकाने लुडबूड करू नये असे श्रद्धावादी म्हणतात. ज्या गोष्टींचे ज्ञान पुराव्यावरून केलेल्या अनुमानाने होत नाही, अशा कितीतरी गोष्टींचे ज्ञान आपल्याला श्रद्धेने होते, आणि त्याचे विवेकाचे समर्थन करता येत नाही यामुळे आपले काही अडत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
श्रद्धावादी श्रुतींचा शब्द प्रमाण मानतात. इंद्रियानुभव, अनुमान यांच्याहून भिन्न शब्द नावाचे एक प्रमाण आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. प्रमाण म्हणजे यथार्थ ज्ञानाचे साधन म्हणजे शब्दाने सत्याचे ज्ञान होते. शब्दाला आसवचनही म्हणतात. आस म्हणजे यथार्थवक्ता अशी त्यांची कल्पना आहे. याचा अर्थ शब्दाने, श्रद्धेने, आपल्याला सत्य ज्ञान, म्हणजे वस्तुस्थितीचे ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान इंद्रिये आणि विवेक यांना अलभ्य असते. लौकिक ज्ञानात प्राप्त होणा-या ज्ञानाहून वेगळ्या वस्तुस्थितीचे ज्ञान असते. या ज्ञानाला विवेकाचे नियम लागू होत नाहीत, आणि म्हणून त्या नियमांच्या साह्याने त्याचे परीक्षणही करता येत नाही, असे श्रद्धावाद्यांचे मत आहे.
इथे एक आक्षेप सुचतो. सत्य व्याघातमुक्त असते असा विवेकाचा नियम आहे. ज्यात व्याघात आहे ते सत्य असू शकत नाही. निदान हा नियम तरी शब्दाला किंवा त्यावरील श्रद्धेला लागू आहे की नाही? लागू असावा असे म्हणावेसे वाटते. कारण लागू नाही असे म्हटले तर श्रद्धेच्या क्षेत्रात व्याघात वर्ण्य नसतो असे मानावे लागेल. पण जगात कोठे व्याघात असू शकेल असे म्हणणे सर्वथा अनाकलनीय आहे, म्हणजे श्राद्ध (श्रद्धेपासून झालेल्या) ज्ञानाच्या क्षेत्राही विवेकाचा हा मूलभूत नियम लागू असला पाहिजे. एक गोष्ट सत्य असेल तर तीच गोष्ट असत्यही आहे असे श्रद्धेलाही मानता येणार नाही.
पण मग भिन्न लोकांचे श्राद्ध ज्ञान परस्परविरोधी असू शकत नाही असे होईल. पण ते तर प्रत्यक्ष घडते असे आपण पाहतो. दोन धर्माच्या अनुयायांना होणारे श्राद्ध ज्ञान परस्परविरोधी असता कामा नये. पण ते असते असे दिसते. उदा. हिंदूचे श्राद्ध ज्ञान आणि मुसलमानांचे. हिंदूंच्या श्रद्धेनुसार मृत्यूनंतर पुनर्जन्म आहे. एवढेच नव्हे, तर जन्मांची अनंत परंपरा आहे, पण मुसलमानांच्या श्रद्धेनुसार पुनर्जन्म नाही. एका व्यक्तीच्या विचारांत ज्याप्रमाणे व्याघात वर्ण्य आहे, तसाच तो दोन व्यक्तींच्या विचारांतही वर्म्य असला पाहिजे असे म्हणावे लागते.
पण जर विवेकाचे हे बंधन श्राद्ध ज्ञानातही मानावे लागते असे असेल, तर श्रद्धावाद्यांच्या विचारार्थ पुढील काही अडचणी ठेवता येतील.
श्रद्धेचे स्वरूप असे आहे की तिला विवेकाची कोणतीही बंधने मान्य होत नाहीत. कोणत्याही श्राद्ध ज्ञानासंबंधी का?’ ‘कशावरून?’ हे प्रश्न विचारायचे नसतात. कारणे आणि पुरावे यांचे क्षेत्र म्हणजे विवेकाचे. पण मग श्रद्धा पूर्णपणे अनिर्बध मानावी लागेल. कोणाचीही कशावरही श्रद्धा असू शकेल. “माझी संतोषी मातेवर श्रद्धा आहे असे कोणी म्हणेल. ‘आमचे गुरु त्रिकालज्ञ आहेत, त्यांना अशक्य असे काही नाही’, असे दुसरे कोणी म्हणतील, आणि ते मुकाट्याने ऐकणे याखेरीज आणखी काही करता येणार नाही. म्हणजे सर्वच श्रद्धा अधिकृत आणि प्रमाण मानाव्या लागतील. यापैकी कोणतीही चूक असेल असे मानता येणार नाही. पण दोन परस्परविरुद्ध श्रद्धा दोन्ही बरोबर आहेत असे मानायचे झाल्यास त्याचा अर्थ काय करावयाचा?
श्रद्धांची चिकित्सा करायची झाली तर ते विवेकाचे काम आहे. पण विवेकाचे बंधन श्रद्धेला नाही असे म्हटले तर श्रद्धांची चिकित्सा अशक्य आहे. ही स्थिती श्रद्धावाद्यांना मान्य होण्यासारखी आहे काय?
कोणत्याही विधानाची चिकित्सा करायची झाली तर ‘सत्य-असत्य’, ‘संभाव्यअसंभाव्य’ या विशेषणांवाचून आपले पानही हलत नाही. प्रत्येक श्रद्धावादी म्हणतो की माझी श्रद्धा खरी आहे. पण सर्व श्रद्धा ख-या आहेत असे खुद्द श्रद्धावाद्यांनाही मान्य नाही, कारण प्रत्येक म्हणतो की इतरांच्या श्रद्धा चूक आहेत. उदा. हिंदू, खिस्ती, मुसलमान श्रद्धावादी केवळ स्वतःच्या श्रद्धा बरोबर आहेत, इतरांच्या चूक आहेत, असे मानतात.
या बिकट अवस्थेतून सुटायचा मार्ग आहे काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.