नागवणुकीचे धार्मिक तंत्र

गुलामगिरी, पुरोहितशाही, वसाहती, साम्राज्यशाही व भांडवलशाही हे ऐतिहासिक अनुक्रमाप्रमाणे मानवांनी मानवांच्या केलेल्या नागवणुकीचे चार प्रकार इतिहासास ओळखीचे आहेत. यांत गुलामगिरी व वसाहती साम्राज्यशाही निदान प्रथमावस्थेत तरी पाशवी बळावरच आधारलेल्या असतात. लोकशाही जन्मास येण्याच्यापूर्वीच भांडवलशाही अस्तित्वात आल्याकारणाने, भांडवलशाही व शासनसत्ता या दोघांची प्रेरकशक्ती एकाच वर्गात एकवटली होती असे चित्र कालपरवापर्यंत नजरेस पडत असे. इतरांच्या मानाने पुरोहिती नागवणुकीच्या तंत्राची वाटचाल जरा निराळी आहे. धर्म आणि पुरोहित या संस्थांचा उगम प्राचीन मानवाला अदृष्ट शक्तीबद्दल वाटणारे भय आणि पूज्यबुद्धी ह्यांत असतो. यामुळे जी नागवणूक इतर क्षेत्रांत बहुतांशी पाशवी शिरजोरीवर चालत असते ती धार्मिक क्षेत्रात मानसिक शिरजोरीवरच पुरोहितवर्गास साधावी लागते. इतिहासाचा निर्वाळा मात्र असा दिसतो की शारीरिक गुलमगिरी व मानसिक गुलामगिरी या दोहोंमध्ये मानसिक गुलामगिरीच जास्त अभेद्य व शाश्वत असते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.