ऐसी कळवळ्याची जाती विरोध असुनी कायम भक्ती

यदुनाथ थत्ते यांचे कुमारसाहित्य मी पौगंडावस्थेत वाचले. त्या वयात प्रभाव टाकणारया साने गुरुजी, खांडेकर यांचे साहित्य आवडावे असा तो काळ होता. याच परिवारातले यदुनाथ थत्ते हे नाव त्यांच्या लेखनामुळे लक्षात राहिले. त्या काळी मी कुमार साहित्य-चळवळीत भाग घेत होतो; राष्ट्रीय वृत्तीच्या कुमार लेखकांच्या चळवळीकडे माझा ओढा होता. त्यामुळे त्याच प्रकारचे साहित्य अधिक वाचले जायचे. यदुनाथजींचे नाव माझ्या लक्षात राहिले ते याच संदर्भात. विशेषतः त्यांचे ‘‘पुढे व्हा’ हे पुस्तक त्या वयात मला फार परिणामकारक वाटले. त्या वयातील कुमारांना या पुस्तकाने उमलत्या अवस्थेतच त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन मिळवून दिले.
दिवाकर आगाशे व डॉ. ना. य. डोळे या दोन मित्रांच्या वशिल्याने, यदुनाथजींची ओळख झाली. ते १९५७-५८ साल असावे. ‘साधना’ कार्यालयातच आमची भेट झाली. बॅ. नाथ पै यांच्या अध्यक्षतेखाली त्याच काळात साने गुरुजींचा स्मृतिदिन होणार होता. त्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात भाषण करण्याचा यदुनाथजींनी आग्रह केला. बहुधा माझ्याविषयी दिवाकर भय्यांनी त्यांना सांगून ठेवले असावे. दिवाकर भय्याही साने गुरुजींच्या परिवारातला. त्यामुळे यदुनाथजींशी त्यांचा स्नेह असावा. मुख्य म्हणजे दिवाकर आगाशे हे असेच एक झपाटलेले झाड होते. अशा झाडांची जोपासना करणे यदुनाथजींना नेहमीच आवडायचे. दिवाकरचे बुलढाण्याचे कार्य पाहून मीही प्रभावित झालो होतो. यदुनाथजींशी बोलताना त्यांनी मला एकदा आनंदवनास भेट देण्याची सूचना केली.
* * * *
बाबा आमटे हेही एक झपाटलेले झाड होते. दिवाकर आणि बाबा या दोघांनीही शून्यातून पुरुषार्थाची सृष्टी उत्पन्न केली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाजमनावर जो एक तृप्तीचा तवंग आला होता त्यामुळे कर्तृत्वाच्या सगळ्या प्रेरणाच कुंठित होऊन गेल्या. चंगळवादाचे लोण तेव्हा तितके पसरले नव्हते. पण सुखासीनता व सामाजिक दायित्वाबद्दलची उदासीनता समाजात दृढमूल होऊ लागली होती. अशा वातावरणात जिथे कुठे स्वतंत्र पुरुषार्थाची ठिणगी दिसेल, तिथे यदुनाथजी झेप घ्यायचे. तिथले काम पाहायचे, ते आवडल्यास उचलून धरण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरायची, त्या बाबतीत कुठेही अंगचोरपणा करायचा नाही. अशावेळी यदुनाथजी आपल्याजवळ असलेल्या प्रसिद्धिमाध्यमाद्वारे त्यांना मोलाचे वाटणारे ते काम जगाच्या निदर्शनाला आणूनच थांबायचे नाहीत. त्या लेखनाद्वारे स्वतःचे प्रभावित मनही ते जगाच्या प्रत्ययाला आणायचे. एवढेच नव्हे तर मागचा-पुढचा विचार न करता सर्वस्वासहित आपणही त्या कामात उतरायचे. आपल्या ऐकण्याची खात्री असलेल्या सहका-यांनाही त्या कामात ओढायचे. आपल्या सहभागाने कामाचे बळ वाढत असेल तर तो देण्यात यदुनाथजींनी कुठेही कुचराई केली नाही.
‘साधनेच्या द्वारे अशी किती कामे त्यांनी प्रकाशात आणली व आत्मतृप्त महाराष्ट्राची गुंगी उडविली. मग ते काम बाबा आमट्यांचे असो किंवा शिवाजीराव पटवर्धनांचे, हमीद दलवाईंचे असो वा बाबा आढावांचे, विलास साळुख्यांचे असो की व्हेंचरानंद दाभोलकरांचे. यदुनाथजी ते समजावून घेणार आणि विशेषांकांच्याद्वारे त्यांचा सविस्तर परिचय जगाला करून देणार, ज्यांचे नाव मोठे आहे त्यांच्या सत्काराची लोकांत चढाओढ़ असणे स्वाभाविक आहे. पण ज्यांचे काम मोठे आहे, पण नाव अज्ञात आहे त्यांचे तोंड भरून कौतुक करण्यासाठी आपल्या जवळची सर्व शक्ती सार्थकी लावण्याची प्रथा यदुनाथजींनी रूढ केली. कारण नाव अपरिचित असल्यामुळे त्यांचे ब्रहमोल कामही अलक्षित राहिल्याची उदाहरणे विपुल आहेत. अशा कामांना आणि नावांना पुढे आणण्यात आपली उपकारभावना असते; वा मनाचे औदार्यही नसते. अशी कामे समाज-शरीरातील रक्तवाहिन्यांसारखी असतात. त्यामुळे समाजाचे आरोग्य व जीवन निकोप राहण्याची आशा असते. ही कामे या कार्यकर्त्यांनी जीव ओतून व आयुष्य झोकून उभारलेली असतात. ती त्यांनी कुठल्याही राजकीय, आर्थिक वा प्रतिष्ठेच्या लभ्यांशाच्या अभिलाषेने आरंभलेली नसतात. ही कामे समाजाच्या हिताची असतात. त्यासाठी परोपदेशाव्यतिरिक्त कुणीतरी प्रत्यक्ष पुढाकार घेणे अगत्याचे असते. शिवाय ही कामे तडीला लावल्याशिवाय यांनाच राहावेनासे झालेले असते. मनाला व बुद्धीला पटलेले चांगले काम केल्याशिवाय न राहवणे हा एक दैवी अनुग्रहच असतो. बाबा आमटे यांच्यासारखी माणसे त्यांचे कार्य यदुनाथजींनी उजेडात आणल्यामुळे मोठी झालेली नसतात. ती मुळातच मोठी असतात. पण त्यांचे मोठेपण ओळखण्याइतके मनाचे खुलेपण नि:संज्ञ समाजाजवळ नसते. त्यांची कामे उजेडात आणण्याच्या दुर्मिळ प्रयत्नामुळे बधिरतेच्या या कातळाला कुठेतरी फट पडून त्यातून माणूसपणाचा पाझर प्रवाहित होण्याची शक्यता असते.
बाबा आमटे नेहमी म्हणतात की, समाजाच्या बहिर्मुखतेमुळे व वाढत्या सुखलोलुपतेमुळे संवेदनेचा शरच-हरवल्यासारखा झाला आहे. त्यामुळे दुसन्यांच्या यातना जाणवत नाहीत इतकेच काय निष्ठेने चाललेली चांगली कामेसुद्धा डोळ्यात भरत नाहीत. यदुनाथजीही त्यासाठी ‘भावसाक्षरता’ हा फार समर्पक शब्द वापरीत असत. समाजात शिक्षणाचा प्रसार खूप वाढला आहे. पण सहृदयतेचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रसेवादलातर्फे समाजजागृतीसाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमालाही ‘भावजागरण दिंडी’ हे अन्वर्थक नाव दिले गेले ते याच उद्देशाने.
* * * *
यदनाथजी तत्त्वनिष्ठ होते. अगदी कडवे तत्त्वनिष्ठ होते. आपल्या तत्त्वांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. बावळट दिसण्याजोगा साधेपणा त्यांनी या तत्त्वनिष्ठेपायीच पत्करला होता. या तत्त्वनिष्ठेत जाह्नवीवहिनींचे त्यांना पूर्ण सहकार्य होते. आपल्या कामातून अन्य कोणत्याही लाभाची त्यांनी कधी अपेक्षा बाळगली नाही. ऐहिक उत्कर्षाची तर कधी आणि कसलीही अभिलाषा नव्हती. मनाला पटलेली व म्हणूनच अंगीकारलेली कामे त्यांच्या लेखी सदैव अग्रक्रमाची होती. त्या कामांपुढे त्यांनी कोणत्या अडचणींची काय पण प्रकृतीचीही दरकार बाळगली नाही. पायांना अपघात झाल्यानंतर सक्तीने घ्यावी लागलेली विश्रांती त्यांच्या भटक्या वृत्तीला असह्यच झाली असणार. म्हणूनच ते थोडेसे बरे वाटल्याबरोबर काखेत कुबड्या घेऊन येवल्याच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. अर्धाग व हृदयविकाराच्या जीवघेण्या दुखण्याचाही त्यांना विसर पडला. कथामालेच्या सोलापूर अधिवेशनाला हजेरी लावून आले. जोपर्यंत आपल्या हातून कामे होणे शक्य आहे तोपर्यंत प्रकृतीची सबब सांगून विश्रांती घेण्याचा तळमळीच्या कार्यकर्त्याला नैतिक अधिकार नसतो असेच ते मानीत असावेत.
आपल्याला पटलेली मते ते पोटतिडकीने मांडत. ती पूर्वग्रहावर आधारलेली असू नयेत याची ते दक्षता घेत व ती अभ्यासपूर्वक स्वीकारलेली असल्याने त्यांचा हिरिरीने पुरस्कारही करीत. पण ही मते मांडायची त्यांची शैलीसुद्धा अहिंसक असे. त्याला आक्रमकताच काय पण आग्रहसुद्धा नसे. आपल्यासारखाच लोकांनीही यावर विचार करावा, त्या बाबतीत अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असेल तर चर्चा करावी पण ते दुस-याच्या गळी उतरविण्याच्या भरीला पडू नये, असे त्यांचे धोरण होते. काही लोकांना दसरा पक्ष गारद केल्याशिवाय आपल्या विचारसरणीचे महत्त्व सिद्ध झाल्याचे समाधान मिळत नाही अशांना यदुनाधजींची अनाग्रही वृत्ती न पटणे अपेक्षितच असे. विचारांचे स्वयंभू सामर्थ्य असते, ते योग्य वेळी अंमल गाजविल्याशिवाय राहत नाही. त्यासाठीच वाट पाहण्याचा संयम बाळगावा लागतो हे उतावीळ लोकांच्या लक्षात येत नाही.
गांधी, विनोबा, गुरुजी, एसेम यांच्याप्रमाणेच बाबा आमटे हेही त्यांचे एक श्रद्धास्थानच होते. त्या त्या व्यक्तीचे विशिष्ट बाबतीतले मोठेपण त्यांनी मनोमन स्वीकारलेले असते. तरी व्यक्तिनिष्ठेपेक्षा विचारनिष्ठा नेहमीच प्रभावी ठरे. आणिबाणीच्या काळातील पवनारभेटीत खुद्द विनोबांशीही त्यांनी याच भूमिकेतून निर्भयपणे फिरकी घेतल्यासारखा प्रतिवाद केला होता. एसेम, नानासाहेब यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुका लढविल्या त्यावेळीही त्यांनी खुद्द साधनेमधूनच त्यांच्यावर टीका करणारे संपादकीय लिहिले होते. एकदा निष्ठापूर्वक पत्करलेल्या विचारांच्या बाबतीत “अडवितील जर देव तरी । झगडू त्यांच्याशी निकरीं ।” हा त्यांचा केशवसुती बाणा होता. पण क्वचित मतभेद झाले तर मनभेद होऊ न देण्याची ते कसोशी बाळगत. मते प्रासंगिक असतात. तेवढ्यामुळे कामासाठी जुळलेली मने दुरावू देणे त्यांना पटत नव्हते. म्हणूनच ते एवढ्या व्यापक व विविध प्रकारचा लोकसंग्रह ठेवू शकले. दुर्दैवाने त्यांच्या विचारसरणीच्या सहका-यांना बुद्धिप्रामाण्य व विचार-स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचे वाटत असल्यामुळे त्यांचे व्यवहार कधीकधी फार रूक्ष व कर्कश होत. आणि त्यांचा नेहमी मतैक्यांपेक्षा मतभेदांवर अधिक भर असे. परिणामी स्वकीयसुद्धा दुखावले जात. शिवाय आपसांतील मतभेदांची जाहीर वाच्यता व खुली चर्चा करण्याचीही त्यांना खुमखुमी असे. त्यामुळे सहप्रवाशांची संख्या रोडावते व अनुयायी भांबावून जातात, याचीही पर्वा करण्याची त्यांना गरज वाटत नसे. सार्वजनिक कार्यकत्र्याला क्वचित आपले अणकुचीदार आग्रह सौम्य करावे लागतात. व सहकान्यांना सांभाळून न्यावे लागते. याचे भान न ठेवल्यामुळे अनुयायी गमावलेल्या व फक्त पुढारीच उरलेल्या कळपाची कळा येऊ लागल्यास नवल नाही.
एकदा तावून सुलाखून घेतलेल्या विचारांचे व पारखून पत्करलेल्या निष्ठांचे अंगभूत बळ एखाद्या सामान्य कार्यकर्त्यालाही आपत्काळी नेतृत्वाची संधी मिळवून देते. तत्त्वापेक्षा व्यवहार सांभाळणा-या चतुराजवळ कसोटीला उतरणारे नीतिधैर्य अभावानेच असते. म्हणूनच जनतेचे बौद्धिक नेतृत्व करण्याचा आव आणणाच्या प्रवाहपतितांपुढे यदुनाथजींचे शालीन पण कणखर कर्तृत्व तळपून उठले.
निष्ठावंत सार्वजनिक कार्यकर्त्यांनासुद्धा संसार असतो, बायको व मुलेबाळे असतात. पण ही नाती कुरवाळत बसण्याइतकी स्वस्थता नसते. राष्ट्रीय दायित्वापेक्षा खाजगी नातीगोती सांभाळण्याच्या काळात अशा भावबंधांकडे पाठ फिरविणा-यांचे अग्रक्रमाचे विषय समजून घेण्याची कुवत नसते. आपल्या ब्रीदापोटी खाजगी जीवनात कठोर निर्णय घ्यावे लागताना होणारा अंतःसंघर्ष केवढा जीवघेणा असेल! आपल्या पायाशी चालत आलेले मोह निर्धाराने नाकारताना मनात कुठलीच वावटळ उठली नसेल ? सुखाची प्रलोभने परतवून लावताना कौटुंबिक संघर्ष अटळ झाला नसेल ? शिवप्रभूचा वैभवसंपन्न नजराणा ‘दिवट्या छत्री घोडे । हैं तो बन्यांत न पडे ।’ म्हणून परतवून लावणाच्या तुकोबांचे नैतिक धैर्य अनुसरताना एखाद्या तत्त्वनिष्ठाची काहीच मानसिक ससेहोलपट होत नसेल ? आपल्या ध्येयधुंदीपायी। कुटुंबीयांच्या होणा-या हालामुळे चित्तावर काहीच ओरखडा उमटत नसेल ?
हे सगळे होत असेलही. पण यदुनाथजींच्या चेह-यावरून ते कुणाला कधी ताडता आले नाही. एवढी स्थितप्रज्ञता त्यांना कशी साधता आली असेल?
* * * *
यदुनाथजींचे दुसरे एक वैशिष्ट्य होते. समाजातील नित्य परिचित अशा तुपाळ आणि ओशट वातावरणामध्ये ठसका लागण्यासारखा झणझणीतपणा कुठे आढळला तर त्यावरही ते लुब्ध होत असत. मग ती नारायण सुर्वे यांची प्रतिभा असो, नरहर कुरुंदकर वा वसंत पळशीकर यांची कुशाग्र बुद्धिमत्ता व सखोल व्यासंग असो, भाऊसाहेब पाटणकरांची संगमोत्सुक निःसंग शायरी असो, यदुनाथजींची कौतुकलोभी वाणी त्यांची ही आरती ओवाळण्याकरिता आतुर असे. एखादा अनिल अवचट अलक्षित समाजाचे डोळसपणे निरीक्षण करीत असेल आणि चित्रमय भाषेत त्याचे यथातथ्य चित्र रेखाटू शकत असेल, एखादा अनिल थत्ते परिचित जगातील अदृष्ट फटी किंवा त्यांना जोडणारे सेतू यांचे नेमके दर्शन घडवू शकत असेल, तर यदुनाथजी त्यांना जवळ करणार. प्रयोग म्हणून साधनेच्या एका अंकाची जबाबदारी त्यांच्यावर टाकणार. उत्साहातिरेकाने ती अंगलट आली. तर आल्या प्रसंगालाही धैर्याने तोंड देणार; पळ काढणार नाहीत. माघारही घेणार नाहीत. एवढेच नव्हे तर लोकक्षोभाच्या या गदारोळात मूल्यांचा विसर पडू देणार नाहीत. प्रक्षुब्ध विरोधकांनाही त्याची जाणीव करून दिल्याशिवाय राहणार नाहीत.
मला नेहमी आश्चर्य वाटे की, या अलक्षणीय कुडीत एवढे धैर्य येते कुठून?
यशवंतराव चव्हाण म्हणायचे. “मूल्यनिष्ठा’ हे माझ्याजवळचे हुकमाचे पान आहे. राजकारण करताना संभ्रांत होण्याची पाळी आली की मी ते हमखास काढतो, त्यामुळे माझ्यावर हरण्याची वेळ कधी येत नाही.”
यदुनाथजींजवळ हे हुकुमाचे पान निर्वाणीच्या वेळी काढण्याचे अस्त्र म्हणून नव्हते. त्यांच्या पत्त्यांमध्ये सर्व पाने हुकुमाचीच असत. मूल्य हा त्यांच्या लेखी संकटाच्या वेळी हमखास आठवणारा देव नव्हता. त्यांनी आपले सार्वजनिक जीवनच देवघर बनविले होते. यदुनाथजींना मी कधीही कोणाची निंदा करताना पाहिले नाही, कुचेष्टा करताना पाहिले नाही: कुणाची थट्टा करण्याची लहर आली की त्यानंतर ते स्वत:च ओशाळल्यासारखे हसायचे.
यदुनाथजींच्या लुब्धतेच्या वर्तुळातील जे लोक होते. त्यांचे एकमेकांशी सोयर नसायचे. कित्येकदा तर विरोधच असायचा. आणि तो यदुनाथजींच्या तोंडावर फटकळपणे प्रगटही व्हायचा. एकदा कुरुंदकरांच्या मुलाच्या मुंजीची पत्रिका बाबा आढावांनी आपल्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर जशीच्या तशीच छापली. पुरोगामी म्हणविणा-या विख्यात व्यक्तीच्या वर्तनातील विसंगती उघड करण्याचा त्या मागील उद्देश उघड होता. कुरुंदकरांची नामांतराबाबतची भूमिका यदुनाथजींना तरी कुठे मान्य होती ? नांदेडमध्ये त्या तप्तकाळात एसेम-कुरुंदकर हा जो वाद घडला तो यदुनाथजींना किती क्लेशकारक ठरला असेल ? तरी पण त्या बाबतची कुरुंदकरांची भूमिका समजावून घेणेही त्यांना न्यायाचे वाटले. एखाद्या प्रसंगावरून किंवा एखाद्या उदाहरणावरून एखाद्याबद्दल एकदम पूर्वग्रह बनविण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता.
बाबा आमटे त्यांना आपल्या स्वप्नांचा सहोदर मानीत असत. बाबांच्या सर्व उपक्रमांत यदनाथजी नेहमी आघाडीवर असत. आनंदवन परिवाराचा एकही कार्यक्रम असा नसे की ज्यात यदुनाथजींचा सहभाग नसेल. आनंदवनाच्या व बाबांच्या कार्याशी ते अविभाज्यतेने जोडलेले होते. तरीही नर्मदा सरोवराविषयी बाबांशी मूलभूत मतभेद राखण्याबाबतचे आपले स्वातंत्र्य ते कायम ठेवू शकले. त्याचवेळी बाबांबद्दलची गाढ स्निग्धताही. मतभेदांमुळे त्यांनी आपले मन दुरावू दिले नाही. परवा हृदयविकाराच्या जीवघेण्या आजारातून थोडेसे बरे वाटू लागल्याबरोबर ते जाह्नवीवहिनींना घेऊन थेट कसरावदला गेले व बाबांना भेटून आले.
त्यांनी आपल्या विचारांत आणि वर्तनात शक्य तेवढी एकवाक्यता ठेवली. गांधीविनोबा, गुरुजींचा वारसा सांगायचा आणि परीट घडीचे कपडे वापरायचे हे त्यांच्या मनाला पटेना. त्यांच्या अंगावर नेहमी घरी धुतलेले खादीचे जाडे-भरडे कपडे असत. त्यांच्यात स्वच्छता असे, पण ऐटबाजपणा नसे. त्यांनी इस्त्रीशी असहकार पुकारल्याबद्दल स्वकीयांमध्येही ते नेहमीच थट्टेचा विषय होऊन राहात. विचार व वर्तन यांत एकरूपता साधत असताना विचारभेदांमुळे वर्तनात परिवर्तन करण्याची गरज त्यांना जाणवत नसे. मते हंगामी असतात, प्रसंगानुरूप ती बदलावी लागली, तरी त्यांमुळे मनामध्ये पालट करण्याची गरज नसावी. त्यामुळे विचार व वर्तनाबाबत दोन ध्रुवांइतके अंतर ठेवणाच्यांशी यदुनाथजी सारख्याच सलोख्याने वागू शकत. त्याबद्दलही त्यांना कोणी वेड्यांत काढले, तर ती हेटाळणीही ते हसण्यावारी नेत. अगदी निकटच्या वर्तुळामध्येही यदुनाथजींची यथेच्छ कुचेष्टा चाले. काही सांगाती खाजगीमध्ये त्यांचा उल्लेख ‘बाळ विनोबा’ असा करीत. हमीद दलवाई। तर त्यांना त्यांच्या माघारी ‘यद् आत्या’ म्हणूनच चिडवीत असत. पण ते कानी पडूनही त्यांच्याकडे पाहण्याच्या यदुनाथजींच्या दृष्टीत वा वागण्यात फरक पडला नाही.
विनोबा म्हणाले होते, माणूस समजावून घ्यायचा असेल तर सणांच्या झरोक्यातूनच त्याला पाहावे लागेल. दर्गुणांच्या भिंतीला धक्के देऊन काहीही साधणार नाही, आपल्या कपाळाला टेंगूळ तेवढे येईल.
इतरांमध्ये चांगले तेवढे पाहायचे किंबहुना तेवढेच पाहायचे. त्यांचे तोंड भरून कौतुक करताना एवढीशीही काटकसर करायची नाही. त्याचवेळी लोकांचा चांगुलपणा आरामशीर राहून उपयोगी नाही. बोलका होऊनही उपयोगी नाही. त्याला संवादी कृतीची पावले फुटायला हवीत यासाठीही ते नेहमी प्रयत्नशील असायचे. शिक्षितांनी भावसाक्षर व्हावे, भावसाक्षरांनी आपली व्याप्ती वाढवावी, त्यांच्या भावनेला विवेकाचा डोळा फुटावा व त्यांच्या पायांमध्ये कृतीची गती यावी यासाठी त्यांच्या वृत्तीचा, वर्तनाचा व लेखनाचा आटापिटा असे.
यदुनाथजींची सहृदयता किती सर्वस्पर्शी असावी? सामाजिक संकेतांनी वर्त्य ठरवलेल्या दोन अनुरक्त जीवांच्या मनोमीलनाचीही काळजी त्यांनाच! ते वैधता किंवा अवैधता पाहात नसत. कारण संकेतांपेक्षा आणि कायद्यापेक्षा माणूस मोठा असल्याचे त्यांनी गृहीत धरले होते. या माणसांच्या मतांचा बागुलबुवा दाखविण्याऐवजी त्यांची मने शिवणे सुसंस्कृत म्हणून त्यांना अधिक अगत्याचे वाटत असे. एरव्ही माणसाचे स्वतःवर प्रेम असते. स्वतःच्या स्वयंकल्पिते प्रतिमेवर त्याहून अधिक असते. पण दुस-याचे अस्तित्व व त्याची अशीच प्रतिमा, याचाही स्वानुभवाने विचार करण्याची गरज त्याला कधी जाणवत नाही.
यदुनाथजींना तेवढेच प्रामुख्याने जाणवायचे. हेच त्यांचे वैशिष्ट्य!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.