पृथ्वीचा कॅन्सर

जमीन, हवा, पाणी या जड पदार्थांसह व विविध प्राणी, वनस्पती, एकपेशीय जीव, यांसह, आपली पृथ्वी हाच एक सजीव पदार्थ आहे ही कल्पना किंवा उपमा आता सर्वमान्य ठरत आहे. या पृथ्वीवरील सर्वच सजीव व निर्जीव घटक एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांवर परिणाम करतात हे आता कोठे आपल्याला समजू लागले आहे. सजीव सृष्टीच्या आगमनापूर्वी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायु अजिबात नव्हता, व कबनडायॉक्साइड भरपूर होता. सजीव वनस्पतींनी सूर्यप्रकाश व क्लोरोफिल यांच्या साहाय्याने त्यातील ब-याचशा कार्बनडायॉक्साइडचे रूपांतर प्राणवायू व कार्बन ह्यांमध्ये करून टाकले व वातावरणात प्राणवायूचे प्रमाण जवळपास एकपंचमांश इतके झाले. म्हणजे सजीव पदार्थांनी निर्जीव पदार्थांवर परिणाम घडवून आणला. या प्राणवायूचा व कार्बनयुक्त पदार्थांचा संयोग घडवून त्यातून निर्माण होणा-या ऊर्जेवर जगणारे व वाढणारे प्राणी मग निर्माण झाले. प्राण्यांनी कार्बनडायॉक्साइड तयार करावा, व तो वापरून वनस्पतींनी पुन्हा प्राणवायू व कार्बन तयार करावा असे परस्परांना उपयुक्त ठरणारे चक्र सुरू झाले.

प्राणी, वनस्पती यांच्या उत्क्रांतीबरोबर जमीन, पाणी, हवा हे देखील उत्क्रांत होत गेले. त्याबरोबर अशी अनेक चक्रे निर्माण झाली व अधिकाधिक गुंतागुंतीची बनत गेली. ही सर्व चक्रे व त्यातील विविध प्रकारचे प्राणी वनस्पती एकमेकांवर अवलंबून असतात, परिणाम करतात. कोळ्याच्या जाळ्याच्या एका धाग्याला जरी धक्का लागला तरी त्याचा कंप सर्व जाळ्याला जाणवतो, तसेच पृथ्वीच्या या पर्यावरणाचे आहे. आपल्या शरीरात जसे एका भागाला टोचले की त्याचे परिणाम सर्व शरीरात दिसतात, एखादे इंद्रिय निकामी झाले किंवा अकार्यक्षम झाले की त्याचे परिणाम सर्व पेशींना भोगावे लागतात, तसेच पृथ्वीच्या पर्यावरणाचे आहे म्हणून या पृथ्वीला एकच सजीव (organism) म्हणणे योग्य वाटत आहे.

प्रशांत महासागरात ‘एल निनो’ हा प्रवाह निर्माण झाला की सर्व जगभर त्याचे परिणाम दिसतात. कोठे भारतात मान्सून बरोबर पडत नाही व दुष्काळ पडतो, तर कोठे युरोपमध्ये अतिवृष्टी होते, तर कोठे मासळीचे दुर्भिक्ष होते. मानवाने ऊर्जानिर्मितीसाठी कार्बन खूप प्रमाणात जाळला की वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण वाढते व ग्रीन हाऊस परिणामाने वातावरणाचे तापमान वाढते व त्यामुळे धुवांवरील बर्फ वितळून समुद्रातील पाण्याची पातळी वाढते. असे अनेक दूरगामी परिणाम अजून माणसाला समजलेलेच नाहीत.

आपल्या शरीरात विविध पेशी असतात. त्वचेच्या पेशी, रक्ताच्या पेशी, मेंदूच्या पेशी, वगैरे. ह्यांतील बहुतेक पेशी ठराविक अवधीनंतर मरण पावतात. त्यांची जागा नवीन निर्माण होणा-या पेशी घेतात. काही पेशी मरणे व त्यांची जागा घेण्यास नवीन पेशी निर्माण होणे यांचा नाजुक समतोल साधलेला असतो, व त्यामुळे प्रत्येक इंद्रियात कार्यक्षमतेस आवश्यक इतक्याच पेशी कायम राहतात
हा समतोल बिघडून एकाच पेशीची अनिर्बध वाढ होत राहिल्यास त्या इंद्रियाची कार्यक्षमता बिघडते, व त्याला आपण नवीन गाठ होणे किंवा ट्यूमर होणे असे म्हणतो. अशा पेशी सर्व शरीरभर पसरू लागल्यास त्याला आपण कॅन्सर म्हणतो. अशा पेशी अनेक रीतीने शरीराला विघातक ठरतात. एक म्हणजे त्या शरीरातील अन्न, ऊर्जा, रक्तपुरवठा, जीवनसत्त्वे यांचा स्वतःकरताच अतिरिक्त वापर करतात व त्यामुळे उर्वरित शरीराला त्यांचा तुटवडा जाणवू लागतो. दुसरे म्हणजे त्या पेशी शरीरातील जागा व्यापतात व इतर पेशींचा कोंडमारा करतात. उदाहरणार्थ अन्ननलिकेत पेशी वाढल्या तर त्या इतकी जागा व्यापतात की अन्न खाली उतरायला जागा राहत नाही. काही प्रकारच्या कॅन्सरच्या पेशी शरीरातील संदेशवाहक अंतःस्राव इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार करून रक्तात सोडतात की शरीरातील इतर पेशींचे किंवा इंद्रियांचे काम बिघडून जाते.

कॅन्सर-पेशींची मात्र भरभराट होत असते. त्यांची संख्या व आकार वाढत असतात. त्यांचा संचार कोणी अडवू शकत नाही, व सर्व शरीरात – मेंदूत, हाडांत, लिव्हरमध्ये फुफ्फुसांत त्यांच्या वसाहती स्थापन होतात व वाढू लागतात. आपल्या अशा अनिर्बध वाढीमुळे व वागण्यामुळे अखेर आपण ज्या शरीरात राहतो त्या शरीराचाच मृत्यु ओढवणार आहे, व त्याबरोबर आपलाही मृत्यु आपण आपल्याच वागण्याने व वाढण्याने ओढवून घेणार आहोत, हे समजण्याइतकी अक्कल मात्र कॅन्सर पेशींना नसते.

पृथ्वीवर देखील विविध घटकांचे प्रमाण व वागणे यांमध्ये एक प्रकारचा सूक्ष्म समतोल साधलेला असतो. हरणे फार वाढली, तर त्यांना मारणा-या वाघांचीही संख्या वाढून हरणांची संख्या काबूत राखली जाते. किंवा हरणे चरून चरून गवत संपवतात व नवीन गवत वाढू देत नाहीत व गवत संपल्यामुळे हरणांची उपासमार होऊन त्यांची संख्या कमी होते. किंवा एका प्रदेशातील हरणांची दाटी प्रमाणाबाहेर वाढल्याने त्यांच्यात विविध रोग, व परोपजीवी प्राणी (जंत वगैरे) यांचे प्रमाण वाढते व हरणांची संख्या कमी होते. किंवा फार गर्दी झाल्याने त्यांच्या आपापसात मारामाच्या फार होतात, व मानसिक संतुलन ढळून प्रजोत्पादन कमी होते. पिलांची काळजी घेणे, त्यांना वाढवणे या गोष्टीही नीट होत नाहीत व परत हरणांची संख्या कमी होते. म्हणजे एकाच प्रकारचा प्राणी किंवा एकाच प्रकारची वनस्पती प्रमाणाबाहेर वाढू नये यासाठी निसर्गात एकच नाही तर अनेक प्रकारची नियंत्रणे असतात व त्यामुळे पर्यावरणाचा तोल तात्पुरता ढळला तरी तो पुन्हा सावरला जातो.
मानवाच्या बाबतीत मात्र ही सर्व नियंत्रणे कुचकामाची ठरली आहेत. मानवाला मिळालेल्या बुद्धीच्या जोरावर त्याने या सर्व नियंत्रणांवर मात केली आहे. त्याला बाह्य शत्रू असा कोणी राहिलेलाच नाही. वाघ, सिंह, विषारी साप यांचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. जंत, जंतू, व्हायरसेस यांच्यावरही सॅनिटेशन, कीटकनाशके, जंतुनाशके, लसीकरण यांच्या साह्याने मात करण्यात आली. देवी, प्लेग, कॉलरा यांच्यासारख्या संहारक साथी इतिहासजमा झाल्या आहेत. एडस्ची साथ मानवेतर निसर्गाच्या दृष्टीने आशादायक वाटत होती. पण मानवाने त्याच्या व्हायरसचा शोध लावून, तो कसा पसरतो याचाही शोध लावून त्याचा प्रसार थांबवण्याची योजना केली आहे.

उपासमारीने, दुष्काळामुळे मानवाची संख्या कमी होईल असे वाटत होते. पण सिंचन-योजना, खते, संकरित बियाणे, जंगलतोड करून तेथे पिके पिकवणे वगैरे उपायांनी धान्योत्पादन लोकसंख्येपेक्षाही वाढते ठेवले गेले आहे. शिवाय धान्याचे साठे, व ते जलद हलवण्याची क्षमता यांमुळे पृथ्वीवर कोठेही दुष्काळ/अतिवृष्टी/वादळ यांमुळे उपासमारीची पाळी आली, तर मानवतावादी जागतिक संस्था लगेच धान्याचे साठे तेथे उपलब्ध करून देतात व दुष्काळात कोणाचाही बळी पडू दिला जात नाही.
घरे बांधून त्यांमध्ये आपल्याला योग्य असे वातावरण निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे, व ऊर्जा निर्मितीच्या विविध प्रकारांमुळे मानव घनदाट जंगले, उष्ण कोरडी वाळवंटे, बर्फमय थंड प्रदेश व प्रसंगी प्राण्यांत बोटीवर ही राहू शकतो. त्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र पसरून त्याने इतर सर्व प्राण्यांना जगणे मुष्कील करून सोडले आहे. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी राहूनही त्याची जनन-क्षमता कमी होत नाही.

अशा रीतीने संख्यावाढीवरची, स्थाननिश्चितीची, सर्व नैसर्गिक नियंत्रणे मानवाने झुगारून दिली आहेत. अनिर्बध संख्यावाढ, नैसर्गिक साधनसंपत्तीचा व जागेचा अतोनात, अविवेकी व आप्पलपोटा वापर, त्यामुळे होणारे बेसुमार प्रदूषण, सर्व पृथ्वीचे सजीव व निर्जीव घटकांचे होणारे नुकसान यांमुळे मानवजात ही पृथ्वीला झालेला कॅन्सर आहे असे म्हणणे सर्वथा योग्य ठरत आहे. मानवामुळे ओझोनचा थर कमी किंवा नष्ट होणे, वातावरणातील कार्बन डायॉक्साइड व मीथेन अशा वस्तूंचे प्रमाण वाढणे, जंगलांचे प्रमाण कमी होणे, सागराची पातळी वाढणे, अनेक जीव-जाती नष्ट होणे असे पृथ्वीचे सार्वत्रिक, गंभीर, दीर्घकाळ टिकणारे व कदाचित कधीच भरून न येणारे नुकसान होणार असे दिसत आहे. पृथ्वीचाच एक सेंद्रिय घटक असलेल्या मानवजातीचाही मृत्यु पृथ्वीच्या मृत्यूबरोबरच होणार असेही दिसत आहे. मानवाने अणु-बाँब, अणु-ऊर्जा-निर्मिती व जैविक अभियांत्रिकी अशा गंभीर मूलगामी परिणाम घडवून आणणाच्या गोष्टींना हात घातल्याने या मानवरूपी कॅन्सरची घातकता अनेक पटींनी वाढली आहे. मानवी शरीरातील कॅन्सरच्या पेशींप्रमाणेच या पृथ्वीच्या कॅन्सरच्या पेशींना म्हणजे बहुतांश मानवी व्यक्तींना, आपण आपल्या कर्तबगारीने’ पृथ्वीचा मृत्यु व त्याबरोबर मानवजातीचाही मृत्यु ओढवून घेत आहो, याची कल्पनाही नाही.

एक आशादायक फरक इतकाच की या मानवरूपी कॅन्सरच्या पेशी बुद्धिवान् आहेत, प्री-प्रोग्रॅम्इ नाहीत. त्या आपल्या वागणुकीत बदल घडवून आणू शकतात. त्यांच्यापैकी काही अल्पसंख्य व्यक्तींना परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव आहे, व या अल्पसंख्य व्यक्ती विविध संपर्कमाध्यमांद्वारे बहुसंख्य मानवी व्यक्तींना जागे करू शकतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.